जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/87 प्रकरण दाखल तारीख - 22/04/2009 प्रकरण निकाल तारीख – 24/07/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य श्रीमती.लक्ष्मीबाई भ्र.गंगाधर शिंदे, वय वर्षे 67, व्यवसाय शेती व घरकाम, अर्जदार. रा. धानोरा (रुई) ता.हदगांव जि.नांदेड. विरुध्द. 1. उप अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, कार्यालय- हदगांव ता.हदगांव जि.नांदेड. 2. अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुनिल जाधव. गैरअर्जदार क्र 1 व 2 तर्फे - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची लाभार्थी ग्राहक आहे, त्यांचा ग्राहक क्र.560050000449 असा आहे. सदरील विज कनेक्शन अर्जदारांच्या पतीच्या नांवाने आहे. परंतु अर्जदार हे स्वतः विज बिलाचा भरणा करीत आसतात. अर्जदार यांच्या शेतामध्ये ऊस,गहु व अन्य पिके घेतली जातात. पिकांच्या पाण्यासाठी अर्जदार यांनी गैरअर्जदार विज वितरण कंपनीकडुन कनेक्शन घेतले आहे. अर्जदार हे विज बिलाचा भरणा वेळोवेळी करीत असतात. अर्जदार ही सन 2007-2008 मध्ये त्यांचे शेत गट नं.319 मध्ये 40 आर क्षेत्रफळामधे ऊसाची लागवड केली होती व तो ऊस हंगामी कारखान्यास गाळपास आला होता. अर्जदार हीच्या शेतामध्ये विद्युत वितरण कंपनीचा डि.पी.आहे. सदरील डि.पी.जवळील विद्युत तारा लोंबकळत असल्यामुळे तारेतील घर्षणामुळे आगीचे गोळे निर्माण होत होते व अर्जदार हिच्या शेतातील ऊसामध्ये पडत असल्यामुळे सदरील घटने बाबत अर्जदार हीने लाईनमन व ज्युनिअर इंजिनियर यांना तीन ते चार वेळेस तोंडी सांगितले, परंतु त्यांनी निष्काळजीपणा दाखविली आणि गंभीरपणे दखल घेतली नाही त्यामुळे अर्जदार हीचे दि.22/04/2008 रोजी शेत जमीन 40 आर मधील ऊस जळुन खाक झाले व रु.1,00,000/- चे नुकसान झाले. तसेच 20 पी.व्ही.सी.पाईप व शेतीचे नांगर वैगेर अवजारे जळुन खाक झाले त्यामुळे रु.70,000/- नुकसान झाले. अर्जदार ही अशिक्षीत असल्यामुळे पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला नाही. परंतु अर्जदार हीने दि.24/04/2008 रोजी तहसीलदार हदगांव यांना नुकसान भरपाई द्यावी म्हणुन अर्ज केलेला आहे. तसेच महसुल खात्या मार्फत मंडळ अधिकारी हदगांव यांनी दि.01/05/2008 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन अर्जदार यांच्या शेत गट नंबर 319 मधील 40 आर जमीनीवरील जळालेल्या ऊसाचा व 20 पी.व्ही.सी.पाईप व शेती अवजारे यांचा पंचनामा केला. अर्जदार हीचे शेतातील ऊस जळाल्यामुळे रु.60,000/- चे नुकसान झाले आहे. तसेच ऊसाची लागवड व इतर खर्च खते, मजुरीचा खर्च रु.25,000/- तसेच 20 पी.व्ही.सी.पाईप व शेतीचे अवजारे वैगेर जळुन खाक झाले त्यामुळे अर्जदराचे रु.10,000/- चे नुकसान झाले आहे. तसेच शारीरिक त्रासापोटी अर्जदारास रु.5,000/- देण्यात यावे अशी मागणी केली आहे, असे एकुण रु.1,00,000/- व्याजासह गैरअर्जदाराकडुन देण्यात यावी, अशी अर्जदाराची मागणी आहे. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली. त्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नसतांना जाणीवपुर्वक दाखल केलेले आहे ते खोटे व चुकीचे असुन खारीज होण्यास पात्र आहे. अर्जदार ही विज वितरण कंपनीची ग्राहक नाही. सदर अर्जदाराला विज वितरण कंपनीने कोणताही विज पुरवठा देण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्जदाराला या प्रकरणांत स्वतःला ग्राहक आहे असे भासवून प्रकरण दाखल करणेचा कोणताही अधिकार नाही व सदरील प्रकरण त्यांना दाखल करता येणार नाही. अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची ग्राहक लाभार्थी आहे, हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराचे ग्राहक क्र.560050000449 असा आहे हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, विज कनेक्शन त्यांचे पतीचे नांवाने आहे. त्यांचे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे की, अर्जदार ही या बिलाचा भरणा करते व त्याचा लाभ घेते व ती वारस आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे की, त्यांच्या शेतामध्ये ऊस व गहु व अन्य पिके घेतली जातात व त्या पिकाच्या पाण्यासाठी अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन विज कनेक्शन घेतले आहे. अर्जदार यांचे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे की, त्यांचे नांवे शेत गट नं.319 मध्ये असलेल्या जमीनीमध्ये 40 आर क्षेत्रफळात ऊसाची लागवण सन 2007-2008 मध्ये केली होती व तो ऊस हंगामी कारखान्यास गाळपास आला होता. अर्जदाराचे हे म्हणणे चुकीचे व खोटे आहे की, त्यांच्या शेत जमीनीमध्ये असलेल्या डि.पी.जवळील विद्युत तारा लोंबकळत असल्यामुळे तारेतील घर्षणामुळे आगीचे गोळे निर्माण होत होते. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे की, त्यांच्या शेतातील ऊसामध्ये पडत असलेल्या आगीच्या गोळया बाबत लाईनमन व ज्युनियर इंजिनियर हदगांव यांना तीने ते चार वेळेस तोंडी सांगितले आहे. परंतु सदरील व्यक्तीनी निष्काळजीपणा दाखविल्यामुळे त्यांचे एक लाखाचे नुकसान झाले हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. दि.22/04/2008 रोजी अथवा अन्य कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेस अर्जदाराच्या डि.पी.जवळील लोंबकळत असलेल्या विद्युत तारेतील घर्षणामुळे आगीचे गोळे निर्माण झाले व ते अर्जदाराच्या शेतात पडले हे अर्जदाराचे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे की, त्यांच्या ऊसाला आग लागली आणि त्यांचे 40 आर जमीनीवरील ऊस जळुन खाक झाला आणि 20 पि.व्ही.सी. पाईप व शेतीचे नांगर ही औजारे जळुन खाक झाली आणि अर्जदाराचे रु.70,000/- चे नुकसान झाले. अर्जदाराने दि.24/04/2008 रोजी तहसिलदार हदगांव त्यांना अर्ज केला ही बाब गैरअर्जदारांना माहीती नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे की, महसुल खात्या मार्फत मंडळ अधिकारी हदगांव यांनी दि.01/05/2008 दिवशी घटनास्थळावर जावुन अर्जदाराचे शेत गट क्र.319 मधील 40 आर जमीनीवरील जळालेल्याऊसाचा व 20 पी.व्ही.सी.पाईप व शेती औजारे यांचा पंचनामा केला. मौजे हडसणी येथे हु.जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना आहे ज्या कालावधीमध्ये अर्जदार स्वतःचे नुकसान झाल्याचे म्हणवतो त्या कालावधीमध्ये कित्येक शेतक-यांनी आपला ऊस विकून त्याची रक्कम वसुल केलेली आहे. ऊस हे असे पिक आहे की, जे पुर्णतः कधीही जळुन जात नाही व जळावयाचा भाग हा त्याच्या शेंडयाची पाचट अथवा पान इतकाच असतो. साखर कारखाने जळीत ऊस सुध्दा खरेदी करतात व त्याचा मोबदला देतात म्हणुन त्याची जबाबदारी गैरअर्जदार यांचेवर येत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता केलेली नाही. म्हणुन अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र यांचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांनी सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र.2 – अर्जदार हे गैरअर्जदार यांचे बेनिफीशरी ग्राहक आहेत, असे अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी लाईट बिल दाखल केलेले आहे. सदर लाईट बिलावर श्री.गंगाधर पुंजाजी असे नमुद केलेले आहे. अर्जदार ही श्री.गंगाधर पुंजाजी यांची पत्नी आहे. गंगाधर पुंजाजी यांच्या मृत्युनंतर अर्जदार ही वारसदार म्हणुन सदर अर्जाचे कामी अर्जदार म्हणुन सदरची तक्रार दाखल केलेली आहे. गंगाधर पुंजाजी यांचे मृत्युनंतर अर्जदार ही बिलाचा भरणा करीत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली लाईट बिल वारस प्रमाणपत्र याचा विचार होता, अर्जदार ही गैरअर्जदार यांचे बेनिफशिरी ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र.2 - अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार शेत गट क्र.319 मधील 40 आर क्षेत्रामध्ये अर्जदार यांनी सन 2007-08 मध्ये ऊस लावलेले आहे. सदरचा ऊस हा अर्जदार यांचे शेत जमीनीमध्ये विद्युत वितरण कंपनीचे डी.पी. जवळील विद्युत तारा लोंबकळत असल्यामुळे तारांचे घर्षण होऊन आगीचे गोळे निर्माण झालेले अर्जदारांचे शेतातील ऊसमध्ये पडल्यामुळे अर्जदाराचे ऊस जळालेले आहे. अर्जदाराच्या शेतातील विद्युत तारा लोंबकळत आहेत, ही बाब अर्जदार यांनी लाईनमन, ज्युनिअर इंजिनियर विज वितरण कंपनीच्या कार्यालय हदगांव येथे जाऊन 3 ते 4 वेळा सांगीतले आहे, असे अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेले आहे परंतु तसे दर्शवीणारा कोणताही कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांच्या पतीचा मृत्यु दि.24/6/2005 रोजी झालेला आहे व आज अखेर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर विज कनेक्शन स्वतःच्या नांवावर करुन घेण्यासाठी कोणताही अर्ज गैरअर्जदार यांचेकडे दिले बाबतचा कोणताही पुरावा या मंचा समोर दाखल केलेला नाही. अर्जदार यांच्या शेतातील ऊस जळाल्यानंतर त्याबाबतची नोंद पोलिस स्टेशनमध्ये अर्जदार यांनी नोंदविलेले नाही. अर्जदार यांनी ऊसासोबत 20 पी.व्ही.सी.पाईप व शेती अवजारे जळुन गेल्याची नोंद केलेली आहे परंतु सदरचे पाईप खरेदी केले बाबत अगर शेतात आग लागल्याची घटना घडली त्यावेळी शेती अवजारे अर्जदाराच्या शेतामध्ये होती हे दर्शवीणारा कोणताही कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दि.1/5/2008 रोजी मंडळ अधिकारी हदगांव यांनी केलेला पंचनामा दाखल केलेला आहे. अर्जदार यांच्या शेतात प्रत्यक्षात ऊस जळाल्याची घटना दि.22/4/2008 रोजी घडलेली आहे व अर्जदार यांच्या शेताचा पंचनामा दि.1/5/2008 रोजी म्हणजे जवळ जवळ आठ दिवसांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांच्या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांच्या शेतामधील विद्युत वितरण कंपनीच्या डि.पी.जवळील लोंबकळत असलेल्या विद्युत तारातील घर्षणामुळे आगीचे गोळे निर्माण होऊन अर्जदार यांच्या शेतात पडले व ऊसाला आग लागली आणि पंचनामामध्ये विद्युत वाहीनीत दोष निर्माण होऊन आग लागुन ऊसाचे पिक जळल्याची नोंद केलेली आहे. सदर पंचनामामध्ये अर्जदाराचे किती रुपयाचे नुकसान झाले याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. अर्जदार यांच्या ऊसाला आग लागल्याची अर्जातील कथनामध्ये व पंचनामामधील कथनामध्ये तफावत दिसुन येत आहे. सदरचा पंचनामा आठ दिवसांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी सदर घटने बाबत गैरअर्जदार यांचे कार्यालयात वारंवार तक्रार केले बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचा समोर आलेला नाही. सदर अर्जाचे कामी विद्युत निरीक्षकाचा कोणताही अहवाल या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार हे त्यांचे ऊस जळीताची व 20 पी.व्ही.सी. पाईप व शेती अवजारे जळाले बाबतची तक्रार पुराव्यानीशी सिध्द करु शकलेले नाही. अर्जदार यांच्या अर्जातील कथने व नुकसान भरपाईची रक्कम ही मोघम स्वरुपाची आहे. अर्जदार यांनी अर्जातील कथने अगर नुकसान भरपाईच्या पृष्ठयार्थ कोणताही कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व त्यांनी केलेला युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र त्यांचा युक्तीवाद याचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |