Maharashtra

Ahmednagar

CC/17/348

Harishchandra Krushnaji Mate - Complainant(s)

Versus

Divisional Manager, United India Insurance Co.Ltd Divisional Officer - Opp.Party(s)

22 Nov 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/348
( Date of Filing : 16 Dec 2017 )
 
1. Harishchandra Krushnaji Mate
R/o 134/1, Gavthan, At Walunj, Post baburdi, Tal. Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager, United India Insurance Co.Ltd Divisional Officer
Kisankranti Building, MarketYard, Post box no. 54, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party: Adv.A.K.Bang, Advocate
Dated : 22 Nov 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २२/११/२०१९

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार यांची पत्‍नी विजया हरिशचंद्र मते यांचा अहमदनगर येथे हिंदुस्‍थान पेट्रोलियम गॅस एजन्‍सीचा व्‍यवसाय होता. तक्रारदाराच्‍या पत्‍नीचे दिनांक ०५-०५-२००९ रोजी निधन झाल्‍यानंतर तक्रारदार हे अधिकृतरित्‍या सदर गॅस एजन्‍सीचे कामकाज पाहत आहेत. तक्रारदाराच्‍या पत्‍नीच्‍या नावे व्‍यवसायासाठी म्‍हणून टाटा कंपनीचा ट्रक मॉडेल नं.एल.पी.टी.९०९, चेसी नं.३८२३३३ जेआरझेड ३८७७९, इंजिन नं.४१७ टी.सी. ९८ जेआरझेड ८५११४२ हे ट्रान्‍सपोर्ट व्‍हेईकल (गुडस कॅरिअर) सन २००९ मध्‍ये खरेदी केलेले होते. तयाचा आर.टी.ओ. ठाणे येथे रितसर नोंदणी केली असुन त्‍याचा रजिस्‍ट्रेशन क्र.एम.एच.०४/डी.एस.५८११ असा आहे. दरम्‍यान तक्रारदाराच्‍या पत्‍नीच्‍या निधनानंतर सदर ट्रकची नोंदणी तक्रारदार यांचे नावे आर.टी.ओ. अहमदनगर अधिकारी यांच्‍या कार्यालयात दिनांक ०९-०४-२०१४ रोजी करण्‍यात आली. तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे सदरील प्रकारचा विमा  उतरविलेला असुन दिनांक ०८-०१-२०१५ ते दिनांक ०७-०१-२०१६ असा कालावधी होता. सदरील विमा पॉलिसीचा क्रमांक १६२५००३११४पी१०८३०७७२३ असा होता. त्‍यामुळे तक्रारदार सामनेवाले यांचेमध्‍ये  ग्राहक व सेवा देणार असे नातेसंबंध तयार झाले. दिनांक २५-१०-२०१५ रोजी सदर वाहन वाळुंज, ता.नगर येथुन सुमारे ८ वाजता मे.जे.एम. इंडस्‍ट्रीज, एम.आय.डी.सी., अहमदनगर येथे रिकामे सिलेंडर घेण्‍यासाठी जात असतांना सकाळी सुमारे ९ वाजता सावेडी नाक्‍यासमोरून जात असतांना समोरील वाहनाच्‍या  चालकाने काही कारणास्‍तव अचानक ब्रेक दाबून वाहन थांबल्‍यामुळे तक्रारदाराचे वाहन सदर समोरील वाहनावर धडकुन अपघात झाला. अपघात झाला त्‍यावेळी वाहनात कोणत्‍याही प्रकारचे मोकळे किंवा भरलेले सिलेंडर नव्‍हते. वाहन पुर्णपणे रिकामे होते. सदर अपघातात तक्रारदाराच्‍या ट्रकचे दर्शनी भागाचे, चालक केबिनचे व तत्‍सम मशीनरी भागाचे अतोनात नुकसान झाले. सदर अपघातात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. वाहन चालक कपील माने यास किरकोळ मार लागला. सदरवेळी तक्रारदाराचा वाहन चालक अत्‍यंत सावकाश वेगाने, वाहतुकीच्‍या नियमांचे पालन करून वाहन चालवत होता. सदर अपघाताची तोफखाना पोलीस स्‍टेशनला सदरील खबर दिली. तक्रारदाराचे सदरील वाहनावरील वाहन चालक कपील माने यांच्‍याकडे ट्रान्‍सपोर्ट व्‍हेईकल चालविण्‍याचे आर.टी.ओ. चा वाहन परवाना आहे. तसेच हजार्डस गुडस वाहन चालविण्‍याचा    ५ वर्षाचा अनुभव आहे. तक्रारदाराचे वाहन चालक कपील माने याचा ट्रान्‍सपोर्ट व्‍हेईकल चालविण्‍याचा वाहन परवाना हा दिनांक २२-०७-२०१८ पर्यंत वैध आहेत.  तर हजार्डस गुडसचा परवाना दिनांक २३-१०-२०१६ पर्यंत वैध आहे.  वाहन परवान्‍यावर तशा नोंदी आहेत. हजार्डस गुडस वाहन चालविण्‍यासाठी प्रत्‍येक वर्षी जे प्रशिक्षण घ्‍यावे लागते ते देखिल घेतलेले आहे. तक्रारदाराने सदर घटनेची माहिती सामनेवाले विमा कंपनीचे अधिकारी यांना दिली व क्रेनच्‍या  सहाय्याने वाहन ओढुन नेऊन टाटा कंपनीचे अधिकृत वितरक व दुरूस्‍ती केंद्र, शुभयान मोटार्स प्रा.लि., नगर-मनमाड रोड, अहमदनगर येथे घेऊन गेले. सदर अपघातानंतर लगेचच दुस-या दिवशी दिनांक २६-१०-२०१५ रोजी विमा दावा सर्व माहितीसह कागदपत्र भरून सामनेवाले यांना दिला. शुभयान मोटार्स यांनी प्राथमिक पाहणी व तपासणी करून रूपये २,९५,५६०/- रकमचे दुरूस्‍तीचे अंदाजपत्रक दिले व या पत्रात विमा कंपनीचा प्रतिनिधी वाहनाच्‍या तपासणीसाठी पाठविण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार सामनेवाले विमा कंपनीच्‍या प्रतिनिधीने शुभयान मोटार्स येथे येऊन वाहनाची पाहणी केली. नुकसानग्रस्‍त भागाचे फोटो घेतले, दुरूस्‍तीचे कोटेशन देण्‍यास सांगितले आणि वाहनाची दुरूस्‍ती करून घेण्‍याविषयी तक्रारदार यांना सांगितले. त्‍यानुसार तक्रारदाराने अपघातग्रस्‍त  वाहनाची दुरूस्‍ती शुभयान मोटार्स या अधिकृत वितरकाकडे केली आहे. दुरूस्‍तीची एकुण रक्‍कम रूपये १,५६,९२१/- तक्रारदाराने शुभयान मोटार्स यांना दिलेले आहे व त्‍या संदर्भात शुभयान मोटार्स यांनी तक्रारदाराला पावत्‍या दिलेल्‍या आहेत. सदर पावत्‍या या तक्रारीसोबत दाखल आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वाहन चालकाचा वाहन परवाना तपासणी करण्‍यासाठी टेक्‍नोट्रॅक डिटेक्‍टीव्‍ह सर्व्‍हीसेस, सावेडी अहमदनगरची नेमणुक केली होती.     

