जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २१६/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०४/११/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/०४/२०१३
श्री. प्रशांत रमेश शिरसाठ
वय- ३० वर्षे, धंदा – शिवणकाम
राहणार – ग.नं.६ नवभारत चौक,
ता.जि. धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
डॉ. सुरेंद्र झेंडे,
उ. वय सज्ञान, धंदा- डॉक्टर
राहणार – झेंडे अॅक्सीडेंट हॉस्पीटल ,
रेल्वेस्टेशन जवळ, ता.जि. धुळे. ........... विरूध्द पक्ष
न्यायासन
(मा. अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा. सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील डी.डी. जोशी)
निशाणी १ वरील आदेश
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ. वी.वी. दाणी)
प्रस्तुत तक्रार अर्ज, तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष डॉ.सुरेंद्र झेंडे यांच्या विरूध्द Thylomin ही अप्रमाणित औषधी गोळी दिल्याने नुकसानभरपाई कामी रक्कम रू.१५,००,०००/- लाख मिळणे कामी सदरचा अर्ज दाखल केला आहे.
सदर तक्रार अर्ज हा तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांच्या विरूध्द वैदयकीय निष्काजीपणाबाबत दाखल केलेला आहे. त्यामुळे या मंचाने दि.०४/११/११ रोजी, सन्मानीय सर्वोच्च न्यायालयाने Martin F.D. souza Vs Mohd. Ishfaq या निवाडयात २००९ CTJ 350 (S.C.) यात दिलेल्या निर्देशाप्रमाणे, विरूध्द पक्ष यांनी निष्काळजीपणा केलेला आहे काय ? याबाबत योग्य तो सविस्तर अहवाल येणे कामी जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील हॉस्पीटल धुळे यांच्या तज्ञ डॉ.समीतीकडे अहवाल मिळविण्या कामी दि.०४/११/११ रोजी आदेश करून नोटीस पाठविण्यात आली. सदर नोटीस नि.८ वर दाखल आहे. त्यासोबत तक्रारदारची तक्रार व त्यासंबंधीत कागदपत्रे अवलोकनार्थ पाठविण्यात आले होते.
सदर समितीने त्यांचा दि.०५/०१/२०१२ रोजीचा अहवाल मंचाकडे पोस्टामार्फत सादर केलेला असुन तो नि.१० वर दाखल आहे. सदर अहवाल पाहता त्यामध्ये असे नमुद केले आहे की,''सदर प्रकरणात श्री. प्रशांत रमेश शिरसाठ यांच्यावर उपचार करतांना डॉ.सुरेंद्र झेंडे यांनी निष्काळजीपणा केलेला नाही.’’
सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर व वर नमूद सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयाप्रमाणे मंचापुढे असा मुददा उपस्थित होत आहे की,
मुददा निष्कर्ष
सदरचा तक्रार अर्ज दाखल करून विरूध्द पक्ष
यांना नोटीस काढणेबाबत आदेश होणे बाबत ? नाही
याबाबत अर्जदाराच्या वकिलांनी सदरचा अर्ज दाखल करून विरूध्द पक्ष यांना नोटीस काढण्याबाबत युक्तिवाद केलेला आहे. याबाबत अर्जदाराचे असे म्हणणे आहे की सदरचा तज्ञ समितीचा अहवाल मान्य नसून तक्रार दाखल करून घेण्यात यावी. तसेच या मंचामर्फत दि.०४/११/११ रोजी तज्ञ समितीला नोटीस पाठवितांना त्याच रोजी मूळ अर्जावरती ‘Register the complaint’ असे आदेश केलेले आहेत. याचा अर्थ त्यावेळी असलेल्या अध्यक्षांनी त्यांच्या सहीने सदर तक्रार अर्ज नोंदविण्यात यावा असे आदेश केलेले आहेत व त्यामुळे सदरीची तक्रार ही नोंदविण्यात येऊन दाखल झालेली आहे व सदर तक्रार अर्जास रजिस्टर क्रमांक दिलेला आहे त्यामुळे सदरची तक्रार दाखल करून घेण्याचा मुददा हा राहत नाही. सदरची तक्रार दाखल झालेली असल्याने विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठवावी असा युक्तिवाद केला आहे.
आमच्या मते सदर तक्रार ही वैदयकीय निष्काळजीपणाबाबत असल्या कारणाने व उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयाप्रमाणे डॉक्टरांचा निष्काळजीपणा आहे काय हे सिध्द होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे तज्ञ समितीकडे माहीती पाठवून प्रथम निष्काळजीपणाबाबतचा अहवाल प्राप्त करणे न्यायाचे आहे. त्याप्रमाणे तज्ञ समितीला नोटीस पाठवून अहवाल प्राप्त झालेला आहे. सदर समितीचा अहवाल दाखल झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठविण्यापूर्वी विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार करतांना निष्काळजीपणा केला आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे.
याबाबत आम्ही उपरोक्त मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयाचा आधार घेत आहोत. सदर निवाडयात पुढीलप्रमाणे मत व्यक्त करण्यात आलेले आहे.
We therefore, direct that whenever a complaint is received against a doctor or hospital by the Consumer For a (whether District, State or National) or by the Criminal Court then before issuing notice to the doctor or hospital against whom the complaint was made the Consumer Forum or the Criminal Court should first refer the matter to a competent doctor or committee of doctors, specialized in the field relating to which the medical negligence is attributed, and only after that doctor or committee reports that there is a prima facie case of medical negligence should notice be then issued to the doctor/ hospital concerned.
वरील न्यायनिवाडयातील तत्वांचा विचार होता जर प्रथमदर्शनी वैदयकिय निष्काळजीपणा सिध्द होत असेल तर ग्राहक मंचाने सामनेवाला यांना नोटीस काढावी असे निर्देश दिलेले दिसत आहे.
त्याप्रमाणे सदर अहवाल मंचाकडे प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयाप्रमाणे जर तज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला आहे असे सिध्द झाले असेल तरच सदरचा तक्रार अर्ज दाखल करून घेण्यात येईल. त्याप्रमाणे तज्ञ समितीचा अहवाल मंचात दाखल झालेला आहे, अहवालानुसार सामनेवाला डॉक्टरांनी वैदयकिेय निष्काळजीपणा केलेला नाही असे स्पष्ट मत तज्ञ समीती यांनी दिलेले आहे. सदर अहवालावर समितीच्या सर्व पॅनलवरील एकूण असलेले नऊ तज्ञ डॉक्टरांच्या सहया आहेत. सदर तज्ञांचा अहवाल हा योग्य त्या परिक्षणावरून व चाचणी घेऊन तज्ञांनी दिलेला आहे. त्यामुळे सदरचा अहवालात पुन्हा नव्याने बदल होणे शक्य नाही याचा विचार होता तज्ञसमितीचा अहवाल लक्षात घेणे आवश्यक आहे. वरील निवाडयातील तत्वाचा विचार होता व तज्ञ समितीचा अहवाल लक्षात घेता सामनेवाला यांनी कोणताही वैदयकिय निष्काळजीपणा केला नाही असे सिध्द होत आहे. सबब सामनेवालांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. त्यामुळे सदरच्या केस बाबत विरूध्द पक्ष यांच्या विरूध्द नोटीस काढणे न्यायाचे होणार नाही.
सदर तज्ञ समितीच्या अहवाला प्रमाणे विरूध्द पक्ष यांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. तसेच उपरोक्त न्यायनिवाडयाप्रमाणे सदरीची केस ही दाखल करून घेता येत नाही अशा निर्णयापार्यंत आम्ही आलेलो आहोत.
अर्जदारांच्या वकीलांनी युक्तिवादात केलेल्या दुस-या मुददयाप्रमाणे, सदर तक्रार अर्जात पूर्वीच्या अध्यक्षांमार्फेत सदर तक्रार नोंदविण्याचा आदेश केलेला आहे. असे असले तरी सदरचा आदेश हा तज्ञ समितीला नोटीस काढण्याकामी सदरची तक्रार नोंदवून घेणे गरजेचे होते त्याप्रमाणे केवळ सदरची ही नोंदविण्यात आलेली आहे. मुख्यतः त्यामध्ये ‘‘तक्रार दाखल करून घेतली व विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठवावी’’, असे आदेश केलेले नाही. यावरून असे स्पष्ट होते की सदरचा तांत्रीक मुददा लक्षात घेवून सदरची तक्रार ही केवळ तज्ञ समितीला नोटीस पाठविण्या कामी नोंदविण्यात आली आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तक्रारदाराचा हा मुददा योग्य नाही.
तक्रारदाराच्या वकीलांनी याकामी मा.सर्वोच्च न्यायालय २०१० (६) बॉम्बे सी.आर. १५५ व्ही. किशनराव विरूध्द निखील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व इतर. हा न्यायनिवाडा दाखल केलेला आहे. सदर निवाडयातील कथन लक्षात घेता यामध्ये असे नमुद केले आहे की, ‘’प्रत्येक वैदयकिय निष्काळजीपणाबाबत असलेला तक्रारअर्ज हा निष्काळजिपणाबाबत वैदयकिय अहवाल मिळणेकामी तज्ञ समितीकडे पाठविणे आवश्यक आहे असे नाही’’. तर हे मंचानी प्रत्येक तक्रार अर्जाच्या स्वरूपानुसार त्यांच्या अधिकारात ठरविण्याचे आहे. याबाबतची चर्चा सदर निवाडयात केलेली आहे.
परंतु उपरोक्त तक्रार अर्जात वरीष्ठ न्यायालयाच्या निवाडयाप्रमाणे तज्ञसमितींचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेला निवाडयातील तत्वे वेगळी असल्याने याकामी लागु होत नाही.
वरील सर्व विवेचन तक्रारदार यांचा नि.२ वरील तक्रारअर्ज, नि.५ वरील कागदपत्र, नि.३ वरील शपथपत्र, नि.१० तज्ञ समितीचा अहवाल व युक्तिवाद लक्षात घेता विरूध्द पक्ष यांच्या विरूध्द कोणताही निष्काळजीपणा सिध्द होत नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांना नोटीस काढण्याचा हुकूम रास्त नाही. सबब सदरचा तक्रारी अर्ज निकाली काढणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.