::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 18.06.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून मेडीक्लेम पॉलिसी क्र. 281600/48/12/8500004032 काढली होती. सदर पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्त्यास व त्यांच्या आश्रीत मुलांना आजार किंवा ॲक्सीडेन्ट करिता विरुध्दपक्ष रु. 1,00,000/- पर्यंत मेडीक्लेम देणार होता. तक्रारकर्त्याचा मुलगा वृषभ हा 2014 साली गाडीवरुन पडला व त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आणि तो डॉ. अविनाश पाटील कडे भरती झाला. तेथे त्याचा उपचार झाला व सदरहू उपचाराकरिता रु. 18,660/- खर्च आला. सदरहू रक्कम पॉलिसी अंतर्गत घेण्याकरिता दि. 14/03/2014 रोजी तक्रारकर्त्याने संपुण कागदपत्रे विरुध्दपक्षाकडे दिले. नियमाप्रमाणे 60 दिवसांच्या आंत दावा मंजुर झाला किंवा नाही, याची माहीती देणे विरुध्दपक्षावर बंधनकारक आहे. तक्रारकर्त्याने या बाबत वारंवार विचारणा केली असता विरुध्दपक्षाने सांगीतले की, अगोदर दाखल केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स दाखल करा, कागदपत्रे अगोदरच दाखल केल्यामुळे झेरॉक्स दाखल करण्याबाबत तक्रारकर्त्याने असमर्थता दर्शविली. दि. 2/12/2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला लेखी कळविले की दाव्याचे निराकरण लवकरात लवकर करावे, परंतु अजुन पर्यंत विरुध्दपक्ष यांनी दाव्याचे निराकरण केले नाही व दावा प्रलंबित ठेवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, तक्रारकत्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष यांनी दाव्याचे निराकरण त्वरीत करावे, जर विरुध्दपक्ष स्वत:च्या चुकीमुळे तक्रारकर्त्याच्या दाव्याचे निराकरण करु शकत नसेल तर तक्रारकर्त्याचा दावा मंजुर करुन रु. 18,660/- दि. 14/5/2014 पासून 24 टक्के व्याजासह तक्रारकर्त्यास रक्कम द्यावी. मानसिक, शारीरिक, आर्थिक व व्यवहारीक नुकसानीपोटी रु. 10,000/- व तक्रार खर्चापेाटी रु. 5000/- देण्याचा आदेश विरुध्दपक्षास व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 03 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी त्यांचा जबाब दाखल केला असून, आरोप नाकबुल करीत असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. तक्रारकर्त्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्त्याच्या मुलाला झालेल्या अपघाताची व उपचाराची सुचना त्वरीत दिली नसल्यामुळे तसेच दावा हा शर्ती व अटीच्या कालावधीमध्ये दाखल केलेला नसल्यामुळे, सदर दावा पेअबल नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला इंन्टीमेशन जवळपास तीन महिने उशिरा दिल्यामुळे व नंतर दावा उशिरा दाखल केल्यामुळे व दाव्यासोबत योग्य ते कागदपत्रे पुर्ण दिले नसल्यामुळे दावा खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने दावा दाखल केल्यानंतर विरुध्दपक्षाने सर्व कागदपत्रे टीपीए जेनीनस इंडिया लि., नागपुर यांच्याकडे दि. 25/3/2014 रोजी पाठविले, परंतु टीपीए जेनीनस नागपुर यांनी सदरहू फाईल मिसप्लेस केल्यामुळे व ती सध्या शोधत असल्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास विनंती केली की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रती परत विरुध्दपक्षाकडे सुपूर्त कराव्या. परंतु तक्रारकर्त्याने आजपर्यंत सदरहू कागदपत्रे पुरविली नाहीत. त्यामुळे मंचाने तक्रारकर्त्यास आदेश द्यावा की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सर्व कागदपत्रे दाखल करुन विरुध्दपक्षास सहकार्य करावे. सदरहू तक्रार तक्रारकर्त्याचा मुलगा वृषभ याने दाखल करावयास पाहीजे होती. तक्रारकर्त्यास तक्रार दाखल करण्याचा अधिकार नसल्यामुळे ती खारीज होण्यास पात्र आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन करुन व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकून काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- सदर प्रकरणात तक्रारकर्ता हा विरुध्दक्षाचा ग्राहक असल्यासंबंधी कुठलाही वाद नसल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- सदर तक्रारीनुसार मुख्य वादाचा मुद्दा असा की, तक्रारकर्त्याने स्वत:साठी व त्याच्या पत्नी व मुलांसाठी मेडीक्लेम पॉलिसी घेतली होती. तक्रारकर्त्याच्या मुलाचा अपघात झाल्यावर त्यासाठी झालेल्या उपचाराचा खर्च मिळण्यासाठी विरुध्दपक्षाकडे दि. 14/3/2014 रोजी संपुर्ण कागदपत्रांसह दावा दाखल केला. परंतु सदर दस्त विरुध्दपक्षाकडून गहाळ झाल्यामुळे तक्रारकर्त्याला पुन्हा सदर कागदपत्रांची झेरॉक्स दाखल करण्याची सुचना विरुध्दपक्षानी दिली, परंतु सदर कागदपत्रांची झेरॉक्स दाखल करण्यासंबंधी तक्रारकर्त्याने असमर्थता दर्शविली व सदर प्रकरण मंचासमोर दाखल केले.
