::: अंतिम आदेश :::
( पारित दिनांक : 31/01/2018 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) सदर प्रकरणात मा. सदस्य यांनी दिनांक 18/07/2014 रोजी अंतिम आदेश पारित केला होता. विरुध्द पक्षाने मंचाचा हा आदेश मा. राज्य आयोग यांचेपुढे फर्स्ट अपील नं. A/14/315 नुसार आव्हानित केला असता, मा. राज्य आयोग यांनी दिनांक 14/02/2017 च्या आदेशानुसार, अपीलात तक्रारकर्त्याने केलेला विलंब माफीचा अर्ज, त्यांना परत देण्यात येवून, जिल्हा ग्राहक मंचासमोर सदर अर्ज तक्रारकर्त्याने करावा व त्यावर उभय पक्षांचे म्हणणे एैकून तो निकाली काढावा असे निर्देश मंचाला दिले असल्यामुळे मंचाने तक्रारकर्त्याचा विलंब माफीचा अर्ज, दाखल सर्व दस्तऐवज, यावरील विरुध्द पक्षाचे निवेदन तपासले तसेच उभय पक्षांचा या अर्जावर युक्तिवाद एैकून दिनांक 24/07/2017 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित केला होता.
1. तक्रारकर्ते यांचा दावा दाखल करण्यास झालेला विलंब माफीचा अर्ज, विनाखर्च मंजूर करण्यात येतो.
2. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
2) सदर आदेश विरुध्द पक्षाने मा. वरिष्ठ न्यायालयात आव्हानीत केलेला नाही, त्यामुळे आज रोजी मंचाचा दिनांक 24/07/2017 चा आदेश अंतिम ठरला आहे. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व उभय पक्षांचा अंतिम युक्तिवाद एैकून मंचाने खालीलप्रमाणे निर्णय पारित केला.
3) तक्रारकर्ते यांचे असे कथन आहे की, तक्रारकर्ता हा पोहा ता.कारंजा जि.वाशिम येथील रहिवासी असुन, त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे जनता व्यक्तीगत दुर्घटना विमा/पॉलिसी क्र. ४०३५६ नुसार रु. २५०/- प्रिमीयम भरुन रु.१,००,०००/- दि.२१.०१.९८ रोजी सदरहु पॉलिसी काढून विरुध्द पक्ष यांचेकडे अपघाताची व नुकसान भरपाइची जोखीम नोंदणीकृत केली होती. सदर पॉलिसीची मुदत दि.२१.०१.९८ ते २१.०१.२००८ पर्यंत होती. तक्रारकर्त्याचा दि.२०.०१.२००६ रोजी अपघात झाला. त्या अपघातामध्ये तक्रारकर्त्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या व त्यामुळे त्याला ५०% कायमचे अपंगत्व आले.
तक्रारकर्त्याला अपघातानंतर त्वरीत दवाखान्यात नेण्यात आले. त्यांच्या जखमा गंभीर स्वरुपाच्या असल्यामुळे त्याला अमरावती येथील डॉ.आर.के.बेलसरे यांच्याकडे भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आली, त्यानंतर डॉ.फडके यवतमाळ यांच्याकडे सुध्दा भरती करण्यात आले व तेथे सुध्दा शस्त्रक्रिया करण्यांत आली व आज सुध्दा तक्रारकर्ता वैद्यकीय उपचार सतत घेत आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयात जानेवारी २०१२ मध्ये जनता वैयक्तिक अपघात विमा दावा फॉर्म भरुन विरुध्द पक्ष यांचेकडे नुकसान भरपाईची पॉलिसी प्रमाणेची रक्कम मागितली, परंतु विरुध्द पक्षाने पॉलिसीची रक्कम दिली नाही. उलट दि.०८.०२.२०१२ रोजी लेखी पत्र देऊन क्लेम फॉर्म घटनेच्या नंतर एक महिन्याच्या आत भरुन न दिल्यामुळे क्लेम नामंजुर केला.
पॉलिसी जारी करतांना तक्रारकर्त्याला पॉलिसीच्या सोबत नियम शर्ती व अटी यांचे विस्तृत नियमावलीचा तपशील किंवा शेडयुल दिला नाही. तसेच तक्रारकर्ता सतत वैद्यकीय उपचाराखाली असल्यामुळे व बिछान्यावर पडून असल्यामुळे त्याने एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाला कळविले नव्हते, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची विम्याची रक्कम टाळण्याच्या उद्देशाने हेतुपूरस्सर थातूर-मातूर कारणे सांगुन सेवा देण्यास असमर्थता दर्शविली आणि अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला. तक्रारकर्त्याने दि. ०९.०३.२०१२ रोजी आपल्या वकीला मार्फत रजिष्टर पोष्टाने नोटीस पाठविली व दि.१२ मार्च २०१२ रोजी विरुध्द पक्षाला प्राप्त झाली. त्यानंतर सुध्दा अदयाप पर्यंत दिलेल्या विहीत मुदतीमध्ये तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम विरुध्द पक्षाने दिली नाही. सदर तक्रार ही मुदतीमध्ये असुन तक्रार वाशिम जिल्हयात घडल्यामुळे सदर तक्रार वि. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येते. सदर तक्रार ही वि. मंचाबाहेर, आपसात झालेली नसून इतर कोठेही दाखल केलेली नाही. म्हणून तक्रारकर्त्याची विनंती की, तक्रार मंजूर व्हावी व तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीची रक्कम रु.१,००,०००/- विरुध्द पक्षाकडुन व्याजासहीत मिळावी तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक,शारिरीक त्रासापोटी रु. ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ५,०००/- विरुध्द पक्षाकडुन मिळण्याचा आदेश व्हावा. तसेच या व्यतिरीक्त योग्य व न्याय दाद तक्रारकर्त्याला देण्यात यावी.
सदर तक्रार तक्रारकर्त्याने प्रतिज्ञापत्रावर केली व दस्तऐवज यादीप्रमाणे १० दस्त, पुरावा म्हणून सोबत दाखल केलेली आहेत.
4) विरुध्द पक्ष क्र. १ व २ चा लेखी जवाब ः- विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जबाब (निशाणी ११) दाखल करुन, बहुतांश विधाने नाकबूल केली आहेत. त्यामध्ये थोडक्यात आशय असा की, विरुध्द पक्ष क्र. १ व २ ने तक्रारकर्ता हा मौजे पोहा ता.कारंजा जि.वाशिम येथील रहिवासी असून, केरला टायर वर्क्स कारंजा येथे मजुर म्हणुन काम करीत होता, हे नाकबुल केले. विरुध्द पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्त्याने त्यांच्याकडे जनता वैयक्तिक दुर्घटना पॉलिसी क्र. ४०३५६ नुसार रु.२५०/- प्रिमीयम भरुन रु.१,००,०००/- चा वैयक्तिक अपघात विमा काढला होता. सदरहु पॉलिसीची मुदत दिनांक २१.०१.१९९८ ते २१.०१.२००८ पर्यंत होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दि. २०.०१.२००६ रोजी अपघात झाला व त्यामध्ये त्याला गंभिर स्वरुपाच्या जखमा झाल्या व त्यामुळे तक्रारकर्त्याला ५०% कायमचे अपंगत्व आले, हे म्हणणे नाकबुल केले. तक्रारकर्त्याला अपघाता नंतर, त्याच्या जखमा गंभिर स्वरुपाच्या असल्यामुळे, डॉ.आर.के.बेलसरे यांचेकडे भरती करण्यात आले व त्याच्यावर वैदकिय उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आली व तसेच त्यानंतर डॉ.फडके यवतमाळ यांच्याकडे सुध्दा भरती करण्यात आले व तिथे सुध्दा शस्त्रक्रीया करण्यात आली व आज सुध्दा तक्रारकर्ता हा वैद्यकिय उपचार घेत आहे व त्याकरीता आजपर्यंत लाखो रुपये खर्च झाले, हे म्हणणे विरुध्द पक्षाने नाकबुल केले.
विरुध्द पक्षाने हे कबुल केले की, तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी अंतर्गत रक्कम मिळण्याचा दावा जानेवारी २०१२ मध्ये केला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नुकसान भरपाईची, पॉलिसी प्रमाणे रक्कम दिली नाही व त्याचा पॉलिसीचा दावा दि. ०८.०२.२०१२ रोजी खारीज केल्याबाबतचे पत्र कारणासह दिले. विरुध्द पक्षाने हे नाकबुल केले की, विमा पॉलिसी देतांना अटी, शर्ती व नियमावलीची प्रत तक्रारकर्त्याला दिली नाही. विरुध्द पक्षाने हे म्हणणे नाकबुल केले की, तक्रारकर्ता हा सतत वैदयकिय उपचार घेत होता व बिछान्यावर पडुन असल्यामुळे विरुध्द पक्षाला एक महिन्याच्या आत कळवु शकला नाही.
