(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिचे पती शेख अब्दुल शेख सत्तार यांचे दि.08.04.2007 रोजी औरंगाबाद देवगाव रंगारी रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातामधे गंभीर दुखापत होऊन घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचार घेत असताना (2) त.क्र.98/09 दि.09.04.2007 रोजी निधन झाले. तिच्या पतीने गैरअर्जदार न्यु इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीकडे जनता अक्सीडेंटल पॉलीसी अंतर्गत दि.02.05.2003 ते दि.01.05.2008 या कालावधीसाठी विमा उतरविला होता. तिच्या पतीचे अपघाती निधनानंतर विमा रक्कम मिळावी म्हणून तिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दि.13.09.2007 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह विमा दावा सादर केला. गैरअर्जदार विमा कंपनीने विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे तिने दि.19.01.2007 रोजी विमा कंपनीस कायदेशीर नोटीस पाठविली. तिचे पतीने अण्णासाहेब पाटील बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मागणी करणारे पत्र बँकेने तिला दिलेले आहे. परतू विमा कंपनीने तिने पाठविलेल्या नोटीसचे उत्तर दिले नाही आणि वारंवार मागणी करुनही विमा रक्कम दिली नाही, अशा प्रकारे गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने विमा रक्कम रु.1,00,000/- मानसिक, शारिरिक त्रास, बँकेचे व्याज, व तक्रारीच्या खर्चासह एकूण रक्कम रु.1,41,725/- व्याजासह गैरअर्जदार विमा कंपनीकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालावरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यु हा मोटार अपघातामधे झालेला नसून “fracture of Right Humarous radius and Ulna” with “cardiomyopathy with coronary artery disease” मुळे झालेला आहे. तक्रारदाराचे पतीचा मृत्यु दि.09.04.2007 रोजी झालेला असून तक्रारदाराने दि.10.04.2007 रोजी तक्रार दिलेली आहे. त्यावरुन मयताच्या अपघाती मृत्यु संदर्भात संशय निर्माण होतो. तक्रारदाराचे पतीस झालेली इजा हे त्याचे मृत्युचे कारण होऊ शकत नाही. कारण Cardiac dsease चा अपघाताशी संबंध नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. गैरअर्जदार क्र.2 अण्णासाहेब पाटील अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक यांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात हजर झाले नाही, म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तक्रारदाराचे पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर तिने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला. परंतू विमा कंपनीने तिच्या पतीचा मृत्यु अपघातामुळे झालेला नाही या कारणावरुन तक्रारदारास विमा रक्कम दिलेली नाही. (3) त.क्र.98/09 तक्रारदाराचे पती शेख अब्दुल शेख सत्तार याचा दि.08.04.2007 रोजी औरंगाबाद देवगाव रंगारी रस्त्यावर अपघात झालेला असून त्यात ते गंभीर जखमी झाल्याचे एफ.आय.आर. वरुन दिसून येते. अपघातानंतर तक्रारदाराचे पतीस घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले असताना दि.09.04.2007 रोजी त्यांचे निधन झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदाराच्या पतीचा मृत्यु “fracture of Right Humarous radius and Ulna” with “cardiomyopathy with coronary artery disease” मुळे झालेला असल्याचे विमा कंपनीचे म्हणणे आहे. परंतू तक्रारदाराच्या पतीचे निधन हार्टफेलने झालेले असले तरी वाहन अपघातामधे त्याला फ्रॅक्चर्स झालेले असून त्याचा मृत्यु नैसर्गिक हार्टअटॅकने झालेला नाही हे त्याच्या शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदाराच्या पतीचा मृत्यु दि.09.04.2007 रोजी म्हणजेच अपघात घडल्याच्या दुस-या दिवशीच झालेला आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाताने झालेला नाही हे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही. तक्रारदाराचे पती शेख अब्दुल शेख सत्तार यांचे वाहन अपघातामधे निधन झाल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसून येते. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराच्या पतीचा वाहन अपघातामुळे मृत्यु झालेला नाही अशा संशयावरुन तक्रारदारास विम्याची रक्कम न देऊन निश्चितपणे तिला त्रुटीची सेवा दिलेली आहे. तक्रारदाराच्या पतीने गैरअर्जदार क्र.2 अण्णासाहेब पाटील अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेमार्फत गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे विमा उतरविलेला असून त्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मागणी करणारे पत्र बँकेने तक्रारदारास दिले आहे. आणि विमा रक्कम बँकेला देण्यात यावी असे विमा प्रस्तावावर नमूद केलेले आहे. परंतू तक्रारदाराचे पतीचे दि.09.04.2007 रोजी झालेल्या अपघाती निधनानंतर बँकेने तक्रारदाराकडून चार वर्षाच्या कालावधीत तक्रारदाराच्या पतीने घेतलेल्या कर्जाची रक्कम वसूलही केलेली असेल तरी बँकेने तक्रारदाराचे पतीने घेतलेले कर्ज तक्रारदाराकडून वसुल केले किंवा नाही ही बाब मंचासमोर आलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विमा रक्कम गैरअर्जदार क्र.2 बॅकेला द्यावी असे म्हणणे उचित ठरणार नाही. एकंदर पुरावा पाहता मयत शेख अब्दुल शेख सत्तार यांचे अपघाती निधन झाले होते हे स्पष्ट दिसून येते. मयत शेख अब्दुल शेख सत्तार यांचे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडील जनता पर्सनल अक्सीडेंट पॉलीसीच्या कालावधीमधेच निधन झालेले असल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला पॉलीसीतील तरतुदीनुसार (4) त.क्र.98/09 रु.1,00,000/- व्याजासह देणे न्यायोचित ठरते. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीने तक्रारदारास रु.1,00,000/-दि.13.09.2007 पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजदराने निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 3) गैरअर्जदार क्र.1 न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीने तक्रारदाराला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु. 1,500/- आणि तक्रारीच्या खर्चापाटी रु.1,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |