ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –188/2010 तक्रार दाखल तारीख –04/01/2011
कुसुमबाई भानुदास पंडीत
वय 40 वर्षे,धंदा शेती/घरकाम
रा.दैठण ता.गेवराई जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं.1, दिशा अंलकार कॉम्पलेक्स,
टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद ...सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलांर्ड इस्टेट, मुंबई
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.व्ही.जाधव
सामनेवाले नं.1 तर्फे :- स्वत:.
सामनेवाले नं.2 तर्फे :- अड.ए.पी.कुलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती भानुदास वामन पंडीत यांचा व्यवसाय शेती होती. त्यांचा अपघाताने दि.28.01.2009 रोजी मृत्यू झालेला आहे. त्या बाबत गेवराई पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम 304 अ, 279, 337नुसार गून्हा नंबर 22/2009 द्वारे गुन्हा नोंदविला आहे. तसेच चौकशी संदर्भात मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा पोलिसांनी केलेले आहे. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय बीड येथे झालेले आहे.
त्यानंतर तक्रारदारांनी विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी दि.26.03.2010 रोजी सामनेवाला नंबर 1 यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता केली.
सामनेवाला यांनी विमा रक्कम न देऊन दयावयाचे सेवेत कसूर केला आहे त्यामुळे तक्रारदाराला शारीरिक,मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- ची मागणी तक्रारदार करीत आहेत.
विनंती की, सामनेवाला यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासहीत तक्रारदार यांना देण्याचे आदेश व्हावेत. मानसिक,शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.,2,000/- तक्रारदार यांना देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला नंबर 1 यांनी त्यांचा खुलासा दि.11.02.2011 रोजी दाखल केला. सदर खुलासा थोडक्यात की, श्री.भानुदास वामन पंडीत रा. दैठणा ता. गेवराई यांचा अपघात दि.28.01.2009 रोजी झाला. त्यांचा दावा दि.31.08.2009 रोजी अपूर्ण कागदपत्रासह मिळाला. सदरचा दावा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे दि.2.2.2010 रोजीच्या पत्राने पाठविला. त्यानंतर दि.02.03.2010 रोजी त्यांना स्मरणपत्र पाठविले. त्यानंतर दावा सर्व कागदपत्राची पुर्तता होऊन आला. सदरचा दावा हा सामनेवाला नंबर 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबईला दि.19.06.2010 रोजी पाठविला आहे. सदरचा दावा निर्णयासाठी प्रलंबित आहे. त्यावर अनेक स्मरणपत्रे दिलेली आहेत. निर्णय प्रलंबित.
सामनेवाला नंबर 2 यांनी त्यांचा खुलासा दि.05.04.2011 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. संबंधीत मृत्यू बाबत या कार्यालयाला कोणतीही सुचना मिळाली नाही, कोणतेही कागदपत्र मिळालेले नाहीत. तक्रार अपरिपक्त आहे कारण सदरचा दावा सामनेवाला यांनी नाकारलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराचा अर्ज, दाखल कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाला नंबर 1 चा खुलासा,दाखल कागदपत्र, सामनेवाला नंबर 2 चा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले,तक्रारदाराचे विद्ववान वकील श्री.धांडे रविंद्र व सामनेवाला नंबर 2 चे विद्ववान वकील श्री.ऐ.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्र पाहता भानुदास वामन पंडीत यांचे मौजे दैठण शिवारात सर्व्हे नंबर 60 मध्ये शेत जमिन असल्याचे 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. त्यावरुन श्री.भानुदास पंडीत हे शेतकरी होते.
दि.28.01.2009 रोजी त्यांना वाहन अपघात झालेला आहे व त्या संदर्भात पोलिस स्टेशनला तक्रारीत नमुद गून्हा नोंदविण्यात आला आहे व पोलिसांनी सदर गून्हाचे चौकशी केलेली आहे. तसेच त्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. या सर्व कागदपत्रावरुन मयत भानुदास यांचा मृत्यू हा अपघाताने झाल्याची बाब स्पष्ट होते.
तक्रारदारांनी त्यांचे मृत्यूनंतर सामनेवालाकडे प्रस्ताव योग्य ते कागदपत्रासह दाखल केलेला होता. सामनेवाला नंबर 1 ने सदरचा प्रस्ताव दि.19.06.2010 रोजी सामनेवाला नंबर 2 यांचेकडे अंतिम निर्णयासाठी पाठविला.
सामनेवाला नंबर 2 यांनी सदर प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सामनेवाला नंबर 2चा खुलासा पाहता सामनेवाला नंबर 2 यांचेकडे सदर अपघाताची सूचना नाही किंवा त्याबाबतची कोणतीही कागदपत्रे मिळालेली नाहीत. या संदर्भात सामनेवाला नंबर 1 यांनी परिपूर्ण प्रस्ताव हा दि.19.06.2010 रोजी पाठविला आहे. तक्रार ही दि.04.01.2011 रोजी दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.05.04.2011 रोजी दिलेला आहे. सामनेवाला नंबर 1 यांचे म्हणणे नाकारल्यासारखा कोणताही पुरावा सामनेवाला नंबर 2 यांचा नाही. त्यामुळे सामनेवाला नंबर 1 यांचेकडून सदरचा प्रस्ताव परिपूर्ण कागदपत्रासह सामनेवाला नंबर 2 यांचेकडे केलेला असल्याने सामनेवाला नंबर 2 यांनी सदर प्रस्तावावर निर्णय शासनाच्या परिपत्रकानुसार एक महिन्याचे आंत घेणे त्यांचेवर बंधनकारक असताना त्यांनी तसा निर्णय न घेतल्याने तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट आहे. सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारदार यांना मयत भानुदास यांच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. सदरचा प्रस्ताव प्राप्त होऊनही त्यावर निर्णय न घेतल्याने सदरचा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने निश्चितच तक्रारदार यांना मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे मानसिक त्रासाबददल रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारदारास देणे उचित होईल असे या न्यायमंचाचे मत आहे. सामनेवाला नंबर 1 यांचे म्हणण्यानुसार सदरचा प्रस्ताव दि.19.06.2010 रोजी सामनेवाला नंबर 2 यांचेकडे पाठविला आहे. सामनेवाला नंबर 2 यांनी नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- वर दि.19.06.2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाला नंबर 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मृत्यूच्या दाव्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- आदेश मिळाल्यापासुन एक महिन्याचे आंत दयावेत.
3. सामनेवाला नंबर 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/-व दावा खर्च रु.2,000/-आदेश प्राप्ती पासून एक महिन्याचे आंत अदा करावेत.
4. सामनेवाला नंबर 2 यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदारांना नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/-वर दि.19.06.2010 पासून द.सा.द.शे. 9 टकके व्याज दयावे.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20(3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड