निकाल
(घोषित दि. 05.10.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार यांचा मुलगा ओंकार हा इ.स.2014 मध्ये 6 वर्षाचा होता. त्याला वारंवार ताप येऊन तो आजारी पडत होता म्हणून उपचारासाठी दि.29.11.2014 रोजी त्याला गैरअर्जदार यांच्या श्री रुग्णालय अंबड येथे नेले. गैरअर्जदार यांनी ओंकारला तपासून औषधी लिहून दिली. औषधाचा कोर्स पुर्ण करुन पाच दिवसानंतर परत तपासणीला बोलाविले. तक्रारदार याने दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार मुलाला डोस देण्यास सुरुवात केली. तक्रारदाराच्या मुलाने एक दोन डोस घेतल्यानंतर त्याला विपरीत परीणाम दिसले, मुलाच्या लघवीतून रक्त निघत असल्याचे दिसले त्याच्या जीवास धोका निर्माण झाला. हा प्रकार तब्बल सहा महिने चालू राहीला. दि.27.05.2015 पर्यंत सुध्दा तक्रारदाराच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
तक्रारदार याने दि.29.11.2014 रोजी गैरअर्जदाराची भेट घेतली. त्याच्या मुलाला होत असलेल्या त्रासाबददल सांगितले. त्यानंतर गैरअर्जदार याने मुलाच्या रक्त व लघवीची तपासणी करुन अहवाल आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार याने मुलाच्या रक्त व लघवीचा तपासणी अहवाल दि.01.12.2014 रोजी गैरअर्जदार यांना दाखविला, सदर अहवाल पाहून गैरअर्जदार यांनी सध्या तरी उपचाराची गरज नाही दोन दिवसांनी फरक पडेल असे सांगितले. परंतू दोन दिवसांनीही अपेक्षित बदल घडला नाही. उलट मुलाची प्रकृती जास्त बिघडली त्यामुळे तक्रारदार याने दि.03.12.2014 रोजी त्याचे मुलास परत गैरअर्जदार यांच्याकडे नेले त्यावेळी गैरअर्जदार याने तक्रारदारास व त्याचे मुलास शिवीगाळ केली व दवाखान्यातून हाकलून दिले. औषधोपचार करण्यास नकार दिला म्हणून नाईलाजाने तक्रारदार याने त्याच दिवशी त्याचे मुलाला इलाजाकरता विवेकानंद हॉस्पीटल जालना येथे नेले. परंतू विवेकानंद हॉस्पीटल जालना येथे ही उपचार घेऊन त्याच्या प्रकृतीत फरक पडला नाही म्हणून तक्रारदार याने त्याचे मुलाला निरामय सुपर स्पेशालिस्ट बालरुग्णालय औरंगाबाद येथे नेले. दि.24.12.2014 ते 29.12.2014 पर्यंत तक्रारदाराचा मुलगा सदर दवाखान्यात आंतररुग्ण होता. तेथे वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर तक्रारदाराच्या मुलास थोडे दिवस बरे वाटले पण परत त्याचे लघवीतून रक्त येणेसुरु झाले, म्हणून तक्रारदार याने परत त्याचे मुलास निरामय हॉस्पीटल औरंगाबादयेथे दि.12.01.2015 ते 14.01.2015 या कालावधीत भरती केले. या सर्व प्रकारात तक्रारदारास शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. या सर्व त्रासाला गैरअर्जदार जबाबदार आहे. तक्रारदार याने या प्रकाराबाबत पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रार केली परंतू पोलीसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलीसांनी गैरअर्जदाराकडून तक्रारदाराचे मुलास दिलेल्या औषधाबाबत अभिप्राय मागितला. गैरअर्जदार याने तक्रारदारास कोणतेही सहकार्य केले नाही म्हणून तक्रारदार यांनी दि.27.05.2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली, नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदार याने दि.30.05.2015 रोजी नोटीसचे उत्तर पाठविले, आणि तक्रारदार यांचेकडून भरमसाठ रक्कम नुकसान भरपाई मागितली. वरील सर्व कारणास्तव तक्रारदार याने हा तक्रार अर्ज गैरअर्जदार यांचे विरुध्द दाखल केला आहे.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत जोडलेल्या नि.4 वरील यादीमध्ये लिहीलेले कागदपत्र त्याचे तक्रारीचे पुष्टयर्थ दाखल केलेले आहेत.
गैरअर्जदार यांना नोटीसची बजावणी झाली. त्यानी वकीलामार्फत सविस्तर लेखी जबाब दाख्ंल केला. गैरअर्जदार यांनी त्यांचेवर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यापमाणे दि.29.11.2014 रोजी तक्रारदार याने त्याचा मुलगा ओंकार यास वैद्यकीय उपचाराकरता आणले होते त्यावेळी गैरअर्जदार याने रुग्णाला तपासून योग्य ते उपचार दिलेले आहेत. दि.29.11.2014 नंतर तक्रारदाराच्या मुलास परत कधीही गैरअर्जदार याने उपचार दिलेला नाही. दि.01.12.2014 रोजी डॉ.कपील सोडाणी यांनी दि.03.12.2014रोजी डॉ.राजकुमार सचदेव यांनी व दि.24.12.2014 रोजी निरामय हॉस्पीटल औरंगाबाद येथे तक्रारदार याचे मुलास इलाज करण्यात आले. तक्रारदाराच्या मुलाच्या आजाराची स्थिती गैरअर्जदार यांचेकडे आणण्यापूर्वी खालावलेली होती. गैरअर्जदार याने योग्य उपचार दिल्यामुळे दोन दिवसात सदर स्थितीमध्ये सुधारणा झाली. दि.01.12.2014 रोजी रुग्णाच्या लघवीच्या अहवालावरुन पस सेल्सचे प्रमाण पुर्वी पेक्षा कमी झाल्याचे दिसून येते. याचाच अर्थ, गैरअर्जदार यांनी दिलेला उपचार योग्य होता. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना दमदाटी करुन खंडणीची मागणी केली. पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली, पोलीस स्टेशनमधील संबंधित अधिका-याने तपास करुन तक्रारदाराची तक्रार खोटी असल्यामुळे ती बंद केली. त्यानंतर गैरअर्जदार यास त्रास देण्याकरता चुक व खोटया माहितीवर आधारीत खोटी तक्रार दाखल केली आहे. प्रत्यक्षात तक्रारदाराच्या मुलास गैरअर्जदार यांच्याकडे इलाजाकरता आणण्यापूर्वी तो सहा ते सात दिवस आजारी होता. गैरअर्जदार याने तक्रारदाराच्या मुलावर योग्य ते उपचार केल्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली, परंतू त्यानंतर तक्रारदार याने पुढील उपचार नियमित घेतला नाही व स्वतःच्या मर्जीने मुलाला दुस-या डॉक्टरांकडे नेले. त्यामुळे नंतर घडलेल्या कोणत्याही गोष्टीस गैरअर्जदार जबाबदार नाही. तक्रारदार यांनी गैरअर्जदार याने दिलेले उपचार चुकीचे होते त्यामुळे तक्रारदाराच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. वरील कारणास्तव गैरअर्जदार याने तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज खारीज करण्याची विनंती केलेली आहे.
तक्रारदार याने हे प्रकरण प्रलंबित असताना तज्ञ डॉक्टरांचे मत या प्रकरणात मागविण्याकरता नि.15 प्रमाणे दि.29.12.2015 रोजी अर्ज केला. गैरअर्जदार यांनी सदर अर्ज खोटा आहे त्यामुळे तो नामंजूर करावा असे लेखी निवेदन दिले. त्यानंतर ग्राहक मंचाने सदर अर्ज मंजूर केला व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांना रुग्णाला गैरअर्जदाराने केलेल्या औषधोपचाराबाबत वैद्यकीय बोर्डचा अहवाल पाठविण्याचा आदेश दिला. सदर आदेशाप्रमाणे वैद्यकीय अधिक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी दि.25.01.2016 रोजी त्यांचा सविस्तर अहवाल सादर केलेला आहे.
