(घोषित दि. 30.04.2014 व्दारा श्रीमती. माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदार क्रमांक 1 यांचे पती श्री.नामदेव भाऊराव शहाणे यांनी गैरअर्जदार यांचेकडे नागरिक सुरक्षा पॉलीसी क्रमांक 1. 65977/5 रुपये 1,00,000/- 2. 36182/5 रुपये 1,60,000/- 3. 36176/7 रुपये 80,000/- एवढया रकमेची घेतली होती. तक्रारदार क्रमांक 1 यांचे पती दूदैवाने दिनांक 03.04.2010 रोजी अपघातात मृत्यू पावले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यू नंतर गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत दाखल केला. गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचे पतीचा दिनांक 03.04.2010 रोजी अपघाती मृत्यू झालेला असून दिनांक 08.08.2012 रोजी या संदर्भातील माहिती पाठवली. अपघाता नंतर 2 वर्षे 4 महिन्या नंतर माहिती दिलेली असल्यामुळे प्रस्तुतची तक्रार मुदतबाहय आहे.
गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्हणण्यानुसार अपघाता संदर्भातील माहिती दिनांक 28.07.2010 रोजी प्राप्त झाली. त्या नंतर दिनांक 07.08.2010 रोजी कोरे क्लेम फॉर्म तक्रारदारांना पाठवले. त्यानंतर तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 16.09.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठवला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा प्रस्तावावर कार्यवाही का केली नाही या बाबत खुलासा होत नाही.
तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे लेखी निवेदन यांचा सखोल अभ्यास केला. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.बी.व्ही.इंगळे, गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विद्वान वकील श्री. व्ही.बी.इंगळे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.नामदेव शहाणे यांचा दिनांक 03.04.2010 रोजी अपघाती मृत्यू झाल्यानंतर दिनांक 28.07.2010 रोजी या संदर्भातील माहिती (क्लेम इंटिमेशन) गैरअर्जदार क्रमांक 2 यांना प्राप्त झाल्याचे त्यांचे लेखी म्हणण्यानुसार दिसून येते. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदारांचा प्रस्ताव दिनांक 16.09.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठवल्याचे दिसून येते.
तक्रारीतील दाखल कागदपत्रानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह विहीत मुदतीत गैरअर्जदार 2 यांचेकडे दाखल झाल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानुसार सदर प्रस्ताव दिनांक 16.09.2010 रोजी गैरअर्जदार 1 यांचेकडे पाठवला.
तक्रारीतील दाखल कागदपत्रावरुन तक्रारदारांनी विहीत मुदतीत प्रस्ताव गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठवलेला असून, तक्रारदार सदर पॉलीसी अंतर्गत देय असलेल्या रकमा मिळण्यास पात्र असल्याचे दिसून येते. तक्रारदार वरील विमा पॉलीसी अंतर्गत विमा लाभ रक्कम मिळण्यास पात्र असूनही गैरअर्जदार 1 यांनी विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचे दिसून येते. गैरअर्जदार 1 यांची सदरची कृती सेवेतील त्रूटी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार 1 यांनी तक्रारदारांना सदर पॉलीसी अंतर्गत देय असलेल्या रकमा देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना 1. विमा पॉलीसी क्रमांक 65977/5 रुपये 1,00,000/- 2. विमा पॉलीसी क्रमांक 36182/5 रुपये 1,60,000/- 3. विमा पॉलीसी क्रमांक 36176/7 रुपये 80,000/- आदेश मिळाल्या पासून 60 दिवसात द्यावे.
वरील रकमा विहीत मुदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरा सहीत द्याव्यात.
खर्चा बाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.