::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्रीमती रोहीणी कुंडले, मा.अध्यक्षा) (पारीत दिनांक –15 डिसेंबर, 2012 ) 1. तक्रार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळण्या बद्यल आहे. तक्रारकर्ती नं.1 मृतक इन्शुअर्ड प्रकाश वसंतराव राऊत यांची पत्नी आहे व त.क.नं.2 त्यांचा अज्ञान मुलगा आहे. 2. दि.21/04/2011 रोजी मृतक प्रकाश त्यांच्या शेतात फवारणीसाठी गेला होता. तेथे त्याची तब्येत अचानक बिघडली म्हणून त्यांना काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केले. तेथे तब्येत चिंताजनक झाल्याने तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन नागपूर येथील मेडीकल कॉलेज येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून प्रकाशला मृत घोषित केले. 3. तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत पत्नी/वारस/नॉमिनी या नात्याने ती विमा दावा रुपये-1,00,000/- मिळण्यास पात्र ठरते. म्हणून तिने संपूर्ण कागदपत्रांसहित दाव्याचा प्रस्ताव वि.प.4 मार्फत, वि.प.1 कडे पाठविला. 4. वि.प.1 इन्शुरन्स कंपनीने दि.13/02/2012 च्या पत्रान्वये मृतक वसंतचा मृत्यू अपघाती नसून विषारी जहर प्राशन करुन आत्महत्या केल्यामुळे झाला. म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा रद्यबादल ठरविला. 5. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की,पोलीस व वैद्यकिय रेकॉर्ड वरुन तिच्या पतीने आत्महत्या केल्याचे सिध्द होत नाही. मृतक इन्शुअर्ड प्रकाशचा मृत्यू आत्महत्या नसून अपघाती झाला आहे. वि.प.1 ने कागदपत्रांची शहानिशा न करताच तक्रारकर्तीचा दावा खारीज केला ही वि.प.1 इन्शुरन्स कंपनीच्या सेवेतील त्रृटी ठरते. 6. तक्रारकर्तीची मागणी- 1) विमा लाभ रुपये-1,00,000/- मिळावा. 2) शारीरिक मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.-30,000/- मिळावी. 3) तक्रारखर्च रुपये-5000/- मिळावा.
4) वरील एकूण रक्कम रु.1,35,000/- वर मागणी केल्या पासून 15% व्याज मिळावे. 7. तक्रारी सोबत एकूण 6 दस्त दाखल केले आहेत.
8. वि.प.1 चे उत्तर थोडक्यात- मृतक इन्शुअर्ड प्रकाश यांचा मृत्यू अपघाती नाही. विषारी औषध प्राशन केल्याने आत्महत्या ठरते असे पोलीस व वैद्यकिय कागदपत्रां वरुन सिध्द होते. आत्महत्येची बाब योजनेच्या अपवादा अंतर्गत येते. म्हणून विमा दावा देय ठरत नाही. असे कारण देऊन दि.13/02/2012 रोजी तक्रारकर्तीचा विमा दावा रद्यबादल ठरविला. ही कारवाई योजनेतील नियमांच्या आधीन राहून केली असल्याने त्याला “ सेवेतील त्रृटी ” ठरविता येणार नाही. 9. तक्रारकर्तीचे अन्य सर्व आरोप/मागण्या वि.प.1 अमान्य करतात.
10. वि.प.2 कबाल – यांचे उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार ते शासन व इन्शुरन्स कंपनी यांना सल्ला देण्याचे काम करतात, त्यासाठी कोणताही मोबदला घेत नाहीत. तक्रारकर्तीशी त्यांचा सरळ संबध नाही. शासना कडून आलेले विमा प्रस्ताव वि.प.1 कडे पाठविणे एवढेच मर्यादित काम त्यांचे असते. तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव त्यांना दि.10/11/2011 रोजी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तो पुढे वि.प.1 इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. वि.प.1 इन्शुरन्स कंपनी यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा दि.13/02/2012 च्या पत्रान्वये रद्यबादल ठरविला. तसे तक्रारकर्तीला कळविण्यात आले. वि.प.2 च्या सेवेत कोणतीही त्रृटी नसल्याने तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती ते करतात. उत्तरा सोबत त्यांनी 3 दस्त जोडले आहेत.
11. मंचाने त.क. व वि.प.1 च्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. वि.प.2 चे उत्तर तपासले. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली. मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष -
12. विमित मयत प्रकाशचा मृत्यू नैसर्गिक कि आत्महत्या हा एकच मुद्या मंचाच्या विचारार्थ येतो. 13. दि.21/04/2011 रोजी विषारी औषध फवारत असताना तब्येत बिघडली व प्रकाशचा मृत्यू झाला असे तक्रारकर्ती म्हणते. या उलट वि.प.1 इन्शुरन्स कंपनीचे म्हणणे आहे की, प्रकाशचा मृत्यू विषारी औषध प्राशन केल्याने झाला. हा आत्महत्येचा प्रकार आहे. आत्महत्या केली असल्याने पोलीस/वैद्यकीय कागदपत्रावरुन सिध्द होते म्हणून विमा दावा देय ठरत नाही. 14. मृत्यूच्या संदर्भात पोलीस रेकॉर्ड तपासले.
15. आकस्मिक मृत्यूची खबर- पॅरा 2 मध्ये नमुद आहे की,- सदर मर्गची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील मृतक नामे प्रकाश व वसंतराव राऊत रा.ढवळापूर हयाने घटना ता.वेळी स्वतःचे शेतात कोणते तरी वि षारी औषध प्राशन करुन तेजराव साहेबराव भोयर रा. हातला (साळा) यांचे घरी आला व तोंडातुन फेस गाळीत असता त्यांची पत्नी सौ.उषा प्रकाश राऊत नी त्याला ग्रा.रु.काटोल येथे प्रथमोपचार करुन रेफर केल्याने मेडीकल कॉलेज नागपूर अपघात विभाग रजि. नं. 510627 वर दि.21/4/11 चे 14.45 वा. भर्ती केले असता डॉ.सी.एम.ओ. श्री जाभुडकर साहेब यांनी तपासुन मृत घोषीत केले. 16. पुढे मरणान्वेशन प्रतिवृत्ता मध्ये पा.नं.2 वर नमुद आहे की, सदर मृतकाचे शरीरावर कोठेही जखमांचे निशाण दिसून येत नाही. पंचाच्या व माझे मता नुसार मृत्यू विषारी औषध प्राशन केल्याने उप दर.मृत्यू कारणामुळे घडला असे वाटते. 17. दि.22/04/2011 च्या पोस्ट मॉर्टम रिपोर्ट नुसार कॉज 5 मध्ये “ H/o Suicidal poisoning on 21/04/11 around 11 AM” असे नमुद आहे. 18. दि.24/04/2011 च्या घटनास्थळ पंचनाम्यामध्ये (पॅरा 2 शेवटची ओळ) “ याच ठिकाणी मृतकाने कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले आहे ” असे नमुद आहे. 19. उपरोक्त सर्व दस्तांमधील नोंदीवरुन मृतक प्रकाशने विषारी औषध प्राशन केले व आत्महत्या केली असाच निष्कर्ष निघतो. मृतक प्रकाशचा मृत्यू नैसर्गिक नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. 20. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, मृतक प्रकाश विषारी औषध फवारणीसाठी शेतात गेला होता. परंतु दि.24/04/2011 च्या घटनास्थळ पंचनाम्या वरुन त्यावेळी (दि.21/04/2011) शेतात कोणतेही पिक उभे नसल्याचे निष्पन्न खालील वाक्यावरुन होते- “ नाल्याला लागून मृतक प्रकाश राऊतचे शेत असून शेतामध्ये कॉंग्रेस गवत वाढलेले, गव्हाचे पिक काढलेले पूर्ण असून..............” मृतक प्रकाशने विषारी औषध फवारण्यासाठी नव्हे तर प्राशन करण्यासाठी नेले असे दिसते. 21. शेतकरी अपघात विमा योजना तपासली असता शेतक-याने आत्महत्या केल्यास विमा-दावा “ अपवादा नुसार ” देय ठरत नाही (प्रपत्र-क विमा संरक्षणामध्ये समाविष्ठ नसणा-या बाबी कलम-2) 22. मंचाला वि.प.1 इन्शुरन्स कंपनीची तक्रारकर्तीचा विमा दावा रद्यबादल करण्याची कृती समर्थनीय वाटते. नियमांच्या आधिन राहून कृती केल्याने ती सेवेतील त्रृटी ठरत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. 23. सबब आदेश ::आदेश:: 1) तक्रारकर्तीची वि.प.1,2,3,4 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क देण्यात यावी. (श्रीमती रोहीणी कुंडले) | (श्रीमती अलका पटेल) | (श्रीमती गीता बडवाईक) | प्रभारी अध्यक्षा | प्रभारी सदस्या | प्रभारी सदस्या | अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर |
|