(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–27 जानेवारी, 2020)
01. उभय तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि इतर एक विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांचे वडील श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे यांचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
उभय तक्रारदार हे उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्यांचे वडील नामे श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचे मालकीची शेत जमिन ही मौजा- कोका (जंगल), तालुका- जिल्हा भंडारा, येथे भुमापन क्रं 102/2 या वर्णनाची होती.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, तयांचे वडील नामे श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे यांचा दिनांक-05.03.2017 रोजी मित्रा सोबत मोटरसायकलवर मागे बसून जात असताना एका ट्रकने धडक दिल्याने गंभिर जख्मी होऊन त्यांचा मोक्यावरच मृत्यु झाला. यातील विरुध्दपक्ष क्रं- 1 व क्रं-2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत उभय तक्रारदारांचे वडीलांचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीकडे काढण्यात आला असल्याने उभय तक्रारदार हे त्यांचे अनुक्रमे नात्याने मुलगी व मुलगा असल्याने “लाभार्थी” आहे. त्यांचे वडीलांचे मृत्यू नंतर त्यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी भंडारा, तालुका- जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दिनांक-12.05.2017 रोजी दाखल केला होता. विरुध्दपक्षाने ज्या दस्ताऐवजाची मागणी केली त्या दस्ताऐवजांची पुर्तता तक्रारदारांनी केली होती.
तक्रारदारांनी पुढे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने दिनांक-22.01.2018 रोजीचे पत्राव्दारे अपघाताचे वेळी मृतका जवळ दुचाकी वाहन चालविण्याचा वैध वाहन परवाना नव्हता असे कारण दर्शवून त्यांचा विमा दावा नामंजूर केला आणि ही विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे तक्रारदारांना दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्यामुळे त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी त्यांनी प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव सादर केल्याचा दिनांक-12.05.2017 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 30,000/- आणि तक्रार खर्च रुपये-15,000/- अशा रकमांची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विभागीय कार्यालय, पुणे यांना ग्राहक मंचाचे तर्फे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता ती त्यांना दिनांक-15.07.2019 रोजी मिळाल्या बाबतची रजि.पोच पान क्रं 78 वर उपलब्ध आहे परंतु अशी नोटीस वि.प.क्रं 1 यांना प्राप्त झाल्या नंतरही ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी लेखी निवेदन सादर केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे दिनांक-11.09.2019 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांनी आपले लेखी उत्तर अभिलेखावर पान क्रं 62 ते 64 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, मृतकाचा अपघात हा दुचाकी वाहन चालविताना झालेला आहे व अपघाताचे वेळी मृतका जवळ दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता त्यामुळे तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी आपले विशेष कथनात असे नमुद केले की, पोलीस दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते की, अपघाती घटनेच्या वेळी मृतक श्री प्रल्हाद मालूजी हातझाडे हा मोटर सायकल चालवित होता आणि त्याचा मित्र हा मोटरसायकलवर मृतकाचे मागे बसला होता आणि घटनेच्या वेळेस मृतक श्री प्रल्हाद मालूजी हातझाडे हयाचे जवळ दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. सदर वैध परवान्याची वारंवार मागणी करुनही तक्रारदारांनी वैध परवाना त्यांचेकडे सादर केलेला नाही, त्यांनी विमा अटी व शर्ती अनुसार विमा दावा रद्द केलेला आहे, त्यामुळे त्यांनी तक्रारदारांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने तक्रारदारांची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांना ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली असता त्यांनी पान क्रं 60 व 61 वर आपले लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, मृतक श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे, राहणार कोका यांचे वारसान भावेश प्रल्हाद हातझाडे यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह त्यांचे कार्यालयात आवक क्रं-1136, दिनांक-12 मे, 2017 रोजी दाखल केला होता. त्यांनी पुढे तो विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह मा.जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात जावक क्रं-1211, दिनांक-18 मे, 2017 रोजी सादर केला व त्यांनी पुढे तो विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष विमा कंपनीला सादर केला. मृतकाचा मृत्यू हा दिनांक-05 मार्च, 2017 रोजी रस्ता अपघातामुळे झाला. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे ही विमा कंपनीची जबाबदारी असल्याने त्यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली.
06. तक्रारदारांनी तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 12 नुसार एकूण-10 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय-2015-2016, विमा दावा नामंजूर केल्या बाबत वि.प. क्रं 1 विमा कंपनीचे पत्र, तक्रारकर्ता क्रं-2 ने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला विमा दावा प्रस्ताव, तक्रारदारांचे मृतक वडीलांचे नावाचा 7/12 उतारा व ईतर शेतीचे दस्तऐवज, त्यांचे वडीलांचे अपघाता बाबत क्राईम डिटेल्स फॉर्म व ईतर पोलीस दस्तऐवज, मृतकाचा शव विच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारदारांचे वडीलांचा वयाचा पुरावा, ग्राम पंचायत कोका/नवेगाव यांचे वारसान प्रमाणपत्र, तक्रारकर्ता क्रं 1 व 2 यांचे आधारकार्ड अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 65 व 66 वर तक्रारकर्ती क्रं 1 कु.माधुरी हिचा शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पान क्रं 75 व 76 वर आणि पान क्रं 81 व 82 वर श्री अविनाश शंकर गोबाडे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं- 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 62 ते 64 वर दाखल केले. तसेच शपथेवरील पुरावा पान क्रं 70 व 71 वर दाखल केला आणि लेखी युक्तीवाद पान क्रं 72 वर दाखल केला.
08. तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र आणि त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे दाखल लेखी उत्तर, शपथपत्र इत्यादीचे ग्राहक मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्री व्ही.एम.दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | उभय तक्रारदार हे विरुध्दपक्ष विमा कंपनीची ग्राहक होतात काय? | -होय- |
2 | वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
09. उभय तक्रारदारांचे मृतक वडील हे व्यवसायाने शेतकरी होते, त्यांचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता व तक्रारदारांचे वडीलांचा मृत्यु दिनांक-05/03/2017 रोजी झाला होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. उभय तक्रारदारांचे वडीलांचे मृत्यू नंतर अनुक्रमे मुलगी व मुलगा या नात्याने ते कायदेशीर वारसदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे ग्राहक (लाभार्थी) होतात करीता मुद्दा क्रं 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 व 3 बाबत
10. उभय तक्रारदारांनी तक्रारी बरोबर दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता पान क्रं 19 वर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वरीष्ठ कार्यालय म्हणजे विभागीय व्यवस्थापक, ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांनी तक्रारदार क्रं 2 श्री भावेश याचा विमा दावा नामंजूर केल्या बाबत पत्राची प्रत दाखल आहे, त्यामध्ये अपघात हा दुचाकी वाहन चालविताना झालेला आहे व अपघात समयी मृतकाकडे दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता आणि त्या आधारावर विमा दावा रद्द करण्यात येत आहे असे नमुद केलेले आहे.
11. तक्रारदारांचे वडीलांचा अपघाती मृत्यू हा दिनांक-05 मार्च, 2017 रोजी झालेला आहे असे दाखल मृत्यू प्रमाणपत्रावरुन दिसून येते. अभिलेखावरील पान क्रं 49 वरील वारसान बाबत दाखला जो ग्राम पंचायत कार्यालय कोका/नवेगाव, पंचायत समिती भंडारा, तालुका जिल्हा भंडारा यांनी दिनांक-22 मे, 2018 रोजी दिलेला आहे त्यावरुन मृतक श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे हे दिनांक-05 मार्च, 2017 रोजी मृत्यू पावलेले असून त्यांचे मृत्यू पःश्चात कायदेशीर वारसदार म्हणून त्यांची विवाहित मुलगी नामे रेखा योगराज मस्के तसेच विवाहित मुलगी नामे शिल्पा दिलीप परशुरामकर त्याच प्रमाणे (तक्रारकर्ता क्रं 1) मुलगी नामे कु.माधुरी प्रल्हाद हातझाडे आणि (तक्रारकर्ता क्रं 2) मुलगा नामे भावेश प्रल्हाद हातझाडे असे असल्याचे त्यामध्ये नमुद केलेले आहे. परंतु मृतकाच्या दोन मुली विवाहित असल्याने मृतकाची अविवाहित मुलगी तक्रारकर्ती क्रं 1 आणि मुलगा तक्रारकर्ता क्रं 2 यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
12. आम्ही पान क्रं 33 ते 36 वर दाखल पोलीसांचे घटनास्थळ पंचनामा प्रतीचे अवलोकन केले असता त्यामध्ये असे नमुद आहे की, मोटर सायकल क्रं- MH-36/U-1672 चा चालक व अविनाश शंकर गोबाडे हे राष्ट्रीयकृत महामार्ग क्रं 6 ने जात असताना ट्रक क्रं-WB/23/D4300 चे वाहन चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगाने सदर मोटरसायकलला धडक दिल्याने मोटर सायकल चालक श्री प्रल्हाद हातझाडे हा मरण पावला व अविनाश शं.गोबाडे हा जखमी झाल्याने फीर्यादिचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन साकोली येथे अपराध नोंदविण्यात आला.
