नि.20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 230/2010 नोंदणी तारीख - 1/10/2010 निकाल तारीख - 25/2/2011 निकाल कालावधी - 144 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री भानुदास दत्तात्रय कावरे रा.ओगलेवाडी, ता.कराड जि. सातारा सध्या रा.करवडी, जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री इ.ए.भास्कर) विरुध्द डॉ अनिरुध्द दिक्षीत, रा.दिक्षीत ऑर्थोपेडीक हॉस्पीटल समृध्दी प्लाझा, कृष्णा नाका, स्टेशन रोड, कराड ता.कराड जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री प्रशांत बहुलेकर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे ओगलेवाडी येथील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार यांना दि.2/2/2010 रोजी अपघात होवून त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. म्हणून ते जाबदार यांचेकडे अॅडमिट झाले. जाबदार यांनी तपासणी केलेनंतर हाताचा एक्सरे काढला व त्याला प्लास्टर केले. नंतर औषधे देवून त्याचदिवशी डिस्चार्ज दिला. त्यानंतर पुन्हा काही वेळा अर्जदार हे जाबदार यांचेकडे उपचारासाठी गेले. त्याची संपूर्ण फी त्यांनी जाबदार यांना दिली आहे. त्यानंतर दि. 24/2/2010 रोजी अर्जदार यांचे प्लॅस्टर जाबदार यांनी काढले असता जाबदार यांचे निष्काळजीपणामुळे ते जुळून न आलेचे / वाकडे झालेचे अर्जदार यांचे लक्षात आले. त्यावर जाबदार यांनी अर्जदार यांना चुकीचा सल्ला देवून पुन्हा प्लास्टर केलेशिवाय हात बरा होणार नाही असे सांगितले व आणखी जादा फी घेवून पुन्हा प्लास्टर केले. त्यानंतर फेरतपासणीसाठी अर्जदार हे जाबदार यांचेकडे दि.10/3/2010 रोजी गेले असता जाबदार यांनी प्लास्टरने हात बरा होणार नाही असे सांगून वैद्यकीय सेवा देणेस नकार दिला व प्लास्टर खोलण्यास नकार दिला. त्यानंतर अर्जदार यांनी कराड येथील गुरसाळे हॉस्पीटलमध्ये यांचेकडे तपासणी केली असता त्यांनी हाताचे हाड अद्यापही जुळून न आल्याने डाव्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. अशाप्रकारे जाबदार यांनी योग्य वैद्यकीय सेवा न दिल्यामुळे अर्जदारचे हाताचे हाड जूळून आलेले नाही त्यामुळे अर्जदार यांना मानसिक व शारिरिक नुकसान सोसावे लागत आहे. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु त्यास जाबदार यांनी खोटया मजकूराचे उत्तर पाठविले. सबब नुकसान भरपाईपोटी रु.2,14,000/- व्याजासह मिळावेत, व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदारचे वय 70 वर्षे असून सदरची बाब अर्जदार यांनी नमूद करण्याचे जाणीवपूर्वक टाळलेले आहे. अर्जदार हे प्रथम जाबदार यांचे उपचारासाठी आले तेव्हा त्यांचे ब्लडप्रेशर 180/80 एम.एम.एच.जी. म्हणजे जास्त होते. म्हणून त्यांचे वय व बी.पी.चा विचार करता त्यांचे हाड जुळणार नाही याची स्पष्ट कल्पना जाबदार यांनी अर्जदार यांना दिली होती. जाबदार यांनी अर्जदारचे हाताला प्लास्टर घातले त्यावेळी त्यांना मनगटाचे हाडाचे बरेच तुकडे झालेचे आढळले व तसा उल्लेख जाबदार यांनी केसपेपर व डिस्चार्ज कार्डवर केला आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचेवर वैद्यकशास्त्र संमत उपचार केलेले आहेत. दि.9/2/2010 रोजी सदरचे फ्रॅक्चरची सी.आर्म. इमेज पाहिली असता हाडाची व सांध्याची स्थिती व्यवस्थित असलेचे आढळून आले. त्यावर अर्जदार यांनीही समाधान व्यक्त केले. त्यानंतर पुन्हा तपासणी केलेनंतर अर्जदारचे हाताचे हाड जुळून आले नसल्याचे आढळले त्याचे कारण अर्जदाराच्या फ्रॅक्चरचे स्वरुप व हाडांना वयाप्रमाणे आलेला ठिसूळपणा हे आहे असे अर्जदारना जाबदार यांनी समजावून सांगितले. दि.5/3/2010 नंतर अर्जदार हे जाबदार यांचेकडे उपचारासाठी आले नाहीत. जुलै 2010 मध्ये अर्जदार यांनी पुन्हा जाबदार यांचेशी संपर्क साधलेनंतर जाबदार यांनी त्यांना गेले 4 महिने औषधोपचार व तपासणी चुकविले असलेबाबत सांगितले. अशा प्रकारे अर्जदार हे फेरतपासणीसाठी जाबदारकडे सांगूनही आलेले नाहीत. अर्जदारास झालेल्या दुखापतीबाबत त्याला प्लॅस्टर घालून अचल करणे हीच एकमेव ट्रीटमेंट होती. जाबदार यांनी अर्जदार यांचेवर योग्य प्रकारे उपचार केलेले आहेत, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदार व जाबदारतर्फे अभियोक्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये असे कथन केले आहे की, त्यांचे हातावर प्लॅस्टर करताना जाबदार यांनी निष्काळजीपणे उपचार केल्याने अर्जदार यांचे हाताचे हाड जुळून आलेले नाही. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मत/अहवाल/प्रमाणपत्र याकामी दाखल करणे आवश्यक होते परंतु तसा कोणताही ठोस कागद याकामी अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. तसेच अर्जदार व जाबदार यांनी याकामी जी कागदपत्रे दाखल केली आहेत त्यांचे अवलोकन केले असता जाबदार यांनी अर्जदार यांचेवर उपचार करताना निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब कोठेही दिसून येत नाही. सबब ठोस पुराव्याअभावी अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. 6. या मे.मंचाने याकामी अर्जदार यांचेवरील उपचाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांचेकडे कागदपत्रे पाठवून त्यांचे मत मागविले. जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी सदरचे कागदपत्रांची जिल्हास्तरीय तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे समितीमार्फत तपासणी केली व वैद्यकीय उपचारामध्ये निष्काळजीपणा झालेचे दिसून येत नाही असा निष्कर्ष काढला आहे. सदरचा निष्कर्ष विचारात घेता जाबदार यांनी अर्जदार यांचेवर उपचार करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही ही बाब स्पष्ट होत आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 25/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |