जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १६/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २७/०३/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १५/०१/२०१६
कल्पेश अशोक कुळकर्णी
उ.वय २५, धंदा – काही नाही
रा.शिवशक्ती कॉलनी, धुळे
ता.जि.धुळे ……......... तक्रारदार
विरुध्द
१) डॉ.संजय किसनराव खोपडे
उ.वय ३९, धंदा – डॉक्टर
रा. लोकमान्य हॉस्पीटल्, चाळीसगाव रोड, धुळे
ता.जि.धुळे
२) डॉ.सिध्दार्थ डी. पाटील
उ.वय ३५, धंदा – डॉक्टर
रा. लोकमान्य हॉस्पीटल, चाळीसगाव रोड, धुळे
ता.जि.धुळे ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एस.सी.वैद्य)
(सामनेवालेतर्फे – अॅड.श्री.वाय.जी. गुजराथी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
१. तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त पायावर सामनेवाले यांनी निष्काळजीपणे शस्त्रक्रिया केली आणि त्यामुळे त्यांच्या उजव्या पायास कायमचे अपंगत्व आल्याने सामनेवाले यांच्याकडून रूपये १९,००,०००/- भरपाई मिळावी व त्यावर ११ टक्के नुसार व्याज आणि अर्जाचा खर्च रूपये २०,०००/- मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, दि.०१-०६-२०११ रोजी तक्रारदार यांना अपघात झाला. त्यात त्यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापती होवून हाड फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्यांना सामनेवाले क्र.१ यांच्या लोकमान्य हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. तेथे सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली. सामनेवाले क्र.१ हे ‘लोकमान्य हॉस्पीटल’ नावाने रूग्णालय चालवितात. सामनेवाले क्र.२ हे तेथेच सामनेवाले क्र.१ यांच्या सोबत अस्थी रोगांचा उपचार व शस्त्रक्रिया करतात. दिनांक ०२-०५-२०११ रोजी लोकमान्य हॉस्पीटल येथे सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांच्या पायात स्क्रू टाकून हाडांची शस्त्रक्रिया केली. परंतु ही शस्त्रक्रिया करतांना सामनेवाले क्र.१ व २ यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे तक्रारदार यांच्या पायास गॅंगरीन होवून तो निकामी झाला आणि त्यानंतर तो पाय कापावा लागला. सामनेवाले यांनी त्यांची जबाबदारी टाळण्यासाठी तक्रारदार यांना दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता डिस्चार्ज देवून पुढील उपचारासाठी मुंबई येथील सायन हॉस्पीटल येथे पाठविले. तेथील डॉक्टरांनी गॅंगरीन झाल्याचे सांगितले. परंतु शस्त्रक्रियेसाठी मुख्य डॉक्टर उपलब्ध नसल्याने तक्रारदार हे नाशिक येथील डॉक्टर काकतकर यांच्या आशिर्वाद हॉस्पीटमध्ये आले आणि तेथे दि.०८/०५/२०११ रोजी त्यांचा उजवा पाय गुडघ्याच्या वरपासून कापावा लागला. आजही तक्रारदार यांना काकतकर यांच्या आशिर्वाद हॉस्पीटलमध्ये वारंवार जावून औषधोपचार घ्यावे लागत आहेत आणि वेळोवेळी खर्चही करावा लागत आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी केलेली शस्त्रक्रिया आणि उपचारादरम्यान गॅंगरीन झाल्याने, शस्त्रक्रिया व्यवस्थित न केल्यामुळे आपल्याला कायमचे अपंगत्व आले आहे, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर आपण वेळोवेळी सामनेवाले यांना ‘’माझ्या पायांना मुंग्या येत आहेत, मला चक्कर येत आहेत’’, असे सांगितले. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असेही तक्रारदार यांनी म्हटले आहे. या निष्काळजीपणामुळे आपल्याला ७५ टक्के अपंगत्व आले असून संपूर्ण आयुष्य अंधकारमय झाले आहे. आज नैसर्गिक विधी देखील स्वतःला करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आपले ठरलेले लग्न मोडावे लागले आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांच्या या कृतीमुळे जीवन उध्दवस्त झाले असून तक्रारदाराला यापुढील आयुष्यात काहीएक कामधंदा करता येणे शक्य नाही. त्यामुळे दुस-यावर अवलंबून राहून आयुष्य जगावे लागणार आहे. आपल्याला वृध्द आई-वडील असून, वडील हे धुळे टेक्सटाईल मिल मधून निवृत्त झाले आहे. त्यांना फक्त रूपये ८००/- एवढे निवृत्ती वेतन मिळते. उपचारासाठी रूपये ५,००,०००/- नातेवाईक व मित्रांकडून उसणवारीने घेण्यात आले, असेही तक्रारदार यांनी नमूद केले आहे. आपल्याला एकूण रूपये २५,००,०००/- भरपाई म्हणून मिळायला हवी. मात्र या मंचाचे न्यायीक क्षेत्र आणि अधिकारक्षेत्राचा विचार करता, ही मागणी रूपये १९,००,०००/- एवढ्यावर सिमित करण्यात आली आहे. सबब सामनेवाले यांच्याकडून रक्कम रूपये १९,००,०००/- व सदर रक्कम मिळेपावेतो त्यावर ११% प्रमाणे व्याज आणि सदर अर्जाचा खर्च रूपये २०,०००/- मिळावा, अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत तक्रारदार यांनी नि.३ वर प्रतिज्ञापत्र, नि.५ सोबत सामनेवाले यांना अॅड.एस.सी. वैद्य यांच्यामार्फत दिलेली नोटीस, सामनेवाले यांनी अॅड.वाय.जी.गुजराथी यांचेमार्फत तक्रारदार यांच्या नोटीसीला दिलेले उत्तर, लोकमान्य हॉस्पीटल यांचे उपचाराची व औषधांची देयके, अॅडमिट पेपर, एल.टी.एम.जी. हॉस्पीटल सायन मुंबई येथील उपचाराची कागदपत्रे व औषधांची देयके, डॉ.व्ही.आर. काकतकर, डॉ.हेमंत कोतवाल, डॉ.राजेंद्र ठिगळे यांनी वेळोवेळी केलेले उपचार आणि त्याबाबतची कागदपत्रे, शिवपार्वती मेडिकल प्रतिष्ठानचे देयक, लोकमान्य मेडिकल स्टोअर्स व लोकमान्य मेडिकल शॉपीचे देयक, आाशापुरा मेडिकल आणि जनरल स्टोअर्स व एल.टी.एम. कॉलेज आणि कन्झुमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. यांची देयके, आशिर्वाद युनिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे अहवाल, रामकृष्ण मेडिकल रिसर्च सेंटरचे डिस्चार्ज कार्ड, ऑटो बॉक हेल्थकेअर इंडिया प्रा.लि. चे देयक, नॅशनल जॉब डेव्हलपमेंट सेंटरच्या पावत्या, ओंकार मेडीकलची देयके, अर्पण ब्लड बॅंक, जनकल्याण ब्लड बॅंकेची देयके, श्री. भाऊसाहेब हिरे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांनी दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे नि.५ सोबत पान क्र.१ ते ११९ वर दाखल केलेली आहेत. नि.१४ वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.३१ वर मा.सर्वोच्च न्यायालयातील दिवाणी याचिका क्र.४०२४/२००३ - सविता गर्ग विरूध्द नॅशनल हार्ट इन्स्टीटयूट, हा न्यायनिवाड दाखल केला आहे.
४. सामनेवाले क्र.१ व २ यांनी हजर होवून संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार बेकायदेशीर, लबाडीची आणि अवास्तव स्वरूपाची आहे, त्यामुळे ती कबूल नाही. कायद्याने सुध्दा सदरची तक्रार चालू शकत नाही. सामनेवाले क्र.१ हे लोकमान्य हॉस्पीटल नावाने दवाखाना चालवित असल्याचे व सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचे सोबत अस्थी रोगाचा उपचार करत असल्याचे तक्रारदाराचे कथन खरे नाही. लोकमान्य हॉस्पीटल हे सामनेवाले क्र.१ यांचे स्वतःच्या वैयक्तिक मालकीचे नाही. ते ट्रस्टच्या मालकीचे होते व आहे. तक्रारदार यांची तक्रारीतील कथने अन्यायकारक, बदनामीकारक असून ती कबूल नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, तक्रारदार हा रस्ता अपघातात जखमी झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला दि.०१-०५-२०११ रोजी लोकमान्य हॉस्पीटल मध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ प्रचंड दुखत होते. तेथे मोठया प्रमाणात सूजही होती. त्यामुळे गुडघ्याखालची हालचाल बंद पडली होती. त्यासोबत तक्रारदाराला इतरही शारीरिक इजा आणि शरीरावर ओरखडे होते. सकाळी १०.३० वाजता तक्रारदाराची तपासणी करण्यात येवून तक्रारदाराच्या पायाचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रे मधे ‘Fracture upper end tibia’ ही दुखापत दिसली. सूज असल्यामुळे त्या दिवशी पायाचे ऑपरेशन शक्य नव्हते. त्यामुळे तक्रारदार हा गंभीरच होता. पायाला असलेल्या प्रचंड सूजमुळे ऑपरेशन गुंतागुंतीचे आहे, अशी पूर्ण कल्पना तक्रारदार, त्याचे वडील व नातेवाईकांना दिलेली होती. दुस-या दिवशी दि.०२-०५-२०११ रोजी रात्री १०.३० वाजता इतर सर्व तपासण्या करण्यात येवून पायाची सूज उतरली आहे याची खात्री झाल्यावर अत्यंत आधुनिक पध्दतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करतांना C-QRM या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यात आला. दिनांक ०३-०५-२०११ रोजी तक्रारदाराची प्रकृती अत्यंत उत्तम होती. त्याच्या पायांच्या नसांची नाडीही व स्पंदनेही व्यवस्थित होती. ऑपरेशन नंतर आणि ऑपरेशन पूर्वी दिवसातून तक्रारदाराची ३-४ वेळा तपासणी करण्यात येत होती. तक्रारदाराच्या भिन्न शरीर प्रकृतीमुळे दि.०४-०५-२०११ रोजी सकाळी ८.३० वाजता तपासणीत त्याच्या पायात सूज दिसली. तक्रारदाराच्या पायाच्या नसांची स्पंदने आणि नाडीचा प्रतिसाद यात फरक जाणवल्यामुळे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. रक्त प्रवाह सुरळीत होत नसल्यामुळे त्याला Heparin-5000 हे इंजेक्शन देण्यात आले. त्याच्या शरीरातील अचानक बदलाचे नेमके कारण शोधण्यासाठी कलर डॉप्लर ही अत्यंत आधुनिक तपासणी तातडीने करावी लागेल, असा सल्ला दिला. परंतु तक्रारदारांनी तसे तातडीने न करता नातेकवाईकांशी चर्चा करू द्या, असे बोलून वेळ घालवला. तक्रारदाराच्या नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता त्याच्या पायावर कलर डॉप्लर करण्यात आला आणि लगेच Heparin-5000 चे इंजेक्शन पुन्हा देण्यात आले. जेणेकरून पायाच्या नसांमधील रक्ताभिसरण थांबू नये आणि सुरळीत रहावे, तसेच पाय कापावा लागू नये महणून Cardio Vascular operation हे तातडीने करावे लागेल असे तक्रारदारास लेखी स्वरूपात सांगितले व ती शस्त्रक्रिया धुळ्यात होत नसल्याबाबत पूर्ण कल्पना देवून, ते मुंबईला ताबडतोब करा, त्यात वेळ घलवू नका असा सल्ला देवून, त्याप्रमाणे सायन हॉस्पीटल, मुंबईचे सी.एम.ओ. यांच्यासाठीचे पत्र व त्यासोबत उपचाराचे सर्व पेपर्स दिले. आमच्याकडून कुठलाही विलंब किंवा वैद्यकीय निष्काळजीपणा झालेला नव्हता व नाही. उलट निर्णय घेण्यात तक्रारदारानीच विलंब लावला. मात्र तक्रारदाराने तिथे गेल्यानंतर नेमके काय केले ? कुठल्या डॉक्टरांकडे गेले ? तिथे उपचार काय घेतला किंवा व कसे ? मुंबईला ऑपरेशन न करता नाशिकला का आले ? मुंबईच्या डॉक्टरांनी तसा सल्ला दिला होता का ? किंवा कुठला सल्ला दिला ? तो सल्ला तक्रारदारांनी पाळला का ? नेमके मुंबई व नाशिक येथे काय झाले ? मुंबईला cardio vascular operation केले किंवा कसे ? तेथे तारीख ४,५ व ६ ला उपचार घेतला का किंवा नाही ? इत्यादी अनेक प्रश्नांची माहिती तक्रारदाराजवळ असून तक्रारदारानी त्याचा उल्लेख नोटीसीत हेतुतः केलेला नाही. तसेच या सर्व बाबी माहिती किंवा उल्लेख नोटीसीत आणि/ अगर सदर अर्जात का केला नाही ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देण्याच्या सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. आम्ही दिलेल्या सल्ल्याचे त्यांनी तंतोतंत पालन न केल्यामुळे आणि आम्ही सुचवलेले Cardio Vascular Operation न केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सामनेवाले यांना जबाबदार ठरवता येणार नाही. म्हणून तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करावी, असा बचाव सामनेवाले यांनी केला आहे.
५. आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ सामनेवाले यांनी नि.१३ वर डॉ.सिध्दार्थ डी. पाटील यांचे प्रतिज्ञापत्र, नि.३४ सोबत मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहे, ते पुढीलप्रमाणे आहे.
- २०१५(१) सीपीआर (एनसी) अरूण के. इंजिनीअर विरूध्द डॉ. मिलींद करमरकर
- २०१४(३) सीपीआर ७९१ (एनसी) गायनोलॉजिस्ट व इतर विरूध्द मुचापोथुलानिर्मला
- २०१४(३) सीपीआर ६२७ (एससी) श्रीमती कांता विरूध्द टागोर हार्ट केअर अॅण्ड रिसर्च सेंटर प्रा.लि. व इतर.
- २०१४(१) सीपीआर ५२२ (एनसी) परविण शर्मा विरूध्द अॅनी हार्ट अॅण्ड मेडिकल सेंटर
- २०१३(२) सीपीआर ५१५ (एनसी) ललीता रमेश जैन विरूध्द सारा हॉस्पीटल व इतर
- २०१३(२) सीपीआर २२० (एनसी) राम निहाल व इतर विरूध्द डॉ.सी.जी. अग्रवाल
- २०१२(३) सीपीआर ३०६ (एनसी) स्वाती प्रकाश पाटील विरूध्द किरण वनासरे
- २०१२(१) सीपीआर ३९० सुनील अढे विरूध्द शैलेश पुणतांबेकर
- २०११(१) सीपीआर ३७८ बी.एल. शर्मा विरूध्द असगर शाह
- २०११(२) सीपीआर २१ (एनसी) मोह. अबरार विरूध्द डॉ.अशोक देसाई व इतर.
६. तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले सविस्तर कथन आणि त्यांचे शपथपत्र, तक्रारदार यांच्यावर केलेल्या वैद्यकिय उपचारांचे कागदपत्र, तक्रारदार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद, सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीवर केलेला खुलासा, डॉ. सिध्दार्थ डी. पाटील यांचे शपथपत्र आणि सामनेवाले यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता, या प्रकरणात आमच्यासमोर जे प्रश्न उपस्थित होतात त्यावर आम्ही पुढीलप्रमाणे चर्चा आणि विवेचन करीत आहोत.
७. या प्रकरणासंदर्भात पहिला मुद्दा उपस्थित होतो तो असा की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक ठरतात काय ?
तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन आणि त्याच्या पुष्ट्यर्थ दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी त्यावर केलेला खुलासा, याचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे लोकमान्य हॉस्पीटल या रूग्णालयामध्ये दि.०१-०५-२०११ रोजी दाखल झाले होते आणि त्यांच्या अपघातग्रस्त उजव्या पायावर दि.०२-०५-२०११ रोजी सामनेवाले यांनी शस्त्रक्रिया केली होती, हे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी वैद्यकिय उपचारांची जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्यात सामनेवाले यांच्या लोकमान्य हॉस्पीटलमध्ये करण्यात आलेल्या उपचारांची कागदपत्रे समाविष्ट आहे. या कागदपत्रांवर ‘लोकमान्य हॉस्पीटल’ असा शिरोनामा ठळक दिसून येतो. ही कागदपत्रे सामनेवाले यांनी नाकारलेली नाहीत. सामनेवाले क्र.२ डॉक्टर सिध्दार्थ डी. पाटील यांनी युक्तिवादामध्ये जे स्पष्टीकरण केले त्या वेळीही त्यांनी ही कागदपत्रे नाकारलेली नाहीत. यावरून तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त उजव्या पायावर सामनेवाले यांच्या लोकमान्य हॉस्पीटल या रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, त्यात सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा दिली हे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी जी वैद्यकिय देयके दाखल केली आहेत, त्यावरही सामनेवाले यांचा उल्लेख आहे.
सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी खुलाशात ‘लोकमान्य हॉस्पीटल’ हे सामनेवाले क्र.१ यांच्या स्वतःच्या वैयक्तिक मालकीचे नाही. ते ट्रस्टच्या मालकीचे होते व आहे, असा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याबाबत विचार करता असे स्पष्ट होते की, लोकमान्य हॉस्पीटल हे सामनेवाले क्र.१ यांच्या वैयक्तिक मालकीचे नाही ते ट्रस्टच्या मालकीचे होते व आहे, असे सामनेवाले यांनी म्हटले असले तरी या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी लोकमान्य हॉस्पीटल या संदर्भात जी कागदपत्रे आणि औषधोपचाराची देयके दाखल केली होती, त्यावर ‘लोकमान्य हॉस्पीटल, कनोसा समोर, चाळीसगाव रोड, धुळे. फोन ०२५६२-२४०११२, फॅक्स २४०१०३’ असा शिरोनाम्यात उल्लेख आहे. या व्यतिरिक्त या देयकांवर अथवा कागदपत्रांवर कोणत्याही ट्रस्टचा उल्लेख नाही. कागदपत्रांवर जो शिक्का मारण्यात आलेला आहे त्यावर ‘लोकमान्य हॉस्पीटल’ असे नमूद आहे, त्यावर कोणत्याही ट्रस्ट चा उल्लेख नाही.
सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी खुलाशात ‘लोकमान्य हॉस्पीटल’ हे ट्रस्टच्या मालकीचे आहे, असे म्हटले असले तरी त्याबद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या कागदपत्रांसोबत सामनेवाले यांच्या वतीने अॅड.श्री.वाय.जी. गुजराथी यांनी दि.१८-११-२०११ रोजी पाठविलेला नोटीसीला दिलेल्या उत्तराची प्रत दाखल केली आहे. या नोटीसीतील मुद्दा क्र.२ मध्ये सामनेवाले यांनी असे म्हटले आहे की, ‘आमच्या अशिलापैकी डॉ.संजय खोपडे यांचे लोकमान्य हॉस्पीटल नावाने स्वतःच्या मालकीचा दवाखाना असल्याचे खरे नाही.’ तर मुद्दा क्र.६ मध्ये असे म्हटले आहे की, ‘खरी वस्तुस्थिती अशी आहे की, ‘तुम्ही आमच्या अशिलांच्या लोकमान्य हॉस्पीटल मध्ये तारीख १.५.२०११ रोजी दाखल झालात.’ यावरून ‘लोकमान्य हॉस्पीटल’ हे सामनेवाले क्र.१ यांच्या मालकीचे होते व आहे, हे स्पष्ट होते. सामनेवाले यांच्या वतीने अॅड. श्री.वाय.जी. गुजराथी यांनी दिलेल्या नोटीसीच्या उत्तरामध्ये मुद्दा क्र.६ मध्ये सामनेवाले यांनी लोकमान्य हॉस्पीटल हे सामनेवाले क्र.१ यांच्या मालकीचे होते, हे कबूल केले आहे.
वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांच्या ‘लोकमान्य हॉस्पीटल’ मध्ये दि.०१-०५-२०११ रोजी दाखल झाले, त्यांच्यावर दि.०२-०५-२०११ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली, हे स्पष्ट होते. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वैद्यकिय सेवा दिली हेही स्पष्ट होते. याचाच अर्थ तक्रारदार हे सामनेवाले क्र. १ व २ यांचे ग्राहक आहेत, हे स्पष्ट होते.
८. या प्रकरणात आमच्यासमोर आणखी एक मुद्दा उपस्थित होतो की, तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन, तक्रारदार यांचे शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र आणि त्यासोबत इतर दाखल केलेल्या कागदपत्रावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार करतांना निष्काळजीपणा केला, हे सिध्द होते काय ?
या सदंर्भात विवेचन करतांना असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांना दि.०१-०५-२०११ रोजी अपघात झाला. त्यात त्यांच्या उजव्या पायावर गंभीर दुखापत होवून त्यांचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यावेळी उपचार घेण्यासाठी तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ यांच्या रूग्णालयात भरती झाले. तेथे सामनेवाले क्र.१ व २ यांनी दि.०२/०५/२०११ रोजी तक्रारदार यांच्या उजव्या पायात स्क्रु टाकून हाडाची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया करतांना सामनेवाले क्र.१ व २ यांनी निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे गॅंगरीन होवून आपला पाय गुडघ्याच्या वरपासून काढावा लागला आणि त्यामुळे आपल्याला कायमस्वरूपाचे ७५ टक्के इतके अपंगत्व आले, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन आणि त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून हेही निदर्शनास येते की, दि.०२-०५-२०११ रोजी तक्रारदार यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नंतर दि.०४-०५-२०११ रोजीच्या रात्री ११.३० वाजेपर्यंत तक्रारदार हे सामनेवाले यांच्या रूग्णालयात भरती होते. दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता तक्रारदार यांना तेथून हलविण्यात (डिस्चार्ज) आले.
सामनेवाले क्र.१ व २ यांच्या सल्ल्यानुसार तक्रारदार हे मुंबई येथील सायन रूग्णालयात भरती झाले. दि.०५-०५-२०११ ते दि.०७-०५-२०११ या कालावधीत तक्रारदार हे मुंबई येथील रूग्णालयात भरती होते. दि.०७-०५-२०११ रोजी तक्रारदार हे नाशिक येथील डॉ.विजय काकतकर यांच्या आशिर्वाद हॉस्पीटल येथे दाखल झाले. तक्रारदार यांच्या उजव्या पायात गॅगरिंन झाल्यामुळे दि.०८-०५-२०११ रोजी नाशिक येथे डॉ.काकतकर यांच्या रूग्णालयात तो गुडघ्याच्या वरपासून कापावा लागला.
तक्रारदार यांनी नि.५ सोबत पान क्र.१ ते ११९ अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात सामनेवाले क्र.१ व २ यांच्या लोकमान्य हॉस्पीटल, मुंबई येथील एल.टी.एम.जी. हॉस्पीटल सायन, नाशिक येथील डॉ.विजय काकतकर यांच्या आशिर्वाद हॉस्पीटलमध्ये करण्यात आलेल्या उपचारांच्या आणि शस्त्रक्रियेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. त्याच बरोबर धुळे येथील साई डायग्नोस्टिक, मुंबई येथील एल.टी.एम.जी. हॉस्पीटल सायन, मुंबई येथील मेट्रो केअर डायग्नोस्टिक सेंटर, मुंबई येथील ओम डायग्नोस्टिक सेंटर, नाशिक येथील रामकृष्ण मेडिकल रिसर्च सेंटर, डॉ.हेमंत जे. कोतवाल, आशिर्वाद युनिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, डॉ.राजेंद्र ठिगळे, डॉ.विजय मानेकर कॉस्मेटिक लेसर सेंटर, ओटो बॉक क्वॉलिटी हेल्थकेअर इंडिया प्रा.लि. यांच्याकडे करण्यात आलेल्या निरनिराळ्या तपासण्या आणि उपचारासंबंधीची कागदपत्रे समाविष्ट आहेत.
तक्रारदार यांना दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता सामनेवाले यांच्या रूग्णालयातून मुंबई येथील सायन रूग्णालयात हलविण्यात आले. सामनेवाले यांनी दोन पत्र सायन येथील रूग्णालयासाठी तक्रारदार यांच्यासोबत दिली होती. त्याची प्रत नि.५ सोबत पान क्र.१४ व १५ वर दाखल आहे. तक्रारदार हे दि.०५-०५-२०११ रोजी मुंबई येथील सायन रूग्णालयात पोहोचल्यावर तेथे त्यांच्या सविस्तर तपासण्या आणि काही उपचार करण्यात आले. दि.०५-०५-२०११ ते दि.०७-०५-२०११ या कालावधीत तक्रारदार हे मुंबई येथील सायन रूग्णालयात भरती होते. त्यावेळी त्यांच्या ज्या निरनिराळ्या तपासण्या करण्यात आल्या त्याबाबत वेळोवेळी तपासण्या करणा-या तज्ञ डॉक्टरांची मते आणि उपचारासंदर्भात नोंदी नि.क्र.५ सोबत पान क्र.१६ ते ३६ आणि पान क्र.५२ ते ५८, पान क्र.६६ ते ६६ यावर दाखल आहेत. या कागदपत्रांवरील नि.५ सोबत पान क्र.१६ वर पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.
तर पान क्र.१७ वरील नोंदीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.
पान क्र.१८ वरील नोंदीत पुढीलप्रमाणे उल्लेख केलेला आहे.
पान क्र.२० वरील नोंदीत पुढीलप्रमाणे उल्लेख केला असल्याचे दिसते.
पान क्र.२२ वरील नोंदीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.
तर पान क्र.२३ वर तज्ञ डॉक्टरांनी उपचारासंबंधी मत व्यक्त केले आहे.
पान क्र.२५ वरही तज्ञ डॉक्टरांनी पुढीलप्रमाणे नोंद केली असल्याचे दिसून येते.
पान क्र.३२ वर पुढीलप्रमाणे नोंदी आढळून येतात.
पान क्र.३४ वर खालीलप्रमाणे नोंदी केल्या असल्याचे दिसते.
पान क्र.३६ वर डॉक्टरांनी गॅगरींनविषयी सष्टपणे नोंद केलेली दिसते.
यावरून असे दिसून येते की, तक्रारदार यांना दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता सामनेवाले यांच्या रूग्णालयातून मुंबई येथील रूग्णालयात हलविण्यात आले. दि.०५-०५-२०११ रोजी तक्रारदार हे मुंबई येथील सायन रूग्णालयात भरती झाले. तेथे त्यांची तपासणी करीत असतांना त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या पायात गॅंगरीन निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. वर ज्या कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या सर्व कागदपत्रांमध्ये तक्रारदार यांच्या पायात गॅगरींनची शक्यता असून तो कापावा लागेल, असा सल्ला किंवा संकेत देण्यात आल्याचा दिसतो. दि.०१-०५-२०११ ते दि.०४-०५-२०११ रोजीच्या रात्री ११.३० वाजेपर्यत तक्रारदार हे सामनेवाले यांच्या रूग्णालयात भरती होते. दि.०२-०५-२०११ रोजी सामनेवाले यांनी त्यांच्या अपघातग्रस्त पायावर शस्त्रक्रिया केली. दि.०३-०५-२०११ रोजी तक्रारदार यांची प्रकृती उत्तम होती, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. तर दि.०४-०५-२०११ रोजी तक्रारदार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबई येथील सायन रूग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात व तक्रारदार यांना अॅड.वाय.जी. गुजराथी यांच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसीतही हा महत्वाचा उल्लेख केला आहे. सामनेवाले यांचे त्यांच्या खुलाशात व अॅड.वाय.जी. गुजराथी यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसीत असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांच्या पायावर Cardio Vascular operation तातडीने करावे लागेल, असा सल्ला त्यांना दिला होता आणि या शस्त्रक्रियेसाठी तक्रारदार यांना मुंबई येथे जाण्याचा सल्ला दिला होता. तथापि, तक्रारदार यांनी नि.५ सोबत दाखल केलेल्या पान क्र.३२ वरील नोंदीत तक्रारदार यांच्यावर अशी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही, असे मत सायन हॉस्पीटल मुंबईतील तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अॅड.वाय.जी. गुजराथी यांच्या मार्फत दि.१८-११-२०११ रोजी पाठविलेल्या नोटीसीत मुद्दा क्र.८ मध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे.
‘‘तुमच्या भिन्न शरीर प्रकृतीमुळे ४.५.२०११ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या तपासणीत तुमच्या पायात सूज दिसली. तुमच्या पायाच्या नसांची स्पंदने आणि नाडीचा प्रतिसाद यात फरक जाणवल्यामुळे आमच्या अशिलांनी ताबडतोब त्यांच्या तपासण्या, त्यात रक्तप्रवाह सुरळीत होत नसल्याबद्दल ते सुरळीत करण्यासाठी Heponin-५००० हे प्रभावी औषध इंन्जेक्शनद्वारे दिले. आणि त्याचे नेमके कारण शोधण्यासाठी कलर डॉप्लर ही अत्यंत आधुनिक तपासणी तातडीने करा असा सल्ला दिला. (मात्र तुम्ही तसे तातडीने न करता, नातेवाईंकाशी चार्चा करू द्या असे बोलून दुपारी ४.०० वाजेपर्यंत वेळच घालवला. शेवटी आमचे अशील रागवल्यावर ५.३० वाजता ती कलर डॉप्लर करण्यात आला. त्याचा अहवाल आमच्या अशिलांना ७.३० वाजता प्राप्त झाला) आणि लगेच Heponin ५००० चे इंजेक्शन पुन्हा देण्यात आले जेणेकरून पायाच्या नसांमधील रक्ताभिसरण थांबू नये आणि सुरळीत रहावे, तसेच पाय कापावा लागू नये म्हणून Cardio Vascular operation हे तातडीने करावे लागेल असे तुम्हांस लेखी स्वरूपात सांगितले व ती शस्त्रक्रिया धुळ्यात होत नसल्याबाबत पूर्ण कल्पना देवून, ते मुंबईला ताबडतोब करा, त्यात वेळ घालवू नका असा सल्ला देवून, त्याप्रमाणे सायन हॉस्पीटल, मुंबईचे सी.एम.ओ. यांच्यासाठीचे पत्र व त्यासोबत उपचाराचे सर्व पेपर्स, घेतलेल्या टिप्पण, नोटस, एक्सरे रिपोर्ट, कलर डॉप्लर रिपोर्ट इत्यादी सर्व तुमच्या ताब्यात देवून, ऍम्बुलन्सने तुम्हांस मुंबईला शिफट करण्यासाठी डिसचार्ज दिला. या सर्व प्रकारात आमच्या आशिलांकडून कुठलाही विलंब किंवा वैद्यकीय निष्काळजीपणा झालेला नव्हता व नाही. उलट निर्णय घेण्यात तुम्हीच विलंब लावला.’’
सामनेवाले यांच्या वरील विधानावरून असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचा पाय कापावा लागू शकतो याची शक्यता सामनेवाले यांना आली होती, मात्र त्याबाबत त्यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार करतांना कोणताही उल्लेख केला नाही. त्याच बरोबर Cardio Vascular operation हे तातडीने करावे लागेल असे तक्रारदार यांना लेखी स्वरूपात सांगितले व ती शस्त्रक्रिया धुळ्यात होत नसल्याबाबत पूर्ण कल्पना दिली, असे सामनेवाले यांनी त्यांच्या नोटीसीत कथन केले आहे. मात्र तक्रारदार यांना तोंडी अथवा लेखी दिल्याबाबत व अशी शस्त्रक्रिया धुळ्यात होत नसल्याबद्दल कोणताही पुरावा सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीच्या मुद्दा क्र.५ मध्ये पुढीलप्रमाणे कथन केले आहे.
“जाबदेणार नं.१ व २ यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान गॅगरींन झाल्यामुळे व ऑपरेशन व्यवस्थित न झाल्यामुळे अर्जदाराची नस जाब देणार नं.१ व २ यांनी स्क्रु कसतांना निष्काळजीपणा करून घट्ट कसली. अर्जदाराने वेळोवेळी “माझ्या पायांना मुंग्या येत आहेत, मला चक्कर येत आहेत,” असे सांगितले, परंतु पट्टी घट्ट झाली आहे. असे जाबदेणार नं.१ व २ यांच्या चुकीमूळे अर्जदाराचा उजवा पाय मांडीपासुन कापावा लागला. त्यामुळे अर्जदारास ७५% अपंगत्व आली आहे.,”
याबाबत सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी खुलाशात किंवा युक्तिवादात समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही.
दिनांक ०५-०५-२०११ ते दि.०७-०५-२०११ या कालावधीत तक्रारदार हे मुंबई येथील सायन रूग्णालयात भरती होते. तेथे त्यांचा पाय कापावा लागण्याची शक्यता आहे, याबाबतची माहिती तक्रारदार यांना तेथील डॉक्टरांनी दिली होती याबाबतची नोंद तक्रारदार यांनी नि.५ सोबतच पान क्र.९ ते ११९ दरम्यान दाखल केलेल्या कागदपत्रांत दिसून येते. तथापि, अशी शस्त्रक्रिया करण्याकरिता डॉक्टर त्वरीत उपलब्ध होत नसल्यामुळे तक्रारदार यांना नाशिक येथील डॉ.विजय काकतकर यांच्या आशिर्वाद रूग्णालयात हालविण्यात आले. दि.०८-०५-२०११ रोजी त्यांचा उजवा पाय घुडघ्याच्या वरपासून कापवा लागला, हे दाखल कागदपत्रांवरून दिसून येते. डॉ.विजय काकतकर यांनी तक्रारदार यांची दि.०७-०५-२०११ रोजी जी तपासणी केली व ज्या नोंदी नोंदविल्या, त्याबाबतचे कागदपत्र नि.५ सोबत पान क्र.६९ ते ७२ वर दाखल आहे. या कागदपत्रांमध्ये पुढीलप्रमाणे नोंद केली असल्याने दिसून येते.
तक्रारदार यांनी नि.क्र.५ सोबत अन्य जी कागदपत्रे दाखल केली आहेत, त्यातील नोंदी पुढीलप्रमाणे आहेत.
वरील सर्व कागदपत्र, तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन, सामनेवाले यांचा खुलासा, तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले यांच्यातर्फे डॉ.सिध्दार्थ डी. पाटील यांचे शपथपत्र, तक्रारदार यांच्या वतीने अॅड.श्री.एस.सी.वैद्य यांनी केलेला युक्तिवाद, सामनेवाले यांच्यावतीने अॅड.श्री.वाय.जी. गुजराथी यांनी केलेला युक्तिवाद, सामनेवाले क्र.२ यांनी युक्तिवादात दिलेली माहिती या सर्वांचा विचार करता, तक्रारदार हे दि.०१-०५-२०११ रोजी सामनेवाले क्र.१ व २ यांच्या रूग्णालयात भरती झाले. दि.०२-०५-२०११ रोजी सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांच्या पायात स्क्रू टाकून शस्त्रक्रिया केली. दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता तक्रारदार यांना मुंबई येथील सायन रूग्णालयात हालविण्यात आले. दि.०५-०५-२०११ व दि.०६-०६-२०११ या दिवशी तक्रारदार यांच्या मुंबई येथील रूग्णालयात वेळोवेळी तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांच्या पायात गॅंगरीन पसरत असल्याचे दिसून आले व त्यानंतर दि.०८-०५-२०११ रोजी तक्रारदार यांचा उजव्या पाय गुडघ्याच्या वरपासून कापण्यात आला. ही शस्त्रक्रिया नाशिक येथील डॉ.विजय काकतकर यांच्या आशिर्वाद हॉस्पीटलकडे करण्यात आली, हा घटनाक्रम दिसून येतो. त्याच बरोबर हेही स्पष्ट होते की, दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता तक्रारदार यांना सामनेवाले यांनी मुंबई येथे हालविण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी त्यांच्या पायाला गॅंगरीन पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. दि.०५-०५-२०११ रोजी तक्रारदार हे मुंबई येथील रूग्णालयात दाखल झाले त्यावेळी त्यांची तपासणी करण्यात आली, त्याच्यातही गॅंगरीन पसरत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील कागदपत्र नि.क्र.५ सोबत पान क्र.१६,१७,१८,२०,२२,२३,२५ वर दाखल आहेत.
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अॅड.वाय.जी. गुजराथी यांच्यातर्फे पाठविलेल्या नोटीसीतील मुद्दा क्र.८ मध्ये व सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी खुलाशातील मुद्दा क्र.१० मध्ये पुढील कथन केले आहे. त्यावरून सामनेवाले यांना गॅगरींनची पूर्ण कल्पना आली होती, हेच दिसून येते. हे कथन असे - ‘....... (मात्र तुम्ही तसे तातडीने न करता, नातेवाईंकाशी चार्चा करू द्या असे बोलून दुपारी ४.०० वाजेपर्यंत वेळच घालवला. शेवटी आमचे अशील रागवल्यावर ५.३० वाजता ती कलर डॉप्लर करण्यात आला. त्याचा अहवाल आमच्या अशिलांना ७.३० वाजता प्राप्त झाला) आणि लगेच Heponin ५००० चे इंजेक्शन पुन्हा देण्यात आले जेणेकरून पायाच्या नसांमधील रक्ताभिसरण थांबू नये आणि सुरळीत रहावे, तसेच पाय कापावा लागू नये म्हणून Cardio Vascular operation हे तातडीने करावे लागेल असे तुम्हांस लेखी स्वरूपात सांगितले व ती शस्त्रक्रिया धुळ्यात होत नसल्याबाबत पूर्ण कल्पना देवून, ते मुंबईला ताबडतोब करा, त्यात वेळ घालवू नका असा सल्ला देवून, त्याप्रमाणे सायन हॉस्पीटल, मुंबईचे सी.एम.ओ. यांच्यासाठीचे पत्र व त्यासोबत उपचाराचे सर्व पेपर्स, घेतलेल्या टिप्पण, नोटस, एक्सरे रिपोर्ट, कलर डॉप्लर रिपोर्ट इत्यादी सर्व तुमच्या ताब्यात देवून, ऍम्बुलन्सने तुम्हांस मुंबईला शिफट करण्यासाठी डिसचार्ज दिला.’
सामनेवाले यांच्याकडून दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता तक्रारदार यांना मुंबई येथील सायन रूग्णालयात हलविण्यात आले. दि.०५-०५-२०११ रोजी तक्रारदार हे मुंबई येथील रूग्णालयात दाखल झाले. दि.०४-०५-२०११ रोजी रात्री ११.३० वाजता सामनेवाले यांच्या रूग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर व दि.०५-०५-२०११ रोजी सायन रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी तक्रारदार हे अन्य कोणत्याही रूग्णालयात किंवा अन्य कोणत्याही डॉक्टरांकडे गेलेले नाहीत. म्हणजेच सामनेवाले यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या रूग्णालयातून तक्रारदार हे थेट मुंबई येथील सायन रूग्णालयात पोहचले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी अन्य कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे उपचार घेतलेले नाहीत.
