द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 24 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. दिनांक 27/2/2005 रोजी तक्रारदारांचे मयत वडिल बोरमळनाथ मंदिरातून परत येत असतांना त्यांना मोटरसायकलने धडक दिली. त्यात त्यांच्या डाव्या हातास फ्रॅक्चर झाले, डाव्या बाजूच्या तिस-या व चौथ्या रिबला फ्रॅक्चर झाले व डोक्याला जखम झाली. अज्ञात इसमांनी त्यांना डॉ. जे.डी.थोरात यांच्या थोरात हॉस्पिटल, केडगांव स्टेशन, ता. दौंड येथे बेशुध्द अवस्थेत दाखल केले. डॉ. थोरातांनी तक्रारदारांना बोलावून घेतले व उपचार सुरु केले. काही इंजेक्शन्स दिले व महाराष्ट्र मेडिकल फाऊंडेशन जोशी हॉस्पिटल मध्ये डॉ. एन. एम. भांबुरे यांच्या देखरेखीखाली दिनांक 27/2/2005 रोजी संध्याकाळी 5.30 वा. दाखल केले. तपासणी करण्यात आली, मेंदूचा सी.टी.स्कॅन करण्यात आला. दाखल करते वेळेस पेशंट बेशुध्द अवस्थेत होते व त्यांच्या अंगात शक्ती नव्हती. सी.टी. स्कॅन मध्ये पेशंटच्या मेंदुमध्ये रक्तस्त्राव किंवा रक्ताची गुठळी आढळून आली नाही. त्यानंतर दिनांक 13/3/2005 रोजी पुन्हा एकदा मेंदुचा सी.टी. स्कॅन करण्यात आला. त्यावेळीही वरीलप्रमाणेच नोंदी आढळून आल्या. एम.आर.आय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पेशंटच्या मेंदुत diffuse axonial injury in corpus callosum region of brain असे आढळून आले. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की जोशी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना पेशंटची तपासणी करतांना डाव्या हातास फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले नाही. फ्रॅक्चर असल्याचे त्यांना अत्यंत उशिरा म्हणजे दिनांक 13/3/2005 रोजी कळले. यावरुन प्रस्तूतच्या हॉस्पिटलचा पेशंटकडे बघण्याचा दृष्टीकोन कॅज्युअल दिसून येतो. जाबदेणार हॉस्पिटलने तक्रारदारांच्या वडिलांना व्यवस्थित सेवा दिली नाही, त्यामुळे तक्रारदारांच्या वडिलांची प्रकृती ढासळत गेली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचे वडीलांना जेव्हा जाबदेणार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताचा एक्सरे काढून त्यावर लगेचच उपचार करणे गरजेचे होते. परंतू त्यांनी तसे केले नाही. तक्रारदारांचे वडिल दिनांक 27/2/2005 ते 1/4/2005 व दिनांक 1/4/2005 ते 9/4/2005 या कालावधीत जाबदेणार हॉस्पिटलमध्ये आय.सी.यू मध्ये उपचार घेत होते. तेथे जाबदेणार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही. हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी पेशंटची काळजी घेतली नाही, नेहमीचे अॅन्टीबायोटिक व अनुषंगिक उपचार देण्यात आले. उपचाराच्या वेळी पेशंटला अनेक बेड सोर झाले. पेशंटच्या पाठीला, खालच्या, वरच्या बाजूस बेडसोर तयार झाले आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पेशंटकडे त्वरीत लक्ष दिले नाही. व्यवस्थित नर्सिंग, देखभाल केली गेली नाही. मऊ, हवेची गादी दिली नाही. बेडसोर होऊ नये म्हणून वेळोवेळी या अंगावरुन त्या अंगावर केले नाही. यामुळे नर्सिंग केअर मध्ये निष्काळजीपणी आढळून येतो. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की एखादया पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर पेशंटकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्या हॉस्पिटल, डॉक्टरांची असते, तसेच पेशंटला काय झाले आहे, कुठल्या चाचण्या करावयाच्या आहेत याची माहिती पेशंटच्या नातेवाईकांना सांगणे गरजेचे असते. तसेच एखादया पेशंटला बराच काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये ठेवावयाचे असल्यास त्याबद्दलची सर्व माहिती पेशंटच्या नातेवाईकांना सांगणे व त्यांची परवानगी घेणे गरजेचे असते. परंतू डॉ. भांबूरे आणि हॉस्पिटलमधील इतर डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना अशा प्रकारची माहिती दिली नाही. जवळपास 43 दिवसांनी दिनांक 09/4/2005 रोजी हॉस्पिटलमधून पेशंटला सोडण्यात आले त्यावेळी पेशंटमध्ये पाहिजे तशी सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे पेशंटला डॉ. थोरात हॉस्पिटल, केडगांव येथे दाखल करावे लागले. त्यानंतर दिनांक 2/5/2005 रोजी पेशंटचे निधन झाले. दिनांक 3/5/2005 रोजी पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टम मध्ये मृत्यूचे कारण मेंदूमध्ये हयुमेटोमा सांगण्यात आले. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की जोशी हॉस्पिटलमध्येच पेशंटला बेड सोर तयार झाले होते. त्यानंतर पेशंट टॉक्सीमिया मध्ये गेला व त्यानंतर पेशंटचे निधन झाले. तक्रारदारांचे वडिल दिनांक 1/4/2005 ते 9/4/2005 या कालावधीत जाबदेणार यांच्या हॉस्पिटल मध्ये आय.सी.यू मध्ये दाखल होते. त्यावेळी त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे जाबदेणार हॉस्पिटल व डॉक्टर यांच्या सेवेतील त्रुटी आहेत. रेस इप्सा लोक्युटर हे तत्व प्रस्तूत तक्रारीस लागू होते असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सेवेतील त्रुटीबद्दल नुकसान भरपाईपोटी रुपये 10,00,000/- मागतात, तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी स्वत:चे शपथपत्र, डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी, असोसिएट प्रोफेसर, फॉरेनसिक मेडिसीन यांचे शपथपत्र, हॉस्पिटलमधील कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 27/2/2005 रोजी पेशंटला जोशी हॉस्पिटल मध्ये दाखल केले पेशंटच्या अंगामध्ये शक्ती नव्हती, पेशंट हा कोमा मध्ये होता. पेशंटची एम.आर.आय तपासणी करण्यात आली. त्यावरुन पेशंटला Diffuse Axonal Injury झाल्याचे समजले. Diffuse axonal injury occurs in about half of all severe head traumas, making it one of the most common traumatic brain injuries. DAI occurs most commonly in patients injured in road accidents and rarely in association with simple falls. तक्रारदारांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. म्हणून डॉ. चिमोटे यांनी सदर तपासणीचे रुपये 5000/- चार्जेस असतांना रुपये 1000/- मध्ये तपासणी केली. तक्रारदारांचे म्हणणे की पेशंटच्या डाव्या हाताचे फ्रॅक्चर दिनांक 13/3/2005 रोजी निदर्शनास आले हे जाबदेणार यांना मान्य नाही. जेव्हा पेशंटला दिनांक 27/2/2005 रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या डाव्या हाताचा एक्सरे काढण्यात आलेला होता, परंतू [स्वेलिंग] सुज असल्यामुळे फ्रॅक्चर असल्याचे कळून आले नाही. दिनांक 12/3/2005 रोजी परत एक्सरे काढण्यात आला त्यावेळी फ्रॅक्चर असल्याचे कळले. डॉ. अजित रानडे, आर्थोपेडिक सर्जन यांनी पेशंटला तपासले व त्यांच्या सल्ल्यानुसार पेशंटवर योग्य उपचार करण्यात आले होते. पेशंटला मऊ गादी देण्यात आलेली होती, तसेच या अंगावरुन त्या अंगावर पेशंटला करण्यात येत होते, पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यापासून ते डिस्चार्ज पर्यन्त हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी व नर्सिंग स्टाफ यांनी पेशंटची योग्य ती काळजी घेतलेली होती, योग्य नर्सिंग करण्यात आले होते. पेशंटच्या नातेवाईकांना, पेशंटच्या आजाराची माहिती, उपचाराची माहिती प्रत्येक आठ तासांनी देण्यात आलेली होती. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी पेशंटच्या नातेवाईकांना, पेशंटच्या ब-याच मोठया काळाच्या हॉस्पिटल मधील राहण्याबद्दल व उपचारांबद्दलची माहिती दिली नव्हती हे म्हणणे जाबदेणार यांना अमान्य आहे. त्याचप्रमाणे दिनांक 9/4/2005 रोजी जेव्हा पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी पेशंटमध्ये फारशी सुधारणा नव्हती हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार यांना अमान्य आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्याप्रमाणे हयुमोटोमा काही काळानंतर विरघळतो किंवा मोठा होतो [any haematoma in the period of time will either get absorbed or will get organized]. मेडिकल ऑफिसर पी.एच.सी, यवत यांनी पेशंटच्या मृत्युचे दिलेले कारण योग्य व खरे आहे. पोस्ट मार्टम रिपोर्ट वरुन मृत्युचे कारण दिलेले आहे. Speticemia बद्दल त्यात उल्लेख करण्यात आलेला नाही. जाबदेणार क्र.2 हॉस्पिटल मध्ये पेशंटला दाखल करण्यात आल्यानंतर, पेशंटला बेडसोर झाले व ते वाढत गेले, त्यामुळे टॉक्सीमिया झाला, त्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार यांना मान्य नाही. तक्रारदारांचे वडिल हे जाबदेणार क्र.1 यांचे सन 2001 पासून पेशंट होते. त्यांना उच्च रक्तदाब व left ventricular dysfunction होते. त्यांच्यावर जाबदेणार क्र.1 यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु होते. जाबदेणार क्र.1 यांनी पेशंटची सर्व योग्य ती काळजी घेतलेली होती. हॉस्पिटलमध्ये दाखल करतांना पेशंट बेशुध्द अवस्थेत होते परंतू डिस्चार्ज देतांना ते शुध्दीमध्ये होते व त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली होती. बेड सोर मध्ये इन्फेक्शन नव्हते. जाबदेणार क्र.2 यांच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर पेशंट थोरात हॉस्पिटल, केडगांव येथे दाखल झाले होते व तेथे डॉ. थोरात यांनी त्यांच्यावर उपचार केले होते. केवळ जाबदेणार क्र.1 यांनीच पेशंटवर उपचार केलेले नव्हते तर डॉ. सुधिर कोठारी- [डी.एम-न्युरो], डॉ. जे.डी.थोरात, डॉ. अजित रानडे-एम.एस. [आर्थो], डॉ. सी.एच.फणसळकर- [एम.डी मेडिसिन], डॉ. जयराम सोनोवणे- [एम.एस.जनरल सर्जन] , व महाराष्ट्र मेडिकल फाऊंडेशन हॉस्पिटल मधील इतर डॉक्टरांनी देखील पेशंटवर उपचार केले होते. त्यांना तक्रारदारांनी प्रस्तूतच्या तक्रारीत पक्षकार केलेले नाही. त्यामुळे तक्रार नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी म्हणून नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात. तक्रार दाखल करण्यास कारण खोटे व बनवून केलेले आहे. त्याच क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे मत दाखल करण्यात आलेले नाही. तक्रारदार अॅडव्होकेट असल्यामुळे त्यांना कायदयाची माहिती आहे. म्हणून जाबदेणार यांच्याकडून रक्कम मिळण्यासाठी खोटी व बनावट कहाणी रचून जाबदेणार यांच्याविरुध्द तक्रारदारांनी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी त्यांनी याच कारणावरुन जे.एम.एफ.सी. दौंड येथे क्रिमीनल केस व मोटार अॅक्सिडेंट क्लेम ट्रॅब्युनल बारामती येथे केस दाखल केलेल्या होत्या. याबद्दल तक्रारदारांनी तक्रारीत कुठेही उल्लेख केलेला नाही. जाबदेणार क्र.1 यांनी पेशंटवर उपचार करतांना कुठलाही निष्काळजीपणा केलेला नाही, तसेच तक्रारदारांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तक्रारदारांकडून कमीत कमी बिलाची आकारणी करण्यात आलेली होती. असे असतांनाही तक्रारदारांनी खोटी, बनावट तक्रार जाबदेणार यांच्या विरुध्द दाखल केलेली आहे. म्हणून ती नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात. जाबदेणार क्र.1 यांनी शपथपत्र, कागदपत्रे व मेडिकल लिटरेचर दाखल केले आहे.
3. जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्टिन एफ. डिसोझा विरुध्द मोहमद इशराफ (2009) 3 SCC या निवाडयात नमूद केल्याप्रमाणे तज्ञाच्या अहवालाशिवाय डॉक्टरांना नोटीस पाठविता कामा नये. तरीसुध्दा या जाबदेणा-यास नोटीस पाठविण्यात आली. तक्रारदारांनी डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी, असोसिएट प्रोफेसर, फॉरेनसिक मेडिसीन एम.आय.एम.इ.आर मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे, पुणे या तज्ञांचा अहवाल दाखल केला आहे तो पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षांनंतरचा आहे. या तज्ञांनी पेशंटला जिवंतपणी कधीही तपासलेले नव्हते, बघितलेले नव्हते, केवळ ऐकीव पुराव्यावरुन [Hearsay] अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल दुर्लक्षित करण्यात यावा असे जाबदेणार क्र.2 यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या वडिलांवर थोरात हॉस्पिटल, केडगांव स्टेशन, ता. दौंड येथे अपघातानंतर व प्रस्तूतच्या हॉस्पिटलमधील डिस्चार्ज नंतर उपचार करण्यात आलेले होते. त्यांना तक्रारीमध्ये पक्षकार करण्यात आलेले नाही. दिनांक 9/4/2005 ते 2/5/2005 या कालावधीत मध्ये पेशंटवर थोरात हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आलेले होते. पेशंटला जाबदेणार क्र.2 हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर उपरोक्त नमूद 22 दिवसांच्या कालावधीत काय घडले याबद्दल तक्रारीमध्ये व तज्ञांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. पेशंटला ज्यावेळी जाबदेणार क्र.2 हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी त्यांची गंभीर स्थिती होती, पेशंटचे वय 75 वर्षे होते व चार वर्षांपासून त्यांना काही आजार होते अशी हिस्टरी होती. पेशंटला अपघातामुळे शॉक बसलेला होता. हॉस्पिटल मध्ये आणते वेळी पेशंट बेशुध्द अवस्थेत होते, अंगात शक्ती नव्हती. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये पेशंटच्या मेंदूस जबरदस्त मार लागला असल्याचे नमूद केलेले आहे ते बरोबर आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पेशंटच्या मेंदूस मार लागल्यामुळे त्यादृष्टीने ताबडतोब उपचार करण्यास सुरुवात केली. पेशंटच्या डाव्या हातास – left arm ला फ्रॅक्चर झाले होते हे जाबदेणार यांना उशिराने कळले हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार यांना मान्य नाही. अॅडमिशन रेकॉर्डवर पेशंटच्या डाव्या व उजव्या हाताचे – आर्मची स्थिती व्यवस्थित नमूद करण्यात आलेली होती, तसेच डाव्या हातास सुज आलेली होती असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे पेशंटच्या डाव्या हाताकडे डॉक्टरांचे लक्ष नव्हते हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार क्र.2 यांना मान्य नाही. दिनांक 27/2/2005 ते 1/4/2005 व 1/4/2005 ते 9/4/2005 या कालावधीत पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली नव्हती हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार क्र.2 यांना अमान्य आहे. जाबदेणार क्र.2 यांचा सर्व स्टाफ, डॉक्टर पेशंटची व्यवस्थित काळजी घेत होते. बेड सोर तयार होणे म्हणजे जाबदेणार क्र.2 हॉस्पिटल, डॉक्टर व नर्सेस किंवा स्टाफनी दुर्लक्ष केले, व्यवस्थित नर्सिंग केले नाही, असे होत नाही. पेशंट 75 वर्षांचे होते, 43 दिवस जाबदेणार यांच्या हॉस्पिटल मध्ये बेड रिडन अवस्थेत होते. त्यापैकी अनेक दिवस ते बेशुध्द अवस्थेत होते. अनेक दिवस बेड रिडन परिस्थितीत आजारपणामुळे पडून राहिल्यामुळे बेड सोर तयार होतात. हॉस्पिटल मध्ये पेशंटला मऊ गादी देण्यात आलेली होती. जाबदेणार हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि स्टाफ यांनी तक्रारदारांना पेशंटच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी योग्य ती माहिती दिली होती, शंकांचे निरसन केले होते. दिनांक 2/5/2005 रोजीच्या पोस्ट मार्टम रिपोर्टवरुन पेशंटच्या मृत्यूचे कारण हयुमोटोमा नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी रेस इप्सा लोक्युटर हे तत्व प्रस्तूत तक्रारीस लागू पडते असे तक्रारीत नमूद केलेले आहे ते चुकीचे आहे. तक्रारदारांना फी मध्ये सवलत देण्यात आलेली होती. दिनांक 9/4/2005 पर्यन्त जाबदेणार यांनी पेशंटवर उपचार केलेले होते. पेशंटचा मृत्यू दिनांक 2/5/2005 रोजी झाला व तक्रारदारांनी दिनांक 30/4/2007 रोजी प्रस्तूतची तक्रार दाखल केलेली आहे. जाबदेणार यांच्याविरुध्द घटना घडण्याचे कारण दिनांक 9/4/2005 पर्यन्त गृहीत धरले तर प्रस्तूतची तक्रार दिनांक 30/4/2007 रोजी दाखल केलेली असल्यामुळे ती मुदतबाहय आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी ही तक्रार डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी यांनी दिलेल्या तज्ञ अहवालावरुन जो की मुद्दाम बनवून घेतलेला, heir say, तक्रारदारांनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेला आहे. डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी यांनी दिलेले तज्ञाचे मत व त्यांचे शपथपत्र जाबदेणार क्र.2 यांना मान्य नाही. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.2 करतात. जाबदेणार क्र.2 यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे.
4. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार, डॉ. भांबुरे व हॉस्पिटलविरुध्द दाखल केली. त्यांचे असे म्हणणे आहे की, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी, कर्मचा-यांनी पेशंटची व्यवस्थित देखभाल, नर्सिंग केले नाही. त्यांना त्यामुळे बेड सोर झाले.
सर्व कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल करते वेळेस त्यांची आरोग्य परिस्थिती गंभीर होती. ते बेशुध्द अवस्थेत होते, शरीराची हालचाल होत नव्हती, मेंदुस मार लागलेला होता. वैदयकिय दृष्टिकोनातून प्रथम मानवाच्या मेंदुवर उपचार करणे गरजेचे असते व तसेही इतर अवयवांवर/शरीरावर गंभीर दुखापत झालेली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी पेशंटच्या मेंदुचा सी.टी स्कॅन दोन वेळा काढला. त्यात त्यांना मेंदुत गाठ किंवा रक्तस्त्राव आढळून आला नाही. युक्तीवादाच्या वेळेस जाबदेणार हॉस्पिटल यांनी 2007 साली त्यांच्या हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय ची व्यवस्था उपलब्ध नव्हती असे सांगितले. पेशंटला बाहेर पाठविण्यासारखी परिस्थिती नव्हती. कारण पेशंट व्हेंटिलेटरवर उपचार घेत होता. ज्यावेळेस तशी परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी पेशंटला बाहेर पाठवून सवलतीच्या दरात त्यांचे एम.आर.आय करवून घेतले. मंचास यामध्ये कुठलीही सेवेतील त्रुटी किंवा निष्काळजीपणी दिसून येत नाही. जर तक्रारदारास पेशंटची एम.आर.आय तपासणी करवून घ्यावयाची अगदीच निकड वाटत होती तर त्यांनी ज्या हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय उपलब्ध होते तिथेच पेशंटला हलवायला पाहिजे होते. तक्रारदारांनी पेशंटच्या डाव्या हातास फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांना उशीरा समजले असे म्हणतात. त्यावर डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की पेशंट आले तेव्हा ते बेशुध्द व बेडरिडन अवस्थेत होते. हॉस्पिटलच्या कागदपत्रांवरुन लेफट आर्मवर सुज आलेली आहे हे त्यावर नमुद केलेले होते. पेशंटला व्हेंटिलेटर लावलेले असल्यामुळे त्यांना आधी वाचवण्याचे व शुध्दीवर आणण्याचे सर्व प्रयत्न, काळजी डॉक्टर घेत होते. त्यामुळे पेशंटच्या डाव्या हातास सुज आलेली आहे हे कळल्यानंतरही पेशंटला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न करीत होते. फ्रॅक्चर जरी झाले असले तरी नंतरही त्यास ऑपरेशन किंवा प्लास्टर घालता येऊ शकते, लवकर न घातल्यास मृत्यू येऊ शकत नाही व तशी तक्रारदारांची केसही नाही की फ्रॅक्चर न घातल्यामुळे किंवा लेफट आर्मचे एक्सरे न काढल्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला. तक्रारदारांचे म्हणणे की फक्त पेशंटच्या डाव्या हाताकडे दुर्लक्ष केले गेले, तसेच हॉस्पिटलचा, तेथील डॉक्टरांचा पेशंटकडे बघण्याचा दृष्टिकोन कॅज्युअल होता. पेशंट जाबदेणार हॉस्पिटलमध्ये दिनांक 27/2/2005 ते 9/4/2005 या कालावधीमध्ये आय.सी.यू मध्ये उपचार घेत होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तिथे डॉक्टरांनी पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली नाही. तेथे फक्त अॅन्टीबायोटिक्स व अनुषंगिक उपचार देण्यात आले. कुठला उपचार दयावा लागणार होता, कुठले अॅन्टीबायोटिक्स पेशंटला आय.सी.यू मध्ये दयावे लागणार होते, काय देणे गरजेचे होते हे तक्रारदारांनी सांगितलेले नाही. त्यामुळे आय.सी.यू मध्ये डॉक्टरांनी, हॉस्पिटलनी पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली नाही हे तक्रारदारांचे म्हणणे मंच विचारात घेत नाही. पेशंटकडे जाबदेणार यांनी लक्ष दिले नाही, त्यांना मऊ, हवेची गादी दिली नाही, पेशंटला वेळोवेळी या अंगावरुन त्या अंगावर केले नाही, पेशंटला बेडसोर झाले, यासाठीही तक्रारदारांनी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. यावर हॉस्पिटलचे असे म्हणणे आहे की पेशंटचे वय 75 वर्षांचे होते, पेशंट बेडरिडन परिस्थितीत होता, 43 दिवस हॉस्पिटलमध्ये होता, त्यांना मऊ गादी देण्यात आलेली होती तरीसुध्दा पेशंटची बेशुध्द, बेडरिडन परिस्थिती असल्यामुळे बेडसोर तयार होऊ शकतात. पेशंटला बेडसोर झाल्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला असे तक्रारदारांचे म्हणणे नाही. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला ब-याच काळपर्यन्त हॉस्पिटलमध्ये रहावे लागेल तसेच दयाव्या लागणा-या उपचारासंदर्भात माहिती दिली नाही असे तक्रारदारांचे आरोप आहेत. परंतू यासंदर्भात तक्रारदारांनी पुरावा दाखल केलेला नाही. पेशंट जाबदेणार हॉस्पिटल मध्ये जवळजवळ 43 दिवस उपचार घेत होते, दाखल झाले त्यावेळी बेशुध्द अवस्थेत होते, डिस्चार्जच्या वेळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली होती व शुध्दीत असतांना पेशंटला डिस्चार्ज देण्यात आलेला होता. यावरुन पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती हे दिसून येते. त्यामुळेच जाबदेणार हॉस्पिटलनी पेशंटला डिस्चार्ज दिला होता. जर पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती आणि पेशंट गंभीर अवस्थेत होता तर तक्रारदारांनी पेशंटला डिस्चार्ज करुन हॉस्पिटल बाहेर न्यावयास नको होते. डिस्चार्ज कार्डवर पेशंटच्या परवानगीविना हॉस्पिटल सोडत आहे असे नमूद करण्यात आलेले नाही. तक्रारदारांचे तसे म्हणणेही नाही. उलट डिस्चार्ज देतांना पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती “G.C. improves” असे डिस्चार्ज कार्डवर नमूद करण्यात आलेले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी पेशंटला थोरात हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती याबद्दलचा पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही. थोरात हॉस्पिटल, केडगांव येथे पेशंट 23 दिवस उपचार घेत होते. त्यांनतर दिनांक 2/5/2005 रोजी पेशंटचे निधन झाले. या 23 दिवसांच्या कालावधीत पेशंटची परिस्थिती कशी होती, त्यांना काय त्रास झाला, काय उपचार करण्यात आले याबद्दलची कागदपत्रे तक्रारदारांनी दाखल केलेली नाहीत. थोरात हॉस्पिटल, केडगांव