Complaint Case No. CC/20/39 | ( Date of Filing : 16 Jun 2020 ) |
| | 1. Shankar Dhonduji Harne | R/o New shende layout, hariom nagar,chandrapur Tah.Dist.Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Dr Babasaheb Ambedkar Vidyut Karmachari Sahkari Pat Sanstha Maryadit, Urjanagar Through Its Chairman | Urjanagar,Super F-65/1, Tah.Dist.Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १२/०४/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हे म.रा.वि.वि. कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. विरुध्द पक्ष हे महाराष्ट्र को.ऑपरेटीव्ह सोसायटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत पतसंस्था आहे. तक्रारकर्ता हे दिनांक १/४/२०२० रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी दिनांक ४/५/२०२० रोजी विरुध्द पक्षाकडे अर्ज करुन त्यांची जमा ठेव आणि भागाची रक्कम रुपये १,१२,३००/- ची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष यांनी उत्तरही दिले नाही व रक्कमही परत केली नाही. तक्रारकर्त्यास कळले की तक्रारकर्ता व श्री प्रविण दैदावार हे एका विठ्ठल वारलू कामटकर यांनी घेतलेल्या कर्ज रकमेकरिता जमानतदार असल्याने विरुध्द पक्ष त्यांना उपरोक्त रक्कम परत करण्यास तयार नाही. विरुध्द पक्ष यांना पूर्ण माहिती आहे की, श्री विठ्ठल कामटकर सेवेत असतांना व सेवानिवृत्त होईपर्यंत पत संस्थेने त्यांचेकडून कर्ज वसुलीकरिता कोणतीही कारवाई केली नाही. श्री विठ्ठल कामटकर सेवानिवृत्ती नंतर ५ वर्षाने मरण पावले. विरुध्द पक्ष यांनी मयत श्री विठ्ठल कामटकर कडून कर्ज वसुलीकरिता कोणतीही कारवाई केली नाही. विरुध्द पक्ष हे ऑक्टोबर २०१३ पासून तक्रारकर्त्याचे वेतनातून मयत श्री विठ्ठल कामटकर ने घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम बेकायदेशिरपणे कपात करत आहे. याकरिता तक्रारकर्ता व दुसरा जमानतदार यांनी अंतरिम अर्जासह क्रमांक ४७६/२०१३ चा दावा विरुध्द पक्ष यांचे विरुध्द सहकार न्यायालय, नागपूर येथे दाखल केला. सहकार न्यायालयाने विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याचे वेतनातून कर्जाच्या हप्त्याची रक्कम कपात न करण्याबाबत स्थगिती दिली आहे. तक्रारकर्ता हे जमानतदार नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या दाव्यातील रक्कम रुपये १,१२,३००/- परत देण्याची विरुध्द पक्षाकडे मागणी केल्यानंतरही त्यांनी परत दिली नाही म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक ४/५/२०२० रोजी विरुध्द पक्षाकडे अर्जकेला परंतु अर्जाला कोणतेही उत्तर दिले नाही व रक्कम सुध्दा परत केली नाही. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास त्याच्या भागाची आणि मासिक जमा ठेव रक्कम रुपये १,१२,३००/- देण्यास जबाबदार असतांना सुध्दा त्यांनी ती परत दिली नाही. विरुध्द पक्ष हे सदर रक्कम कर्ज देण्याकरिता वापरुन त्यावर व्याज मिळवीत आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दर्शविल्याने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शेअर आणि मासिक जमा रक्कम रुपये १,१२,३००/- आणि त्यावर १२ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व इतर खर्च रुपये १०,०००/- असे एकूण रक्कम रुपये १,४२,३००/- द्यावे अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष प्रकरणात उपस्थित राहून त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये नमूद केले की, तक्रारकर्ता हे म.रा.वि.वि. कंपनीमधून सेवानिवृत्त झालेले आहे व विरुध्द पक्ष ही संस्था आहे. तक्रारकर्ता हे श्री विठ्ठल वारलू कामटकर यांनी घेतलेल्या कर्जाकरिता जमानतदार आहे आणि श्री विठ्ठल कामटकर यांनी कर्जाच्या पूर्ण रकमेची परतफेड केली नाही. श्री विठ्ठल कामटकर हे म.रा.वि.वि. मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. परंतु त्यांचे प्रमोशन होऊन ते तृतीय श्रेणीचे कर्मचारी झाल्याने त्याच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षावरुन ५८ वर्ष झाले. चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे वय ६० वर्ष असते. श्री विठ्ठल कामटकर यांचे वय ५८ वर्ष झाल्याने ते नोकरीमध्ये असतांना त्यांचेकडून कर्जाच्या रकमेची पूर्णपणे वसुली होऊ शकली नाही. तक्रारकर्ता हे श्री विठ्ठल कामटकर यांनी घेतलेल्या कर्जाकरिता जमानतदार आहे आणि करारनाम्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्ता मयत श्री विठ्ठल कामटकर यांचेकडून रुपये २,२९,२६५/- थकीत कर्जाची रक्कम घेणे आहे व ती मयत विठ्ठल कामटकर यांचेकडून किंवा त्यांचे जमानतदार कडून वसूल करणे आहे. तक्रारकर्ता सुध्दा सेवानिवृत्त झाले आहे व तक्रारकर्ता हे जमानतदार असल्याने त्यांचे शेअर्स परत केले नाही. तक्राकरर्ता व एक श्री प्रविण दैदावार यांनी सहकार न्यायालयात दावा क्रमांक ४७६/२०१३ दाखल केलेले आहे तसेच विरुध्द पक्ष यांनी सुध्दा तक्रारकर्त्याविरुध्द दावा क्रमांक ४८१/२०१४ सहकार न्यायालय, नागपूर येथे दाखल केले आहे. विरुध्द पक्ष यांनी वसुलीकरिता केलेली कारवाई ही संस्थेच्या नियमानुसारच आणि उभयपक्षातील करारनाम्यानुसारच आहे. विरुध्द पक्ष हे सहकार न्यायालयाचा आदेश होईपर्यंत रक्कम परत करण्यास असमर्थ आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, तक्रारकर्त्याची तक्रार, पुरावा शपथपञ यांना तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद समजण्यात यावी अशी पुरसीस, विरुध्द पक्ष यांचे लेखी कथन, दस्तावेज, शपथपञ तसेच उभयपक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे...
कारणमीमांसा - तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हे म.रा.वि.वि. कंपनी येथे कनिष्ठ तंञज्ञ म्हणून कार्यरत होते व ते दिनांक १/४/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. विरुध्द पक्ष हे विद्युत कर्मचा-यांकरिता असलेली सहकारी पत संस्था आहे. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष संस्थेचे सदस्य आहेत. विरुध्द पक्ष यांनी श्री विठ्ठल वारलु कामटकर यांना दिनांक १७/५/२००७ रोजी रुपये १,२५,०००/- चे कर्ज दिले होते. कर्जदार श्री कामटकर हे सुध्दा वरिष्ठ तंञज्ञ म्हणून म.रा.वि.वि. कंपनी मध्ये कार्यरत होते. त्यांनी घेतलेल्या कर्जाकरिता तक्रारकर्ता व त्यांचे सोबत असलेले श्री प्रविण पुरुषोत्तम दैदावार हे दोघेही जमानतदार होते. श्री कामटकर यांनी घेतलेल्या कर्जाकरिता तक्रारकर्ता यांनी जमानतदार म्हणून हमीपञ करुन दिले. श्री विठ्ठल वारलू कामटकर हे थकीतदार होते. कर्जदार हे सेवेत असतांना त्यांच्या वेतनातून पूर्ण कर्जाची रक्कम वसूल झालेली नाही व ते थकीतदार होते आणि त्या कर्जाकरिता तक्रारकर्ता हे जमानतदार होते म्हणून विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या वेतनातून रक्कम कपात करणे सुरु केले आणि तक्रारकर्ता व दुसरे जमानतदार श्री दैदावार यांनी विरुध्द पक्षाविरुध्द सहकार न्यायालय, नागपूर येथे अंतरिम अर्जासह दावा क्रमांक ४७६/२०१३ दाखल केलेला आहे. विरुध्द पक्ष यांनी श्री विठ्ठल कामटकर यांच्या कर्जाची रक्कम तक्रारकर्ता व दुसरे जमानतदार यांचे पगारातून कपात न करण्याकरिता स्थगिती अर्ज दाखल केला होता. त्यावर दिनांक २७/०६/२०१४ रोजी सहकार न्यायालय,नागपूरने विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्ता व दुसरे जमानतदार यांचेकडून प्रकरणासंदर्भात असलेली रक्कम प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत वसूल करु नये असे निर्देश देऊन त्याला स्थगिती दिलेली आहे. याशिवाय विरुध्द पक्ष यांनी सुध्दा कर्जदार, तक्रारकर्ता व दुसरे जमानतदार या तिघांविरुध्द सहकार न्यायालय, नागपूर येथे दावा क्रमांक ४८१/२०१४ दाखल केलेला असून त्यामध्ये तक्रारकर्ता व इतर दोघे यांचेविरुध्द थकीत कर्जाच्या रकमेकरिता अवार्ड पारित करण्याची प्रार्थना केलेली आहे.सध्या दोन्ही उपरोक्त प्रकरण सहकार न्यायालयासमक्ष प्रलंबित आहेत व सहकार न्यायालय नागपूर येथे उपरोक्त दोन्ही प्रकरण आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यापुर्वी दाखल झालेली असुन ते दोन्ही प्रकरण प्रलंबित असताना परत त्याच कारणाकरिता तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष प्रस्तुत तक्रार दिनांक १६/६/२०२० रोजी दाखल केलेली आहे व एकाच कारणाकरिता वेगवेगळया न्यायासनासमक्ष तक्रार दाखल करुन दाद मागता येत नाही व सहकार न्यायालय नागपूर येथे उपरोक्त दोन्ही प्रकरण प्रलंबित असल्याने आयोगाला प्रस्तुत प्रकरण चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र.३९/२०२० खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |