::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-28 फेब्रुवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष डॉक्टर जो एक अस्थीरोग तज्ञ (Orthopedic Surgeon) आहे, त्याचे विरुध्द तक्रारकर्त्याच्या आईच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करते वेळी निष्काळजीपणा केल्या संबधी मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा आर्डीनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर येथे इलेक्ट्रिशियन पदावर नौकरीत असून त्याला व त्याच्या कुटूंबियानां वैद्दकीय उपचारार्थ केंद्र सरकार तर्फे सी.जी.एच.एस.ची सुविधा मिळते. तक्रारकर्त्याच्या आईला बरेच दिवसां पासून दोन्ही पायाच्या गुडघे दुखीचा आजार होता त्यामुळे ती चालू फीरु शकत नव्हती म्हणून तक्रारकर्त्याने तिला रामेश्वरी, नागपूर येथील सी.जी.एच.एस. दवाखान्यात वैद्दकीय तपासणी करीता नेले होते, त्या दवाखान्यात विरुध्दपक्ष डॉक्टर हे अस्थीरोग तज्ञ म्हणून पॅनेल वर आहेत. त्या दवाखान्यात वैद्दकीय तपासणी केल्या नंतर तेथील डॉक्टरांनी तिला विरुध्दपक्ष डॉक्टर कडे पुढील वैद्दकीय तपासणीसाठी पाठविले. त्यानुसार दिनांक-03/11/2010 रोजी तक्रारकर्त्याने त्याच्या आईला विरुध्दपक्ष डॉक्टरच्या धंतोली येथील दवाखान्यात वैद्दकीय तपासणीसाठी नेले, तपासणीअंती विरुध्दपक्ष डॉक्टरने सांगितले की, तिचे गुडघे बदलविण्याचे ऑपरेशन केले तर तिला आराम मिळू शकतो. विरुध्दपक्ष डॉक्टरने असे पण सांगितले की, डाव्या पायाचा गुडघा जास्त खराब असल्याने त्वरीत त्याची शस्त्रक्रिया करणे जरुरीचे आहे व त्या करीता अंदाजित खर्च रुपये-1,56,000/- रकमेचे अंदाजपत्रक दिले. दिनांक-16/11/2010 रोजी तक्रारकर्त्याच्या आईच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया विरुध्दपक्ष डॉक्टराने केली, शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर तिला जेंव्हा वॉर्ड मध्ये आणण्यात आले, त्यावेळी तक्रारकर्त्याच्या असे लक्षात आले की, विरुध्दपक्ष डॉक्टरने सांगितल्या नुसार डाव्या पायाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया न करता तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया केली परंतु दुस-या दिवशी तक्रारकर्ता दवाखान्यात भेटीसाठी गेला असता त्याच्या आईची तब्येत ठिक होती, त्या दिवशी विरुध्दपक्ष डॉक्टरच्या दवाखान्यात काम करणा-या नर्सने विरुध्दपक्ष डॉक्टरने ठरवून दिल्या प्रमाणे तक्रारकर्त्याच्या आईला एक इंजेक्शन
दिले, त्यानंतर 02 ते 03 मिनिटातच तिला अस्वस्थता जाणवू लागली व थोडया वेळातच ती बेशुध्द पडली. विरुध्दपक्ष डॉक्टरने तिला तपासले असता तिची प्रकृती स्थित असून तिला आय.सी.यु. मध्ये देखरेखी खाली ठेवावे लागेल असे सांगितले, त्यासाठी तिला अर्नेजा हॉस्पीटल, नागपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले. अर्नेजा हॉस्पीटल मध्ये भरती करते वेळी तिच्या पाठीवर एक जखम असल्याचे आढळून आले, जी शस्त्रक्रिये पूर्वी नव्हती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, अर्नेजा हॉस्पिटल, नागपूर येथे तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्यामुळे तिला दिनांक-10/12/2010 रोजी शुअरटेक हॉस्पिटल, नागपूर येथे हलविण्यात आले व तेथेच वैद्दकीय उपचार चालू असताना तिचा दिनांक-22/12/2010 रोजी मृत्यू झाला. तक्रारकर्त्याच्या तक्रारी वरुन पोलीसानीं त्याच्या आईचे शवविच्छेदन शासकीय वैद्दकीय महाविद्दालय व रुग्णालय, नागपूर येथे केले व शवविच्छेदन अहवाला मध्ये मृत्यूचे कारण “Septicemia due to infected wound” असे नोंदविले. पोलीस स्टेशन अधिकारी, धंतोली यांनी तपासा दरम्यान अधिष्ठाता, शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांना तज्ञांचा अहवाल देण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्याची विनंती केली होती, त्यानुसार 04 तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली, सदर समितीने खोलवर चौकशी करुन अहवाल सादर केला व त्या अहवाला नुसार मृत्यूचे कारण तेच सांगितले जे शवविच्छेदन अहवाला मध्ये नमुद केलेले आहे. त्याच प्रमाणे इंडीयन मेडीकल असोसिएशन यांनी सुध्दा तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करुन अहवाल दिला व तेच मृत्यूचे कारण नमुद केले. यावरुन तक्रारकर्त्याच्या आईला जी जखम झाली होती ती तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आणि विरुध्दपक्ष डॉक्टरांच्या दवाखान्यात दिलेल्या चुकीच्या इंजेक्शन मुळे सुध्दा तिचा मृत्यू झाला. विरुध्दपक्ष डॉक्टरांची वैद्दकीय उपचार पध्दती, शस्त्रक्रिया पध्दती निष्काळजीपणाची होती या सर्व आरोपां वरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष डॉक्टरां कडे नुकसान भरपाईची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष डॉक्टरानीं ती मान्य केली नाही.
म्हणून या तक्रारीव्दारे त्याने विरुध्दपक्ष डॉक्टर कडून रुपये-15,00,000/- नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चाची मागणी केली आहे.
03. विरुध्दपक्ष डॉक्टराने आपला लेखी जबाब दाखल करुन त्याच्या कडून कुठलाही निष्काळजीपणा झाला हा आरोप नाकबुल केला. पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याच्या आईची वैद्दकीय तपासणी केल्यावर त्याला सांगितले की, तिचे दोन्ही गुडघे खराब झाले असून दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करुन नविन गुडघे बसविणे गरजेचे आहे आणि त्यासाठी रुपये-1,56,000/- रुपयाचे अंदाजपत्रक दिले होते. विरुध्दपक्ष डॉक्टराने हे कबुल केले आहे की, तक्रारकर्त्याच्या आईच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु हे नाकबुल केले की, डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असताना उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारकर्त्याला ही पूर्ण कल्पना होती की, त्याच्या आईचे दोन्ही गुडघे खराब झाले असून त्यावर उपचार करण्यासाठी विरुध्दपक्ष डॉक्टरचे दवाखान्यात तिला भरती करण्यात आले होते आणि तिचा उजवा गुडघा हा जास्त खराब असल्याने त्यावर पहिल्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. विरुध्दपक्ष डॉक्टरने हे सुध्दा कबुल केले आहे की, शस्त्रक्रियेच्या दुस-या दिवशी तक्रारकर्त्याच्या आईची तब्येत खराब झाल्यामुळे तिला अर्नेजा हॉस्पिटल, नागपूर येथे हलविण्यात आले होते, तेथे विरुध्दपक्ष डॉक्टर प्रत्येक दिवशी तिची प्रकृती पाहण्यासाठी जात होता तसेच रुग्णाच्या नातेवाईकानां कल्पना दिली होती की, तिची तब्येत चांगली नसल्याने तिला आय.सी.यु. मध्ये भरती केलेले आहे आणि तिला श्वास घेण्यामध्ये त्रास होत असल्यामुळे ती बेशुध्दावस्थेत होती. त्यानंतर तक्रारकर्त्याच्या आईला शुअरटेक हॉस्पिटल, नागपूर येथे त्याच्या सांगण्या वरुन हलविण्यात आले, त्या दवाखान्यात तिचा “E.E.G.” काढण्यात आला, ज्यावरुन हे स्पष्ट झाले की, ती पूर्णपणे “Brain-dead” झाली असून ती दुरुस्त होण्याची शक्यता फार कमी आहे तसेच ती बेशुध्दावस्थेत असल्यामुळे तिच्या पाठीला झालेली जखम भरुन निघण्यास विलंब होत होता आणि त्यामुळे तिला संसर्ग झाला होता.
