( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 13 डिसेंबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द अशी आहे की, महाराष्ट्र सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविली व विमा कंपनीशी करार करुन विमा हप्त्याचा भरणा केला आहे. त्यामध्ये शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यास अपघाती विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्याची व्यवस्था आहे. सदर विमा गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडे नोंदविण्यात आलेला आहे. तक्रारकर्ती ही मृतक सिध्दार्थ डोमाजी दुपारे यांची पत्नी आहे व तक्रारदार क्रं.2 ते 4 हे सिध्दार्थ डोमाजी दुपारे यांचे मुलगे आहेत. त्यांची संयुक्त कुटुंबातील वडीलोपार्जित शेती मौजा सोनोली, सर्व्हे नं.75, आराजी 1.29 हेक्टर होती. ते स्वतः शेतकरी होते. मृतक सिध्दार्थ दुपारे हे दिनांक 3/11/2010 रोजी सायंकाळी 6 वाजता काटोल वरुन चिखली येथे आपल्या वाहनाने येते असता घुबडमेट ते गोधनी दरम्यान डांबरी रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने धडक मारली त्यामुळे ते रोडवर पडुन जबर जखमी झाले म्हणुन त्यांना नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा दिनांक 4/11/2010 रोजी मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने तहसिलदार काटोल यांचेकडे सर्व कागदपत्रांसह विमा दाव्याकरिता अर्ज केला. सदर अर्ज आवश्यक दस्तऐवजासह दिनांक 23/5/2011 रोजी तालुका कृषी अधिकारी काटोल यांचेकडे पाठविला. सदर विमा दावा, पॉलीसीच्या अटीनुसार मृतकाजवळ ड्रायव्हींग लायसन्स नाही या कारणास्तव नाकारण्यात आला. म्हणुन तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- व दाव्याचा खर्चापोटी रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली.
यात गैरअर्जदार क्रं.1 ते 4 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं.1 व 4 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.2 व 3 नोटीस मिळुनही हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालिवण्याचा आदेश 15/11/2011 रोजी पारित करण्यात आला.
गैरअर्जदार क्रं. 1 आपले जवाबात नमुद करतात की, अपघातानंतर त्यांनी अन्वेषकाची नियुक्ति केली व त्यांच्या अहवालानुसारच तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केलेला आहे कारण विमा धारकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे विम्याच्या पॉलीसीतील अटी व शर्तीचा भंग झाला व दावा नियमबाहय असल्यामुळे नामंजूर करण्यात आला.
शेतकरी जनता अपघात विमा योजना शासनातर्फे कृषी आयुक्त व कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस व गैरअर्जदार क्रं.1 यांचेशी झालेल्या त्रिपक्षीय कराराप्रमाणे तक्रारदाराने विमा काढला होता. त्यामुळे कृषी आयुक्त आणि त्यांचे स्थानिक प्रतिनीधी हे आवश्यक पक्षकार आहेत व त्यांना तक्रारदाराने तक्रारीत प्रतिवादी न केल्यामुळे ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असा उजर घेतला. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीचे सेवेत कोणतीही कमतरता दिली नाही म्हणुन सदर तक्रार दंडासह खारीज करावी अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रं. 4 आपल्या कथनात नमुद करतो की, सदर योजना ही कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असुन दावा मंजूर अथवा नामंजूर करणे ही गैरअर्जदार क्रं.1 चे अधिकार आहेत व गैरअर्जदार क्रं.1 ने वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार गैरअर्जदार क्रं.4 यांच्याशी संबंधीत नसल्यामुळे त्यांना या प्रकरणातुन वगळयात यावे अशी विनंती केली.
तक्रारकर्तीने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात सुचना पत्र, 7/12 नमुना, प्राथमिक फौजदारी, घटनास्थळ पंचनामा इन्क्वेस्ट पंचनामा, शव विच्छेदनाची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत. तर गैरअर्जदार क्रं.1 यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला. व तीन दस्तऐवज अन्य न्यायलयाचे न्यायनिवाडे दाखल केले.
तक्रारकर्ती तर्फे वकील श्री ए.एस.गोतमारे, गैरअर्जदार क्रं.1 तर्फे वकील श्री बी. लाहिरी यांनी युक्तिवाद केला. इतर गैरअर्जदार गैरहजर.
-: कारणमिमांसा :-
यातील गैरअर्जदाराने मृतक शेतकरी होता. त्याचा अपघाती मृत्यु अज्ञात वाहनाने धडक मारल्यामुळे झाला हया बाबींना उत्तर न दिल्यामुळे त्या त्यांनी मान्य केल्या आहेत हे स्पष्ट होते. त्यांचा महत्वाचा आक्षेप असा आहे की, मृतक याचेजवळ वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. यासंबंधी त्यांनी आरटीओ कडुन कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज प्राप्त करुन घेऊन ते प्रकरणात दाखल केलेले नाही, ज्याद्वारे मृतक याचेजवळ वाहन चालविण्याचा परवाना नव्हता हे सिध्द होईल.
गैरअर्जदार यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी यासंबंधी एक तपास अधिकारी नेमला होता त्यांनी आपल्या अहवालात दिले आहे की मृतकाजवळ वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. परंतु गैरअर्जदाराने हा अहवाल देणा-या तपास अधिका-याचा कोणताही प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केला नाही. सदर प्रकरणात एक महत्वाची बाब अशी आहे की, मृतकाचा मृत्यु त्यांचेमुळे अपघात झाल्याने झालेला नसुन अज्ञात वाहनाने त्यांचे वाहनाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामुळे त्यांचा मृत्यु झाला आहे. यासंबंधी दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट आहे की, सदर प्रकरणात अपघात गुन्हा हा अज्ञात वाहन चालकाचे विरुध्द नोंदविण्यात आल्यामुळे व तो पोलीस तपासातील दस्तऐवजात त्यांना दोषी मानन्यात आले असुन अशा प्रकारच्या प्रकरणात 2 वाहनांचा अपघात घडलेला आहे ही बाब लक्षात घेतली तर मृतकाच्या वाहन परवान्याचा विषय हा महत्वाचा ठरत नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर केला नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी ठरते म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1.
2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 1,00,000/- अदा करावे. सदर रक्कमेवर दिनांक 23.5.2011 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याज द्यावे.
3. मानसिक व शरिरिक त्रासापोटी रुपये 5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- गैरअर्जदार क्रं.1 ने तक्रारकर्तीस द्यावे.
4. गैरअर्जदार क्रं.2 ते 4 विरुध्द कुठलाही आदेश नाही.
4.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे न पेक्षा 9 टक्क्याऐवजी 12 टक्के व्याज देय राहतील.