::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार बचत ठेव कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे बचत खाते क्र. ०८ ची सुविधा घेतली. दिनांक ०२.०१.२०१० रोजी सदर खात्यामध्ये रक्कम रू. १,२५,१०२/- जमा होते. त्याबाबतची नोंद खाते पुस्तकामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांस करून दिली. दिनांक ३०.१२.२०१० रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारास पत्र पाठवून खोटे आरोप केले. तक्रारदार यांनी दिनांक ११.०१.२०११ रोजी सामनेवाले यांना उत्तर पाठवून सदर बचत ठेव सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अदा करावी असे कळविले. परंतु सामनेवाले यांनी सदर रक्कम न दिल्याने तक्रारदार यांनी मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बल्लारपूर यांना दिनांक ०२.०७.२०१३, २९.११.२०१३ व १२.०२.२०१४ रोजी तक्रार देऊन रक्कमेची मागणी केली. परंतु रक्कम न मिळाल्याने दिनांक १२.०३.२०१४ रोजी लेखी नोटीस पाठवून रक्कमेची मागणी केली. सामनेवाले यांनी दिनांक १२.०५.२०१४ रोजी लेखी नोटीसला उत्तर पाठवून रक्कमेबाबत कोणतीच माहिती दिली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी तक्रारदारांस सदर रक्कम व्याजसह अदा करावी तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी, अशी विनंती केली आहे.
३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केला नसून तक्रारीतील मुद्द्याचे खंडन केले. तक्रारदार २००६ पासून प्रभारी व्यवस्थापक पदावर प्रतिमाह मानधन रु. १२००/- स्वीकारून कार्यरत होते. सामनेवाले यांचे २००७-२००९ लेखापरीक्षनामध्ये रु. ८०,९११/- अफरातफर सिध्द झाल्याने दिनांक १८.०३.२०१० रोजी प्रभारी व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला. तक्रारदार यांच्या पासबुकामधील रक्कम सामनेवाले यांच्याकडे जमा नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम रु. १,५३,७३१/- भरण्यास लेखी कळवूनही तक्रारदार यांनी सदर रक्कम अदा केलेली नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व सामनेवाले याचे लेखी म्हणणे, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारास बचत ठेव
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब तक्रारदार सिद्ध करतात काय? होय
२. सामनेवाले तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास
पात्र आहेत कायॽ होय
३. आदेश ? अशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ व २
५. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची बचत खात्यामध्ये जमा असलेली रक्कम सामनेवाले यांच्याकडे जमा नसल्याबाबत वादकथन केले असले तरी त्याबाबत कोणतीही कागदपत्रे मंचात दाखल केली नाहीत. तक्रारदार यांच्याकडून देय असलेल्या रक्कमेच्या वसुलीबाबत सक्षम नायाधीकरनाकडे दाद मागीतल्याबाबतची कागदपत्रे मंचात दाखल केली नाहीत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी अफरातफार केल्याची बाब नमुद केली असली तरी त्याबाबत कागदोपत्री पुरावा मंचात दाखल केला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना लेखी पत्र पाठऊन रक्कमेची मागणी करूनदेखील कोणत्याही न्यायोचित कारनाशिवाय सदर रक्कम अदा केलेली नाही, ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता वैध बचत ठेव करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्यायतत्व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदार यांनी सदर तक्रार बचत ठेव करार सेवेबाबत दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास बचत ठेव कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदार यास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २
६. मुद्दा क्रं. १ व २ मधील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ६६/२०१५ अशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार बचत ठेव कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले यांनी तक्रारदारास, तक्रारदाराचे बचत खाते क्र. ८ मध्ये जमा असलेली रक्कम रु. १,२५,१०२/- दिनांक १२.०३.२०१४ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. १२ टक्के व्याजासह अदा करावी.
४. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना बचत ठेव कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व तक्रार दाखल खर्चापोटी एकत्रित नुकसानभरपाई रक्कम रु. ५०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)