विरुध्दपक्ष डॉक्टरने पुढे असे नमुद केले की, या प्रकरणात पोलीसानीं चौकशी केली होती, ज्यामध्ये त्याचे बयान नोंदविण्यात आले होते. पोलीस चौकशीत विरुध्दपक्ष डॉक्टराने तक्रारकर्त्याच्या आईवर वैद्दकीय उपचार करताना कुठलाही निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाले नसल्याने त्याचे विरुध्द कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. विरुध्दपक्ष डॉक्टराने हे नाकबुल केले की, त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा पाठीच्या जखमे मुळे तक्रारकर्त्याच्या आईचा मृत्यू झाला. तसेच विरुध्दपक्ष डॉक्टरच्या वैद्दकीय उपचारातील निष्काळजीपणामुळे ती जखम झाली होती किंवा चुकीच्या इंजेक्शन मुळे तिचा मृत्यू झाला होता हे नाकबुल केले आहे. सर्व साधारण परिस्थितीत तिची जखम भरुन निघाली असती. पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष हा स्वतः एक ख्यातीप्राप्त अस्थीरोग शल्यविशारद आहे आणि गुडघे बदलविण्याच्या शस्त्रक्रिये मध्ये त्याचा हातखंडा असून त्याने ब-याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमीनार मध्ये भाग घेतलेला आहे तसेच त्याचे पेपर्स, जर्नलस प्रसिध्द झालेले आहेत. अशाप्रकारे तक्रारकर्त्याची तक्रार पूर्णपणे नाकबुल करुन ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष डॉक्टर तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार तसेच विरुध्दपक्ष डॉक्टरचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं यांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री लोकरे तर विरुध्दपक्ष डॉक्टर तर्फे वकील सौ.राजश्री देवानी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. ज्याअर्थी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द त्याच्या आईच्या वैद्दकीय उपचारा दरम्यान निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे, त्याअर्थी या प्रकरणात विरुध्दपक्ष डॉक्टरने केलेली वैद्दकीय उपचार पध्दती बरोबर होती कि नाही या संबधी तज्ञाचे अहवालाची आवश्यकता आहे. या प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने पोलीसानीं चौकशी केली होती आणि त्यावेळी शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील अधिष्ठातानां तक्रारी संबधी चौकशी करुन अहवाल मागितला होता. पोलीसानीं केलेल्या विनंती नुसार तज्ञ डॉक्टरांची एक समिती तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण-04 डॉक्टर्स होते, जे अस्थीरोग विभाग, अनेस्थेशिया विभाग, मेडीसिन विभाग आणि फॉरेन्सीक मेडीसिन या विभागाचे प्रोफेसर आणि एच.ओ.डी. होते, त्या समितीने आपला अहवाल दिला होता. त्यापूर्वी सुध्दा इंडीयन मेडीकन असोसिएशनने 06 डॉक्टरांची एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीचा अहवाल सुध्दा पोलीसांना देण्यात आला होता, त्या दोन्ही समितीचे अहवाल अभिलेखावर दाखल आहेत. त्याशिवाय तक्रारकर्त्याची उलट तपासणी या प्रकरणात घेण्यात आली होती.
06. समितीने दिलेला अहवाल आणि तक्रारकर्त्याची उलट तपासणी याकडे वळण्यापूर्वी काही प्राथमिक वस्तुस्थिती जी वादातीत नाही, ती पहिल्यांदा नमुद करीत आहोत. तक्रारकर्त्याच्या आईला दोन्ही पायांच्या गुडघ्या मध्ये त्रास होता व त्याच्या वैद्दकीय उपचारासाठी ती विरुध्दपक्ष डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली होती, तिला विरुध्दपक्ष डॉक्टरच्या दवाखान्यात दिनांक-15/11/2011 ला भरती करण्यात आले, त्यावेळी भरण्यात आलेल्या “Admission Form” मध्ये हे स्पष्टपणे नमुद केले आहे की, तिच्या दोन्ही गुडघ्या मध्ये “ OSTEOARTHRITIS” आजार आहे. या “Admission Form” वरुन तक्रारकर्त्याची ही तक्रार खोटी ठरते की, त्याच्या आईच्या उजव्या गुडघ्याची चुकीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तक्रारी मध्ये असे कुठेही नमुद केलेले नाही की, तिच्या गुडघ्या वरील शस्त्रक्रिया अपयशी ठरली होती किंवा गुडघ्यावर वैद्दकीय उपचार करताना चुकीची उपचार पध्दती अवलम्बलेली होती किंवा ती शस्त्रक्रिया करण्यास विरुध्दपक्ष डॉक्टर सक्षम नव्हता.
07. तक्रारकर्त्याची तक्रार 02 विशीष्ट मुद्दांवर असून त्यातील पहिला मुद्दा असा आहे की, त्याच्या आईच्या डाव्या गुडघ्या ऐवजी, उजव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शस्त्रक्रियेच्या दुस-या दिवशी तेथील नर्सने जे इंजेक्शन त्याच्या आईला दिले होते, त्यामुळे तिच्या पाठीला जखम झाली होती आणि ती जखम चिघळल्यामुळे तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.
08. तक्रारकर्त्याच्या आईची उजव्या गुडघ्याची जी शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचा विचार करता दाखल कागदपत्रां वरुन असे स्पष्ट दिसून येते की, तिच्या दोन्ही पायाचे गुडघे खराब झाले होते आणि त्यामुळे दोन्ही गुडघे बदलविण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. डिसचॉर्ज समरी (“Discharge Summary”) असे लिहिलेले आहे की, उजवा गुडघा हा जास्त खराब झाला असल्या कारणाने त्यावरील शस्त्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले. तसेच त्याच्या आईचा आजारपणाचा जो ईतिहास (History of patient) लिहिलेला आहे त्यात असे नमुद आहे की, सुरुवातीला उजव्या गुडघ्या मध्ये दुखणे सुरु झाले व पुढे ते डाव्या गुडघ्या मध्ये सुध्दा सुरु झाले. तिचा उजवा गुडघा हा पूर्णपणे निकामी झाला होता, त्यामुळे जरी तिला दोन्ही गुडघे बदलविण्यासाठी विरुध्दपक्ष डॉक्टरच्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते तरी तिच्या उजव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया पहिल्यांदा करण्यात आली होती. तसेच या सर्व
कागदपत्रां वरुन हे पण सिध्द होते की, तक्रारकर्त्याला याची पूर्ण कल्पना होती की, त्याच्या आईचे दोन्ही गुडघे निकामी झालेले आहेत.
09. आता दोन्ही समिती तर्फे दिलेले अहवाल आणि तक्रारकर्त्याची उलट तपासणी याचा विचार करणे योग्य राहिल. शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील समितीने दिलेल्या अहवाला वरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या आईचे दोन्ही गुडघे हे निकामी झाले होते व तिचा उजवा गुडघा जास्त प्रमाणात खराब झाला होता. विरुध्दपक्ष डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णा कडून घेण्यात येणा-या समतीपत्राची (“Consent Form”) प्रत दाखल केली आहे, त्यानुसार तक्रारकर्त्याला व त्याच्या आईला तिच्या उजव्या गुडघ्यावर होणा-या शस्त्रक्रियेची माहिती देण्यात आली होती, या समतीपत्रावर तक्रारकर्त्याचे आईचा आंगठा (Thumb Impression) आणि तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे. उलट तपासणीत जेंव्हा तक्रारकर्त्याला या विषयी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने असे उत्तर दिले की, त्याच्या आईचा आंगठा त्याच्या न कळत आणि तिला काहीही न सांगता घेण्यात आला होता आणि होणा-या शस्त्रक्रिये संबधी कुठलीही माहिती किंवा कल्पना तिला किंवा त्याला देण्यात आलेली नव्हती आणि म्हणून सुरुवाती पासून त्याचे समतीपत्रा विषयी आक्षेप आहे, त्याच्या या उत्तरावर विरुध्दपक्ष डॉक्टरच्या वकिलानीं जेंव्हा त्याला विचारले की, समतीपत्रावर विरुध्दपक्ष डॉक्टरने त्याला काहीही कल्पना न देता त्याची सही आणि त्याचे आईचा आंगठा घेतला होता, या बद्दल त्याने विरुध्दपक्ष डॉक्टरला पाठविलेल्या नोटीस मध्ये किंवा तज्ञ समिती पुढे तसेच तक्रारी मध्ये कुठेही नमुद केले होते काय, यावर तक्रारकर्त्याने “ नकारार्थी” उत्त्र दिलेले आहे. जर त्याचा समतीपत्रावर सुरुवाती पासून आक्षेप होता तर त्याने ही बाब पोलीसानां किंवा तज्ञ समितीला सांगणे अपेक्षीत होते. तसेच तक्रारी मध्ये सुध्दा तसा कुठलाही उल्लेख केलेला नाही. म्हणजेच उलट तपासणीत पहिल्यांदा त्याने वरील आक्षेप घेतला, ज्यावरुन हे स्पष्ट दिसून येते की, त्याने जाणुनबुजून विचार करुन त्याच्या तक्रारीला समर्थन मिळावे म्हणून असा आक्षेप उलट तपासणीत घेतलेला दिसून येतो आणि म्हणून तो आक्षेप स्विकारार्ह नाही.