या प्रकरणात गैरअर्जदार यांनी Mefenamic acid बाबत शास्त्रीय महिती सादर केली आहे. तसेच तक्रारदार यांनी केस लॉ आणि शास्त्रीय माहितीबाबत लेख दाखल केलेला आहे.
या प्रकरणात डॉ.सुधाकर डोईफोडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांची साक्ष नोंदवली आहे, त्याचप्रमाणे तक्रारदार याने साक्षी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
आम्ही तक्रारदाराचा अर्ज आणि गैरअर्जदार यांचा लेखी जबाब काळजीपूर्वक वाचला. दोन्ही बाजुंच्या वतीने दाखल केलेल्या सर्व कागदांचे काळजीपूर्वक परिक्षण केले. त्याचप्रमाणे दोन्ही बाजुंच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार त्याची केस गैरअर्जदाराविरुध्द सिध्द करु शकलेला नाही. हे प्रकरण वैद्यकीय निष्काळजीपणाचे आहे. अशा प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अतिशय काळजी घेणे अत्यावश्यक असते.
तक्रारदार हा त्याच्या आजारी मुलाच्या वैद्यकीय उपचाराकरता गैरअर्जदार यांच्या श्री रुग्णालय अंबड येथे दि.29.11.2014 रोजी घेऊन गेला ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. त्यावेळी तक्रारदार याचे मुलास ताप आला होता. गैरअर्जदार यांनी तक्रारदार याचे मुलाची तपासणी केली व मुलास देण्याकरता औषधी लिहून दिली. गैरअर्जदार याने एकंदर पाच दिवसाच्या औषधाचा कोर्स तक्रारदार याचे मुलास दिला. तक्रारदार याचे म्हणण्याप्रमाणे सदर औषधाचे फक्त दोन डोस त्याचे मुलास दिले. त्यानंतर त्याचे मुलाच्या लघवीतून रक्त येण्यास सुरुवात झाली. सदर त्रास रुग्णाला तब्बल सहा महिने चालू होता. या मुद्यावर गैरअर्जदार यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार त्याचे मुलास घेऊन श्री रुग्णालय अंबड (गैरअर्जदाराकडे) येथे फक्त दि.29.11.2014 रोजीच आला होता, त्यानंतर तो परत गैरअर्जदार यांचेकडे मुलाच्या औषधोपचाराच्या कारणाने आलेला नाही. गैरअर्जदार यांचे असेही म्हणणे आहे की, दि.30.11.2014 रोजी तक्रारदार याचे मुलाच्या लघवीमध्ये 4-5 पस सेल्स असल्याचे निष्पन्न झाले, परंतू दि.01.12.2014 च्या तपासणीमध्ये तक्रारदाराचे मुलाचे लघवीमध्ये पस सेल्सचे अस्तित्व निष्पन्न झाले नाही. या मुद्यावर गैरअर्जदार यांचे वकीलांनी पुष्पक क्लिनिक लॅबोरेटरी अंबड यांच्या दि.30.11.2014 च्या तपासणी अहवालाकडे लक्ष वेधले. त्यामध्ये ओंकार खरात या मुलास श्री बालरुग्णालय यांनी लघवीच्या तपासणीकरता पाठविल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे रुग्णाच्या लघवीमधील पस सेल्सचे प्रमाण 4-5 निष्पन्न झाल्याचाही उल्लेख आहे. त्यानंतर दि.01.12.2014 रोजी वरद पॅथालॉजी लॅबोरेटरी अंबड यांचा ओंकार खरात याच्या तपासणीचा प्रयोगशाळा रिपोर्ट दाखविण्यात आला, त्यावर डॉ.कपील सोडाणी यांनी ओंकार खरात याला तपासणीकरता पाठविल्याचा उल्लेख असून दि.01.12.2014 रोजी ओंकार खरातच्या लघवीमध्ये OCC/HPF इतक्या प्रमाणात पस सेल्स निष्पन्न झाल्याचे लिहीलेले आहे. याचाच अर्थ, दि.30.11.2014 रोजी असलेल्या पस सेल्सचे प्रमाण दि.01.12.2014 रोजी कमी झाले. दि.01.12.2014 रोजी ओंकार खरात यास डॉ.कपील सोडाणी यांनी उपचार दिला असे दिसून येते. आम्ही गैरअर्जदार यांचे वकीलाच्या वरील कथनावर विश्वास ठेवणे उचित आहे असे गृहीत धरतो.
