ग्राहक तक्रार क्र. 79/2014
अर्ज दाखल तारीख : 14/03/2014
अर्ज निकाल तारीख: 18/12/2014
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री.दशरथ लक्ष्मण ईटकर,
वय-55 वर्षे, धंदा – मजूरी,
2. सौ. मुक्ताबाई दशरथ र्इटकर,
वय-50 वर्षे, धंदा- घरकाम,
दोही रा. सिंकदरपूर, ता. लातूर, जि. लातूर,
3. सुजित राजेंद्र धनके,
वय-25 वर्षे, धंदा - शेती,
मु.पो. वाघोली ( व ), ता. व जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मे. विभागीय व्यवस्थापक,
दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी, विभागीय कार्यालय,
442, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर.
व्दारा:मॅनेजर, दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
मारवाड गल्ली, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.डी.मोरे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.पी.पी.देवळे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार क्र.1 व 2 यांचा मुलगा रामा दशरथ इटकर हा तक्रारदार क्र.3 यांच्या शेतात विहीरीवर मजूर म्हणून कामावर होता. तक्रारदार क्र.3 ने विमा पॉलिसी क्र.161990/48/2012/8 या क्रमांकाने कालावधी दि.07/04/2011 ते 06/04/2012 अशी असलेल्या नागरी सुरक्षा व्यक्तिगतनुसार अपघाती मृत्यू झाल्यास व दवाखान्यासाठी रु.50,000/- अशी एकूण रु.1,50,000/- ची जोखीम विरुध्द पक्षकाराने घेतलेली आहे.
दि.01/05/2012 रोजी तक्रारदार यांचा मुलगा रामा ऊर्फ रामदास हा त्याच्या डाव्या पायास साप चावल्याने दि.02/05/2012 रोजी अपचारा दरम्यान मयत झाला त्यास उपचारासाठी रु.30,000/- चा खर्च आला. पो.स्टे.29/2011 कलम 174 सी.आर.पी.सी. नुसार नोंद झाली असून त्यांनी तहसीलदार यांच्याकडे अंतीम अहवाल दि.26/2011 अन्वये दि.12/07/2011 रोजी पाठविलेला असून जाहीर प्रगटन काढून तहसिलदार यांनी रामदार दशरथ इटकर हा साप चावून मयत झाल्याचा अंतिम आदेश दि.31/03/2012 रोजी केलेला आहे. तक्रारदार यांचा मुलगा साप चावल्याने मयत झाला आहे. तक्रारदार क्र.3 यांनी सदरची पॉलिसी घेतलेली असल्याने ती त्यांना मिळणे गरजेचे आहे.
दि.17/10/2012 रोजी विरुध्द पक्षकाराने तक्रारदार क्र.3 यांना दावा नाकारलेला असल्याबाबत विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास कळविले व त्यामध्ये साप चावल्याचे नक्की कारण दिसुन येत नाही या कारणावरुन दावा नाकारलेला आहे व असे करुन विरुध्द पक्षकाराने खोटे कारण देवून सेवेत त्रुटी केली आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारदार क्र. 1 व 2 यांना मुलाच्या मृत्यूमूळे विरुध्द पक्षकार यांच्याकडून विमा पॉलीसी रु.1,50,000/- अदा करण्यात आलेली नाही म्हणून सदरची रक्कम तसेच शारीरिक, आर्थीक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापाटी रु.10,000/- दि.01/05/2011 रोजी पासून व्याजासह बोनस देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत पॉलीसी कव्हर नोट, नो क्लेम लेटर, अंतीम आदेश, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शविच्छेदन अहवाल इत्यादरी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहे.
2) विरुध्द पक्षकार यांना या मंचा मार्फत नोटीस बजावली असता त्यांनी आपले म्हणणे दि.20/01/2011 रोजी दाखल केले केले ते पुढीलप्रमाणे.
सदर पॉलिसी चा कालावधी मान्य असून तक्रारदार आपला ग्राहक होत नाही तसेच विमा धारकाचा मृत्यू अपघाती नाही. ग्रामपंचायतीने दिलेले वारसाचे प्रमाणपत्रामध्ये मिनाबाई रामदास ईटकर जी मयताची पत्नी आहे तिला एकटीलाच वारस म्हणून दाखविले आहे. परंतु सदरच्या तक्रारीमध्ये ती पार्टी नाही. म्हणून ही तक्रार चालू शकत नाही. तक्रादार क्र.1 व 2 यांच्या वारस असल्याचे पुराव्याने सिध्द करावे. दि.17/10/2012 रोजी पत्र देवून योग्य कारणाने दावा नाकारला. तक्रारदारास दोन आठवडयांचा कालावधी देऊन दावा शाबीत करण्यासाठी संधी देखिल दिलेली होती. अर्जदार क्र.3 यांनी त्यांच्या विहिरीवर असलेल्या कामगारांचा विमा या विरुध्द पक्षकारकडे उतरवीला होता. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.01/05/2011 रोजी घडलेली असून रामदास याचा मृत्यू दि.02/05/2011 रोजी सोलापूर येथील सरकारी दवाखान्यात झालेला आहे. संबंधीत डॉक्टरांना साप चावल्याचे सांगितले नाही. दि.02/05/2011 रोजी उस्मानाबाद सरकारी रुग्णालय यांनी सोलापूर येथील सरकारी रुग्णालयास पाठविलेल्या संदर्भ चिठठीमध्ये देखील सर्पदंशाच्यापुढे प्रश्नार्थक चिन्ह नमूद केले आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये डाव्या पायावर साप चावल्यामुळे जखम झाल्याचे कोठेही नमूद नाही.
पोलीसांनी साक्षीदारांचे तपास टीपण नोंदलेले आहेत. या तपास टिपणामध्ये मयतास दि.02/05/2011 रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान सर्पदंश झाल्याचे नमूद केले आहे. तर अर्जदार दि.01/03/2011 रोजी दुपारी 4.00 वा सर्पदंश झाल्याचे कथन करतात. वरील सर्व कारणामुळे विरुध्द पक्षकाराने डॉ. प्रकाश आर. कुलकर्णी औरंगाबाद यांचेकडे त्यांचे मागविण्यासाठी पाठविले असता त्यांनी मयताचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला नसल्याचे दि.07/11/2012 रोजी लेखी नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारदार हे विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) तक्रारदार हे अपघात विमा रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय. होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
निष्कर्षाचे विवेचन
4) मुद्दा क्र.1 चे उत्तर:
तक्रारदार क्र.1 व 2 हे मयताचे आई व वडील असून त्यांचे वारस आहेत. तक्रारदार क्र.3 यांनी मयताच्या जीवीतासाठी व औषधोपचाराच्या दायीत्वासाठी विरुध्द पक्षकारा कडून पॉलिसी घेतलेली आहे. तसेच तक्रारदाराची पत्नी ही तक्रारदार म्हणून रेकॉर्डवर नसली तरी वारस म्हणून रेकॉर्डवर आली आहे. त्यामुळे तक्रारदार क्र.1 व 2 व मयताची पत्नी मिनाबाई रामदास ईटकर हे मयताचे रेकॉर्डवर असलेले वारसदार आहेत. त्यामुळे तसेच तक्रारदार क्र.3 यांनी मयताच्या दायीत्वासाठीच पॉलिसी घेत असल्यामुळे तोही विरुध्द पक्षकारचा ग्राहक आहे. त्यामुळे तक्रारदार क्र.1 व 2 तसेच मयताची पत्नी म्हणून मिनाबाई व तक्रारदार क्र.3 हे ग्राहक (लाभार्थी) व विरुध्द पक्षकार हा सेवापुरवठादार हे नाते प्रस्थापीत होण्यास काही अडचण नाही म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे देतो.
5) मुद्दा क्र. 2 चे उत्तर:
विरुध्द पक्षकाराने तक्रारदार क्र.3 ने मयताच्या दायित्वासाठी पॉलिसी घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच रेकॉर्डवरुन दाखल झालेल्या नागरी सुरक्षा वैयक्तीक पॉलीसी शेडयूल ता.14/06/2013 च्या पत्राअन्वये क्र.2 ला मयताचे नाव स्पष्ट दिसून येते. त्यामुळे सदर पॉलीसीबाबत कोणताही वाद आहे असे आम्हला वाटत नाही. दि.17/10/2012 रोजी विरुध्द पक्षकाराने जो क्लेम नाकारलेला आहे त्यामध्ये साप चावल्याबददल साशंकता व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना वेळही दिलेला आहे व याची एक प्रत मिनाबार्इ रामा ईटकर यांनाही दिलेली आहे. या संदर्भात कागदपत्रांची पाहणी केली असता दि.31/03/2012 रोजीचे कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे पत्र ज्यामध्ये मयताच्या बाबतीत मुदतीत कोणताही आक्षेप प्राप्त झाला नसल्यामुळे साप चावल्याने मृत्यू याबाबत अंतिम मान्यता देण्यात येत आहे असा अहवाल दिसुन येतो. घटनास्थळ पंचनाम्याबाबत पाहणी केली असता त्यामध्येही वागवली ते तेर जाणा-या रत्यावर वागोली येथूपासून 1 किलोमिटर अंतरावर शेत कडेला नवीन विहीरीचे खोद काम चालू असून शेजारी असलेल्या पालीमध्ये साप चावल्याविषयी नमूद केल्याचे दिसून येत आहे. इन्क्वेस्ट पंचनामा पाहीला असता पोलीस व पंच याचे मारणाबाबत मत या सदरामध्ये डाव्या पायास साप चावल्याने सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले असून उपचारा आधीच मरण पावले आहे. या संदर्भात डॉक्टराचा पी.