- विरुध्दपक्षाने त्यांच्या युक्तीवादात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याचा क्लेम हा त्यांच्याकडून गहाळ झाला, ही बाब खरी असून तक्रारकर्त्याला सुचना दिल्याप्रमाणे जर त्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स दाखल केल्या तर आजही नियमाप्रमाणे तक्रारकर्त्याच्या क्लेमचा विचार करुन, क्लेम योग्य असल्यास मंजुर करण्यात येईल. परंतु तक्रारकर्त्याने तसे न करता मंचात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने सदरच्या अपघाताची प्रथम सुचना विरुध्दपक्षाच्या अटी शर्ती प्रमाणे सात दिवसाच्या आत न देता तब्बल तिन महिन्यांनी दिली व तक्रारकर्त्याने त्याच्या अपघातग्रस्त मुलाला सदर तक्रारीत पक्ष न केल्याने सदर तक्रार खारीज होण्यायोग्य आहे.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर व दाखल दस्तांचे अवलोकन केल्यवर, मंचाला विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्त क्र. 2 व 3 ( पृष्ठ क्र. 26 व 27 ) वरुन, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे उशिरा क्लेम केल्याचे दिसून येते. सदर दावा वेळेत दाखल केला हे दाखविण्यासाठी तक्रारकर्त्याने पृष्ठ क्र. 34 वर जो दस्त दाखल केला, त्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दि. 6/12/2013 ला अपघातासंबंधी सुचना दिली होती, असे दिसून येते. परंतु दस्त क्र. 26 व 27 वरील तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला लिहीलेल्या पत्रातील मजकुरावरुन अपघाताची सुचना दि. 10/3/2014 रोजी व विमा दावा दि. 14/3/2014 रोजी दाखल केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने तक्रारकर्त्याचे, दावा वेळेत दाखल केल्याचे निवेदन मंचाला ग्राह्य धरता येणार नाही.
विरुध्दपक्षाने घेतलेले आक्षेप त्यांच्या अटीशर्तीचा भंग केल्यासंबंधी असल्याने, त्याचा विचार त्यांनी दावा मंजुर करतेवेळी करावा, असे मंचाचे मत आहे. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने जर विरुध्दपक्षाकडे त्यांच्या मागणीप्रमाणे पुन्हा कागदपत्रांची पुर्तता केली असती तर त्यांना मंचासमोर प्रकरण दाखल करण्याची गरज भासली नसती. परंतु विरुध्दपक्षाकडून नजरचुकीने का होईना, तक्रारकर्त्याचे संपुर्ण दस्त गहाळ झाल्याने तक्रारकर्त्याला जो आर्थिक भुर्दंड बसणार आहे, व जो मानसिक त्रास झाला आहे, त्यापोटी तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून रु. 3000/- मिळण्यास व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे.
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दाव्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल कराव्यात. त्यासाठी तक्रारकर्त्याला होणाऱ्या आर्थिक भुर्दंडापोटी व मानसिक व शारीरिक त्रासासाठी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु.. 3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) द्यावेत. सदर कागदपत्रे झेरॉक्स स्वरुपात प्राप्त झाल्यावर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा दावा प्राधान्याने निकाली काढावा.
- तक्रारकर्ता मंचासमोर आल्याने त्याला आर्थिक भुर्दंडाची व शारीरिक, मानसिक नुकसान भरपाईची रक्कम मंजुर झाली असल्याने प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/-(रुपये दोन हजार ) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्यावे.
- उपरोक्त आदेशीत एकूण रक्क्म रु. 5000/-(रुपये पांच हजार ) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला आदेशाची प्रत प्राप्त दिनांकापासून 45 दिवसांच्या आंत द्यावी.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.