दि.03.12.2014 रोजी ओंकार खरात यास विवेकानंद हॉस्पीटल जालना मधील डॉ.सचदेव यांनी तपासून वैद्यकीय उपचार दिल्याचे केस पेपरचे अवलोकनावरुन दिसून येते. वरील सर्व गोष्टी असे दर्शवितात की, तक्रारदाराचे मुलास फक्त दि.29.11.2014 या दिवशीच गैरअर्जदार यांनी तपासून वैद्यकीय उपचार दिला. त्यानंतर पुढील सहा महिन्याच्या काळात कधीही ओंकार खरात याला तक्रारदार यांनी गैरअर्जदार याचे दवाखान्यात वैद्यकीय उपचार देण्याकरता आणल्याचे दिसून येत नाही. तशा प्रकारचा कोणताही ठोस पुरावा सुध्दा तक्रारदार यांनी ग्राहक मंचासमोर दाखल केलेला नाही.
हे प्रकरण वैद्यकीय निष्काळजीपणाचे असल्यामुळे यामध्ये जे तांत्रीक मुददे उपस्थित होतात, त्यावर तज्ञ डॉक्टरांचे मत घेऊन त्यानुसार योग्य तो निष्कर्ष काढणे आवश्यक असते. या प्रकरणात तक्रारदार यांनी स्वतःहून दि.29.12.2015 रोजी नि.15 प्रमाणे अर्ज दिला व तज्ञ व्यक्तीचे मत मागवावे म्हणून विनंती केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सदर अर्जाला गैरअर्जदार यांनी विरोध केला, तरीही ग्राहक मंचाने न्यायाच्या दृष्टीने उचित राहील म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांचे अधिष्ठाता यांना पत्र देऊन बालरोग विभाग प्रमुख यांचेकडून या प्रकरणामध्ये खरोखरच वैद्यकीय निष्काळजीपणा झाला अथवा नाही या बददलचा अभिप्राय मागविला. त्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयात शासनाने ठरविलेल्या समितीमार्फत योग्य ती चौकशी झाली व अहवाल बनविण्यात आला. सदर अहवाल ग्राहक मंचासमोर नि.20/1 प्रमाणे दाखल आहे.
तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार यांनी त्याचे मुलास जी औषधे दिली, त्यामुळे तक्रारदार याचे मुलाचे दुखणे वाढले व लघवीतून रक्त येण्यास सुरुवात झाली. परंतू तक्रार अर्जात कोणते औषध तक्रारदार याचे मुलास गैरअर्जदार यांनी दिले याचा स्पष्ट शब्दात उल्लेख नाही. परंतू युक्तीवादाच्या वेळेपर्यंत असे स्पष्ट झाले की, तक्रारदाराच्या मुलास मॅफथॅलफोर्ट हे औषध दिल्यामुळे त्याचे लघवीतून रक्त येऊ लागले. याच मुद्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा नि.20/1 (10.03.2016) वरील अहवाल वाचला तर असे दिसून येते की, ओंकार अनिरुध्द खरात याचेवर गैरअर्जदार यांनी केलेले सर्व उपचार यथायोग्य होते आणि सदर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा ढोबळ पुरावा आढळून येत नाही. आमच्या मताने वैद्यकीय महाविद्यालयातील चौकशी समितीचा अहवाल हा गैरअर्जदारास आरोप मुक्त करण्यास पुरेसा आहे.