10. तक्रारकर्त्याच्या वकीलानीं आमचे लक्ष विरुध्दपक्ष डॉक्टरने दिलेल्या शस्त्रक्रियेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाकडे वेधले, जे डाव्या गुडघ्या वरील शस्त्रक्रियेच्या खर्चाचे अंदाजपत्रक आहे, म्हणून तक्रारकर्त्याच्या वकीलानीं असा युक्तीवाद केला की, यावरुन हे स्पष्ट आहे की, शस्त्रक्रिया डाव्या गुडघ्याची व्हावयाची होती परंतु ती उजव्या गुडघ्यावर करण्यात आली आणि यावरुनच विरुध्दपक्ष डॉक्टरचा निष्काळजीपणा सिध्द होतो परंतु हा युक्तीवाद पूर्णपणे चुकीचा आहे, कारण एक तर ते केवळ संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक होते, जे तक्रारकर्त्याला वैद्दकीय खर्चाची प्रतीपुर्ती होण्यासाठी त्याच्या कार्यालयात सादर करणे जरुरीचे होते. दुसरे असे की, जरी थोडया वेळा करीता असे गृहीत धरले की, तक्रारकर्त्याच्या आईच्या डाव्या गुडघ्या ऐवजी उजव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली तरी केवळ त्यामुळे विरुध्दपक्ष डॉक्टरचा निष्काळजीपणा होता असे म्हणता येणार नाही, कारण तक्रारकर्त्याच्या आईचे दोन्ही गुडघे खराब असल्याने ते बदलविण्याची शस्त्रक्रिया जरुरीचे होते हे “Admission Form” आणि समितीचे अहवाला वरुन स्पष्ट दिसते आणि दुसरे असे की, झालेली शस्त्रक्रिया ही अपयशी ठरली होती असे तक्रारकर्त्याने कुठेही म्हटलेले नाही, उलट उजव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती आणि तज्ञ डॉक्टरांचे समितीला त्या शस्त्रक्रियेत कुठलेही चुक आढळून आली नाही. अशाप्रकारे सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर तक्रारकर्त्याच्या या आरोपाशी आम्ही सहमत नाही की,विरुध्दपक्ष डॉक्टरने डाव्या गुडघ्या ऐवजी उजव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करुन काही चुक केली किंवा निष्काळजीपणा केला.
11. पुढे तक्रारकर्त्याने असा आरोप केला की, जी नर्स त्याच्या आईची देखभाल करीत होती, ती कुठलीही प्रशिक्षीत नर्स नव्हती आणि त्याच्या आईला त्या नर्सने जे इंजेक्शन दिले होते ते चुकीचे इंजेक्शन होते ज्यामुळे तिचेवर “Reaction” होऊन तिचा मृत्यू झाला. यासाठी डॉक्टरांचे तज्ञ समितीचा अहवाल वाचून पाहणे जरुरीचे ठरेल. शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील डॉक्टरांचे तज्ञ समितीला पोलीसानीं काही ठराविक प्रश्न विचारुन त्यावर अभिप्राय देण्यास सांगितले होते. ज्या प्रश्नांवर अभिप्राय मागविले होते, ते प्रश्न खालील प्रमाणे आहेत-
प्रश्न क्रं-1) पेशंटवर करण्यात आलेले उपचार व औषधोपचार योग्य होते
काय.
प्रश्न क्रं-2) अयोग्य उपचारांमुळे पेशंटचे पाठीला जखमा झाल्याने तिची
प्रकृती बिघडून पेशंटचा मृत्यू झाला आहे का.
प्रश्न क्रं-3) पेशंटवर शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांचा निष्काळजीपणा
निष्पन्न होत आहे का.
प्रश्न क्रं-4) नेमक्या कोणत्य जखमां मध्ये जंतु संसर्ग झाल्याने पेशंटचा
मृत्यू झाला आहे का.