३.   दिनांक ३०-०८-२०१६ रोजीचे पत्राप्रमाणे तक्रारदार यांना सामनेवाले यांनी विमा क्‍लेम नाकारलेबाबत कळविले. सदर क्‍लेम नाकारतांना त्‍याबाबतचे कारण, अपघाताचे वेळी वाहनचालक कपील माने यांचेकडे हजार्डस गुडस् वाहन चालविणेचा परवाना असलेबाबतची नोंद वाहन परवान्‍यावर नाही. त्‍याच्‍याकडे वैध लायसन्‍स नव्‍हते, तक्रारदाराने हजार्डस गुडसचे परमिट दाखल केलेले नाही. म्‍हणून विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग झाला, असे कारण देऊन सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारून सदोष सेवा दिलेली आहे. आश्‍चर्याची बाब म्‍हणजे सामनेवाले यांनी याच पत्रात असेही नमुद केले आहे की, ‘no further correspondence will be entertain in this regard’. सामनेवाले यांची सदरची कृती ही बेकायदेशीर, एकतर्फी व मनमानीपणाची असल्‍याचेच यावरून स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराचे काही म्‍हणणे ऐकुन न घेता सामनेवालेने तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारला आहे.   तक्रारदाराच्‍या वाहन चालकाकडे कोणत्‍याही प्रकारचा हजार्डस गुडसचा परवाना  अपघाताचेवेळी नव्‍हता, ही बाब सामनेवाले यांनी विचारात न घेता केवळ अपघाताचेवेळी सदरचे वाहनातुन हजार्डस गुडसची वाहतुक केली जात होती, ड्रायव्‍हर कपील माने यांचेकडे त्‍याबाबतचे वैध लायसन्‍स नव्‍हते आणि म्‍हणुन अपघाताचेवेळी ड्रायव्‍हींग लायसन्‍स हे अवैध होते, याच अहवालावर विश्‍वास ठेवुन व तसे कारण देऊन सामनेवाले यांनी तक्रारदाराचा वाहनाचा विमा क्‍लेम नकारलेला आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे तोंडी व लेखी विनंती विनंती करून सर्व कागदपत्रांची पुर्तता केली.  तक्रार यांना त्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला. तक्रारदाराचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले व मानसिक त्रास झालेला आहे. सबब सामनेवालेने तक्रारदाराचे अपघातग्रस्‍त वाहनाची विमा क्‍लेमची रक्‍कम रूपये २,९५,५६०/- द्यावी. त्‍यावरील नुकसानी दाखल १८ टक्‍के  व्‍याज दराने रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदारास प्रस्‍तुत अर्ज दाखल करावा लागला आहे.

४.   तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, सामनेवाले विमा कंपनी यांचेकडुन यांचेकडुन तक्रारदराच्‍या अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा क्‍लेम रक्‍कम रूपये १,५६,९२१/- मिळावे, सदर रकमेवर दिनांक ३०-०८-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने नुकसानीदाखल जादा रक्‍कम सामनेवालेकडुन मिळावी, सामनेवालेने दुषित सेवा दिल्‍याबद्दल व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणुन रक्‍कम रूपये २५,०००/- सामनेवालेकडुन मिळावी.

५.   तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र तसेच निशाणी ५ वर दस्‍तऐवजसोबत एकूण १५ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये वाहनाची माहिती/ तपशिल, गुडस् परमिट २१/०५/२०१९ पर्यंत, फिटनेस प्रमाणपत्र, श्री.कपील माने यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स, परमानंर इन्स्टियुटचे सर्टिफीकेट, श्री.कपील माने यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍सचा गोषवारा, इन्‍शुरन्‍स  पॉलिसी क्र.१६२५००३११४/पी/१०८३०७७२३ ची प्रत, युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍सचे पत्र, हरिशचंद्र कृष्‍णाजी मते यांचे पत्र, कृष्‍णा गॅस यांचे पत्र, टेक्‍नोट्रॅक यांचे पत्र, आर.टी.ओ.अहमदनगर यांचे प्रमाणपत्र, आर.टी.ओ. अहमदनगर यांचे माहितीपत्र, शुभयान मोटर्स यांची पावती दाखल केली आहे.

६.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मंचामार्फत नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाले हे मंचात हजर झाले. त्‍यांनी नि.१४ वर त्‍यांची कैफीयत दाखल केलेली आहे. सदर कैफीयतीत सामनेवाले तक्रारदाराचे तक्रारीतील म्‍हणणे व मागणी खोटी असुन ती सामनेवाले ती सामनेवाले यांना नाकबुल आहे असे म्‍हटले आहे. सत्‍य परिस्थितीत असे नमुद केले आहे की, तक्रारदाराने त्‍याची टाटा एल.पी.टी.९०९ वाहन (एम.जी.व्‍ही. डिलेव्‍हरी व्‍हॅन) चा विमा उतरविला आहे, ही बाब सामनेवालेने मान्‍य केलेली असुन विमा हा विमा करारातील अटी, शर्तीं, मर्यादा व अपवादांच्‍या अधीन आहे.  मुळ विमा पॉलिसी ही तक्रारदाराच्‍या ताब्‍यात असते. तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीचे अधिकारी यांचेकडे दिनांक २५-१२-२०१५ रोजी अपघात होऊन वाहनाचे नुकसानीचा खर्च झाला या घटनेची अधिका-यांना माहिती दिल्‍यानंतर या विमा कंपनीने सर्व्‍हे करण्‍यासाठी नुकसानीची नोंद व आकलन करणेसाठी व दाव्‍यावर प्रक्रिया करणेसाठी तक्रारदारास सामनेवालेकडे कागदपत्र दाखल करण्‍याचे आवाहन केले.  त्‍या अनुषंगाने श्री.नरेंद्र लोहाडे यांनी मे.शुभयान मोटर्स प्रा.लि. येथे जाऊन अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसानीची पाहणी केली आणि वाहन दुरूस्‍तीबाबतचे कागदपत्र व माहिती घेतली. सर्व्‍हे करतांना सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे  अहवाल दिनांक १८-१२-२०१५ रोजी सामनेवाले विमा कंपनीला सादर केला. सर्व्‍हे  अहवालानंतर वाहनांचे सुटे भागांचा घसाराची किंमत रूपये ६५,७३५/-, कामगारांचे शुल्‍क रूपये ३८,०१४/-, इतर उर्वरीत मुल्‍यांकन रक्‍कम रूपये ३,७४९.१० पैसे, विमा पॉलिसीचे एक्‍सेस क्‍लॉजनुसार रूपये १,०००/- असा एकुण रक्‍कम रूपये ९९,०००/- केले.  त्‍यानंतर दिनांक २५-१२-२०१५ रोजी सर्व्‍हेअरने वाहनाची पुर्नतपासणी केली पाहणी अहवालानुसार दुरूस्‍ती किंवा पार्टस बदलण्‍याचे कामकाजाविषयी सर्व्‍हे रिपोर्ट दिला. त्‍यानंतर पावत्‍या, बिले आणि व्‍हाऊचर्स मिळाल्‍यानंतर सर्व्‍हेअरने आकारणी करून रक्‍कम रूपये ९७,०००/- इतकी रक्‍कम केली. त्‍यामध्‍ये सुटे भागाचे रक्‍कम रूपये ६४,३३३.८० आणि रूपये ३७,४४१.५० हे कामगाराचे शुल्‍क मिळविले. तारणाची किंमत रूपये ३,७७५.३० पैसे हे मिळाल्‍याची आकारणी केली. तसेच सर्व्‍हेअरने विमा पॉलिसीच्‍या एक्‍सेस क्‍लॉज रूपये १,०००/- वजावट केली. सर्व्‍हेअरने सर्व्‍हे  करतांना कुठलाही पुर्वग्रह दुषीत न ठेवता सर्व्‍हे केलेला आहे व त्‍याचा पुर्नतपासणी अहवाल हा सामनेवालेकडे सादर केला आहे. तक्रारदाराने आर.सी. बुक, फिटनेस सर्टीफीकीट आणि ड्रायव्‍हर कपील माने याचे एम.डी.एल. सामनेवालेकडे सादर केले आहे.

७.   सामनेवाले विमा कंपनीने दाव्‍याची सत्‍यता पडताळण्‍यासाठी टेकनोट्रॅक डिटेक्‍टीव्‍ह सर्व्‍हीसेस यांच्‍याकडुन तपासणी केली. त्‍यानुसार त्‍यांनी तपास केला आणि दिनांक १६-१०-२०१६ रोजी त्‍याचा अहवाल या सामनेवाले विमा कंपनीस सादर केला. त्‍यांनी अपघाताच्‍यावेळी विमाधारक वाहनाचा हजार्डस गुडस (धोकादायक वस्‍तु) म्‍हणजे एल.पी.जी. सिलेंडर वाहुन नेण्‍यासाठी वापर होत होता आणि चालक कपील पंढरीनाथ माने यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍सवर हाजार्डस गुडस (धोकादायक वस्‍तु) वाहुन नेणेबाबत उल्‍लेख नव्‍हता व तशी पावतीही नव्‍हती.  तसेच तक्रारदाराने हाजार्डस गुडसचे परमीटही दाखल केले नव्‍हते. अशाप्रकारे स्‍पष्‍ट झाले की, विमा वाहनाच्‍या चालकाकडे वाहन चालविण्‍याचा योग्‍य वैध परवाना अपघाताच्‍या वेळी नव्‍हता. तसेच त्‍यास धोकादायक वस्‍तु  वाहनासाठीचा परवाना नव्‍हता. त्‍यामुळे विमा पॉलिसीच्‍या  अटी व शर्तींचा भंग झाल्‍यामुळे विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारला व त्‍या संदर्भात तक्रारदारास रजिस्‍टर्ड पोस्‍टामार्फत पत्र पाठविण्‍यात आले. सदर पत्र तक्रारदारास प्राप्‍त झाले होते. तक्रारदारास सेवा देण्‍यास कोणताही उशीर झाला नाही. सामनेवालेने तक्रारदाराचा विमा दावा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे नाकारलेला आहे. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे. सामनेवाले विमा कंपनीचा विमा दावा नाकारलेबाबतचा सामनेवालेचा दावा नाकारल्‍याची कृती ही बेकायदेशीर व योग्‍य  नाही, असे मे. मंचाचे निदर्शनास आल्‍यास सामनेवाले विमा कंपनीच्‍या सर्व्‍हेअरने केलेल्‍या सर्व्‍हेप्रमाणे रक्‍कम रूपये ९७,०००/- देण्‍यास पात्र असल्‍याबद्दल सामनेवालेचे म्‍हणणे आहे. सामनेवालेने त्‍याची कैफीयत नि.१४ वर व १६ ला दस्‍तऐवज दाखल केले आहे. त्‍यात पुढीलप्रमाणे कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. तक्रारदाराने माहिती दिलेले पत्र, तक्रारदाराने दाखल केलेला क्‍लेम फॉर्म, सर्व्‍हे रिपोर्ट, पुर्नसर्वेक्षण रिपार्ट, बिल चेक रिपोर्ट, ड्रायव्‍हर कपील माने याचे एम.डी.एल., दावा नाकारल्‍याचे पत्र दाखल आहे. सामनेवाले विमा कंपनीने नरेंद्र नेमीचंद लोहाडे, सर्व्‍हेअर यांचे शपथपत्र नि.१७ वर दाखल केले आहे. सदर शपथपत्रामध्‍ये त्‍यांनी निरीक्षण नोंदविलेले की, वाहन दुरूस्‍तीचा खर्च रक्‍कम रूपये ९७,०००/- सर्व्‍हे केला. वाहनाच्‍या  दुरूस्‍तीवर सर्व्‍हेअर नरेंद्र लोहाडे यांनी दिनांक ३१-१२-२०१५ रोजी वाहनाचा पुर्नतपासणी अहवाल सादर केला. त्‍यानुसार चेक रिपोर्ट आणि अंतीम मुल्‍यांकनानुसार रक्‍कम रूपये ९७,०००/- चे दुरूस्‍तीचे मुल्‍यांकन करण्‍यात आले. त्‍यात तपासणी अहवाल व पुर्नतपासणी अहवाल आहेत. तक्रारदाराने नि.१२ वर पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तसेच पुराव्‍याचे शपथपत्रासोबत आर.टी.ओ. ऑफीस, अहमदनगर यांचे हजार्डस गुडस व्‍हेईकलबाबतचे सर्टीफीकीट दिलेले आहे. तसेच अपघातग्रस्‍त विमा वाहनाचे ड्रायव्‍हरचे हजार्डस गुडसबाबत एम.डी.एल. दाखल केलेले आहे. नि.२२ वर सामनेवाले विमा कंपनीने आणखी पुरावा देणे नाही, अशी पुरसीस दाखल केली. निशाणी २३ वर तक्रारदाराने त्‍याचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. निशाणी २४ वर सामनेवाले विमा कंपनीने लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. निशाणी २५ वर सामनेवाले विमा कंपनीतर्फे कागदपत्रे दाखल करून घेणेकामी विनंती अर्ज दाखल केलेला आहे. निशाणी २६ वर सामनेवाले विमा कंपनीचे कागदपत्र दाखल केलेले आहेत. त्‍यामध्‍ये ट्रक ड्रायव्‍हर कपील माने यांचे लायसन्‍सबाबत मे. आर.टी.ओ. अहमदनगर यांनी दिलेला उतारा, इन्‍वहेस्‍टीगेटर टेक्‍नोट्रॅक डिटेक्टिव्‍ह सर्व्हिसेस यांनी दिलेला रिपोर्ट, एलपीटी वाहन नं.एमएच-०४-डिएस-५८११ याचे विम्‍याचे प्रमाणित प्रत दाखल आहे.            

