निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 28/06/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 07/07/2011 तक्रार निकाल दिनांकः- 06/01/2012 कालावधी 06 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. शामराव पि.ग्यानोजी वारकड. अर्जदार वय 50 वर्ष.धंदा.शेती. अड.अरुण खापरे रा.करवली ता.जिंतूर.परभणी. विरुध्द 1 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया. मंडल कार्यालय क्रं 2 अंबिका हाउस, शंकर नगर चौक, नागपूर 400 010 2 विभागीय व्यवस्थापक, स्वतः कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग, प्लॉट नं.7, सेक्टर इ -1 टाउन सेंटर. सिडको औरंगाबाद.
3 तालुका कृषी अधिकारी. स्वतः तालुका कृषी कार्यालय, जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेची नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे करवली ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवाशी आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदारचा मयत मुलगा अशोक वारकड हा देखील लाभार्थी होता तारीख 06/02/2010 रोजी अर्जदाराच्या मुलाच्या डाव्या पायास सर्पदंश झाला.उपचारासाठी त्याला नांदेड येथील सरकारी दवाखान्यात अडमिट केले होते.पण दुर्दैवाने तारीख 08/02/2010 रोजी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेची खबर पोलिस स्टेशन हट्टा ता.वसमत येथे दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पोस्टमार्टेमसाठी शव सरकारी दवाखान्यात करुन घेतले.अर्जदारने त्यानंतर मुलाच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेमफॉर्मसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे तारीख 10/09/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 3 ने क्लेम मंजुरीसाठी ती कागदपत्रे गैरअर्जदार कमांक 2 यांच्याकडे पाठवली, गैरअर्जदार क्रमांक 2 ने आणखी काही कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत अर्जदारास कळवले त्याप्रमाणे त्याही कागदपत्रांची पुर्तता अजदाराने केली होती. त्यानंतर विमा कंपनी गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराला विना तारखेचे पत्र पत्र पाठवुन विमा क्लॉज 6 नुसार पॉलिसीची मुदत संपल्यावर 90 दिवसाच्या वाढीव मुदतीत क्लेमची कागदपत्रे मिळाली नाही या कारणास्तव क्लेम नामंजूर केला असल्याचे कळवले अर्जदारचे म्हणणे असे की, क्लेम मुदतीत दाखल केला असतांनाही विमा कंपनीने बेकायदेशिररित्या क्लेम नामंजूर करुन सेवात्रुटी करुन नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले आहे म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 35 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तारीख 16/09/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि.17) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 06.08.2011 रोजी प्रकरणात नि. 7 ला समाविष्ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मंचाची नोटीस स्वीकारुनही नेमले तारखेस मंचापुढे हजर झाले नाही.व लेखी म्हणणे सादर केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द तारीख 06/08/2011 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.17) तक्रार अर्जातून त्यांच्या विरुध्द केलेल्या विधानांचा इन्कार करुन प्रस्तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्द मुळीच चालणेस पात्र नाही त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही कारण कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हीसेस यांचेमकडे चौकशी केली असता असे समजले की, त्यांनी तारीख 02/10/2010 च्या पत्रातून अर्जदारास काही अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळवले होते त्यानंतर दोन तीन वेळा त्या बाबत स्मरणपत्रे पाठवुनही अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता वेळेवर न करता पॉलिसीची तारीख 06/12/2010 रोजी मुदत संपल्यावर 90 दिवसाच्या वाढीव मुदतीतही कागदपत्रे सादर केली नाहीत त्यामुळे पॉलिसी कंडीशनचे उल्लंघन झाले असल्याने नियमानूसार क्लेम नामंजूर केलेला आहे.अर्जदार त्यामुळे नुकसान भरपाई मिळणेस मुळीच पात्र नाही. शेतकरी विम्या संबंधी तक्रार अर्जातील बाकीचा मजकूर ही वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारला आहे. गैरअर्जदाराकडून क्लेम मंजुरीच्या बाबतीत कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 1 चे शपथपत्र (नि.18) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.7) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची आवश्यक ती पूर्तता व छाननी करुन क्लेम प्रस्ताव विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत अशोक शामराव वारकड याच्या विमा क्लेमची कागदपत्रे तारीख 23/09/2010 रोजी प्राप्त झाली होती.परंतु त्यामध्ये काही कागदपत्रे अपुरी होती म्हणून अर्जदाराला तारीख 02/10/2010 चे पत्र पाठवुन पुर्तता करण्याबाबत कळवले हाते त्यानंतरही पुन्हा तारीख 03/11/2010, 06/12/2010 रोजी स्मरणपत्रे पाठवुन देखील कागदपत्रे मिळाली नाही त्यामुळे 21/12/2010 रोजी तसा शेरा मारुन विमा क्लेम प्रस्ताव युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला त्यानंतर विमा कंपनीने 24/03/2011 च्या पत्रातून ती फाईल बंद केल्याचे कळवले. सबब गैरअर्जदार क्रमांक 1 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे.अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत विमा कंपनीने अर्जदारास पाठवलेल्या क्लेम नाकारलेल्या पत्राची आणि कागदपत्रांच्या पुर्तते संबंधी अर्जदाराला वेळोवेळी पाठवलेल्या पत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.खापरे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे उत्तर 1 गैरअर्जदार 3 यानी अर्जदाराच्या मयत मुलाच्या मृत्यूची शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत मुलगा अशोक शामराव वारकड हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.4/7 ते 4/10 वरील 7/12 उतारे, नि./12 व नि.4/32 वरील फेरफार उतारे, नि.4/11 वरील होल्डींग प्रमाणपत्र, नि.4/13 वरील गाव नमुना नं. 6-क चा उतारा या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 08.02.2010 रोजी अर्जदाराच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता ही वस्तूस्थिती पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/18 वरील अ.मृ.क्रमांक 8/2010 मधील हट्टा पोलीस स्टेशनमध्ये दिलेली एफ.आय.आर.नि.4/17 वरील मृत्यू दाखला, नि.4/22 वरील पी.एम.रिपोर्ट, नि.4/20 वरील घटनास्थळ पंचनामा, नि.4/23 वरील इन्क्वेस्ट पंचनामा या पुराव्यातून शाबीत झालेले आहे. मयत अशोक वारकड हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताचे वडील ) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे विमा क्लेमसह आवश्क ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 लगत दाखल केलेल्या आहेत. शिवाय नि.25 व नि.4/26 वरील गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस औरंगाबाद यांचेकडे अर्जदारने दिलेला विमा क्लेम व आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर पुन्हा मागणी केलेल्या काही कागदपत्रांची पुर्तता दिनांक 23/03/2011 च्या पत्रासोबत केलेली होती त्या पत्राची कॉपी ( नि.4/26 ) अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेली आहे.त्यातील मजकुरा वरुनही अर्जदाराने विमाक्लेम व आवश्यक ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सुपूर्द केलेली होती याबद्दल कोणतीही शंका उरत नाही.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी लेखी जबाबातून घेतलेल्या बचावात तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत सादर केलेल्या नि.8 वरील विमा कंपनीने क्लेम विना तारीखेच्या पत्रातून विमा क्लेम पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही. या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे.ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्लेम चुकीच्या पध्दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्याचे स्पष्ट दिसते. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार नं 1 यांनी अर्जदाराच्या मयत मुलाच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |