श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार एम.बी.ए चे विदयार्थी असून त्यांच्या गावाहून – हरयाणा येथून रेल्वेने बाईक मागविली होती. तक्रारदारांच्या मित्रांनी बाईकचे मुळ नोंदणी प्रमाणपत्र, विम्याची कागदपत्रे, भारतीय रेल्वेची मुळ बुकींगची पावती, पोल्युशन प्रमाणपत्र, बाईकच्या दोन ओरिजीनल किल्ल्या जाबदेणारांमार्फत दिनांक 25/10/2008 रोजी पाठविल्या होत्या. सदरहू पार्सल तक्रारदारांना 1/11/2008 पर्यन्त मिळेल असे सांगण्यात आले होते. दिनांक 5/11/2008 पर्यन्त वाट पाहूनही जाबदेणार यांच्याकडून पार्सल प्राप्त न झाल्यामुळे चौकशी अंती पार्सल मुंबई ऑफिस मधून पुणे येथे 10/11/2008 पर्यन्त येईल असे सांगण्यात आले. दिनांक 10/11/2008 रोजी पार्सल ट्रान्झीट मध्ये हरविल्याचे सांगण्यात आले. तक्रारदार विदयार्थी होते, सदरहू कालावधी परीक्षेचा होता. रेल्वेची ओरिजिनल लोडींग पावती नसल्यामुळे रेल्वेने बाईक देण्यास नकार दिला. तक्रारदारांना त्यामुळे पुढील कायदेशिर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर, बराच पैसा, वेळ खर्च केल्यानंतर एक महिन्यानंतर बाईक परत मिळाली. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना त्रास सहन करावा लागला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 50,000/- मागतात. तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत.
2. जाबदेणार क्र.1 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द मंचाने दिनांक 15/11/11 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. जाबदेणार क्र. 2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी गुड्स ट्रेन मधून बाईक मागविली होती त्यासंदर्भात पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांच्या मित्रांनी जाबदेणारांमार्फत दिनांक 25/10/2008 रोजी मुळ कागदपत्रे पाठविली होती हे जाबदेणार यांना मान्य नाही. तक्रारदारांना तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दिनांक 24/10/2008 रोजी बाईक मिळाली होती. अटी व शर्तीनुसार मुळ कागदपत्रे पाठवितांना त्यांचा विमा उतरविल्याशिवाय कागदपत्रे कुरिअर द्वारा पाठविता येत नाहीत. जाबदेणार यांनी अटी व शर्ती पावती/व्हाऊचर वर नमूद केलेल्या आहेत, त्यानुसार जाबदेणार यांची मर्यादित जबाबदारी रुपये 100/- पर्यन्तच आहे. तक्रारदारांनी रुपये 100/- घेण्यास नकार दिला. तक्रारदारांनी पावतीवरील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे, जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
4. जाबदेणार क्र.2 यांनी लेखी युक्तीवाद व मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे दाखल केले.
5. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांच्या मित्रांनी हरयाणा येथून दिनांक 25/10/2008 रोजी त्यांच्या बाईक संदर्भातील मुळ कागदपत्रे - नोंदणी प्रमाणपत्र, विम्याची कागदपत्रे, भारतीय रेल्वेची मुळ बुकींगची पावती, पोल्युशन प्रमाणपत्र, बाईकच्या दोन ओरिजीनल किल्ल्या जाबदेणारांमार्फत पाठविली होती/तक्रारदारांनी मागविली होती. सदरहू पार्सल जाबदेणार यांनी ट्रान्झीट मध्ये हरविले ही बाब निर्वीवाद आहे. जाबदेणार यांनी त्यांच्या अटी व शर्ती तक्रारदारांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या. जाबदेणार यांच्या अटी व शर्तीनुसार मुळ कागदपत्रे जाबदेणारांमार्फत पाठवावयाची झाल्यास त्यांचा विमा उतरविणे आवश्यक होते. प्रस्तूत प्रकरणी तक्रारदारांनी तसे केले नसल्याचे निदर्शनास येते. म्हणून जाबदेणार यांच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार रक्कम रुपये 100/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे पार्सल हरविल्याचे मान्य केलेले आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील ही त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हे एम.बी.ए चे विदयार्थी आहेत. ज्या कालावधीत पार्सल हरविले त्या कालावधीत तक्रारदारांची परीक्षा होती. जाबदेणार यांनी पार्सल संदर्भात आवश्यक ती काळजी घेतलेली नसल्यामुळे, पार्सल हरविल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 2000/- अदा करावी असा आदेश जाबदेणार यांना देण्यात येत आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 50,000/- मागितले आहेत. परंतू तक्रारदारांची ही मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे. प्रस्तूत प्रकरणी जाबदेणार क्र.2 यांनी मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांचा I (1994) CPJ 52 (NC) एअरपाक कुरिअर्स इं. प्रा. लि. विरुध्द एस. सुरेश दाखल केलेला आहे, तो तंतोतंत लागू होतो असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन, दाखल कागदपत्रांवरुन व मा. वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रुपये 100/-, नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.