ग्राहक तक्रार क्र. 76/2013
अर्ज दाखल तारीख : 01/07/2013
अर्ज निकाल तारीख : 29/05/2015
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 29 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1. हेमंत भगवान पाठक,
वय – सज्ञान, धंदा – व्यवसाय,
प्रोप्रायटर – सप्तगिरी साडी सेंटर,
काळा मारुती जवळ, मेन रोड, उस्मानाबाद,
रा. उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारदार
विरुध्द
1. श्री. मेघराज अंबादास सोनकांबळे,
विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.
शिवाजी चौक, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदार यांचे तर्फे विधिज्ञ : श्री.आर.एच.कदम.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही.मैंदरकर.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा:
अ) तक्रारदाराच्या तक्रारीचे थोडक्यात कथन असे की अर्जदार हे उस्मानाबाद येथील रहिवाशी असुन त्यांचे सप्तगिरी साडी सेंटर या आपल्या दुकानाचा आगी संबंधीत विमा विप कडे उतरविलेला होता. त्याचा कालावधी दि.13/10/2011 ते 12/10/2012 असा होता. तारीख 27/03/2012 रोजी रात्री दुकानास आग लागून कपडयाच्या दुकानातील संपूर्ण माल व फर्नीचर जळून गेले. आगीमुळे रु.30,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारदाराने विपकडे नुकसान भरपाईची मागणी केली. भरपाई न मिळाल्यामुळे तक्रारदाराने तक्रार क्र.217/12 या मंचात दाखल केली. दुकानातील स्टॉक रु.23,64,829/- चा होता. दि.03/04/2013 रोजी विप यांनी तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे रक्कम देण्याचे मान्य केले. म्हणून विप च्या शब्दावर विश्वास ठेवून तक्रारदाराने तक्रार काढून घेतली. विप ने मागणी केलेले रु.19,75,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.20,000/- तक्रारीचा खर्च रु.3,000/-, वरील सर्व रक्कमेवर द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात दि.23/04/2012 रोजी रु.13,31,839/- च्या रक्कमेचा चेक विप ने दिला. विप ने तक्रारदाराची फसवणूक केली आहे. म्हणुन राहीलेले रक्कम रु.6,66,161/- मिळावे म्हणुन तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
ब) 1) तक्रारदाराने दुकानाच्या माला संदर्भात काढलेले विम्याचे मिळालेल्या अपू-या विमा रकमेबाबत या न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने विप ला नोटीस काढली असता त्यांनी आपले म्हणणे दाखल केले व म्हणण्यामध्ये असे प्राथमिक आक्षेप दाखल केला की न्यायालयात या पुर्वी ग्राहक तक्रार क्र.217/2012 या नुसार प्रस्तुतच्या घटनेबाबत तक्रार दाखल झाली होती व त्यामध्ये दि.03/04/2013 रोजी तडजोड झालेले असून सदर तडजोडीचा पुरसिस नुसार तक्रारदाराची तक्रार निकाली केली काढली आहे. त्यामध्ये असे आदेश आहेत की यदाकदाचित नमूद केल्याप्रमाणे विमा रक्कम देण्यास दि.08 ते 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ विलंब लागल्यास तक्रारदारास विप यांचे विरुध्द पुन्हा सदर तक्रार अर्ज नव्या स्वरुपाने दाखल करण्याचा हक्क व अधिकार राहील व त्यानुसार सदरचा अर्ज निकाली काढण्यात आला. विप संदर्भात तक्रारदाराने दाखल केलेली पुरसीस अथवा न्यायालयात दिलेले तक्रारदाराच्या सदर तक्रारीतील किती रक्कमेवर जडजोड झाली याचा कोठेही काहीही उल्लेख नाही तथापि जडजोड रक्कम दिली नाही तर तक्रारदारास नव्या स्वरुपात तक्रार दाखल करणे योग्य व जरुर होते. परंतु तक्रारदारास या विप ने तडजोडीची रक्कम अदा केली व ती स्वीकातांना तक्रारदाराने कोणतेही नकार अधिकार अथवा आक्षेप नोंदविलेले नाही त्यामुळे त्यांचे प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचा अधिकार कोठेही निर्माण होत नव्हता. पुन्हा त्यांची तक्रार चालू शकते किंवा नाही असा प्राथमिक आक्षेप विप ने नोंदविलेला आहे व हा मुद्दा प्राथमिक मुद्दा म्हणून घेऊन योग्य तो हुकूम करावा अशी विनंती केली आहे. या अनुषंगाने या न्यायमंचाने सदरचा मुद्दा प्राथमिक मुद्दा म्हणून निकाल देतांना स्विकारलेला आहे व त्यांच प्राथमिक मुद्दा त्या न्यायीक दृष्टीने निर्णय दिले आहेत.
क) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचा, आक्षेप व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद व विप इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दा उत्तरे
1) विप च्या अर्जातील मुद्दा प्राथमिक मुद्दा म्हणून
स्विकारण्यात आला काय ? होय.
2) सदर तक्रार पुन्हा या न्याय मंचास चालवता येईल काय ? नाही.
3) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
क) कारणमीमांसा
1) तक्रारदाराने दाखल केलेली तक्रारीच्या अनुषंगाने विप ने दि.25/07/2014 रोजी प्राथमीक आक्षेप अर्ज दाखल केला त्यावर युक्तिवादासाठी तसेच विप चे म्हणण्यासाठी आदेश करण्यात आला. तथापि तक्रारदाराने या अर्जा पुरते म्हणणे मुदत मागणीही सेवेत पर्यंन्त दिलेले नाही. त्यामुळे अंतिम निर्णयाचा वेळेस सदरचा मुद्दा हा प्राथमिक मुद्दा म्हणून घेण्यास या न्यायमंचास घेण्यास अडचण नाही उलट या मुद्यावर निर्णय झाल्यावर समोर प्रकरण गुणत्तेवर जॉइंट प्रले म्हणून सदरचा मुद्दा प्राथमिक मुद्दा म्हणून स्विकारण्यात आलेला आहे.
2) या मुद्यावर निष्कर्षाच्या अनुषंगाने या न्यायमंचाचा असा मुद्दा आहे की पुर्वी ग्राहक तक्रार क्र.217/12 मध्ये पुरसीसच्या अनुषंगाने जी तक्रार निकाली निघाली त्यामधील आदेश क्र.1 चे न्यायीक विष्लेषण केले असता विप ने तक ला विमा रक्कम तडजोडीत तरतुद व अटी नुसार देण्यात यावी असे म्हंटलेले आहे. यामध्ये रकमेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे तडजोडीची अट व नियम यांचा भंग झाला आहे असे जर तक्रारदाराचे म्हणणे असले तर त्यांनी मिळालेल्या तडजोडीच्या अटी व तरतुदी नियम रेकॉर्डवर आणणे गरजेचे होते ती त्यांची जबाबदारी होती. तथापि तक्रारदाराने असे काहीही न करता फक्त एक पुरसीस रेकॉर्डवर दाखल केलेली असून त्या पुरसीसमध्ये तक्रार ही नुकसान भरपाईची रक्कम मागणी नुसार मिळत असल्यामुळे सदरचे प्रकरणही परत घेत आहे अशा स्वरुपाचा उल्लेख आहे. यावरुन तक्रारदार व विप यांचेमध्ये कोणत्या रकमेस तडजोड झाली याचा कोठेही उल्लेख आढळून आलेला नाही. न्याय मंचाने पुढे आदेश क्र.2 मध्ये असे म्हंटलेले आहे की जर 8 दिवसात सदर तडजोड रक्कम मिळाली नाही तर तक स पुन्हा नव्याने तक्रार दाखल करण्याचे अधिकार राहतील या आदेशाच्या अनुषंगाने या न्यायमंचाने रक्कम नाही मिळाल्यास परत तक्रार दाखल करता येईल असा आदेश केला आहे. परंतु प्रस्तूत प्रकरणात तक्रारदारास त्यांची रक्कम मिळाल्याचे दिसुन येते. तक्रारदारास सदरची रक्कम स्विकारतांना त्यांनी सदर रक्कम अपूरी असल्याचे व अजून उर्वरीत काही रक्कम विप कडून येणे बाकी आहे असे नमूद केल्याचे कोणतेही कागदपत्रे विप ला दिलेले नाही अथवा या न्यायमंचात दाखल करुन शकले नाहीत या संदर्भात मुळ फाईल तक्रार क्र.02/07/2012 ची पाहणी केली असता तक्रारदाराने दि.05/04/2013 रोजी मुळ कागदपत्रांची मागणीचा अर्ज दाखल केला आहे व दि.03/04/2013 रोजी पुरसीस दाखल केली आहे. या दोन्ही ठिकाणी रक्कमेबाबत उल्लेख दिसून येत नाही. त्यामुळे तडजोडीनुसार तक्रारदारास रक्कम मिळाली आहे असे त्यांच्या पुरसीसनुसार मान्य करण्यास कोणतीही हरकत नाही. तक्रादाराचा मुख्य आक्षेप हा अपूरी रक्कम मिळाल्याबाबतचा आहे त्या अनुषंगाने कोणत्याही स्वरुपाची कागदपत्रे व रेकॉर्डवर त्यांच्या म्हणण्याला पुष्ठी देतांना दिसून येत नाही. त्यामुळे Resjudicata व estopels या न्यायीक तत्वाचा येथे अंमल दिसून येत आहे व दुस-यांदा त्याच प्रकारची तक्रार तक्रारदारास या न्यायमंचात दाखल करता येत नाही म्हणून सदरचा विप चा प्राथमिक मुद्दा मान्य करुन सदरची तक्रारही वर उल्लेख केलेल्या न्यायीक तत्वाच्या आधारे फेटाळून लावत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.