व तेथील डॉक्टरांना प्रस्तूत तक्रारीमध्ये पक्षकार कारण्यात आलेले नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये पेशंटच्या मृत्यूचे कारण हयुमोटोमा झाला असे नमूद करण्यात आलेले आहे. पेशंटला हयुमोटोमा जाबदेणार हॉस्पिटलमध्ये झाला किंवा जाबदेणार क्र.1 यांच्या उपचारांमुळे झाला याबद्दलची कागदपत्रे, पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. किंबहूना तक्रारदारांची तशी केसही नाही. पेशंटच्या पोस्टमार्टमची कागदपत्रे पाहून डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी यांनी सन 2007 साली तज्ञाचा अहवाल व शपथपत्र दिले व त्यात जाबदेणार क्र.1 व 2 डॉक्टर व हॉस्पिटल यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बेडसोर झाले असे म्हटले आहे आणि मृत्यूचे कारण हयुमोटोमा नमुद केलेले आहे. परंतू हयुमोटोमा जाबदेणार यांच्या हॉस्पिटल मध्ये झाला होता असे त्यात नमुद केलेले नाही. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या मेडिकल लिटरेचरचे अवलोकन केले असता त्यात “Hematoma is a localized collection of blood, usually clotted, in a tissue or organ. Hematomas can occur almost anywhere on the body. In minor injuries, the blood is absorbed unless infection develops. The haematoma will gradually be dealt with and absorbed by the body and unless it is very large no other treatment will be required.” असे नमूद केल्याचे दिसून येते. यावरुन हयुमोटोमा मोठा झाल्यावर उपचार घेणे आवश्यक आहे असे त्यात नमूद केलेले आहे. हयुमोटोमा आपोआप विरघळला जातो. त्यामुळे कदाचित पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर हयुमोटोमा झाला असावा. कारण दिनांक 13/3/2005 रोजी पेशंटवर एम.आर.आय करण्यात आला होता. त्यापुर्वी पेशंटचे सी.टी. स्कॅन करण्यात आले होते. त्यात हयुमोटोमा बद्दल काही नमूद करण्यात आले नव्हते. 43 दिवस जाबदेणार हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर, शुध्दीवर असतांना पेशंटला डिस्चार्ज देण्यात आलेला होता. त्यानंतरच्या 23 दिवसांमध्ये पेशंटला कुठली ट्रिटमेंट देण्यात आलेली होती याची माहिती नसतांना तक्रारदारांनी जाबदेणार यांच्यावर मेडिकल निग्लीजन्सची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सेवेमध्ये कुठली त्रुटी होती, काय निष्काळजीपणा होता याबद्दलचा पुरावा दाखल केलेला नाही. असे असतांनाही तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की रेस इप्सा लोक्युटर हे तत्व प्रस्तूत तक्रारीस लागू पडते. रेस इप्सा लोक्युटर म्हणजे निष्काळजीपणा दिसूनच येतो, पुरावा देण्याची गरज नसते. परंतू प्रस्तूत प्रकरणामध्ये कुठेही असे दिसून येत नाही. तक्रारदारांनी कुठल्याही तज्ञाचा पुरावा दाखल केलेला नाही. डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी या तज्ञांचा अहवाल तक्रारदारांनी दाखल केलेला आहे. परंतू डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी हे ना सर्जन आहेत ना फिजीशिअन आहेत. त्यांनी पेशंटला तपासलेले देखील नाही. केवळ पोस्टमार्टम अहवाल पाहून पेशंटवर उपचार करतांना दुर्लक्ष केले असे त्यांनी उपचारानंतर दोन वर्षांनी अहवालामध्ये नमूद केलेले आहे. म्हणून डॉ. लक्ष्मण गोविंद फेरवानी यांनी दिलेला तज्ञांचा अहवाल वा त्यांचे शपथपत्र मंच पुरावा म्हणून मान्य करीत नाही.
उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या मा.वरिष्ठ न्यायालयांच्या निवाडयांचे मंचाने अवलोकन केले.
वरील सर्व विवेचनावरुन व पुराव्या अभावी मंच प्रस्तुतची तक्रार नामंजुर करीत आहे.
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्दल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.