दि.०१-०५-२०११ ते दि.०४-०५-२०११ रोजीच्या रात्री ११.३० वाजता तक्रारदार हे सामनेवाले यांच्या रूग्णालयात त्यांच्या देखरेखीत उपचार घेत होते. या कालावधीत दि.०२-०५-२०११ रोजी सामनेवाले यांनीच तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त पायावर शस्त्रक्रिया केलेली आहे. ही सर्व बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. यावरून हे स्पष्ट होते की, तक्रारदार यांना सामनेवाले यांच्या रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर व त्यांची दि.०५-०५-२०११ रोजी मुंबई येथील रूग्णालयात तपासणी करत असतांना त्यांना गॅंगरीन झाल्याचे निदर्शनास आले. पाय कापावा लागू नये म्हणून Cardio Vascular operation करण्याचा सल्ला दिला असे कथन सामनेवाले यांच्या खुलाशात आले आहे. यावरून सामनेवाले यांच्या रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि उपचार सुरू असतांनाच तक्रारदार यांच्या पायात गॅंगरीन पसरत होते, हे सिध्द होते. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणांनी तक्रारदार यांच्या पायात गॅंगरीन पसरत होते किंवा त्याची शक्यता आहे, याबाबत कोणताही पुरावा सामनेवाले यांनी समोर आणलेला नाही.
वरील सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या पायावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या पायात गॅंगरीन पसरले आणि त्यामुळे त्यांना त्यांचा पाय कायमचा गमवावा लागला. यावरून हेही स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी त्यांच्या उपचारात निष्काळजीपणा केला व त्यामुळेच तक्रारदार यांना त्यांचा पाय कायमचा गमवावा लागला.
९. या प्रकरणात सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या पायावर शस्त्रक्रिया करतांना निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे त्यांच्या पायाला गॅंगरीन झाले, त्याच कारणामुळे तक्रारदार यांचा उजवा पाय गुडघ्याच्या वरपासून कायमचा कापावा लागला आणि त्यामुळे तक्रारदार यांना कायमस्वरूपीचे ७५ टक्के एवढे अपंगत्व आले, हे वरील मुद्यात स्पष्ट झाले आहे. त्याच्या पुराव्यासाठी तक्रारदार यांनी नि.५ सोबत पान क्र.११९ वर श्री. भाऊसाहेब हिरे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांनी दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. या प्रमाणपत्रात तक्रारदार यांना ७५ टक्के पूर्णपणे कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे, असे नमूद कले आहे. हे प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे
आता आमच्यासमोर आणखी एक मुद्दा उपस्थित होतो की, सामनेवाले यांच्याकडून झालेल्या निष्काळजीपणाबद्दल तक्रारदार हे नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरतात काय ? या प्रश्नाचे उत्तर देतांना काही महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष देणे आणि तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत त्यांचे वय २५ वर्ष असे दिलेले आहे. वैद्यकिय उपचारासंदर्भात त्यांनी जी कागदपत्र दाखल केली आहेत, त्यात बहुतांश कागदपत्रांवर तक्रारदार यांचे वय २२ ते २६ दरम्यान दिलेले आहे. तक्रारदार हे पंकज दीपक अग्रवाल यांच्याकडे राधेय कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून सुमारे अडीच वर्षांपासून नोकरीस होते. तक्रारदार यांनी दि.१०-०५-२०११ रोजी पोलीस ठाण्यात जी तक्रार दाखल केली आहे त्यात या नोकरीचा उल्लेख केला आहे. साधारणतः कायद्यानुसार आणि शासकीय नियमानुसार कोणतीही व्यक्ती वयाच्या ६० वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरी करू शकते. तक्रारदार यांचे तक्रारीतील वय २५ असे दिलेले आहे. याचाच अर्थ तक्रारदार अजून ३५ वर्ष कोणत्याही नोकरीत राहू शकले असते. मात्र, सामनेवाले क्र.१ व २ यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कायमस्वरूपी कापावा लागला. या कारणामुळे तक्रारदार यांची शारीरिक हालचाल बंद झाल्यामुळे रोजगारावर व नोकरीवर मर्यादा आली आहे. अपघातानंतर व पाय कापावा लागल्यानंतर तक्रारदार यांची नोकरीही गेलेली आहे. एवढेच नव्हे तर तक्रारदार यांना ऐन उमेदीच्या काळात अपंगत्व आल्यामुळे भविष्यात त्यांना अन्य नोकरी मिळण्याची संधीही कमी झाली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा विवाह ठरलेला होता. परंतु त्यांना आलेल्या अपंगत्वामुळे त्यांचा विवाह मोडला आहे. तक्रारादार यांचे आई-वडील वृध्द असून, त्यांचे वडील धुळे टेक्सटाईल मिल येथे नोकरीस होते. ते सेवा निवृत्त झाले असून त्यांना फक्त रूपये ८००/- एवढे निवृत्ती वेतन मिळते. अशा सर्व परिस्थितीत तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबापुढे उर्वरित आयुष्यात रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, हे दिसून येते. तक्रारदार यांनी त्यांच्या उपचारासाठी रूपये ५,००,०००/- एवढी मोठी रक्कम त्यांच्या नातेवाईक व मित्रांकडून उसणवारीने घेतल्याचे नमूद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचे झालेले नुकसान आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील अंधकार याची कमी कधीही पैशात भरून काढता येणार नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या अर्जातील विनंती कलमात रूपये १४,००,०००/- एवढी भरपाई सामनेवाले यांच्याकडून मिळण्याची विनंती केली आहे. आमच्या मते तक्रारदार यांना त्यांच्या मागणी आणि विनंतीनुसार संपुर्ण रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावी, असे वाटते.
१०. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे लोकमान्य हॉस्पीटल धुळे, मुंबई येथील सायन हॉस्पीटल आणि नाशिक येथील डॉ.काकतकर यांचे आशिर्वाद हॉस्पीटल येथे उपचार घेतले. त्याचबरोबर या उपचाराच्यावेळी विविध औषधोपचार व तपासण्या त्यांना कराव्या लागल्या. हे उपचार घेतांना अनेक प्रकारची औषधे तक्रारदार यांना बाजारातून विकत घ्यावी लागली. त्यासाठी तक्रारदार यांना मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे. या सर्व खर्चाची देयके तक्रारदार यांनी कागदपत्रांसोबत दाखल केली आहेत. त्याची एकत्रित बेरिज रूपये २,६४,४८५/- एवढी होते. हा सर्व भुर्दंड तक्रारदार यांना सामनेवाले यांच्यामुळे करावा लागला आहे. म्हणूनच औषधोपचाराची ही सर्व रक्कम तक्रारदार यांना सामनेवाले यांच्याकडून मिळायला हवी, असे आमचे मत बनले आहे.
११. ह्या सर्व घटनाक्रमात तक्रारदार यांना मोठ्या मानसिक त्रासास व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागाले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही भरपाई दिली नाही, म्हणून त्यांना या मंचात तक्रार दाखल करावी लागली आणि तक्रारीचा खर्चही सहन करावा लागला. त्याचीही भरपाई त्यांना मिळायला हवी, असे आमचे मत बनले आहे.
१२. या प्रकरणाच्या निकालपत्रात आम्ही काही ठळक मुद्दे नमूद करू इच्छितो. सामनेवाले हे या प्रकरणाच्या कामकाजात तब्बल ११ वेळा गैरहजर आहेत. दि.१२-०३-२०१३, दि.२८-०८-२०१३, दि.१०-१२-२०१३, दि.०३-०१-२०१४, दि.१४-११-२०१४, दि.१२-१२-२०१४, दि.२६-०३-२०१५, दि.२७-०३-२०१५, दि.१०-०४-२०१५, दि.१९-०६-२०१५, दि.१७-०७-२०१५, या तारखांना तक्रारदार यांच्यातर्फे त्यांचे वडील हजर होते. मात्र सामनेवाले हे गैरहजर होते. त्यामुळे या प्रकरणाचे कामकाज लांबणीवर टाकावे लागले. याशिवाय सामनेवाले यांनी त्यानंतर ११ तारखांना विविध कारणाखाली मुदतीचा अर्ज देवून कामकाज लांबविले. दि.०५-०७-२०१३, दि.२१-१०-२०१३, दि.१६-०१-२०१५ या तारखांना सामनेवाले यांनी मुदतीचे अर्ज दिले आहेत. तर दि.१४-०२-२०१४, दि.१२-०६-२०१५ या तारखांना प्रश्नावली दाखल करण्यासाठी सामनेवाले यांनी मुदत घेतली. मात्र त्यानंतरही त्यांनी प्रश्नावली दिलेली नाही. दि.१२-०६-२०१५, दि.२६-०६-२०१५ या तारखांना दंड भरण्यासाठी मुदत घेतली आहे. तर दि.३०-१०-२०१५, दि.२०-११-२०१५ या तारखांना कागदपत्रे दाखल करण्यासाठी मुदत घेवूनही त्यांनी कागदपत्र दाखल केली नाहीत.
१३. सामनेवाले यांनी नि.क्र.१५ वर दि.३०-११-२०१२ रोजी तक्रारदार यांची उलटतपासणी करण्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जावर मंचाने दि.०७-०६-२०१३ रोजी आदेश करत उलटतपासणी ऐवजी प्रश्नावली दाखल करण्याचे निर्देश दिले. तथापि, सामनेवाले यांनी प्रश्नावली दाखल केली नाही. दि.१२-०६-२०१५ रोजी अर्जावर “नो क्रॉस” असा आदेश करण्यात आला. सामनेवाले यांच्या नि.१५ वरील अर्जावर आदेश पारित झालेले असतांना, त्यांनी पुन्हा एकदा नि.२२ वर दि.२४-०२-२०१४ रोजी उलट तपासणी घेण्यासाठीचा अर्ज दिला. हा अर्ज दि.२७-०३-२०१५ रोजी मंचाने दंडासह नामंजूर केला.
१४. या प्रकरणात तक्रारदार यांनी दिवाणी याचिका क्र.४०२४/२००३ मा.सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा दाखल केला आहे. तर सामनेवाले यांनी पुढीलप्रमाणे न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
- २०१५(१) सीपीआर (एनसी) अरूण के. इंजिनीअर विरूध्द डॉ. मिलींद करमरकर
- २०१४(३) सीपीआर ७९१ (एनसी) गायनोलॉजिस्ट व इतर विरूध्द मुचापोथुलानिर्मला
- २०१४(३) सीपीआर ६२७ (एससी) श्रीमती कांता विरूध्द टागोर हार्ट केअर अॅण्ड रिसर्च सेंटर प्रा.लि. व इतर.
- २०१४(१) सीपीआर ५२२ (एनसी) परविण शर्मा विरूध्द अॅनी हार्ट अॅण्ड मेडिकल सेंटर
- २०१३(२) सीपीआर ५१५ (एनसी) ललीता रमेश जैन विरूध्द सारा हॉस्पीटल व इतर
- २०१३(२) सीपीआर २२० (एनसी) राम निहाल व इतर विरूध्द डॉ.सी.जी. अग्रवाल
- २०१२(३) सीपीआर ३०६ (एनसी) स्वाती प्रकाश पाटील विरूध्द किरण वनासरे
- २०१२(१) सीपीआर ३९० सुनील अढे विरूध्द शैलेश पुणतांबेकर
- २०११(१) सीपीआर ३७८ बी.एल. शर्मा विरूध्द असगर शाह
- २०११(२) सीपीआर २१ (एनसी) मोह. अबरार विरूध्द डॉ.अशोक देसाई व इतर.
तथापि, या प्रत्येक न्यायनिवाड्याचा घटनाक्रम, वास्तविकता, अंतर्गत घटक, संदर्भित कारणाचे न्यायनिवाडे, आजाराच्या आणि रूग्णांच्या बाबतीत भिन्नता असून त्यांचा या प्रकरणासाठी आधार घेतला जावू शकत नाही, असे आमचे मत आहे.
१५. वरील सर्व सविस्तर विवेचन व त्यासोबत तक्रारदार यांनी दाखल केलेली कगदपत्रे जशीच्या तशी आम्ही येथे स्कॅन करून वापरली आहेत. तक्रारदार व सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद, तक्रारदार यांची शारीरिक व आर्थिक परिस्थिती आणि सामनेवाले यांची उपचारात केलेला निष्काळजीपणा, या सर्वाचा विचार करता आम्ही या प्रकरणत पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैय्यक्तिक अथवा संयुक्तपणे या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसांच्या आत तक्रारदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
- वैद्यकिय निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचा एक पाय कायमस्वरूपी कापावा लागला, त्याबद्दल नुकसान भरपाई रूपये १४,००,०००/- (अक्षरी रूपये चौदा लाख मात्र).
(ब) तक्रारदार यांना कराव्या लागलेल्या औषधोपचाराच्या खर्चापोटी भरपाई रूपये २,६४,४८५/- (अक्षरी रूपये दोन लाख चौसष्ट हजार चारशे पंचाएैंशी मात्र)
(क) मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल भरपाई रूपये १,००,०००/- (अक्षरी रूपये एक लाख मात्र).
(ड) तक्रारीचा खर्च रूपये २०,०००/- (अक्षरी रूपये वीस हजार मात्र)
- वरील आदेश क्रमांक २(अ) व (ब) मधील रक्कम मुदतीत न दिल्यास त्यानंतर संपूर्ण रक्कम देवून होईपर्यंतच्या कालावधीसाठी द.सा.द.शे. ९ टक्केनुसार व्याज देण्यास सामनेवाले क्र.१ व २ जबाबदार राहतील.
-
दिनांकः १५-०१-२०१६.
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.