एम अहवाल दि.02/05/2011 रोजीचा पाहणी केला असता opinion as to cause probable मध्ये साप चावला असा स्पष्ट उल्लेख आढळून येतो. डॉ. अनिल हूलसूरकर यांचा हा अहवाल असून ते फॉरेनसीक डीपार्टमेंटचे मेडीकल ऑफिसर आहेत तसेच सोलापूरला पाठविणा-या रेफरंन्स कार्डमध्येही डॉ.गिलबीले यांनी केलेला स्नेक बाईटचा उल्लेख आढळून येतो. या संदर्भात संशय आल्यामुळे विरुध्द पक्षकारने डॉ.प्रकाश कुलकर्णी यांच्याकडून एक अहवाल मागविला तो दि.08/11/2012 रोजी विरुध्द पक्षकार यांना मिळाला त्यामध्ये 'It will not correct to pay the claim if it is payable only in case of snake bite'असा अभिप्राय दिला असल्याने विरुध्द पक्षकाराने सदरचा क्लेम हा नामंजूर केलेला असावा. तथापि जेव्हा दोन डॉक्टरांचे परस्पर विरोधी अहवाल पुराव्यासाठी समोर येतात तेव्हा अर्थातच ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्ष मयताची तपासणी केली, शवविच्देदन केले तसेच संबंधीत शासकीय यंत्रणाने तपासणी करुन आपले मत जाहीर केले व ज्या डॉक्टरांनी कागदपत्रांची पडताळणी करुन आपले मत विमा कंपनीच्या मागणीवरुन जाहीर केले. यापैकी नैसर्गीक न्यायतत्वानुसार प्रत्यक्ष प्रेताची तपासणी करणा-या डॉक्टरांचे मत हे अधिक महत्वाचे व न्यायिक दृष्टीने खरे ठरते. त्यामुळे मयताचा मृत्यू हा साप चावूनच झाला या विषयी होकारार्थी मत देण्या शिवाय आमच्या जवळ पर्याय नाही. त्यामूळे दाव्याचे दायीत्व असतांना देखील तसेच उपलब्ध कागदपत्रावरुन सदरचा दावा मान्य करता येणे सहज शक्य असतांना देखील विनाकारण गुतागुंत निर्माण करुन दायीत्व टाळण्याचाच विरुध्द पक्षकारचा प्रयत्न डॉ.प्रकाश कुलकर्णी यांनी दिलेल्या ‘साप चावल्याच्या बाबत विमा मंजूर करु नये’ असा अहवाल दिसून येतो त्यावरुन दिसून येतो. तसेच तक्रारदाराने उपचारा संदर्भात झालेला खर्च रु.30,000/- हा सिध्द न करु शकल्याने तसेच अधिकच्या उपचारापुर्वीच व शासकिय दवाखान्यामार्फतच सदरचा मयत हा उपचार घेत असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदाराची रु.30,000/- उपचारासंदर्भातील मागणी अमान्य करण्यात येत आहे. त्यामुळे विरुध्द पक्षकाराने या रक्कमेव्यतरीक्तचे दायीत्व अमान्य करुन सेवेत त्रुटी केली आहे असे आमचे मत असून मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व पुढील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी मयताची पत्नी मिनाबाई रामदास ईटकर यांना क्लेम रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार फक्त) व तक्रादार क्र.1 व 2 यांना क्लेम रक्कम रु.60,000/-(रुपये साठ हजार फक्त) द्यावी.
विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार क्र.1 व 2 व मयताची पत्नी मिनाबाई रामदास ईटकर यांना वरील रक्कमेवर दि.17/10/2012 रोजी पासून 9 % द.सा.द.शे. व्याजासह अदा होईपर्यंत द्यावी.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार क्र.1 व 2 यांना तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावा.
4) विरुध्द पक्षकार विभागीय व्यवस्थापक, दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी यांना अशा
प्रकारच्या संवेदनशील प्रकरणामध्ये स्पष्ट कागदपत्रे उपलब्ध असतांना सुध्दा अनावश्यक
कागदपत्रांची मागणी करुन टाळाटाळ केल्याबददल सेवेतील त्रुटीबाबत वैयक्तिकरित्या
रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) मयताची पत्नी मिनाबाई रामदास ईटकर यांना
देण्याविषयीचा आदेश करण्यात येतो.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत मंचात अर्ज
दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.