(घोषित दि. 23.11.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदाराचे पती शेतकरी असून साप चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम न मिळाल्यामूळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती विठोबा एकनाथ शिरसाट हे शेतकरी होते. दिनांक 31.08.2009 रोजी साप चावल्यामुळे त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली असुन, मरणोत्तर पंचनामा व पोष्ट मार्टम करण्यात आले. दिनांक 07.11.2009 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे शासनाच्या योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी योग्य त्या कागदपत्रासह क्लेम फॉर्म दाखल केला. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, 7/12 उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, पंचनामा इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दखल केलेल्या जवाबानुसार महारष्ट्र शासनातर्फे त्याची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून आलेल्या क्लेम फॉर्म व कागदपत्रांची छाननी करुन ते विमा कंपनीकडे पाठविण्याचे त्यांचे काम आहे. अर्जदाराचा क्लेम फॉर्म त्यांना मिळाला नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने त्यांचेकडे विमा पॉलीसी घेतलेली नाही. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. हा त्रिपक्षीय करार असून, मुंबई येथे तक्रार दाखल होऊ शकते.
अर्जदाराचे पती मयत विठोबा एकनाथ शिरसाट यांच्या नावे शेतजमिन नाही. ते शेतकरी नाहीत. 7/12 मध्ये त्यांचे नाव घटना घडल्यानंतर टाकण्यात आले असल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फी सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार 1 व 2 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, गट क्रमांक 185, वाल्हा, ता.बदनापूर जि.जालना येथे अर्जदाराचे पती विठोबा एकनाथ शिरसाट यांची शेतजमिन आहे. तलाठी सजा ता.बदनापूर यांनी जमिनीच्या दाखल्यात विठोबा एकनाथ शिरसाठ यांची गट क्रमांक 185 मध्ये शेतजमिन असल्याचे नमूद केले आहे. अर्जदाराने 7/12 चा उतारा दाखल केला असून त्यात विठोबा एकनाथ शिरसाट यांच्या नावे शेतजमिन असल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्जदार शेतकरी नाहीत हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही. दिनांक 31.08.2009 रोजी अर्जदाराच्या पतीचे साप चावल्यामुळे निधन झाले. याची नोंद बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली असल्याचे दिसून येते. दिनांक 01.09.2009 च्या पोष्टमार्टम अहवालात देखील विठोबा एकनाथ शिरसाट यांचा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अर्जदाराने दिनांक 07.11.2009 रोजी क्लेम फॉर्म दाखल केला असुन, तलाठी बदनापूर यांनी 7/12, 6 क, 6 ड खाते उतारा सोबत जोडले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अर्जदाराने संपूर्ण कागदपत्रासह योग्य मुदतीत क्लेम फॉर्म दाखल केला असल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन व अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
आदेश
- गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास विमा रक्कम 1,00,000/- (एक लाख फक्त) रुपये 7.12.2009 पासून 9 टक्के व्याजासह 30 दिवसात द्यावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई व खर्चाबद्दल रुपये 1,500/- (एक हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.