13. अभिलेखावरील दाखल पोलीस घटनास्थळ पंचनाम्या वरुन असे दिसून येते की, सदरची फीर्याद श्री योगेश बाळकृष्ण बोरकर याने पोलीसां समोर नोंदविलेली असून सदर फीर्याद देणारा हा प्रत्यक्ष घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye Witness) नव्हता. तर प्रत्यक्ष अपघाती घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा श्री अविनाश शंकर गोबाडे होता आणि त्यामुळे सदरचे पोलीसांनी केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यास कायदेशीररित्या तेवढे महत्व नाही आणि केवळ फीर्यादिने दिलेल्या फीर्यादिचा घटनास्थळ पंचनाम्यात उल्लेख केल्याने त्यावरुन विमा दावा नामंजूर करता येत नाही असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर प्रकरणामध्ये अपघाती घटनेमध्ये श्री अविनाश शंकर गोबाडे हा मृतका सोबत अपघाताचे वेळी मोटरसायकलवरुन प्रवास करीत होता आणि श्री अविनाश शंकर गोबाडे हा सदर अपघाती घटने मध्ये जख्मी झाला होता त्यामुळे श्री अविनाश गोबाडे याचे बयानाला या प्रकरणामध्ये महत्व आहे असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. आम्ही अभिलेखावर पान क्रं 75 व 76 आणि पान क्रं 81 व 82 वर श्री अविनाश शंकर गोबाडे याने दाखल केलेल्या दोन्ही शपथपत्रांचे काळजीपूर्वक वाचन केले असता त्यामध्ये त्याने असे नमुद केले की, अपघाती घटनेच्या वेळेस मृतक श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे हा शपथकर्ता याचे मागे मोटरसायकलवर बसून जात होता व मृतक हा घटनेच्या वेळी मोटरसायकल चालवित नव्हता. सदर अपघातामध्ये श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे याचा मृत्यू झाला होता तर शपथकर्ता श्री अविनाश शंकर गोबाडे हा गंभीर जख्मी झाल्याने बेशुध्द झाला होता व त्यामुळे तो पोलीसांना योग्य ती माहिती देऊ शकला नाही. तक्रारदारांचे मृतक वडील श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे हे अपघाताचे वेळी मोटरसायकल चालवित होते ही बाब पोलीस घटनास्थळ पंचनाम्या मध्ये जरी नमुद केलेली असली तरी अपघाती घटने मध्ये जो प्रत्यक्षदर्शी साक्षदार श्री अविनाश शंकर गोबाडे आहे, जो अपघाती घटनेच्या वेळी गंभिर जख्मी होऊन बेशुध्द झालेला होता त्याने शपथपत्रात अपघाती घटनेच्या वेळी तो स्वतः म्हणजे अविनाश शंकर गोबाडे मोटरसायकल चालवित होता आणि मृतक नामे श्री प्रल्हाद मळुजी हातझाडे हा मोटरसायकलचे मागे बसलेला होता असे नमुद केलेले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याचे बयानावरुन मृतक हा स्वतः मोटर सायकल अपघाती घटनेच्या वेळी चालवित होता ही बाब जर सिध्द झाली असती तरच वैध वाहन चालक परवान्याची अट (Valid Driving License) महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका प्रमाणे बंधनकारक (Mandatory) होती.
14. अपघाताची प्रत्यक्षदर्शी घटना न पाहिलेल्या फीर्यादिचे फीर्यादि वरुन पोलीसांनी जो घटनास्थळ पंचनामा नोंदविला त्यामधील कथनावरुन मृतका जवळ अपघाताचे वेळी दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याने विमा दावा देय नाही असा जो निष्कर्ष विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने काढलेला आहे तो चुकीचा असून त्यासंदर्भात खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयांवर ग्राहक मंच आपली भिस्त ठेवीत आहे-
- 2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.
सदर मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case” पोलीसांनी नोंदविलेल्या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.
2) 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्या जात नाही असे मत नोंदविले.
*****
उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे ग्राहक मंचाचे मत आहे.
15. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पोलीसांनी केलेल्या घटनास्थळ पंचनाम्या वरुन ज्यामध्ये फीर्यादी श्री योगेश बाळकृष्ण बोरकर याने फीर्याद दिली होती व जो घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षदार नव्हता आणि अपघाती घटनेच्या वेळी जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्री अविनाश शंकर गोबाडे होता त्याचे जवळ कोणतीही विचारपूस न करता उभय तक्रारदारांचे मृतक वडीलांचे अपघाती मृत्यू संबधात मृतका जवळ दुचाकी चालविण्याचा वैध वाहन परवाना नव्हता असा चुकीचा निष्कर्ष काढून तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करुन त्यांना सेवेत त्रृटी दिल्याची बाब दिसून येते आणि त्यामुळे त्यांना निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे ही बाब स्वयंस्पष्ट आहे. करीता उभय तक्रारदारांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे त्यांचे मृतक वडीलांचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल आणि सदर विम्याचे रकमेवर विमा दावा नामंजूर केल्याचा दिनांक-22.01.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15% दराने व्याज (महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार व्याजाचा दर) मंजूर करणे न्यायोचित होईल.तसेच त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- अशा नुकसानभरपाईच्या रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांनी तक्रारकर्ता क्रं 2 याने दाखल केलेला विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत दाखल केल्याने त्यांचे सेवेत कोणतीही त्रृटी दिसून येत नाही व उभय तक्रारदारांची सुध्दा त्यांचे विरुध्द तशी कोणतीही तक्रार नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
(01) उभय तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, विभागीय कार्यालय, पुणे आणि क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी उभय तक्रारदारांना त्यांचे वडील श्री प्रल्हाद मळूजी हातझाडे यांचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) दयावी आणि सदर विमा रकमेवर विमा दावा नामंजूर केल्याचा दिनांक-22.01.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्याज उभय तक्रारदारांना दयावे.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 व क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने उभय तक्रारदारांना द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, तालुका-जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारदारांना “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.