विरुध्दपक्षाने त्यांच्या अधिकच्या कथनामध्ये म्हटले की, तक्रारकर्त्याने जनता वैयक्तिक दुर्घटना विमा पॉलिसी रु. १,००,०००/- ची दि. २१.०१.१९९८ ते २१.०१.२००८ या कालावधीची घेतली होती. सदरहु विमा पॉलिसी ही, पॉलिसी मधील अंर्तभूत अटी, शर्ती, परिभाषा व निर्बंधाच्या अधीन राहून देय होती. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, डॉ. बेलसरे यांनी दिलेला फॉर्म कॉम्प “बी” प्रमाणपत्र असे दर्शविते की, तक्रारकर्ता हा दि. २३.०१.२००६ ते ३०.०१.२००६ आणि ३०.०१.२००६ ते ०६.०२.२००६ पर्यंत भरती होता व उपचार घेत होता. तसेच सिव्हील सर्जन, जनरल हॉस्पिटल, वाशिम यांनी दिलेला फॉर्म कॉम्प “बी” प्रमाणपत्र असे दर्शविते की, तक्रारकर्ता हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि फडके हॉस्पिटलमध्ये दि. ३०.०८.२०१० ते ३१.०८.२०१० या कालावधीकरिता भरती होता आणि त्याचा उपचार अंर्त:बाहय रुग्ण विभागामध्ये दि. २१.०१.२००६ ते ०६.०२.२००६ उपचार घेत होता. डॉ.बेलसरे यांनी दिलेले डिस्चार्ज कार्ड असे दर्शविते की, तक्रारकर्ता हा दि. २३.०१.२००६ रोजी भरती होता व त्याला दि. ०६.०२.२००६ रोजी डिस्चार्ज करण्यात आले. तक्रारकर्त्याला आलेले ५०% कायमचे अपंगत्व हे पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील क्लॉज “C” प्रमाणे नाही, आणि तक्रारकर्त्याला जरी ५०% कायमचे अपंगत्व आलेले असले तरी, ते अटी व शर्ती मधील क्लॉज “C” प्रमाणे नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार टिकू शकत नाही. तक्रारकर्त्याला सिव्हील सर्जन, वाशिम यांनी दि. ०८.११.२०१० रोजी कायमचे अपंगत्व प्रमाणपत्र दिले. त्यावेळेस तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीचा दावा करायला हवा होता, परंतु तक्रारकर्त्याने त्याचा दावा जानेवारी २०१२ मध्ये, डिस्चार्ज झाल्याच्या २ वर्षानंतर, तसेच कायमचे अपंगत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, तसेच पॉलिसीची मुदत दि. २१.०१.२००८ रोजी संपल्यानंतर केला. पॉलिसीच्या शर्त क्र. १ नुसार (“ Upon the happening of any event which may give rise to a claim under this policy this insured shall forthwith give notice there of the company unless reasonable cause is shown the insured should within one calendar month after the event which may give rise to a claim under the policy, give written notice to the company with full particulars of the claim. ” )
तक्रारकर्त्याने अपघाताबाबतची सुचना विरुध्द पक्षाला एक महिन्याच्या आत दिली नाही. म्हणुन तक्रारकर्त्याचा दावा टिकू शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याचा अपघात दि. २०.०१.२००६ रोजी झाला, त्याने घटनेच्या ६ वर्षा नंतर व तसेच मुदतीच्या ४ वर्षानंतर विमा पॉलिसीच्या रक्कमेची मागणी केली. विमा पॉलिसीची मुदत ही दि. २१.०१.२००८ रोजी संपुष्टात आली, म्हणून तक्रारकर्त्याचा दावा टिकू शकत नाही. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीची पुर्तता न केल्यामुळे, विमाकृत रक्कम रु. १,००,०००/- च्या ५०% म्हणजेच रु.५०,०००/- मिळण्यास पात्र नाही. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अंर्तगत तक्रार दाखल करण्याची मुदत ही २ वर्षाची आहे. परंतु तक्रारकर्ता यांनी त्याची तक्रार मुदतीमध्ये आणण्याकरिता, त्याचा दावा विरुध्द पक्षाकडे जानेवारी २०१२ मध्ये दाखल केला व विरुध्द पक्षाने दि. ०८.०२.२०१२ रोजी दावा खारिज केल्याचा गैर फायदा घेत आहे. तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतीमध्ये नाही तसेच विरुध्द पक्षाने कुठल्याही प्रकारे अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही. करिता तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी.
5) कारणे व निष्कर्ष ः-
तक्रारकर्ता व सर्व विरुध्दपक्ष यांना मान्य असलेल्या बाबी म्हणजे, तक्रारकर्ता यांनी दि. २१.०१.१९९८ रोजी विरुध्द पक्षाकडे जनता वैयक्तिक दुर्घटना विमा पॉलिसी क्र. ४०३५६ नुसार रु. २५०/- प्रिमीयम भरुन रु. १,००,०००/- चा वैयक्तिक अपघात विमा काढला होता म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचा ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सदरहू पॉलिसीची मुदत दि. २१.०१.१९९८ ते २१.०१.२००८ पर्यंत होती. तक्रारकर्त्याचा दि. २०.०१.२००६ रोजी अपघात झाला. अपघातामध्ये तक्रारकर्त्याला गंभिर स्वरुपाच्या जखमा झाल्या व त्यामुळे ५०% कायमचे अपंगत्व आले. विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारकर्त्याने अपघाताबाबतची सुचना ही एका महिन्याच्या आत दिली नाही. तसेच घटनेच्या सहा वर्षानंतर व पॉलिसीच्या मुदतीच्या चार वर्षानंतर विमा पॉलिसीच्या रक्कमेची मागणी केली म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाहय असल्यामुळे टिकू शकत नाही. परंतु दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, असे दिसून येते की, तक्रारकर्त्याचा अपघात दिनांक 20/01/2006 रोजी झाला तेंव्हापासून तक्रारकर्ता हा शासकीय रुग्णालय, कारंजा त्यानंतर डॉ. आर.के.बेलसरे, अमरावती, त्यानंतर डॉ. फडके, यवतमाळ व त्यानंतर शासकीय रुग्णालय, वाशिम येथे वेळोवेळी भरती होता व उपचार घेत होता. तक्रारकर्ता हा सतत वैद्यकीय उपचार घेत होता व बिछान्यावर पडून होता. त्या कारणाने तक्रारकर्ता, विरुध्द पक्षाला अपघाताबाबतची सुचना एका महिन्याच्या आत देऊ शकला नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 01/02/2012 रोजी विमा रक्कमेची मागणी केली आणि त्याचा विमा दावा हा दिनांक 08/02/2012 रोजीच्या पत्रानुसार विरुध्द पक्षाने नाकारलेला आहे. म्हणून तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्याचे कारण हे दिनांक 08/02/2012 पासुन आहे. त्यामुळे मुदतीच्या कायदयाच्या तरतुदीच्या अनुषंगाने तक्रारकर्त्याची तक्रार व विमा दावा हा मुदतीमध्ये आहे, असे मंचाचे मत आहे.
विरुध्द पक्षाचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याला आलेले 50 % कायमचे अपंगत्व पॉलिसीच्या अटी व शर्तीमधील क्लॉज - सी प्रमाणे नाही व त्या कारणाने विम्याची 50 % रक्कम मिळण्यास सुध्दा तक्रारकर्ता पात्र नाही. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या रुग्णालयाच्या कागदपत्रांवरुन व वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याच्या जखमा हया गंभिर स्वरुपाच्या असून, त्याला 50 % कायमचे अपंगत्व आलेले आहे. त्या कारणाने तो त्याचे दैनंदिन काम, मोलमजूरीचे काम पुर्ववत करु शकत नाही. विमा पॉलिसीच्या क्लॉज - डी नुसार नमुद केलेले आहे की, “ If such injury shall within six Calendar months of its occurrence be the sole and direct cause of permanently totally and absolutely disabling the insured from engaging in, being occupied with or giving attention to any employment or occupation of any description whatsoever the capital sum insured stated in the schedule. ” त्यामुळेच तक्रारकर्ता हा विमा पॉलिसीमधील वरील अटीच्या आधारे पॉलिसीची पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याचा दावा बेकायदेशीररित्या फेटाळून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे व तक्रारकर्त्याला दयावयाच्या सेवेत त्रुटी केली असुन, तक्रारकर्त्यास मानसिक त्रास दिलेला आहे. परिणामत: तक्रारकर्ता हा झालेल्या मानसिक त्रासापोटी ग्राहक संरक्षण कायदा, कलम-१४ नुसार रुपये 5,000/- नुकसान भरपाई व 2,000/- रुपये प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
::: अं ति म आ दे श :::
१) तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येत आहे.
२) विरुध्द पक्ष क्र. १ ते 2 यांनी तक्रारकर्त्याला जनता व्यक्तीगत दूर्घटना विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- ( अक्षरी रुपये एक लाख फक्त ), तक्रार दाखल दि. 24/03/2017 पासुन प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 6 % व्याजदराने, व्याजासह दयावी.
३) विरुध्द पक्ष क्र. १ ते 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- व प्रकरणाचा खर्च 2,000/- रुपये दयावे.
४) विरुध्द पक्षांनी उपरोक्त निर्देशाचे पालन, आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसांचे आत करावे.
५) उभय पक्षास आदेशाची प्रत निशुल्क दयावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri