जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 483/2009. तक्रार दाखल दिनांक : 10/09/2009. तक्रार आदेश दिनांक : 25/03/2011. सौ. मनिषा महादेव, माळी, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. स्टेशन रोड, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. विभागीय कार्यालय क्र.1-15, एडी कॉम्लेक्स, पहिला मजला, माऊंट रोड, सदर, नागपूर – 10. 2. जयका इन्शुरन्स ब्रोकरेज, जयका बिल्डींग, सिव्हील लाईन्स, नागपूर – 1. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ, अकोला. 4. सोलापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या., सोलापूर, व्यवस्थापक संचालक, 24/1 अ, मुरारजी पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.ए. सुतार विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एच. कुलकर्णी आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते विरुध्द पक्ष क्र.4 यांचे सभासद आहेत. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी सुरु केलेल्या पशुधन विमा योजनेंतर्गत 2636 सभासदांच्या गाईंचा विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे विमा उतरविण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांच्या गाईचा तीन वर्षाकरिता रु.20,000/- विमा उतरविला असून पॉलिसीचा क्रमांक एस.ओ.एल.पी. 108554 असा आहे. त्यांची गाय आजारी पडून दि.20/2/2008 रोजी मृत्यू पावली. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा दावा पोस्टमार्टेम रिपोर्टसह विमा कंपनीकडे दाखल केला असता विमा रक्कम देण्याकरिता टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विमा रक्कम रु.20,000/-, मानसिक त्रास व दैनंदीन उत्पन्नाचे नुकसान भरपाईपोटी रु.20,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- व्याजासह मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पशुधन विम्याचा करार हा महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, मे. जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. व विमा कंपनीने दि.6/11/2007 रोजी केलेला आहे. अग्रीमेंटच्या अटी व शर्तीनुसार कराराविषयी निर्माण झालेला वाद लवादाकडून सोडविणे आवश्यक आहे आणि केवळ अकोला कोर्टास त्याचे अधिकारक्षेत्र आहे. त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, नुकसानीची सूचना मिळताच तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे मागविण्यात आली असता त्यांनी काही कागदपत्रे दाखल केली. परंतु तक्रारदार यांनी रु.50/- ची पी.एम. पावती, फोटोग्राफ, खरेदी पावती, मेडिकल बिले, पंचनामा इ. कागदपत्रे दाखल न केल्यामुळे नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर रु.15,000/- रकमेमध्ये सेटल करण्यात आला. शेवटी त्यांच्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होते काय ? होय. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 3. तक्रारदार उर्वरीत विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 :- प्रामुख्याने, तक्रारदार यांनी रु.50/- ची पी.एम. पावती, फोटोग्राफ, खरेदी पावती, मेडिकल बिले, पंचनामा इ. कागदपत्रे दाखल न केल्यामुळे नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर सेटल करण्यात आल्याचे नमूद करुन त्या रकमेचा धनादेश तक्रारदार यांना पाठविल्याचे विमा कंपनीने नमूद केलेले आहे. तक्रारदार यांच्या अभियोक्त्यांनी युक्तिवादाचे वेळी रु.15,000/- प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. 5. परंतु, सर्वप्रथम विमा कंपनीने पॉलिसी कराराविषयी निर्माण झालेले वाद सामंजस्याने न सुटल्यास ते लवादाकडे पाठविण्यात यावेत आणि त्याचे अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असतील, असे नमूद केले आहे. विमा कंपनी व पशुधन विकास मंडळाच्या अग्रीमेंटनुसार तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिलेले आहे. ’विमा’ हा विषय ग्राहक संरक्षण कायद्यातील ’सेवा’ या तरतुदीमध्ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्यामुळे निश्चितच त्यांची तक्रार या मंचाच्या कार्यकक्षेत येते. मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोग यांनी अनेक निवाडयामध्ये लवादाचा क्लॉज असला तरी जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, असे न्यायिक तत्व विषद केलेले आहे. त्यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास अधिकारक्षेत्र प्राप्त होते, या मतास आम्ही आलो आहोत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 6. मुद्दा क्र. 2 ते 4 :- विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. तसेच प्रस्तुत तक्रार दाखल केल्यानंतर विमा कंपनीने तक्रारदार यांच्या मयत गाईकरिता रु.15,000/- विमा रक्कम मंजूर केल्याविषयी विवाद नाही. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी रु.50/- ची पी.एम. पावती, फोटोग्राफ, खरेदी पावती, मेडिकल बिले, पंचनामा इ. कागदपत्रे दाखल न केल्यामुळे नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर क्लेम सेटल केला आहे. तक्रारदार यांच्या गाईस रु.20,000/- विमा संरक्षण दिल्याचे स्पष्ट आहे. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा पॉलिसी, दुध संस्थेचा दाखला, पशुदावा प्रपत्र, उपचार प्रमाणपत्र, गाईचे फोटो, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, कॅटल व्हॅल्युएशन रिपोर्ट इ. कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास येते. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यासाठी सदर कागदपत्रे पुरेशी आहेत. विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर सेटल करण्यासाठी दिलेली कारणे सिध्द करण्याकरिता कोणताही उचित कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. विमा कंपनीने तक्रारदार यांची विमा रक्कम कपात करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार गाईच्या विम्याची उर्वरीत रक्कम रु.5,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्यास दरासह मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.5,000/- तक्रार दाखल दि.10/09/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |