निकाल
पारीत दिनांकः- 31/01/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार हे 50% पेक्षा जास्त अपंग आहेत. ते आणि त्यांचे कुटुंब मिरजहून महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्याला यायला निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, 10 वर्षांचा मुलगा, 7 वर्षांची मुलगी आणि बरेच मोठे सामान होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अचानकपणे त्यांच्या ऑफिसमध्ये काम निघाल्याने त्यांना रिझर्व्हेशन काढता आले नाही. मिरज रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर तक्रारदारांनी, अपंगासाठी वेगळा डबा किंवा वेगळ्या सिटबाबत (रिझर्व्ह) चौकशी केली. रेल्वेच्या नियमानुसार अपंगासाठी वेगळा डबा किंवा रिझर्व्ह सिट असते. परंतु चौकशी विभागात विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली गेली नाहीत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एक्स्प्रेसची पाहणी केली असता, त्यामध्ये अपंगांसाठी सुविधा नसल्याचे आढळून आले, म्हणून त्यांना जनरल डब्यातुन प्रवास करावा लागला. तक्रारदारांने त्यांच्याजवळ असणारी रेग्झिनची बॅग बाकाखाली ठेवली. त्यामध्ये एक लेडीज पर्सही ठेवली. रेल्वेगाडी ताकारी स्टेशनवरुन सुटल्यानंतर, तक्रारदारांचे बाकाखाली ठेवलेल्या रेग्झिनच्या बॅगकडे लक्ष गेले, तेव्हा ती बॅग अस्ताव्यस्त झाल्याचे व त्यातील लेडीज पर्स गहाळ झाल्याचे त्यांना दिसले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या बॅगमध्ये सोन्याचे, चांदीचे दागिने मिळून व रोकड अशी सर्व मिळून जवळपास रु. 30,000/- ठेवलेले होते. तक्रारदारांनी रेल्वेतील पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु एकही पोलिस दिसला नाही, म्हणून पुणे येथील पोलिस स्टेशन येथे त्यांनी तक्रार नोंदविली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी नियमाप्रमाणे अपंग व्यक्तीसाठी रेल्वेमध्ये स्वतंत्र डबा किंवा सिट ठेवली नाही, म्हणून त्यांच्याकडील सामानाची चोरी झाली व त्याकरीता जाबदेणार हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. यासाठी तक्रारदारांनी दि. 6/6/2009 रोजी जाबदेणारांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. नोटीस मिळूनही जाबदेणारांनी दखल घेतली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 30,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 20,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5000/- व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता ते मंचासमोर उपस्थित झाले व त्यांच्या लेखी म्हणण्याद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी रेल्वे ट्रॅब्युनल अॅक्ट, 1987 प्रमाणे रेल्वे ट्रॅब्युनलमध्ये तक्रार दाखल करावयास हवी होती, परंतु त्यांनी प्रस्तुतच्या मंचामध्ये तक्रार दाखल केलेली आहे, म्हणून ती नामंजूर करावी. तक्रारदारांनी चोरीची FIR ही सातारा किंवा कराड येथे दाखल करावयास हवी होती, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार ही अपरिपक्व (Immature) आहे. तक्रारदारांनी डीव्हिजनल मॅनेजर, मिरज यांना पक्षकार केलेले आहे, म्हणजे चुकीचे पक्षकार (Mis joinder of party) केलेले आहे. इंडियन रेल्वे अॅक्टच्या कलम क्र. 100 नुसार, ते रेल्वेमधील कुठल्याही चोरीस जबाबदार नाहीत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, काही रेल्वेमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र कोच आहेत, परंतु अपंग व्यक्तीने त्यासाठी आगाऊ तिकिट काढले पाहिजे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी अचानकपणे तिकिट काढल्याचे ते सांगतात. तक्रारदारांच्या सामानाची चोरी ही त्यांच्याच निष्काळजीपणामुळे झालेली आहे. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांना अचानकपणे पुणे येथे यावयाचे असल्याने त्यांनी रिझर्व्हेशन न काढता महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील जनरल डब्यामध्ये बसले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी नियमाप्रमाणे अपंग व्यक्तीसाठी रेल्वेमध्ये स्वतंत्र डबा किंवा सिट ठेवले नाही, म्हणून त्यांच्याकडील सामानाची चोरी झाली. तक्रारदारांना अपंग व्यक्तीच्या सुविधा किंवा रिझर्वेशन हवे होते, तर त्यांनी आगाऊ तिकिट काढावयास हवे होते, परंतु तक्रारदारांनी ऐनवेळी तिकिट काढले, त्यामुळे त्यांना रिझर्वेशन मिळाले नाही. प्रवास करतेवेळी सामानाची काळजी घेणे हे ज्या-त्या प्रवाशाची जबाबदारी असते. तक्रारदारांनीच त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांची पर्स बाकाखाली ठेवली होती असे नमुद केले आहे. सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स स्वत:जवळ व्यवस्थित न ठेवता बाकाखाली ठेवणे यामध्ये तक्रारदारांचाच निष्काळजीपणा दिसून येतो. तक्रारदारांनी अचानकपणे तिकिट काढले, अपंगासाठीच्या सुविधांची मागणीही केली नाही व स्वत:च्या सामानाची व्यवस्थित काळजी घेतली नाही, याकरीता जाबदेणार हे जबाबदार नाहीत, असे मंचाचे मत आहे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये मंचास जाबदेणारांची कोणतीही सेवेतील त्रुटी आढळत नाही, तक्रारदारांच्या सामानाची चोरी ही त्यांच्याच निष्काळजीपणामुळे झालेली आहे, म्हणून मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.