निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 30/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 25/10/2013
कालावधी 08 महिने. 25दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गीताबाई भ्र.अशोक काकडे. अर्जदार
वय 41 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.एच.एस.आरसुळे.
रा.संदलापूर ता.पूर्णा. जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार.
न्यु इंडीया अॅशुरन्स कंपनी लि, अॅड.जी.एच.दोडीया.
विभागीय कार्यालय क्रमांक. 153400
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाऊस रोड,पुणे 422005.
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद 431003.
3 तालुका कृषी अधिकारी. स्वतः
तालुका कृषी कार्यालय, पूर्णा, ता.पूर्णा, जि.परभणी.
4 शाखा व्यवस्थापक. न्यु इंडीया अॅशुंरन्स कंपनी लि.
अॅड.शर्मा यांचा वरचा मजला, नानल पेठ,परभणी 431401.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा अपघात विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या पतीच्या नावे मौजे. संदलापूर तलाठी सज्जा पिंपळगाव (बा) ता.पूर्णा जि.परभणी येथे शेती आहे. व याची नोंद 7/12 उतारा, 8 अ, 6 ड, प्रमाणपत्रा मध्ये आलेली आहे.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती दिनांक 21/12/2011 रोजी विहीरीचे पाणी शेंदत असतांना अचानक पाय घसरुन विहीरीत पडल्यामुळे मृत्यू झाला, त्यानंतर अर्जदाराने शेतकरी जनता अपघात विमादावा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज क्लेम भाग 1, 2, 3 इतर सर्व त्या आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 19/03/2012 ला गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केला व त्याने तो दावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचेकडे पाठवला.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरच्या विमादाव्याची मंजुरी बाबत गैरअर्जदार क्रमांक 3 यांना चौकशी केली असता त्याने तुमचा अर्ज नामंजूर झाला आहे असे कळविले व त्यास नामंजूर होण्याचे कारण विचारले असता त्यांनी असे सांगीतले की, मयत पतीच्या नावे जमीन नाही, म्हणून विमादावा फेटाळला असे सांगीतले.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी चुकीचे कारण दाखवुन अर्जदाराचा विमादावा फेटाळले आहे ते कायदेशिरदृष्टया योग्य नाही व गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार अर्जदारास दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करण्यात यावा. गैरअर्जदाराने अर्जदारास 1,00,000/- रु. देण्याचा आदेश व्हावा, व गैरअर्जदारास 21/12/2011 पासून पूर्ण रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के प्रमाणे अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर 13 कागदपत्रांच्या यादीसह 13 कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये प्रभाकर कुलकर्णी यांच्या जबाबाची कॉपी, पंचनाम्याची प्रत, स्पॉट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट, अर्जदाराचे शपथपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्र, 7/12 उतारा, होल्डींग प्रमाणपत्र, फेरची नक्कल, मराठवाडा बँकेचे पासबुकची प्रत, क्लेमफॉर्म लेटर इ. कागदपत्रे दाखल केले आहेत,
मंचातर्फे गैरअर्जदारांना त्यांचा लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीसा काढण्यात आल्या. गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 15 वर आपला लेखी जबाब सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. तसेच अर्जदार हा विमा कंपनीचा ग्राहक नसलेमुळे सदरची तक्रार ही सी.पी. अॅक्ट 1986 अंतर्गत विद्यमान मंचासमोर चालत नाही वा तसेच विद्यमान मंचास सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही, म्हणून खारीज होणे योग्य आहे. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. तसेच अर्जदाराने विमा कंपनीस हप्त्यापोटी 1 रुपया देखील भरलेला नाही व तसेच करार हा Tri Party Agreement असले कारणाने शेतक-यास विमा कंपनी विरुध्द दावा करण्याचा कायद्याने अधिकार पोहचत नाही व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणने आहे की, विमा कालावधी हा 15/08/2011 ते 14/08/2012 असा होता व 15/08/2011रोजी पॉलिसीच्या नियमा नुसार शेतक-याचे नाव 7/12 उता-यावर असणे आवश्यक आहे. तरच त्यास विम्याचा फायदा घेता येतो व सदरच्या तक्रारी मध्ये पाहिले असता तलाठ्याने फेर अर्जदाराच्या मयत पतीच्या नावावर 30/08/2011 रोजी मंजूर केला व मंडळ अधिका-याने सदरचा फेर प्रगटन केले व 16/09/2011 रोजी फेर मंजूर झाला व अशा प्रकारे अर्जदाराचा मयत पतीचे नाव शेतकरी म्हणून 16/09/2011 रोजी 7/12 उता-यावर आले यावरुन असे दिसते की, अर्जदाराचे मयत पती हे 15/08/2011 रोजी शेतकरी नव्हते. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा फेटाळला आहे व तो योग्यच आहे अर्जदारास विमा कंपनीने कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार 1 व 4 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रिमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे नि.क्रमांक 18 वर 1 कागदपत्राच्या यादीसह 1 कागदपत्र गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केले आहे व त्यात पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपले लेखी निवेदन सादर केले आहे व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था ही विमा विनीयामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशिलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार विचार करीता अर्जदाराने आमचे विरुध्द केलेली तक्रार ही अपु-या माहितीवर, गैरसमजाने आणि चुकीने केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने आमची फक्त सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे व या नेमणुकीसाठी आमच्या संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारची फी, मागीतलेली नाही वा स्वीकारलेली नाही म्हणून सदरच्या तक्रारीतुन आमची मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11/1 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 मंचासमोर हजर व आपला लेखी जबाब नि.क्रमांक 7 वर दाखल केले आहे व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्यांचा विमादावा त्यांच्याडे दिनांक 19/03/2012 रोजी दाखल केला सदरील प्रस्ताव या कार्यालयाचे पत्र क्रमांक 389 दिनांक 19/03/2012 रोजी वरिष्ठ कार्यालयास दाखल केला, त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचे पत्र क्रमांक 2386 दिनांक 09/04/2013 अन्वये कळविल्या प्रमाणे गीताबाई अशोक काकडे यांचा प्रस्ताव विमा कंपनीने रद्द केला व तसे अर्जदारास कळविले, त्यामुळे सदर प्रकरणा मध्ये आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यामुळे या प्रकरणात आम्हांस दोषी धरणे योग्य नाही.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 विमा कंपनीने अर्जदाराच्या
मयत पतीचा शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई
देण्याचे नाकरुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 21/12/2011 रोजी विहीरीचे पाणी शेंदत असतांना अचानक पाय घसरुन झाला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वर साक्षीदाराच्या जबाबावरुन, 4/2 वरील इन्क्वेस्ट पंचनामाच्या प्रतिवरुन व 4/4 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने तिच्या मयत पतीचा अपघाती विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिनांक 19/03/2012 ला दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/12 वरील दाखल कलेल्या क्लेमफॉर्म भाग – 3 वरुन सिध्द होते. अर्जदाराचा अपघात विमादावा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल केल्यानंतर त्याने तो गैरअर्जदार विमा कंपनी 1 व 4 कडे दाखल केला होता व तो प्रस्ताव विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीच्या नावे जमीन नसले कारणाने विमादावा फेटाळला ही बाब नि.क्रमांक 4/13 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 विमा कंपनी याचे म्हणणे की, अर्जदाराचे मयत पती हे पॉलिसी जाहिर झालेल्या तारखे दिवशी शेतकरी नव्हते व ते गैरअर्जदार विमा कंपनीचे ग्राहक होत नाहीत. व अर्जदारास शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत विमादावा मागण्याचा अधिकार नाही ही बाब मंचास योग्य वाटते, कारण गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18 वरील पॉलिसी प्रत वरुन हे सिध्द होते की, सदरची पॉलिसी ही 15/08/2011 ते 14/08/2012 पर्यंत वर्षाकरीता लागु होती व सदर पॉलिसीच्या Eligibility (पात्रता ) Clause मध्ये स्पष्ट म्हंटले आहे की,
II Eligibility
The farmers name should be in the Land Record Register i.e. 7/12 on the date of issuance of policy.
व अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/10 वरील फेरफारच्या प्रतीवरुन हे सिध्द होते की, अर्जदाराच्या मयत पतीच्या नावे दिनांक 16/09/2011 रोजी फेर मंजूर झाला. यावरुन हे सिध्द होते की, पॉलिसीच्या सदर EligibilityClause प्रमाणे दिनांक 15/08/2011 रोजी अर्जदाराचे मयत पती हे शेतकरी नव्हते. यावरुन हे स्पष्ट होते. अर्जदाराचे मयत पती हे गैरअर्जदार विमा कंपनी क्रमांक 1 व 4 चे ग्राहक नव्हते. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने त्याचा विमादावा नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 कडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.