Maharashtra

Pune

CC/07/154

Prakash Babulal Pardeshi - Complainant(s)

Versus

Dr Jayant S Shaha - Opp.Party(s)

07 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/07/154
 
1. Prakash Babulal Pardeshi
427 Indira Vasahat Behind Swagat Hair Saloon Gultekdi Pune 411 037
Pune
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Dr Jayant S Shaha
Grand Medical Foundation, Ruby Hall Clinic, 40, Sasoon Road, Pune
Pune
Maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MS. Geeta S.Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारातर्फे अ‍ॅड. श्री. सुर्यवंशी हजर. 
जाबदेणार क्र. 1 तर्फे अ‍ॅड. श्रीमती उदावंत हजर 
जाबदेणार क्र. 2 तर्फे अ‍ॅड. ईराणी हजर 
 
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
 
** निकालपत्र **
                                                                                   (07/01/2014)                                                  
      प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारांनी जाबदेणार डॉक्टरांविरुद्ध व हॉस्पिटलविरुद्ध सेवेतील त्रुटी व वैद्यकिय निष्काळजीपणाबद्दल ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1]    तक्रारदार हे गुलटेकडी, पुणे येथील रहीवासी असून त्यांचा रेडीमेड कपडे तसेच रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. दि. 17/5/2006 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास तक्रारदार कोरेगांव पार्क, पुणे पासून रिक्षामध्ये प्रवासी घेवून सर्किट हाऊसच्या दिशेने चालले होते, त्यावेळी विरुद्ध दिशेने टोयोटो गाडी क्र. एम.एच.- 03, एस.- 7441 वेगाने आली व तक्रारदारांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातामुळे तक्रारदार यांच्या डाव्या हिप जॉईंट तसेच उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. म्हणून तक्रारदार जाबदेणार क्र. 1 यांच्या निदर्शनाखालील जाबदेणार क्र. 2 हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले, त्यावेळी त्यांचा एक्स-रे काढण्यात आला. जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदारांना एक्स-रे नॉर्मल असल्याचे व फ्रॅक्चर नसल्याचे सांगितले व दि.18/5/2006 रोजी डिस्चार्ज दिला. परंतु घरी गेल्यानंतर तक्रारदार यांना अत्यंत वेदना होऊ लागल्यामुळे ते डॉ. रमेश केअरिंग यांच्याकडे गेले. तेथे डॉक्टरांनी तक्रारदार यांना तपासले व एक्स-रे पाहून त्यांचे हिप जॉईंट फ्रॅक्चर असल्याचे निदान केले. त्यानंतर तक्रारदार दि. 19/5/2006 रोजी पुन्हा जाबदेणार क्र. 2 हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी तेथील डॉ. वर्षा हरदास यांनी दि. 17/5/2006 रोजीचा एक्स-रे पाहून तक्रारदार यांना फ्रॅक्चर असल्याचे निदान केले. त्यानंतर तक्रारदार यांची तपासणी डॉ. राघव बर्वे यांनी केली व ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. दि.12/6/2006 रोजी जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदार यांच्या तपासण्या बोन स्कॅनिंग पद्धतीने केल्या व त्यात जुना आजार असल्याचे नमुद केले. त्यानंतर तक्रारदार यांनी डॉ. हेमंत बन्सल यांचेकडे तपासणी केली. त्यावेळी डॉ. बन्सल यांनी समर्थ हॉस्पिटल येथे जावून डॉ. कलशेट्टी यांचेकडे तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तक्रारदार हे समर्थ हॉस्पिटल येथे गेले व डॉ. कलशेट्टी व डॉ. आडकर यांनी तक्रारदारांची तपासणी केली आणि तक्रारदारांना तातडीने ऑपरेशन करण्याची गरज आहे, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार दि. 16/6/2006 रोजी समर्थ हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले व त्यांचे ऑपरेशन डॉ. आडकर यांनी केले. सदर ऑपरेशनमध्ये तक्रारदारांच्या डाव्या बाजुच्या खुब्यात कृत्रिम बॉल बसविण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांची प्रकृती गंभीर झाली व त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर दि. 24/6/2006 रोजी पुन्हा तक्रारदार यांना समर्थ हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले व दि. 30/6/2006 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
2]    तक्रारदार यांच्या कथनानुसार, जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांची काळजीपुर्वक तपासणी केली नाही व योग्य निदान केले नाही त्यामुळे जाबदेणार क्र. 1 वैद्यकिय अधिकारी व जाबदेणार क्र. 2 हॉस्पिटल हे दोघेही वैद्यकिय निष्काळजीपणासाठी जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दाखल केलेली आहे. या तक्रारीत त्यांनी वैद्यकिय उपचाराचा खर्च, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई आणि तक्रार अर्जाचा खर्च यासाठी एकुण रक्कम रु. 10,05,000/- ची मागणी केलेली आहे. 
 
 
3]    जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी मंचामध्ये हजर होवून आपले लेखी कथने दाखल केली. त्यामध्ये त्यांनी तक्रारीतील कथने नाकारली. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार यांना दि. 17/5/2006 रोजी कोणतेही फ्रॅक्चर झालेले नव्हते व तशा प्रकारचे निदान जाबदेणार क्र. 1 यांनी केले होते व ते बरोबर आहे. जाबदेणार पुढे असेही कथन करतात की, तक्रारदारांना 1996 साली झालेल्या अपघातासाठी वैद्यकिय उपचार घ्यावे लागले होते व त्या अनुषंगाने त्यांना रॉड बसविलेला होता. जाबदेणारांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दि.17/5/2006 रोजी कढलेला एक्स-रे दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी दहा वर्षांपूर्वी झालेले फ्रॅक्चर लपवून ठेवले. जाबदेणार क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार, ते नामांकित अस्थिरोग तज्ञ आहेत, त्यांनी तक्रारदारांची संपूर्णपणे व्यवस्थितरित्या तपासणी करुन निदान केलेले आहे व उपचार दिलेले आहे. जाबदेणार क्र. 1 असेही स्पष्ट करतात की केवळ एक्स-रे व बोन स्कॅनिंगच्या अहवालावरुन फ्रॅक्चरचे निदान करता येत नाही. जाबदेणार क्र. 1 पुढे असेही कथन करतात की, तक्रारदार हे अपघात झालेल्या दिवशी स्वत:च्या पायाने दवाखान्यामध्ये चालत आले होते व स्वत:च्या पायाने परत गेले होते. यावरुन तक्रारदार यांना फ्रॅक्चर झाले नव्हते हे सिद्ध होते. तक्रारदार यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांकडून घेतलेल्या वैद्यकिय उपचाराबाबत, त्याचप्रमाणे डॉ. वर्षा हरदास यांच्या अहवालाबाबत त्यांना माहिती नाही, असे कथन जाबदेणार क्र.1 यांनी केलेले आहे. तक्रारदार यांनी तीन आठवड्यांनंतर परत हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले होते, परंतु ते आले नाहीत. जाबदेणार क्र. 1 यांच्या कथनानुसार, तक्रारदार दि. 12/6/2006 रोजी म्हणजे एक महिन्यानंतर त्यांचे खाजगी दवाखान्यात आले, त्यावेळी त्यांचा एक्स-रे काढण्यात आला. त्यावेळी एक्स-रे मध्ये जून फ्रॅक्चर दिसून आले, असेही कथन जाबदेणार क्र. 1 यांनी केले आहे. यामध्ये जाबदेणार क्र. 1 यांनी कोणताही निष्काळजीपणा किंवा सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली नाही, त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार क्र. 1 करतात.
4]    जाबदेणार क्र. 2 यांनी जाबदेणार क्र. 1 यांच्याप्रमाणेच लेखी कथन केले असून त्यांनीही तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
5]    दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्‍यावरील निष्‍कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
 

अ.क्र.
             मुद्ये
निष्‍कर्ष
1.
जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा देऊन त्रुटी निर्माण केली, हे सिद्ध होते का?
नाही
2.   
अंतिम आदेश काय ?  
तक्रार फेटाळण्यात येते

