निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 23/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 18/12/2013
कालावधी 07 महिने. 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मुक्ताबाई भ्र.नागोराव गिनगीने. अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.अरुण एम.राऊत.
रा.आसोला ता.व जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार.
न्यु इंडीया अॅशुरन्स कंपनी लि. अॅड.जी.एच.दोडीया.
विभागीय कार्यालय क्रं. 153400,
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाऊस रोड,पुणे. 422005.
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरंन्स अँन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि,
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठी मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद 431003.
3 तालुका कृषी अधिकारी. तालुका कृषी कार्यालय, परभणी. स्वतः
ता. व जि. परभणी.
4 शाखा व्यवस्थापक.
न्यु इंडीया अॅशुरंन्स कंपनी लि.
अॅड शर्मा यांच्या घराचा वरचा मजला.
नानलपेठ, परभणी 431401.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 व 4 यांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखरल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी.
अर्जदार पती नामे नागोराव पिता बाजीराव गिनगीने यांच्या नावे गट नं. 596 मध्ये क्षेत्र 0 हे. 39 आर व गट नं. 590 मध्ये 0 हे. 72 आर मौजे असोला तलाठी सज्जा आसोला ता जि परभणी येथील शेतीचा मालक व कब्जेदार होता, दिनांक 07/03/2012 रोजी तीचा मुलगा नामे वैजनाथ हा छतावरुन खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला त्याच्या उपचारासाठी सरकारी दवाखना परभणी येथे दाखल केले होते, दिनांक 13/03/2012 रोजी त्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे व तसा निरोप अर्जदाराच्या पतीस मिळाल्यामुळे तो मध्यरात्री सरकारी दवाखाना परभणी येथे जाण्यासाठी पिंगळीहून निघाला व परभणी – नांदेड जाणारा रेल्वेट्रॅक ओलांडतांना रात्रीच्या अंधारात रेल्वेचा धक्का लागून खाली पडला व या अपघातात तो मरण पावला. अर्जदाराचा पती हा शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता, या योजनेचा लाभ गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे दिनांक 07/11/2012 रोजी दाखल केला होता, परंतु मयत विमाधारकाचा मृत्यू अपघातामुळे झाला नसून त्याने आत्महत्या केली असे चुकीचे कारण दाखवुन दिनांक 16/01/2013 रोजी अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदाराने निरस्त केला. म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास विमादाव्याची रक्कम दिनांक 13/03/2012 पासून पूर्ण रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह द्यावी, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अर्जदारास देण्यात यावी. अशी मागणी अर्जदाराने मंचासमोर केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 5, नि.8 व नि.21 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2, 3 व 4 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी लेखी निवेदन नि. 16 वर व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी निवेदन नि. 13 वर व गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी लेखी निवेदन नि.10 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे असे की, ही संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. महाराष्ट्र शासनाने उपरोक्त योजनेसाठी सल्लागार म्हणून त्याची नेमणुक केलेली आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत घेत नाही. विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यापूर्वी कागदपत्राची छाननी करणे व परीपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविणे व दाव्याचा निर्णय होई पावेतो विमा कंपनीकडे पाठपुरावा करणे एवढया पुरतीच त्यांची भुमिका मर्यादित आहे. त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी निवेदन सोबत शपथपत्र नि. 14 वर दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, अर्जदाराचा प्रस्ताव दिनाकं 07/11/2012 रोजी प्राप्त झाल्यानंतर त्याने पूढील कार्यवाहीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविला होता, परंतु सदर प्रकरणात विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला नसून रेल्वेखाली पडून आत्महत्या केल्याचे शाबीत झाल्यामुळे प्रकरण नामंजूर करण्यात आले. सदरील प्रकरणात आवश्यक ती सव कार्यवाही विहीत मुदतीत पार पाडल्यामुळे त्यांना दोषी ठरविणे योग्य नसल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे.
गैरअर्जदाराने शपथपत्र नि. 9 वर मंचासमोर दाखल केले.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या मयत पतीने गैरअर्जदाराकडे प्रिमीयम भरलेले नसल्यामुळे तो विमा कंपनीचा ग्राहक नाही, पुढे त्यांचे म्हणणे असे की, त्यांच्याकडे अर्जदाराचा प्रस्ताव प्राप्त झाला होता, परंतु रिर्पोट नुसार व इतर कागदपत्रा वरुन अर्जदाराच्या पतीने दारु पीऊन आत्महत्या केल्याचे शाबीत झाल्यामुळे दिनांक 16/01/2013 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा क्लेम निरस्त करण्यात आला. यामुळे गैरअर्जदारानी त्रुटीची सेवा दिल्याचे मानता येणार नाही, सबब अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा, अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचासमोर केली. आहे. गैरअर्जदारांनी लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 17 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 20 वर मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा योग्य
कारणास्तव निरस्त केल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही.
2 अर्जदार कोणती दाद मिळवण्यास पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराचा पती हा शेतकरी असल्यामुळे तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता दिनांक 13/03/2012 रोजी त्यास रेल्वेचा धक्का लागुन खाली पडला व रेल्वे खाली कटून त्याचा अपघाती मृत्यू झाला. उपरोक्त योजने अंतर्गत विमा धारकाच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम दाखल केला असता, अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झालेला नसून त्याने दारु पीऊन आत्महत्या केल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा वाजवी क्लेम निरस्त केला, अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.
यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या पतीने दारु पीऊन
रेल्वे खाली आत्महत्या केल्याचे पोलीस रिपोर्ट व इतर कागदपत्रावरुन शाबीत झाल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार गैरअर्जदार विमा कंपनी विमादाव्याची रक्कम अर्जदारास देण्यास बांधील नाही. निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुद्दा असा की, अर्जदाराच्या पतीने दारु पीऊन आत्महत्या केल्याचे ठोसरित्या गैरअर्जदाराने शाबीत केले आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. कारण अपघात हा मध्यरात्री झालेला आहे व विमा धारकाने दारुचे प्राशन करुन रेल्वे पूढे उडी घेउन आत्महत्या केली असे ठामपणे सांगणारा कोणताही प्रथमदर्शनी साक्षीदार समोर आलेला नाही. तसेच मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट यावरुन देखील विमा धारकाने दारु पीऊन आत्महत्या केल्याचे शाबीत होत नाही,पूढे गैरअर्जदाराने विठ्ठल गिनगीने व स्वतः अर्जदार याचे जबाब मंचासमोर दाखल केलेले आहेत, त्यात विमा धारकाने दारु पीउन आत्महत्या केली असा निव्वळ अंदाज वर्तीवीण्यात आल्याचे स्पष्ट होते, तसेच त्याच्या पुष्टयर्थ संबंधीत व्यक्तीचे शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही, यावरुन गैरअर्जदाराने घेतलेला बचाव ग्राहय धरण्याजोगा नसल्याचे मंचाचे मत आहे, तसेच अर्जदाराने मा.वरिष्ठ न्यायालयाचे खालील प्रमाणे न्यायनिवाडे मंचासमोर दाखल केलेले आहेत.
1 मा.छत्तीसगढ राज्य आयोग, रायपूर. 2012 /3) CPR 149
2 मा.छत्तीसगढ राज्य आयोग, मुंबई Appeal No. 1834/2003
3 मा.महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई Appeal No. 2405/1999
उपरोक्त न्यायनिवाड्या मध्ये मा.राज्य आयोगाने व्यक्त केलेल्या मंताचा ही या ठिकाणी आधार घेण्यात आलेला आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी वैयक्तिकरित्या वा संयुक्तिकरित्या निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत विमादाव्याची रक्कम रु.1,00,000/- फक्त
(अक्षरी रु.एकलाख फक्त ) अर्जदारास द्यावी.
3 तसेच गैरअर्जदारांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,500/- फक्त
(अक्षरी रु. एकहजार पाचशे फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.
1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार फक्त) आदेश मुंदतीत अर्जदारास द्यावी.
4 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.