(घोषित दि. 21.02.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळाली नसल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची वाल्हा, तालुका बदनापूर, जि.जालना येथे शेत जमीन आहे. त्यांच्या मुलाचा दिनांक 17.02.2008 रोजी विहीरीत पडून मृत्यू झाला. सदरील घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी दिनांक 07.08.2008 रोजी तहसील कार्यालया मार्फत प्रस्ताव दाखल केला. प्रस्तावासोबत 7/12, 8-क, 6-क, चा उतारा तलाठयाचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्र यांची पूर्तता केली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने दिनांक 23.06.2010 रोजी कागदपत्रे अपूर्ण असल्याबाबत सांगितले. सदरील प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नसल्यामूळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, विमा रक्कम व्याजासह मिळण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे पत्र, तलाठयाचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा, 6-क चे प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, मृत्यूचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार अर्जदाराचा प्रस्ताव त्यांना दिनांक 11.08.2008 रोजी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला आहे. इन्शुरन्स कंपनीला स्मरणपत्रे पाठवूनही अद्याप पर्यंत क्लेम मंजूर झालेला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराच्या प्रस्तावासोबत 7/12 च्या उता-याची सत्यप्रत, फेरफार इत्यादी कागदपत्रे न जोडता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव पाठविला आहे. अनेक वेळेस स्मरणपत्रे पाठवूनही आवश्यक ती कागदपत्रे दिलेली नसल्यामुळे विमा रक्कम देता येत नाही. त्यामुळे सदरील तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदाराचा मृत्यू दिनांक 17.02.2008 रोजी झालेला आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत घटनास्थळ पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने अर्जदाराने 7/12 च्या उता-याची सत्यप्रत, फेरफार इत्यादी कागदपत्रे न मिळाल्यामुळे प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत 7/12 च्या उता-याची सत्यप्रत, फेरफार इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केलेली आहेत.
अर्जदाराने सदरील कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 यांना पाठवून द्यावी व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदाराच्या प्रस्तावाबाबत योग्य कार्यवाही करणे आवश्यक ठरते.
आदेश
- अर्जदाराने 7/12 च्या उता-याची सत्यप्रत, फेरफार ही कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे पाठवावी व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदाराच्या कागदपत्रांची छाननी करुन तक्रारदाराचे कागदपत्र मिळाल्या पासून 30 दिवसात प्रस्तावाबाबत गुणवत्तेवर निर्णय करावा.
- खर्चाबद्दल आदेश नाही.