(घोषित दि. 21.11.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती प्रकाश रखमाजी गिरी हे शेतकरी होते. तिच्या पतीचे दिनांक 17.11.2009 रोजी विषबाधा झाल्यामुळे निधन झाले. तिच्या पतीला विषबाधा झाल्यानंतर घटनेची माहिती सिंदखेडराजा पोलीस ठाण्याला दिली होती. त्यावरुन पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करुन मरणोत्तर पंचनामा व घटनास्थळ पंचनामा केला आणि शासकीय रुग्णालय सिंदखेडराजा येथे तिच्या पतीचे शवविच्छेदन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने दिनांक 15.08.2009 ते 14.08.2010 या कालावधीसाठी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत औरंगाबाद महसुल विभागातील शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीच्या कालावधीमध्येच तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिने दिनांक 03.12.2009 रोजी आवश्यक कागदपत्रांसह जालना तालुका कृषी अधिका-या मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने दिनांक 03.12.2010 रोजी तिचा विमा दावा चुकीचे कारण देवून फेटाळला व त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा रक्कम रुपये 1,00,000/- व्याजासह देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्राकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांना मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर असल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
गैरअर्जदार क्रमांक 2 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, प्रस्तुत तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात चालण्यास योग्य नाही. तसेच शेतकरी अपघात विमा पॉलीसी संदर्भातील करार विमा कंपनी आणि महाराष्ट्र शासनाच्या दरम्यान झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन या प्रकरणात आवश्यक पक्षकार आहे. परंतू तक्रारदाराने महाराष्ट्र शासनाला तक्रारीमध्ये समाविष्ठ केलेले नाही. त्यामुळे ही तक्रार आवश्यक पक्षकारा अभावी आयोग्य आहे. तक्रारदार मंचासमोर स्वच्छ हाताने आलेली नाही. तक्रारदाराने यापुर्वी देखील मंचासमोर तक्रार दाखल केली होती व ती तक्रार मंचाच्या आधिकार क्षेत्राबाबतच्या मुद्दयावरुन फेटाळण्यात आलेली होती. परंतू तक्रारदाराने पुन्हा या मंचात तक्रार दाखल केलेली आहे व ही तक्रार चालण्यास योग्य नसल्यामुळे फेटाळावी. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या पतीचे निधन विषबाधेमुळे झाल्याचे त्यांना मान्य नाही. तसेच तक्रारदाराचे पती शेतकरी असल्याचे देखील त्यांना मान्य नाही. तक्रारदाराने पॉलीसी मधील तरतुदीनुसार वेळेच्या आत विमा दावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतू त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण अद्याप कळालेले नाही. तक्रारदाराच्या पतीचे नांव 7/12 अभिलेखामध्ये पॉलीसी सुरु झाल्यानंतर नमूद केलेले असल्यामुळे तिच्या पतीला विमा संरक्षण नव्हते. म्हणून तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही व तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1.प्रस्तुत तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालण्यास
योग्य आहे काय ? नाही
2.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? मुद्दा उरत नाही
3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.संदिप देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराने दाखल केलेली प्रस्तुत तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालण्यास योग्य नाही असा मुद्दा गैरअर्जदार विमा कंपनीने उपस्थित केला आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा योग्य आहे. कारण तक्रारदारो पती प्रकाश हे तुळजापूर ता.देऊळगावराजा जि. बुलढाणा येथील रहिवाशी होते. ही बाब तक्रारदाराने दाखल केलेले मृत्यु प्रमाणपत्र नि. 4/4 वरुन स्पष्ट दिसून येते. त्याच प्रमाणे मयताची शेती देखील तुळजापूर ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा या शिवारातच होती. तसेच त्यांचे अपघाती निधन देखील बुलढाणा जिल्हयातच झालेले आहे. म्हणून तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण बुलढाणा जिल्हयात घडलेले असुन केवळ तक्रारदार सध्या जालना जिल्हयामध्ये राहते व तिने जालना तालुका कृषी अधिका-या मार्फत विमा दावा दाखल केला. म्हणून तिला या मंचात तक्रार दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही.
तक्रारदाराने यापुर्वी ज्या कारणावरुन ही तक्रार दाखल केली आहे, त्याच कारणावरुन तक्रार क्रमांक 58/2010 या मंचासमोर दाखल केली होती. परंतू ती तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नसल्याच्या कारणावरुन तक्रारदाराला योग्य मंचात दाखल करण्यासाठी परत करण्यात आली होती. परंतू तक्रारदाराने पुन्हा याच मंचात ही तक्रार दाखल केली. ही तक्रार या मंचात चालण्यास योग्य नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.