या प्रकरणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सुधाकर मल्हारराव डोईफोडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्या साक्षीचे दरम्यान त्यांची सविस्तर उलट तपासणी तक्रारदार याचे वकीलांनी केली. सदर उलट तपासणीमध्ये डॉ.डोईफोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की त्यांचा अहवाल खोटा नाही. त्यांनी असेही सांगितले आहे की, ते खोटी साक्ष देत नाहीत. डॉ.डोईफोडे यांनी स्पष्ट शब्दात असे सांगितले की, मॅफथॅलफोर्ट हे औषध रुग्णाला योग्य प्रमाणात देण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनवरुन त्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसत नाही. चौकशी समितीचा अहवाल व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक श्री.डोईफोडे यांची साक्ष सहजासहजी दुर्लक्षीत करता येणार नाही.
गैरअर्जदार यांचे वकीलांनी त्यांच्या पक्षकाराच्या बचावामध्ये 2016 (1) ALL MR (JOURNAL) 64 या निकालपत्राची प्रत दाखल केली आहे. सदर निकालपत्रामधील B या परिच्छेदामध्ये खालीलप्रमाणे निरीक्षण आहे.
(B) Medical Negligence – Guiding principles – Doctor choosing one course of action in preference to other one available – Cannot be accused of negligence if course of action chosen by him acceptable to medical profession.
आमच्या मताने या निकालपत्रातील निरीक्षण हे गैरअर्जदार यास सहाय्य करणारे आहे. तक्रारदार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे एक निकालपत्र त्यांच्या म्हणण्याचे पुष्टयर्थ दाखल केले आहे. त्यामध्ये एका स्त्रीची कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ती गरोदर राहीली. ही गोष्ट कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांचा निष्काळजीपणा दर्शविते. आमच्या मताने सदर प्रकरणातील वस्तुस्थिती व आमच्या पुढे चर्चेत असलेल्या प्रकरणातील वस्तुस्थिती भिन्न आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या निकालपत्राचा तक्रारदाराला हया प्रकरणात फायदा होऊ शकत नाही.
तक्रारदार यांनी त्यांचे कथनाच्या पुष्टयर्थ इंडियन मेडिकल कौन्सिल यांनी डॉक्टरांनी पाळायच्या आचार संहीतेबददलचे कागदपत्र दाखल केले आहेत. परंतू सदर कागदाचा या प्रकरणातील गैरअर्जदार यांनी केलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाबददल प्रत्यक्ष संबंध लावता येत नाही.
आमच्या मताने गैरअर्जदार यांनी फक्त एक दिवसच तक्रारदार याचे मुलावर वैद्यकीय उपचार केला. त्यानंतर सहा महिने तक्रारदार याच्या मुलाला वेगवेगळया वैद्यकीय तज्ञांकडे उपचाराकरता नेण्यात आले. यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार याचे मुलाचे आजारपण कमी जास्त प्रमाणात चालूच राहीले. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी दिलेल्या उपचारानंतर तक्रारदार याचे मुलाच्या लघवीतील पस सेल्सचे प्रमाण 01 डिसेंबर 2014 रोजी कमी झाल्याचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदार याचे मुलास गैरअर्जदार यांनी जो वैद्यकीय उपचार दिला त्यामुळे काही प्रमाणात त्याचे मुलाला त्रास कमी झाला असे दिसते. असे असतानाही गैरअर्जदार यांच्या वैद्यकीय उपचारामुळे तक्रारदाराच्या मुलाची प्रकृती गंभीर झाली असा अरोप करणे उचित नाही. वरील सर्व परिस्थितीत आमचे असे मत आहे की, तक्रारदार हे त्यांचे प्रकरण गैरअर्जदार यांच्याविरुध्द योग्यरितीने सिध्द करु शकले नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांच्या सेवेत त्रुटी आहे, तसेच ते वैद्यकीय निष्काळजीपणास जबाबदार आहे हे सिध्द झालेले नाही. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना