(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची हकिकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने दि.02.11.2005 रोजी गैरअर्जदार टाटा मोटर्स कंपनीकडून वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. त्याने गैरअर्जदाराकडे कर्ज परतफेडीपोटी सर्व हप्ते वेळेवर भरले. परंतू एक धनादेश अनादरीत झाला त्यावेळेस त्याने सदर हप्त्याची रक्कम रोखीने भरली. गैरअर्जदार कंपनीने दि.08.05.2009 रोजी रु.350/- रिटेनर चार्जेसची रक्कम भरण्यास सांगितले असता तक्रारदाराने सदर रक्कम जमा केली आणि त्याने गैरअर्जदाराकडे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने दि.10.03.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून रक्कम रु.16,395/- भरण्याची सुचना केली. त्याने सर्व कर्ज हप्त्यांची रक्कम गैरअर्जदाराकडे भरली व (2) त.क्र.404/10 त्याच्याकडे कोणतीही रक्कम बाकी नसतानाही गैरअर्जदाराने त्यास खोटी व चुकीची नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. त्याने वारंवार मागणी करुनही गैरअर्जदाराने बेबाकी प्रमाणपत्र दिले नाही व त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने बेबाकी प्रमाणपत्र सर्व कागदपत्रांसह द्यावे व त्यास नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार टाटा मोटर्स कंपनीने लेखी निवेदन दाखल कले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने कर्ज परतफेडीपोटी दिलेले काही धनादेश न वटता परत आले, त्यामुळे तक्रारदार रिटेनर चार्जेस, बँक चार्जेस आणि ओव्हर डयु चार्जेस देण्यास जबाबदार आहे. तक्रारदाराचा कर्ज परतफेडीचा करार संपल्यानंतरही त्याचेकडे मुळ कर्जाची रक्कम रु.17,713.11 आणि ओव्हर डयु चार्जेसची रक्कम रु.7,951.04 बाकी आहेत. तक्रारदाराने कर्जाची रक्कम न भरल्यामुळे त्यास बेबाकी प्रमाणपत्र दिलेले नाही यामधे कंपनीची काहीही चुक नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. गैरअर्जदार कंपनीने तक्रारदाराला दिलेल्या कर्जाची तक्रारदाराने परतफेड केल्याचे गैरअर्जदाराने दाखल केलेल्या त्याच्या कर्ज खाते उता-यावरुन स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदार कंपनीला दिलेल्या धनादेशापैकी एक धनादेश न वटता परत आला त्यावेळेस त्याने सदर हप्त्याची रक्कम रु.7950/- रोखीने भरले, ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या दि.13.09.2006 रोजीच्या पावतीवरुन दिसून येते. गैरअर्जदार कंपनीचे तक्रारदाराकडे ओव्हर डयु चार्जेसची रक्कम बाकी आहे असे म्हणणे आहे परंतू गैरअर्जदाराने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. गैरअर्जदाराने ओव्हर डयु चार्जेस कशाचा आहेत याचा उल्लेख केलेला नाही, तसेच सदर चार्जेसचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून ओव्हर डयु चार्जेस मागण्याचा काहीही अधिकार नाही असे आमचे मत आहे. गैरअर्जदार टाटा मोटर्स कंपनीने तक्रारदाराचा कर्ज खात्याचा उतारा सादर केला आहे. सदर उतारा पाहता तक्रारदाराने सर्वच हप्ते भरल्याचे दिसते. त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही बाकी नाही असे आमचे मत असून गैरअर्जदार कंपनीने तक्रारदाराकडे कर्ज हप्त्यांशिवाय इतर कोणतीही रक्कम बाकी दर्शवून त्याची मागणी करणे योग्य ठरत नाही गैरअर्जदार कंपनीने तक्रारदाराने सर्व कर्जाची रक्कम भरल्यानंतरही त्याचेकडे कर्जाची रक्कम बाकी असल्याचे व ओव्हर डयु (3) त.क्र.404/10 चार्जेस बाकी असल्याचे दर्शवून त्यास दि.10.03.2010 रोजी नोटीस पाठवून रु.16,395/- ची मागणी करणे आणि त्यास बेबाकी प्रमाणपत्र देण्यास नकार देऊन निश्चितपणे त्रुटीची सेवा दिली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार टाटा मोटर्सने तक्रारदाराला निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत बेबाकी प्रमाणपत्र द्यावे. 3) गैरअर्जदार टाटा मोटर्सने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |