जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ७५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०४/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २५/०३/२०१४
श्री निळकंठ मोतरीराम बनछोड
उ.वय सज्ञान, धंदा – नोकरी
रा. ६७, शिनेरी कॉलनी, विद्यानगरी
देवपूर धुळे ता.जि. धुळे. …........ तक्रारदार
विरुध्द
डॉ. अमित अशोक खैरनार
अथर्व क्लिनीक
उ.व. सज्ञान, धंदा-वैद्यकिय व्यवसाय,
रा.६५, बडगुजर शॉपिंग जवळ,
शिवाजी बोर्डिंगसमोर, धुळे
ता.जि. धुळे. ......... जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. सौ.सी.एन. अग्रवाल)
(जाबदेणार तर्फे – अॅड. श्री.आर.एन. नगराळे)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या वैद्यकिय निष्काळजीपणा केल्याबाबत नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे दि.१९/०४/२०१० रोजी कामावर जात असतांना आग्रारोडवर अपघात झाला व त्यांच्या डाव्या पायास गुडघ्याच्या खाली मार बसून जखम झाली. त्यावेळेस त्यांनी सामनेवाला यांचा दवाखाना जवळ असल्याने त्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेले तेव्हा सामनेवाला यांनी तक्रारदारच्या जखमेची निर्जंतुकीकरणेची कोणतीही काळजी न घेता टाके टाकले व उपचार केले. त्याकामी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना रक्कम रू.२५०/- ची फी अदा केली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून नियमीत औषधोपचार घेतले. परंतु तक्रारदार यांचे दुखने कमी झाले नाही. शेवटी दि.२९/०४/२०१० रोजी तक्रारदार यांनी डॉ.दिपक हिरे यांचेकडे तपासणी केली असता जखमेत इन्फेक्शन होऊन सेप्टीक झाले होते व गॅंगरिन होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचदिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी रक्ताची तपसणी केली असता, त्या अहवालात योग्य वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे रक्तातील पांढ-या पेशी खुपच कमी झाल्या असल्याचे व जखमेतील पु मुळे त्यातील संसर्ग विषाणु हे रक्तात गेल्याने किडणी व फुफूसांना त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉ.विजय हिरे यांनी पुढील उपचार केले. सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे योग्य त्या वैद्यकिय मानकांचा अवलंब न केल्यामुळे तपसणी करून औषधोपचारामध्ये योग्य तो बदल न केल्यामुळे तक्रारदार यांना त्रास होऊन शस्त्रक्रिया करावी लागली व कायमचे अपंगत्व येऊन पायाची नैसर्गिक हालचाल बंद झाली आहे. ज्यामुळे तक्रारदार यांना शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून होणारी नुकसानीस सामनेवाले जबाबादार आहेत. त्यामुळे सामनेवाला यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले यांनी त्यास खोटे उत्तर दिल्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे.
२ तक्रारदार यांची विनंती अशी आहे की, सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे सोसावा लागलेला उपचार खर्च रक्कम रूपये ७०,०००/- व्याजासह मिळावे व मानसिक व शारीरिक त्रासाकामी रू.२५०००/- व अर्जाचा खर्च रू.३०००/- मिळावा.
३. सामनेवालायांनी त्यांचा लेखीखुलासा दाखल करून सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रादार हे दि.१९/०४/२०१० रोजी आले होते व तेव्हा त्यांची जखमेची पूर्ण काळजी घेवून ईलाज केला आहे. परंतु तक्रारदार यांनी सदर जखम कोरडी होईपर्यंत काळजी घेणे व औधोपचार घेणे याबाबत निष्काळजीपणा केला आहे. सामनेवाले यांनी तक्रादार यांना कधीही चुकीचे उपचार केलेले नाही. तक्रादार यांनी कॉम्पीटन्ट डॉक्टरांचा अथवा कमीटी ऑफ डॉक्टरांचा तसेच वैद्यकिय क्षेत्रांत पारंगत असेलेल्या व्यक्तींचा अभिप्राय दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी हेतुपुरस्कर सदरची तक्रार दाखल केली आहे. सदरची तक्रार ही खर्चासह रद्द करण्याची मागणी सामनेवाला यांनी केली आहे.
४. सामनेवाला यांनी निशाणी ९ लगत शपथपत्र व निशाणी १४ लगत कागदपत्र दाखल केले आहे. त्यामंध्ये वैद्यकिय सर्टिफिकेट व वैद्यकिय दाखले दाखल केले आहेत.
५. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे व सामनेवाला यांचा लेखी युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? होय
ब. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? नाही
क. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
तक्रारदार गैरहजर युक्तिवाद नाही. सामनेवाला यांचा लेखी युक्तिवाद वाचला.
६. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे दि.१९/०४/२०१० रोजी, सामनेवाला यांच्याकडून अपघात झाल्या कारणाने उपचार घेतल्याने त्याबाबत सामनेवाला यांनी उपचारकामी प्रिस्क्रीपशन दिले आहे ते नि.४ लगत दाखल केले आहे. सदर कागदपत्रचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांना अपघातात पायावर जखम झाली आहे त्यामुळे त्यांनी सामनेवाला यांचेकडे उपचार घेतले परंतु सामनेवाला यांनी जखमेची निर्जंतुकीकरण करणेबाबत कोणतीही काळजी घेतली नाही असे तक्रादार यांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रादार यांनी सामनेवाले यांचे उपचारकामीचे प्रिस्क्रीपशन सादर केले आहे. त्याचा विचार करता त्यावरून असे दिसते की दि.१९/०४/१० रोजी तक्रादार यांचा अपघात झाल्यानंतर सामनेवाला यांनी उपचार केले व त्याकामी त्यांना औषधे लिहून दिलेली आहेत. परंतु त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला डॉक्टर यांच्याकडे उपचार घेतले आहेत याबाबतचे कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी उपचार घेणेकामी डॉक्टर हिरे यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले आहे याबाबातचे कागदपत्र नि.४/२ लगत दाखल केलेले आहेत. यावरून असे दिसते की तक्रारदार यांनी पुढील उपचार हा सामनेवाला डॉक्टरांकडे न घेता डॉक्टर हिरे यांच्याकडे घेतलेला आहे. परंतु पुढील ज्या डॉक्टरकडे उपचार घेतले आहे त्या डॉक्टरला सदर तक्रार अर्जामध्ये पार्टी केलेले नाहीत. तसेच त्यांनी जे उपचार केले आहेत त्या कागदपत्रवरून सामनेवाला डॉक्टर यांनी चुकीचे उपचार दिले आहेत हे स्पष्ट होत नाही.
८ तक्रादार याचे असे म्हणणे आहे की दि.०४/०५/२०१० रोजी रक्ताच्या तपासणी अहवालामध्ये सामनेवाला यांनी योग्य ते उपचार न केल्यामूळे रक्तातील पांढ-या पेशींची संख्या कमी झाली व जखमेची सेप्टीक होऊन त्यामुळे संसर्ग झाला. सदरचा अहवाल हा नि.४/१६ लगत दाखल केलेला आहे. त्या अहवालावरून असे दिसते की तक्रादार यांच्या रक्तातील पांढ-या पेशीचे प्रमाण खुप कमी झाले असून त्याकामी त्यांनी उपचार घेतलेले आहे. सदर अहवालावरून असे निश्चित स्पष्ट होत नाही की सामनेवाला यांनी चुकीचे उपचार केले व त्यामुळे निष्कळीपणा होऊन तक्रारदार यांना त्रास सहन करावा लागला आहे. सदरचा अहवाल हा सामनेवालांविरूध्द पुरावा म्हणून सिध्द होत नाही. त्यामुळे तक्रादार यांच्या कथनात तथ्य नाही असे स्पष्ट होते.
९. तक्रादार यांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ कोणत्याही तज्ञ वैद्यकिय डॉक्टरांचा अहवाल दाखल केलेला नाही. केवळ तक्रारदार यांच्या कथनावरून सामनेवाला यांचा वैद्यकिय निष्काळजीपणा सिध्द होत नाही. तसेच तक्रादार हे सदर तक्राद दाखल केल्यापासून सतत गैरहजर आहेत. त्यांनी कोणता पुरावा दाखल केला नसून युक्तिवादही केलेला नाही. तक्रारदार यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते.यावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार ही सामनेवाला यांना केवळ हेतुपूरस्कर दाखल केली आहे असे दिसते. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘क’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणताही आदेश नाहीत.
धुळे.
दि.२५/०३/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.