घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे पती हणमंता देवराव घुगे हे जनता वैयक्तिक अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 या सोसायटीचे सभासद होते. गैरअर्जदार क्रमांक 3 सोसायटीने त्यांच्या सर्व सभासदांची जनता अपघात विमा पॉलिसी गैरअर्जदार क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा को औप.बँक लि., तर्फे घेतलेला होती. ही पॉलिसी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची होती. दिनांक 25/8/2006 रोजी मयत हणमंता घुगे हे पाझर तलावामध्ये पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर पोलीसात कळविण्यात आले. पोलीसांनी गुन्हा नोंदविला आणि इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, व पीएम केला. तक्रारदारानी पॉलिसीची रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 आणि 2 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे क्लेमफॉर्म पाठवून दिला. परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मयत हणमंता घुगे यांची पॉलिसी घेतलेली नसल्यामुळे त्यांना पॉलिसीचे संरक्षण मिळू शकत नाही या कारणावरुन क्लेम नामंजूर केला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 1 लाख पॉलिसीची रक्कम 18 टक्के व्याजासह आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब मंचात दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी त्यांच्या सभासदांच्या पॉलिसीच्या यादीमध्ये मयत हणमंता देवराव घुगे यांचे नाव नाही आणि त्यांच्या हप्त्यांची रक्कम सुध्दा मिळाली नसल्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आला आहे. गैरअर्जदारानी योग्य त्या कारणाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. गैरअर्जदारने शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मयत हणमंता घुगे हे जनता अपघात विमा पॉलिसीचे लाभार्थी होते. ती पॉलिसी त्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेली होती. मयत हणमंता घुगे हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्जदार होते. बँकेने सर्व सोसायटच्या सभासदांची पॉलिसी काढलेली होती आणि त्यांचा हप्ता देखील विमा कंपनीकडे पाठविला होता. प्रस्तुतच्या प्रकरणातील इन्शुरन्स कंपनीने त्यांना नामंजूरीचे पत्राने कळविले आणि तशा प्रकारची माहिती त्यांनी दिनांक 24/9/2007 रोजी सोसासयटीस कळविली. त्यांच्याकडून कोणतीही सेवेत त्रुटी झालेली नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 यांना मिळूनही ते गैरहजर म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी मंचाने केली. तक्रारदाराचे पती मयत हणमंता देवराव घुगे हे जनता वैयक्तिक अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. त्यांचा मृत्यु पाझर तलावामध्ये बुडून झाला. गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/9/2007 रोजी मयत हणमंता घुगे यांचे नाव त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट नसल्यामुळे त्यांच्या क्लेम नामंजूर केला आहे. तक्रारदारानी आणि विमा कंपनीने दोघांनी त्या यादया दाखल केलेल्या आहेत. तक्रारदारानी दाखल केलेल्या यादीमध्ये सर्व लाभार्थी सभासदांची नावे आहेत व त्यांची संख्या 150 + 52 अशी दिलेली आहे. त्यामध्ये मयत हणमंता घुगे यांचा क्रमांक 121 असा आहे. परंतु विमा कंपनीने दाखल केलेल्या यादीमध्ये फक्त 115 सभासदाची नावे आहेत. त्यामध्ये मयत हणमंता देवराव घुगे यांचे नाव दिसून येत नाही. दोन्हीही यादीची पाहणी केली असता तक्रारदारानी दाखल केलेल्या यादीसोबत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कव्हरनोट आहे त्यामध्ये संस्थेचे नाव आणि गांव यासोबत जुने कर्जदार सभासद, नविन कर्जदार सभासद यांची संख्या नमूद केलेली आहे. मयत हणमंता घुगे हे महागावचे राहणार होते. महागाव या गावचे सुमारे 150 जुने कर्जदार आणि नविन कर्जदाराची संख्या 52 असे एकूण 202 कर्जदार सभासदांची संख्या दाखविण्यात आली आहे. त्यावर महागाव शाखा वासडी येथील इन्स्पेक्टरची सही व शिक्का आहे. प्रत्येक पानावर महागाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी महागाव ता कन्नड जि औरंगाबादचा शिक्का आहे. गैरअर्जदारानी दाखल केलेल्या यादीमध्ये कुठलेही कव्हरींग लेटर दिलेले नाही. परंतु महागाव सोसायटीचा शिक्का मात्र दिसतो. परंतु त्यावर तारीख दिसून येत नाही. ही यादी न 2003 ची आहे. तेंव्हाचे कर्जदार हे जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते म्हणून बँकेने ही यादी विमा कंपनीकडे पाठविल्याचे दिसून येते. तक्रारदारानी दाखल केलेली ही यादी अधिकृत असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदारानी दिलेली यादी सुध्दा अधिकृत असावी परंतु त्या यादीवर सन 2003 सालीच लाभार्थीची संख्या 202 असताना त्यांनी 115 ची यादी दाखल केलेली आहे. यादीतील सर्व नावे काळया शाईत असून फक्त महागाव विकास कार्यकारी सोसायटीचे नाव लाल शाईमध्ये नंतर लिहील्याचे दिसून येते. गैरअर्जदाराकडे 115 जणांची यादी आलेली आहे. उर्वरीत यादी कदाचित त्यांच्याकडून गहाळ झाली असावी असे मंचाचे मत आहे. मयत हणमंता घुगे हे लाभार्थी होते व त्यांचा मृत्यू अपघाताने झाला हेही कागदपत्रावरुन दिसून येते. बँकेने त्यांच्या लेखी जवाबात मयत हणमंता घुगे हे लाभार्थी असल्याचे व त्यांच्या विमा हप्ता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठविल्याचे म्हटले आहे. या सर्वावरुन मयत हणमंता देवराव घुगे हे लाभार्थी होते म्हणून तक्रारदार विम्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच गैरअर्जदार क्रमांक 1 यांना असा आदेश देतो की, त्यांनी तक्रारदारास रक्कम रु 1 लाख दिनांक 24/9/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावेत. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 विरुध्द कुठलाही आदेश नाही. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- द्यावेत. 3. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 विरुध्द कोणताही आदेश नाही. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |