Maharashtra

Ahmednagar

CC/16/209

Natha Ramdas Shinde - Complainant(s)

Versus

Dr. Daman Kashid (Patil) - Opp.Party(s)

Tandale K. J.

18 Jun 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/16/209
( Date of Filing : 12 Jul 2016 )
 
1. Natha Ramdas Shinde
R/o. Nimbalak, Tal. Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr. Daman Kashid (Patil)
Piles Fistula Surgeon & Potvikar Shastrakriya, Opp. Hotel Oberoi, Patrakar Chowk, Nagar-Shirdi Road,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Tandale K. J., Advocate
For the Opp. Party: S.R. Sangale, Advocate
Dated : 18 Jun 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १८/०६/२०२०

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हे निंबळक ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी असुन दिनांक १७-०५-२०१५ रोजी त्‍यांचे नितंबावर गुदद्वाराशेजारी २ ते ३ इंच हरबाराच्‍या दाण्‍याएवढी बेंड (पुरळ) आले होते व त्‍यापासुन वेदना होत असल्‍यामुळे तक्रारदार हा सामनेवाले डॉ. दमन काशीद यांच्‍याकडे दिनांक १७-०५-२०१५ रोजी ओपीडीमध्‍ये उपचारासाठी गेला त्‍यावेळी सामनेवाला याने तक्रारदाराचे बेंड (पुरळ) पाहिले व त्‍यावर सामनेवाले डॉक्‍टर यांनी काही गोळ्या व औषधे दिली व या गोळ्या औषधे घ्‍या, आराम पडला नाहीतर उद्या सकाळी परत या, सदरचे बेंड (पुरळ) दोन टाक्‍याचे ऑपरेशन करून काढून टाकू व ताबडतोब एक तासात तुम्‍हाला डिस्‍चार्ज देऊ असे सांगितले. याप्रमाणे गोळ्या व औषधे घेवुनही तक्रारदाराला आराम मिळाला नाही म्‍हणुन दिनांक १८-०५-२०१५ रोजी सामनेवालेंचे दवाखाण्‍यात गेला असता पुन्‍हा  तक्रारदाराला पाहणी करून सलाईन लावले. तक्रारदाराची तपासणी केली नाही, कोणतीही मेडीकल टेस्‍ट केली नाही, ऑपरेशन जरूरी आहे किंवा नाही याची खात्री केली नाही व प्रमाणित वैद्यकीय पुस्‍तकानुसार निदान केले नाही. महत्‍वपुर्ण निदान करणारी तपासणी सामनेवाले यांनी केली नाही. सामनेवाले यांनी आवश्‍यक त्‍या तपासण्‍या करण्‍यामध्‍ये निष्‍काळजीपणा केला आहे. कोणत्‍याही प्रकारची केमिकल वैद्यकीय चाचणी न करता तसेच लगेच त्‍याच दिवशी दुपारी २.४५ मी. तक्रारदाराचे ऑपरेशन करण्‍याचे ठरवले. तक्रारदार हा ऑपरेशन थेटरपर्यंत स्‍वतःचे पायावर चालत गेला. सामनेवाले यांनी तक्रारदार याचे सदर बेंडावर शस्‍त्रक्रिया करतांना कोणतीही काळजी घेतली नाही, साधी पट्टीही लावली नाही व कोणत्‍याही प्रकारचे टाकेसुध्‍दा लावले नाही फक्‍त सदर जागेवरून छोटासा मासाचा गोळा बाहेर काढला व शस्‍त्रक्रिया करतांना सदरची जागा गुदद्वारापर्यंत फाडत नेली. वास्‍तविक पाहता सदरची जागा ही गुदद्वारापासुन ३ इंच लांबीपर्यंत होती. गुदद्वारापर्यंत जागा फाडण्‍याचे कोणतेही कारण नव्‍हते, त्‍यामुळे तक्रारदाराचे गुदद्वाराला भयंकर इजा झाली. दिनांक १९-०५-२०१५ पासुन तक्रारदाराचे पोट फुगु लागले व अंडाशयाची जागा सुजली व त्‍यामध्‍ये विष तयार होऊन मोठ्या प्रकारचे इन्‍फेक्‍शन तयार झाले. वास्‍तविक पाहता उपरोक्‍त बेंडाचा व अंडाशयाचा व गुदद्वाराचा कोणताही संबंध नसल्‍यामुळे केवळ सामनेवालेचे हजलगर्जी व निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारास जबरदस्‍त  इन्‍फेक्‍शन होऊन तक्रारदारास मरणोप्रांत वेदना झाल्‍या. ऑपरेशननंतर दिनांक १८-०५-२०१५ ते २०-०५-२०१५ पर्यंत सामनेवालेनी तक्रारदाराची कोणत्‍याही प्रकारची तपासणी केली नाही. सामनेवालेकडे प्रशिक्षीत नर्स नव्‍हती व सामनेवाले ही सदर तीन दिवसाचे कालावधीमध्‍ये कोठेतरी निघुन गेले व त्‍यांनी निष्‍काळजीपणा व हलगर्जीपणा केल्‍यामुळे तक्रारदाराचे पुर्ण अंतर्गत शरिरात विष निर्माण झाले व तक्रारदार हा बेशुध्‍द पडला. त्‍यानंतर तक्रारदाराचे नातेवाईकांनी तक्रारदाराला निर्मया हॉस्पिटलमध्‍ये प्रा.लि. चिंचवड पुणे येथे अॅडमिट केले. तेथे तक्रारदार दिनांक २१-०५-२०१५ ते ०७-०७-२०१५ या कालावधीत अंतर्गत रूग्‍ण म्‍हणून दाखल होता. तक्रारदाराचे अंतर्गत ऑर्गन्‍स हे इन्‍फेक्‍शन झाल्‍यामुळे तक्रारदाराचे पोटावर ३ शस्‍त्रक्रिया कराव्‍या लागल्‍या. तक्रारदाराचे गुदद्वारावर दोन वेळा ऑपरेशन करावे लागले. तसेच तक्रारदाराचे अंडाशयाचे दोन वेळा ऑपरेशन करावे लागले. तक्रारदार हा ५० दिवस निर्मया हॉस्‍पीटल येथे अंतररूग्‍ण म्‍हणून अॅडमिट होता. त्‍यावेळेस त्‍याला बरे करण्‍याकरीता त्‍याचे नातेवाईक यांना किमान रक्‍कम रूपये १६,७२,४०९/- हॉस्‍पीटल, मेडीकल, वैद्यकीय चाचण्‍या, डॉक्‍टरांचे अटेंडन्‍स व ऑपरेशन चार्जेस करता खर्च आला हा सर्व खर्च व तक्रारदाराचे शरिराचे व जीवाचे चिरफाड ही केवळ सामनेवालेचे निष्‍काळजी व हलगर्जीपणामुळे झाली. या सर्व परिस्थितीला सामनेवाले हा केवळ एकमेव जबाबदार आहे. तक्रारदार याचेवर झालेल्‍या शस्‍त्रक्रियेमुळे व्‍यवस्थित चालता फिरता येत नाही, तक्रारदार दैनंदिन कार्यविधीही व्‍यवस्‍थतीत करू शकत नाही. नैसर्गिेक विधीही व्‍यवस्‍थीत करू शकत नाही. तक्रारदार हा आजरोजी अपंग अवस्‍थेत जगत आहे. आजही तक्रारदाराचे पोटात व इतर अंगात अचानक त्रास होऊन व काही ठिकाणी सेफ्टीक होऊन पुन्‍हा हॉस्पिटलमध्‍ये जाऊन सदरचे पॉयझन काढावे लागते. अर्जदाराचे पोट  ऑपरेशनमुळे कमजोर झाल्‍यामुळे त्‍यास आजही पोट धरून वाकुन चालावे लागते, तक्रारदाराचे अंडशयावर दोन अवघड प्रकारच्‍या शस्‍त्रक्रिया कराव्‍या लागल्‍यामुळे गुप्‍तंगातील विविध ऑर्गनचे नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारदार यास कायम स्‍वरूपाचे नपुसकत्‍व आले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे जीवनातील आनंद संपला व तक्रारदारास आजही पोट धरून चालावे लागत असल्‍यामुळे त्‍यास संपूर्णपणे अपंगत्‍व (डिसएबलमेंट) आले आहे. तसेच त्‍याची काम करण्‍याची पूर्ण क्षमता संपलेली आहे. अशा परिस्थितीत कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन शिल्‍लक नाही. तक्रारदाराचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तक्रारदार हे वयाने तरूण असुन संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे. या सर्व गोष्‍टीस सामनेवाले हे एकमेव जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिनांक १६-०६-२०१६ रोजी वकिलामार्फत रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठवुन नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये ३४,००,०००/- व त्‍यावर दिनांक १८-०५-२०१५ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे व्‍याज‍ मिळण्‍याची मागणी केली. सदर नोटीस मिळून सामनेवाले दिनांक ०२-०७-२०१६ रोजी उलटपक्षी खोटी व बचावाची नोटीस पाठवीली व कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.

       तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना निर्मया हॉस्पिटल मर्या. चिंचवड, पुणे येथे झालेला एकूण खर्च रूपये १६,७२,४०९/- तसेच तक्रारदाराची काम करण्‍याची क्षमता संपल्‍याने बुडालेले उत्‍पन्‍न व इतर खर्च असे मिळून रूपये  १९,७०,८४०/- असे एकुण रूपये देण्‍याचा हुकुम व्‍हावा. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये ५०,०००/- व सदर रकमेवर बॅंक व्‍याजदराने व्‍याज व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च रूपये ५,०००/- सामनेवालेकडुन मिळावे.   

३.   तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्‍ट्यर्थ नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ५ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण १३ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये दिनांक १८-०५-२०१५ रोजी डॉ. काशिद यांचेकडील प्रिस्‍क्रीप्‍शन, ग्‍लोबल डायग्‍नोस्‍टीक सेंटरचा रिपोर्ट, निर्मया हॉस्‍पीटलचे डिस्‍चार्ज कार्ड, डॉ.संजय देवधर निर्मया हॉस्‍पीटलचे पत्र, तपासणी रिपोर्ट, निर्मया हॉस्‍पीटलचे बील, मेडीकल, सिटी स्‍कॅन, सोनोग्राफी व पॅथॉलॉजी व इतर चाचण्‍यांची बिले, निर्मया हॉस्‍पीटलचे प्रिस्‍क्रीप्‍शन, तक्रारदाराने सामनेवाले यांना दिनांक १६-०६-२०१६ रोजी पाठविलेली नोटीस, तक्रारदारास सामनेवालेला पाठविलेली दिनांक ०२-०७-२०१६ रोजीची नोटीस दाखल केलेली आहे. निशाणी १४ वर तक्रारदाराने सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

४.   सामनेवाले यांनी निशाणी १३ वर त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले हे शिक्षापात्र सर्जन असुन त्‍यांनी निकषाप्रमाणे व परिस्थितीअनुरूप तक्रारदारावर उपचार केले आहेत. सामनेवालेने तक्रारदारावर उपचार करतांना कोणताही निष्‍काळजीपणा केला नाही अथवा सेवेत त्रुटी दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराला नुकसानभरपाई मागण्‍याचा कोणताही अधिकार नाही.  तक्रारदार हे दिनांक १४-०५-२०१५ रोजी गुदद्वाराजवळ ठणकणा-या फोडाकरीता उपचार घेण्‍यासाठी आले होते. त्‍यावेळी त्‍यांचेवर उपचार करून तक्रारदाराने आवश्‍यकतेनुसार उपचार घेण्‍यासाठी यावे असे सांगण्‍यात आले होते. परंतु त्‍यानंतर तक्रारदार सामनेवालेकडे आले नाही. तक्रारदाराने सामनेवालेला कोणतीही रक्‍कम दिलेली नाही त्‍यामुळे तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे नाते निर्माण झालेले नाही. सदर तक्रार कायद्याप्रमाणे चालु शकत नाही. तक्रारदार दिनांक १८-०५-२०१५ रोजी तपासणीसाठी आले असता सामनेवाले यांनी तपासणी करून गुदद्वाराजवळ फोड असल्‍याचे निदान केले व रक्‍ताची तपासणी करण्‍यास सांगितले. सदर बाब तक्रारदाराने दिनांक १८-०५-२०१५ रोजी दाखल केलेल्‍या प्रिस्‍क्रीप्‍शनवरून दिसुन येते. तक्रारदाराने सामनेवाले यांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍यानुसार मेडीकल तपासणी केली नाही. सामनेवालेने तक्रारदाराचे शरीरातील प्रभावीत असलेल्‍या भागातुन ५०० ते ६०० सीसी पस काढले. तक्रारदारावर दिनांक १९-०५-२०१५ रोजी Incision and Drainage ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍यानंतर दिनांक २०-०५-२०१५ रोजी तक्रारदारावर नियमीत उपचार करण्‍यात आले. तक्रारदाराने सामनेवाले यांनी दिलेल्‍या सुचनांचे पालन केले नाही. दिनांक २१-०५-२०१६ रोजी तक्रारदाराचे उदरामध्‍ये त्रास झाला असता त्‍याचेवर उपचार करण्‍यात आले व रक्‍त तपासणी केली असता रिपोर्टमध्‍ये   Retroperitoneal extension of Abscess असे निदान झाले. या रिपोर्टनुसार सामनेवालेने त्‍वरीत तक्रारदाराला CT Scan Abdomen करण्‍यास सांगितले व उच्‍च केंद्रात स्‍थलांतर करण्‍यास सांगितले, त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी अॅम्‍बुलन्‍सची व्‍यवस्‍था करून तक्रारदारास उच्‍च केंद्रात स्‍थलांतरीत केले. सदरची बाब ही तक्रारदारानेही मान्‍य केली आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची मेडीकल प्रोटोकॉलप्रमाणे उपचार केले व काळजी घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे उपचाराबाबत निष्‍काळजीपणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप हे सामनेवालेला त्रास देणेसाठी व सामनेवालेकडुन पैसे उकळण्‍यासाठी केलेले आहे. तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल न करता चुकीची तक्रार सामनेवालेविरूध्‍द दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

     सामनेवाले यांनी नि.१५ वर दस्‍तऐवज यादीसोबत मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांचा Civil Appeal No.3541 of 2002 Dt.17-02-2009 Martin F. D’Souza Verses Mohd. Ishfaq या न्‍यायनिवाड्याची प्रत दाखल केली आहे.

५.   तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा यांचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी केली आहे काय ?

नाही

(३)

तक्रारदार हे सामनेवालेंकडुन नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

नाही

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

६.  मुद्दा क्र. (१) तक्रारदार यांचे नितंबावर गुदद्वाराशेजारी २ ते ३ इंच हरबाराच्‍या दाण्‍याएवढी बेंड (पुरळ) आले होते व त्‍यापासुन वेदना होत असल्‍यामुळे तक्रारदार हा सामनेवाले डॉ.दमन काशीद यांच्‍याकडे दिनांक १७-०५-२०१५ रोजी ओपीडीमध्‍ये उपचारासाठी गेले होते. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे मेडीकल उपचाराबाबतचे कागदपत्र प्रिस्‍कीप्‍शन दाखल केले आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत हे स्‍पष्‍ट होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२ व ३ ) तक्रारदार हे दिनांक १७-०५-२०१५ रोजी सामनेवाले डॉक्‍टर दमन काशीद यांच्‍याकडे उपचारासाठी गेले होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराची तपासणी करून त्‍याला बेन्‍ड झाले असल्‍याने त्‍यांना औषधी व गोळ्या दिल्‍या व आराम पडला नाही तर परत येण्‍यास सांगितले. तक्रारदाराला आराम मिळाला नाही त्‍यामुळे तक्रारदार दुस-या दिवशी दिनांक १८-०५-२०१५ रोजी सामनेवाले यांचे दवाखाण्‍यात गेला. त्‍यावेळी तपासणी केली असता सामनेवाले यांनी त्‍यांना सांगितले की, काही तपासण्‍या करून ऑपरेशन करणे गरजेचे आहे. तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीत असे कथन केले आहे की, सामनेवाले यांनी कोणतीही चाचणी न करता लगेच त्‍याच दिवशी दुपारी २.४५ मी. तक्रारदाराचे ऑपरेशन करावयाचे ठरविले. तसेच शस्‍त्रक्रिया करतांना सामनेवाले यांनी कोणतीही काळजी घेतली नाही. यामुळे तक्रारदाराला खुप त्रास झाला. सामनेवाले यांनी तक्रारदाराची सदरची शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर तक्रारदाराला भयंकर त्रास झाला. त्‍यामुळे दिनांक १९-०५-२०१५ रोजी तक्रारदाराचे पोट फुगु लागले व अंडाशयाची जागा सुजली व त्‍यामध्‍ये विष तयार झाले. तक्रारदाराला हा संपुर्ण त्रास सामनेवाले यांचे हलगर्जी व निष्‍काळजनीपणामुळे झालेला आहे. सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी कथनामध्‍ये  असा खुलासा दिला की, तक्रारदाराची शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर त्‍याला काही तपासणी करण्‍यास सांगितले, परंतु ती त्‍याने केली नाही. तक्रारदाराचा त्रास होत असलेल्‍या भागातुन ५०० ते ६०० सीसी पस काढण्‍यात आले व दिनांक १९-०५-२०१५ रोजी शस्‍त्रक्रिया Incision and Drainage ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. ज्‍या ज्‍या तपासण्‍या शस्‍त्रक्रियेसाठी आवश्‍यक होत्‍या  त्‍या सामनेवाले यांनी तक्रारदारास करण्‍यास सांगितल्‍या व त्‍यानुसार सामनेवाले यांनी उपचार केले. यामध्‍ये सामनेवालेचा कोणताही निष्‍काळजीपणा दिसुन येत नाही. तक्रारदाराने जे कथन केले आहे की, त्‍याचे पोटात इन्‍फेक्‍शन होऊन पोट दुखु लागले व त्‍याबाबत शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर सामनेवालेने निष्‍काळजपीपणा केला ही बाब स्‍पष्‍ट करणेसाठी वैद्यकीय तज्ञाचा अहवाल मागविणे गरजेचे होते. यासाठी तसा अर्ज प्रकरणात दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु तक्रारदाराने तसा कोणताही अर्ज सादर केला नाही किंवा कथन केले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराला त्रास झाला असुन सामनेवालेचा निष्‍काळजीपणा झाला ही बाब मंचासमक्ष स्‍पष्‍ट  झाली नाही. तसेच तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडे उपचारासाठी गेले व त्‍यांनी त्‍याला उपचार व औषधे दिली आहे. त्‍यांनी कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही, तसेच तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीमध्‍ये कथन केले की त्‍यानंतर त्रास झाल्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदाराला पुणे येथील निर्मया हॉस्‍पीटलमध्‍ये  जाण्‍यासाठी अॅब्‍लुन्‍सची व्‍यवस्‍था करून दिली व तक्रारदाराला स्‍थलांतरीत केले, ही बाब सामनेवाले यांनी मान्‍य केली आहे. परंतु यावरून असे सिध्‍द होत नाही की, सामनेवाले यांनी तक्रारदारावर शस्‍त्रक्रिया करतांना निष्‍काळजीपणा केला,  त्‍यामुळे तक्रारदाराला निर्मया हॉस्‍पीटलमध्‍ये जावे लागले. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन हे बाब स्‍पष्‍ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराला उपचार दिलेले आहे व त्‍याबाबतचे बिल प्रकरणात दाखल केलेले आहे. तक्रारदाराने त्‍यानंतर निर्मया हॉस्‍पीटल, पुणे येथे उपचार घेतल्‍याचे कागदपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदारावर शस्‍त्रक्रिया करून तक्रारदाराला शस्‍त्रक्रियेनंतर त्रास वाढला तो सामनेवालेने केलेल्‍या निष्‍काळजपीपणामुळे आहे असे म्‍हणता येणार नाही व निष्‍काळजीपणा केलेबाबत कोणतेही दस्‍त किंवा तज्ञाचा अहवाल प्रकरणात दाखल नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे म्‍हणणे ग्राह्य धरता येणार नाही. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली नाही, तसेच तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई देणेसाठी सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (४ ) : क्रमांक १,२ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.