 
कारणे 
 
6]    या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा व लेखी कथने आणि युक्तीवाद यांचा विचार केला असता काही गोष्टी अविवादीत आहेत. दि.17/5/2006 रोजी तक्रारदार यांना अपघात झाला होता व ते जाबदेणार क्र. 2 या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होते व जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांची तपासणी केली होती. या गोष्टीबाबत दोन्ही बाजूंमध्ये कोणताही वाद नाही. तक्रारदार यांच्या कथनानुसार, जाबदेणार क्र. 1 यांनी एक्स-रे काढल्यानंतर त्यांना कोणतेही नविन फ्रॅक्चर नाही असे निदान केले व दुसर्‍या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारदार पुढे असेही कथन करतात की, दुसर्‍या दिवशी त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्यामुळे ते डॉ. रमेश केअरिंग यांच्याकडे गेले, त्यांनी तपासणी केल्यानंतर फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 2 हॉस्पिटलमधील रेडिओलॉजिस्ट डॉ. वर्षा हरदास, यांनीदेखील तक्रारदारांना फ्रॅक्चर असल्याचा अहवाल दिला. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना भयंकर वेदना होत असल्यामुळे त्यांनी डॉ. हेमंत बंसल यांचा सल्ला घेतला व समर्थ हॉस्पिटलमधील डॉ. आडकर यांनी त्यांचे ऑपरेशन केले. त्या कालावधीत त्यांना सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते.   त्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाला व त्यांना रक्कम रु.85,000/- खर्च आला. तक्रारदार यांच्या कथनानुसार या सर्व गोष्टींकरीता जाबदेणार क्र. 1 व 2 हे जबाबदार आहेत. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी काही कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये अपघातासंबंधी फौजदारी कोर्टातील कागदपत्रे व निकालपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे फौजदारी कोर्टातील साक्षीदारांच्या जबानींच्या नकला दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये डॉ. आडकर व डॉ. सुहास शेट्टी यांच्या जबानी आहेत. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार, सदर प्रकरणात ते पक्षकार नव्हते, त्यामुळे त्यांना तज्ञांची उलट तपासणी घेण्याची संधी मिळाली नाही. फौजदारी कोर्टाने त्या प्रकरणात तक्रारदार यांना फ्रॅक्चर झाले आहे असे म्हटले आहे. फौजदारी कोर्टातील साक्षीदारांच्या जबान्या, व इतर पुराव्यावरुन जाबदेणार यांनी केलेले निदान चुकीचे आहे, असा निष्कर्ष निघत नाही. जाबदेणार क्र. 1 यांच्या कथनानुसार तक्रारदार यांचे 10 वर्षापूर्वी झालेल्या वैद्यकीय उपचारासंबंधी सदरच्या फ्रॅक्चरची नोंद आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यानुसार त्याचप्रमाणे डॉ. आडकर, डॉ. बर्वे व डॉ. हरदास यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि अहवाल यानुसारदेखील दि. 17/5/2006 रोजी तक्रारदार यांना नवीन फ्रॅक्चर झाले होते, असे कुणीही म्हटलेले नाही.
 
7]    तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विशेषत:, जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांना तपासल्याचा अहवाल पृष्ठ क्र. 51 वर दाखल केलेला आहे. त्यामध्ये जाबदेणार यांनी फ्रॅक्चर झाल्याचे नमुद केलेले नाही. याउलट असे नमुद केले आहे की, त्या दिवशी त्यांची प्रकृती नॉर्मल होती. त्यांचे चारही अवयव, म्हणजे दोन्ही पाय व दोन्ही हातांच्या हालचाली सर्वसाधारण होत्या. एखाद्या इसमास नवीन फ्रॅक्चर झाले असेल तर त्यांच्या चारही अवयवांच्या हालचाली सामान्य असू शकत नाहीत. 
 
8]    वैद्यकिय निष्काळजीपणा ही अतिशय तांत्रिक बाब आहे. ती सिद्ध करण्यासाठी तज्ञाचा पुरावा आवश्यक आहे. तक्रारदार यांनी केलेल्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ कोणताही तज्ञ किंवा साक्षीदार तपासलेला नाही. तक्रारदार यांनी नमुद केलेले डॉ. वर्षा हरदास, डॉ. आडकर, डॉ. बर्वे आणि डॉ. केअरिंग यांच्यापैकी कुणीही शपथपत्र दाखल केलेले नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा हा तज्ञाशिवाय आहे, असे नमुद करणे भाग आहे. याउलट, जाबदेणार क्र. 1 हे स्वत: अस्थिरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांनी डॉ. राजन कोठारी, ऑर्थोपेडीक सर्जन यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदरच्या साक्षीदारांना प्रश्नावली देण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्या प्रश्नावलीस डॉ. कोठारी यांनी उत्तरे दिली. डॉ.कोठारी यांच्या पुराव्याचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की त्यांनी तक्रारदार यांच्या दि. 17/5/2006 रोजीच्या एक्स-रे अहवालाचे व तक्रारदारांच्या बोन स्कॅनिंग अहवालाचे अवलोकन केले असता, त्यांना कोणतेही नवीन फ्रॅक्चर आढळून आले नाही. त्यांच्या कथनानुसार, सदरची बाब ही तक्रारदारांच्या पूर्वीच्या दुखापतीसंदर्भात आहे.
8]    तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 अ‍न्वये आवश्यक असणार्‍या कोणत्याही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. याउलट जाबदेणार यांनी तज्ञाचा पुरावा देऊन तक्रारदार यांनी केलेले आरोप खोडलेले आहेत.
 
9]    या प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता विशेषत: फौजदारी खटला क्र. समरी ट्रायल केस नं. 19544/2007 मधील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी त्या खटल्यातील आरोपींकडून औषधोपचाराचा खर्च म्हणून वेळोवेळी रक्कम रु. 30,000/- घेतलेले आहे. या बाबीचा उल्लेख त्यांनी कुठेही केलेला नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी वाहनाच्या मालकाविरुद्ध आणि इन्शुरन्स कंपनीविरुद्ध मोटार अ‍ॅक्सीडेंट क्लेम ट्रॅब्युनल येथेही MACP No. 482/2007 हा नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला होता. त्याचाही उल्लेख तक्रारदार यांनी केलेला नाही. तक्रारदार यांनी या प्रकरणात रक्कम रु. 10,05,000/- ची अवास्तव नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे, त्यामध्ये व्यवसायामध्ये झालेल्या नुकसान भरपाई समाविष्ट आहे. ग्राहक मंचास व्यावसायिक नुकसानीसंबंधी नुकसान भरपाई देण्याचे अधिकार नाहीत. जाबदेणारांतर्फे असेही स्पष्ट करण्यात आले की, केवळ एक्स-रे अहवालावरुन फ्रॅक्चर झाले असे निश्चित होत नाही, त्यासाठी क्लिनिकल तपासण्या करणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या डॉ. हरदास यांचा अहवाल हा, त्यांना न तपासल्यामुळे सिद्ध होऊ शकत नाही. डॉ. वर्षा हरदास या रेडिऑलॉजिस्ट आहेत व जाबदेणार क्र. 1 डॉक्टर व साक्षीदार हे एम.एस. ऑर्थोपेडीक सर्जन आहेत. अशा परिस्थितीमध्ये, जाबदेणार यांचा पुरावा अधिक महत्वाचा ठरतो. जाबदेणार यांचेतर्फे युक्तीवादात असेही प्रतिपादन करण्यात आले की, चुकीचे निदान हा वैद्यकिय निष्काळजीपणा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे केवळे एक्स-रे अहवलावरुन फ्रॅक्चर झाल्याचे निदान करणे योग्य नाही. तज्ञाचा पुरावा दिल्याखेरीज वैद्यकिय निष्काळजीपणा सिद्ध होत नाही. त्या अनुषंगाने जाबदेणार यांनी खालीलप्रमाणे निवाडे दाखल केलेले आहेत.
 
 
1]   CPA Medical Judgments page no. 502 National Commission
          “Rahul Sharma V/S Dr. Ashok Mitra”
 
2]      CPA Medical Judgments Vol II page no. 592 = II(2002) CPJ 381 “Madhyagram Consumer Welfare V/S Dr. Kalyan Kumar”
 
3]      CPA Medical Judgments Vol. II page no. 688 – II (2003) CPJ 344,        “Mrs. Shntosh Kaur V/S Dr. Vijaya Mujoo”
 
4]      CPA Medical Judgments Vol. II page no. 354 = 1997 (2) CPR 641 “Dr. Sharque V/S Dr. A. M. Lahari”
 
5]      CPA Medical Judgments page no. 60
          “A. K. Hajarika V/S Sarighat X-ray and Clinical Lab”
 
6]      CPA Medical Judgments page no. 115 National Commission
          “Brij Mohan Kher V/S Dr. N. H. Banka”
 
7]      1995 DGLS (soft) 1061
          “Indian Medical Association V/S V.P. Shantha”
 
8]      CPA Medical Judgments Vol. II 892 = III (2000) CPJ 558
          “Rajindra Singh V/S Batra Hospital”
 
9]      CPA Medical Judgments Vol II 343 = I (2003) CPJ 248
          National Commission, “Dr. R. C. Sharma V/S Jage Ram”
 
10]    CPA Medical Judgments Vol II 345 = I (1999) CPJ 33
          “Dr. R. N. Sethi V/S Hardial Singh”
 
      वरील निवाड्यांचे अवलोकन केले असता या प्रकरणात जाबदेणार यांचा कोणताही वैद्यकिय निष्काळजीपणा किंवा सेवेतील त्रुटी नाही, असे मंचाचे मत आहे. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्ष आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
                                                            ** आदेश **
 
1.                  तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात येते.
                2.            तक्रारीच्या खर्चाबाबत कोणताही हुकुम नाही.
   
                                 3.           आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क
पाठविण्‍यात यावी.
 
4.                 पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या
आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन
जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
 
 
 स्थळ : पुणे
दिनांक : 07/जाने./2014
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.