८.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र, सर्व्‍हेअरचे शपथपत्र, सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र, उभयपक्षांचा लेखी युक्तिवाद याचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमांसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदारास न्‍युनतम सेवा दिली  आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडुन नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

९.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदाराने त्‍याच्‍या मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक मॉडेल नं.एल.पी.टी.९०९ रजिस्‍ट्रेशन क्र.एम.एच.०४/डी.एस.५८११ या वाहनाचा विमा दिनांक ०८-०१-२०१५ ते दिनांक ०७-०१-२०१६ या कालावधीसाठी सामनेवाले विमा कंपनीकडे विमा उतरविलेला असुन त्‍याचा विमा पॉलिसीचा क्रमांक १६२५००३११४पी१०८३०७७२३ असा होता. सदरील पॉलिसीचा विमा प्रिमीयम रक्‍कम रूपये १८,३४१/- अदा केलेला आहे. सदर बाब उभयपक्षांना मान्‍य असुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा     क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

१०.  मुद्दा क्र. (२) :  सामनेवालेने त्‍याच्‍या बचावाव्‍या पुष्‍टयर्थ अशी बाजु मांडलेली आहे की, तक्रारदाराचे वाहन चालकाकडे हजार्डस गुडस (धोकादायक वस्‍तु) वाहुन नेण्‍याचा व योग्‍य वैध वाहन चालविण्‍याचा परवाना नव्‍हता, म्‍हणुन तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर करण्‍यात आला व तसे पत्र देखील पाठविण्‍यात आले. सामनेवालेने  तक्रारदारास कोणत्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. सामनेवालेने लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, अपघातग्रस्‍त वाहन विमा दाव्‍याच्‍या वाहन चालकाचा हजार्डस गुडस परवाना (धोकादायक वस्‍तु वाहुन नेण्‍याचा परवाना) नाही. विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार वाहन अपघाताचे वेळी अपघातग्रस्‍त वाहनाचे चालक याच्‍याकडे योग्‍य तो वाहन चालविण्‍याचा परवाना नव्‍हता. तक्रारदाराने त्‍याच्‍या लेखी युक्तिवादात; वाहनाच्‍या चालकाकडे अपघात झाला त्‍यावेळेस वाहन रिकामे होते. त्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारचा धोकादायक माल नव्‍हता. तसेच तक्रारदाराच्‍या वाहनाचे चालकाकडे योग्‍य व वैध परवाना आहे. त्‍याचा धोकादायक वाहन चालविण्‍याचा परवाना २४-१०-२०१५ ते २३-१०-२०१६ पर्यंत आहे व त्‍यासंदर्भात तक्रारदाराने दाखल कागदपत्रात आर.टी.ओ. ऑफीस, अहमदनगर येथील दिनांक ०६-०६-२०१६ रोजीचे पत्र त्‍याचप्रमाणे दिनांक ०१-०३-२०१७ रोजीचे प्रमाणपत्राची छायांकीत प्रत तसेच दिनांक १५-१२-२०१७ रोजी दाखल केलेले हाजार्डस गुडस तसेच नॉन हाजार्डसगुडस विषयी माहिती व एम.डी.एल. माहीती यासोबत हजार्डस गुडस लायसन्‍स वैधता दिनांक २४-१०-२०१५ ते २३-१०-२०१६ अशी नमुद असल्‍याचे दिसते. त्‍याचप्रमाणे तक्रारदाराचे वाहनचालक कपील माने याचे ड्रायव्‍हींग लायसन्‍सवर हजार्डसची वैधता दिनांक २३-१०-२०१६ पर्यंत दिसुन येते. यावरून तक्रारदाराच्‍या वाहन चालकाकडे योग्‍य परवाना असतांनासुध्‍दा सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा दावा दिनांक ३०-०८-२०१६ रोजी अयोग्‍यरित्‍या नाकारला आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराचे वाहन चालकाकडे योग्‍य व वैध परवाना असतांनासुध्‍दा सामनेवाले विमा कंपनीने त्‍याचा दावा नामंजुर केला असल्‍याने सामनेवालेने तक्रारदारास दिलेल्‍या सेवेत न्‍युनतम सेवा दर्शविली आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र. २ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

११.  मुद्दा क्र. (३) :  मुद्दा क्र.१ व २ चे विवेचन, उभयपक्षांचा लेखी युक्तिवाद, तसेच सामनेवाले यांच्‍या सर्व्‍हेअर श्री.नरेंद्र लोहाडे यांचा निष्‍कर्ष व सर्व्‍हे अहवाल, तसेच नि.१७ वरील समानेवालेचे श्री.नरेंद्र लोहाडे यांचे शपथपत्राचे अवलोकन केले असता तसेच सामनेवाले यांच्‍या कैफीयतीमधील क्र.१३ चे विनंती कलमामधील शेवटचा परिच्‍छेद याचे अवलोकन केले असता सामनेवाले विमा कंपनी ही सर्व्‍हेअरच्‍या अहवालानुसार रक्‍कम रूपये ९७,०००/- नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे. सदरील नुकसान भरपाई ही सामनेवाले विमा कंपनीने दावा नाकारल्‍यापासुन म्‍हणजे दिनांक ३०-०८-२०१६ पासुन द.सा.द.शे. ८ टक्‍के व्‍याज देण्‍याचे आदेश करणे उचित होईल. तसेच सामनेवालेने तक्रारदारास विमा क्‍लेम नाकारून दुषित सेवा दिल्‍यामुळे व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रूपये १०,०००/-. तक्रारदाराचा तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- सामनेवालेने तक्रारदारास द्यावा, असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.३ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

१२.  मुद्दा क्र. (४) :  मुद्दा क्र.१, २ व ३ चे विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

अंतीम आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्‍कम रूपये ९७,०००/- (अक्षरी सत्‍त्‍याण्‍णव हजार) व त्‍यावर विमा दावा नाकारलेली दिनांक    ३०-०८-२०१६ पासुन संपूर्ण रक्‍कम तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. ८ टक्‍के प्रमाणे व्‍याज द्यावे.

 

३. सामनेवाले यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा.

 

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.