(घोषित दि. 30.12.2011 व्दारा श्रीमती रेखा कापडिया सदस्या)
अर्जदारास अपघातामध्ये अपंगत्व आले असून गैरअर्जदार यांनी, सर्व कागदपत्रांची पूर्तता असतांनाही अर्जदारास शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा अंतर्गत विमा रक्कम नाकारली म्हणून ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार त्यांची किनगाव वाडी, ता.अंबड जि.जालना येथे शेत जमिन आहे. अर्जदाराचा दिनांक 06.06.2010 रोजी अपघात झाला. सदरील अपघाताची नोंद अंबड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. या अपघातात अर्जदारास 82 टक्के अपंगत्व आले असून त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी दिनांक 24.06.2010 रोजी तालुका कृषी अधिकारी, अंबड यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. परंतु दिनांक 31.12.2010 रोजी विमा कंपनीने अपूर्ण कागदपत्रे असल्याचे सांगून दावा नामंजूर केला. अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही विमा कंपनीने दावा नामंजूर केला असल्यामुळे विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र, गाव नमुना 8-अ, गाव नमुना 6-क, फेरफार पत्रक, विमा कंपनीचे नामंजूरीचे पत्र, मेडीकल सर्टिफिकेट, घटनास्थळ पंचनामा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराचा अपघात दिनांक 05.06.2010 रोजी झाला असून विमा दाव्याचा प्रस्ताव त्यांना दिनांक 31.07.2010 रोजी प्राप्त झाला. या प्रस्तावामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र, डिस्चार्ज कार्डची मूळ प्रत इत्यादी कागदपत्रे जोडलेली नाहीत व त्यासाठी दिनांक 03.08.2010, 02.10.2010, 03.11.2010, 06.12.2010 रोजी स्मरणपत्रे पाठविण्यात आली व शेवटी दिनांक 21.12.2010 रोजी विमा कंपनीने अपूर्ण कागदपत्रे असल्यामूळे विमा दावा नामंजूर केला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार तक्रारदार शेतकरी असल्याबद्दलचा पुरावा दाखल करण्यात आलेला नाही, त्याबद्दलची पूर्ण कागदपत्रे त्यांनी दाखल केलेली नाहीत. तक्रारदाराने विमा कंपनीकडे विहीत मुदतीमध्ये अर्जदार शेतकरी असल्या बद्दलची म्हणजे फेरफार नक्कल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे अर्जदाराचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदाराचा दिनांक 05.06.2010 रोजी अपघात झालेला आहे. संबंधित अपघाताची नोंद किनगाव अंबड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून घटनास्थळ पंचनामा सोबत जोडलेला आहे. अर्जदाराच्या एका पायास कायम स्वरुपी अपंगत्व आल्यामुळे त्यांनी विमा कंपनीकडे दिनांक 31.07.2010 रोजी प्रस्ताव पाठविल्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांना मान्य आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास दिनांक 02.10.2010, 03.11.2010, 06.12.2010 रोजी मेडीकल रिपोर्टची प्रमाणित प्रत व डिस्चार्ज कार्डच्या मूळ प्रतीची मागणी केलेली दिसून येते. अर्जदाराने तक्रारी सोबत या सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडलेल्या दिसून येतात. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या लेखी जवाबात अर्जदाराने 7/12 चा उतारा, फेरफारची नक्कल इत्यादी कागदपत्रे विहीत मुदतीत प्रस्तावा सोबत जोडली नसल्याचे म्हटले आहे. परंतू कबाल इन्शुरन्स कंपनीने अर्जदारास या कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येत नाही. याचा अर्थ प्रस्तावा सोबत जमिनी संबंधी कागदपत्रे अर्जदाराने जोडलेली आहेत. अर्जदाराने तक्रारी सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले आहे. अर्जदाराचा दावा योग्य असून ते विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास विमा रक्कम 50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्चा बद्दल रुपये 1,000/- 30 दिवसात द्यावे.