प्रश्न क्रं-5) तसेच पेशंटवर डॉ.संगतानी हॉस्पीटल, अर्नेजा हॉस्पीटल आणि
शुअरटेक हॉस्पिटल या हॉस्पीटल्स मध्ये केलेले उपचार
एकमेकांशी सुसंगत आहेत का आणि पेशंटचा मृत्यू नक्की
कोणत्या कारणाने झालेला आहे.
शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिलेल्या अहवालात असे लिहिलेले आहे की, तक्रारकर्त्याच्या आईला तिचा उजवा गुडघा पूर्णपणे बदलविण्यासाठी दवाखान्यात भरती केले होते तसेच शस्त्रक्रिये नंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा व्यवस्थीत होती. दिनांक-17/11/2010 म्हणजे शस्त्रक्रिया झाल्याचे दुसरे दिवशी तिने पाठीत, गुडघ्या मध्ये आणि माने मध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यावेळी विरुध्दपक्ष डॉक्टरने “epidural” इंजेक्शन देण्यास सांगितले होते, त्यानुसार नर्स भारती राणा हिने रुग्णाची तपासणी आणि इतर सावधगिरी घेतल्या नंतर तिला ते इंजेक्शन दिले होते, इंजेक्शन दिल्या नंतर 03 ते 05 मिनिटात तिला श्वासोश्वास करण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे तिला त्वरीत अर्नेजा हॉस्पिटल, नागपूर येथे तिच्या जिवाची संपूर्ण दक्षता घेऊन पुढील वैद्दकीय उपचारार्थ पाठविण्यात आले होते, त्या ठिकणी ती अतिदक्षता तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली अतिदक्षता विभागात होती. डॉक्टरांच्या तज्ञ समितीने या सर्व बाबींचा विचार केल्या नंतर खालील प्रश्न अहवाल देण्यासाठी उपस्थित केले होते-
- What is the cause of respiratory distress after giving epidural injection, Sensorcain?
- Whether epidural injection was indicated in the case at that moment?
- Whether this complication occurred due to faulty procedure of giving epidural injection?
- If yes, whether sister on duty was experienced for this procedure?
- If no, whether this complication is expected while giving epidural injection?
- If expected, are there nay preventive measures to be undertaken to avoid such complication? If yes, whether they were taken in this case?
- Whether this complication was treated by taking reasonable care and with reasonable skill?
- As asked by Complainant, whether-
- Whether patient suffered injury on back due to wrong treatment and whether patient died due to illness out of this injury?
- Whether there was negligence of doctor who operate the patient?
- Which injury got infected because of which patient died?
- Whether treatment received at Dr.Sangtani’s Hospital, Dr.Arneja’s hospital & Suretek Hospital is treated to each other? And what is cause of death?
त्या सर्व प्रश्नांवर शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील गठीत तज्ञ डॉक्टरांच्या समितीने जी उत्तरे दिलेली आहेत, त्याचा थोडक्यात गोषवारा असा सांगता येईल की, तक्रारकर्त्याच्या आईला “Epidural Injection” देताना कुठल्याही प्रकारे सदोष पध्दतीचा अवलम्ब झाला नव्हता आणि ते इंजेक्शन फार कमी प्रमाणात (In a small volume) आणि “ low concentration” मध्ये देण्यात आले होते तसेच तिला उत्पन्न झालेल्या श्वासोश्वासाचे त्रासावर संवैधानिक पध्दतीने व काळजीपूर्वक वैद्दकीय उपचार केले होते तसेच पाठीवर जी जखम आढळून आली होती ती शस्त्रक्रिया करताना वापरण्यात आलेल्या “Cautery Plate” च्या भाजण्यामुळे झाली असावी असे मत प्रदर्शित केले होते परंतु तज्ञ डॉक्टरांच्या समिती पुढे विरुध्दपक्ष डॉक्टरने जे बयान दिले होते, त्यात त्याने सांगितले होते की, “Cautery Plate” चा वापर हा मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया करताना केल्या जातो आणि या प्रकरणात त्याने त्या प्लेटचा उपयोग केला नव्हता, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या आईच्या पाठीला झालेली जखम त्या प्लेट मुळे झाली या बद्दल ठोस मत तज्ञ डॉक्टरांच्या समितीने प्रदर्शित केले नाही. परंतु हे पण तेवढेच सत्य आहे की, तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवाला नुसार तक्रारकर्त्याच्या आईच्या पाठीवरील जखम ही तिचे मृत्यूस कारणीभूत नव्हती, ती जखम “In ordinary course of nature” भरुन निघाली असती परंतु ती बेशुध्दावस्थेत असल्या कारणाने
जखम भरण्याच्या प्रक्रियेला विलंब होत होता आणि त्यामुळे जखमध्ये संक्रमण पसरले होते. डॉक्टरांच्या तज्ञ समितीने हा पण निष्कर्ष दिला आहे की, तिचा मृत्यू पाठीवरील जखमे मुळे झाला नव्हता आणि ती जखम शस्त्रक्रिये मुळे सुध्दा झालेली नव्हती. तज्ञ डॉक्टरंच्या समितीच्या निष्कर्षा मध्ये हे सुध्दा स्पष्ट लिहिलेले आहे की, तक्रारकर्त्याच्या आईच्या शस्त्रक्रिये मध्ये विरुध्दपक्ष डॉक्टर कडून कुठल्याही प्रकरणाचा निष्काळजीपणा किंवा चुकीची वैद्दकीय उपचार पध्दती अवलंबिलेली नव्हती.
12. शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समितीचा हा अहवाल तक्रारकर्त्याने कुठेही आव्हानित केलेला नाही किंवा तक्रारी मध्ये सुध्दा या अहवाला विरुध्द काहीही लिहिलेले नाही. तज्ञ समितीचा हा अहवाल तक्रारकर्त्यची तक्रार संपूर्णपणे खोटी ठरवितो. या समितीने जो अहवाल दिलेला आहे, तोच निष्कर्ष आणि अहवाल इंडीयन मेडीकल असोसिएशनने स्थापन केलेल्या 06 डॉक्टरांच्या समितीचा सुध्दा आहे. या दोन्ही समितीचे अहवाला विरुध्द तक्रारकर्त्याने तक्रारीत एकही शब्द लिहिलेला नाही. येथे हे लक्षत घेणे महत्वाचे आहे की, शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर तर्फे पोलीसांच्या सांगण्या वरुन ती समिती स्थापन केली होती, त्या समितीच्या अहवाला वरुन तसेच पोलीस चौकशीत विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द कारवाई करण्या इतपत कुठलाही पुरावा न मिळाल्यामुळे पोलीसानीं त्याचे विरुध्द कुठलीही कारवाई केली नाही.
13. विरुध्दपक्ष डॉक्टरच्या वकिलानीं मा.वरिष्ठ न्यायालयाचे 02 निवाडे या ठिकाणी दाखल केलेले आहेत-
(1) “Kusam Sharma-Versus-Batra Hospital &
Medical Research Cenre”- AIR 2010 S.C.-1050
या निवाडया मध्ये असे ठरविण्यात आले आहे की, शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरने शस्त्रक्रियेची जी उपचार पध्दती वापरली त्याला जर तज्ञ डॉक्टरांच्या समिती कडून मान्यता मिळत असेल तर त्या डॉक्टरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवता येणार नाही. जो पर्यंत डॉक्टर आपली जबाबदारी पूर्णपणे व्यवसायिक कौशल्या नुसार आणि क्षमते नुसार पार पाडतात, तो पर्यंत त्यांचेवर वैद्दकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप लावता येणार नाही.
(2) “Jacob Mathew-Verus-State of Punjab”-(2005)
6 SCC-I
या निवाडया मध्ये वैद्दकीय निष्काळजीपणा केंव्हा होतो किंवा ठरविल्या जाऊ शकतो या मुद्दावर विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. हातातील प्रकरणाची वस्तुस्थिती आणि परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेतले असता वरील दोन्ही निवाडयां मध्ये वैद्दकीय उपचाराचे निष्काळजीपणा संबधीचा जो “Ratio” सांगितला आहे, तो हातातील प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो. तक्रारकर्ता हे सिध्द करण्यास पूर्णपणे अपयशी ठरला की, त्याच्या आईची गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी विरुध्दपक्ष डॉक्टरने चुकीची वैद्दकीय उपचार पध्दती अवलंबिली होती.
14. तक्रारकर्त्यची जर उलट तपासणी वाचली तर त्यावरुन त्याची तक्रार जवळपास पूर्णपणे निःष्प्रभ होते, त्याच्या उलट तपासणी वरुन असे दिसून येते की, त्याला शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिलेल्या अहवाला बाब पूर्ण माहिती होती परंतु समितीने दिलेला अहवाल चुकीचा आहे हे दाखविण्यासाठी पहिल्यांदा त्याने उलट तपासणीत सांगितले. परंतु त्याने हे सुध्दा कबुल केले आहे की, तो समितीचा अहवाल चुकीचा असल्या बद्दल त्याने नोटीस मध्ये किंवा तक्रारी मध्ये उल्लेख केला नाही तसेच पोलीस चौकशी अधिका-याने विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द पुरावा नाही म्हणून कारवाई न केल्याचे विरुध्द तक्रारकर्त्याने वरिष्ठ अधिका-यां कडे तक्रार केली नाही किंवा नोटीस वा तक्रारी मध्ये सुध्दा त्याचा उल्लेख केला नाही.
15. आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याची आई विरुध्दपक्ष डॉक्टरच्या दवाखान्यात दिनांक-15 नोव्हेंबर ते दिनांक-17 नाव्हेंबर, 2010 अशी तीनच दिवस भरती होती. दिनांक-17 नोव्हेंबर, 2010 ला सकाळीच तिला अर्नेजा हॉस्पिटल नागपूर येथे हलविण्यात आले होते आणि तेथून दिनांक-10/12/2010 ल तिला शुअरटेक हॉस्पिटल, नागपूर येथे हलविण्यात आले होते, म्हणजेच जवळपास 02 महिने ती अर्नेजा हॉस्पिटल, नागपूर येथे वैद्दकीय उपचारार्थ भरती होती. तिच्या पाठीला जी जखम आढळून आली ती प्रथम दिनांक-17/12/2010 ला आढळून आली होती, त्यापूर्वी तिच्या
पाठीला जखम नव्हती. वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवाला नुसार ती जखम इतकी गंभिर नव्हती की ज्यामुळे तिचा मृत्यू होऊ शकेल, त्या जखमेवर उपचार अर्नेजा हॉस्पिटल, नागपूर येथे 02 महिन्यांच्या कालावधी मध्ये होत होता, त्या 02 महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर काय वैद्दकीय उपचार झालेत किंवा त्या जखमुळे तिच्या प्रकृतीत काय बिघाड झाला या संबधी कुठलाही पुरावा किंवा भाष्य तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारी मध्ये केलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे तक्रारकर्त्याने अर्नेजा हॉस्पिटल मधील वैद्दकीय उपचार करणा-या कुठल्याही डॉक्टरला या प्रकरणात प्रतिपक्ष म्हणून सामिल केलेले नाही, कारण त्याच्या आईच्या पाठीवरील जखमेवर जे वैद्दकीय उपचार झाला त्या उपचाराचा जास्तीत जास्त काळ हा अर्नेजा हॉस्पिटल, नागपूर येथे व्यतित झालेला होता.
16. वैद्दकीय उपचारा संबधी निष्काळजीपणाचा जर आरोप होत असेल तर तज्ञ डॉक्टरांच्या अहवालाला फार महत्व असते कारण वैद्दकीय उपचार पध्दती बद्दल आणि वैद्दकीय उपचारा मुळे मानवी शरिरात ज्या क्रिया किंवा प्रतिक्रिया होतात या अतिशय तांत्रिक बाबी असल्यामुळे तज्ञांचा अहवाल निकष लावण्यासाठी फार उपयोगी ठरतो. या प्रकरणात डॉक्टरांच्या दोन तज्ञ समितीचा अहवाल असून दोन्ही अहवाला मध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द त्याच्या आईच्या वैद्दकीय उपचारात केलेल्या निष्काळजीपणाच्या आरोपाला कुठल्याही प्रकारे दुजोरा मिळत नाही. तसेच तक्रारकर्त्य कडून दोन्ही समितीच्या अहवालावर कुठलीही हरकत किंवा आक्षेप किंवा आव्हान घेण्यात आलेले नाही.
17. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार केल्या नंतर आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष डॉक्टरवर त्याच्या आईच्या वैद्दकीय उपचारा संबधी निष्काळजीपणाचे केलेले आरोप सिध्द होत नाहीत आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उभवत नाही.
सबब ही तक्रार खारीज होण्यास पात्र असून त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री सुनिल जानराव खोब्रागडे यांची विरुध्दपक्ष डॉक्टर एच.जे. संगतानी, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.