न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीची स्कोडा कार क्र. एम.एच.09-ए.एल.-0338 असून सदर वाहनाचा विमा त्यांनी वि.प. कंपनीकडे पॉलिसी नं. 1628003117P107257781 ने उतरविला होता. पॉलिसीचा कालावधी दि. 21/08/2017 ते 20/08/2018 असा होता. ता. 15/07/2018 रोजी श्री महमदअली खान हे कोल्हापूरहून कागलला जात असताना सदरची कार रोड डिव्हायडरवर चढून कारचे पूर्णतः नुकसान झाले. त्यानंतर तक्रारदारांनी वि.प. यांचे विमा क्लेम दाखल केला. परंतु वि.प. विमा कंपनीने दि. 23/12/2018 रोजीचे पत्राने तक्रारदार यांनी कार ही नेट लॉस झाली होती व ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. तसेच इन्व्हेस्टीगेटरच्या अहवालाप्रमाणे अपघातावेळी कारमध्ये 4 ते 5 लोक होते असे कारण देवून तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. वास्तविक पाहता, अपघातावेळी महमदअली खान हे एकटेच सदर कारमध्ये होते. परंतु वि.प. यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 5,25,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 6 कडे अनुक्रमे त्रुटीपत्र, पॉलिसी, संचकारपत्र, वटमुखत्यारपत्र, तक्रारदार यांचे आधार कार्ड, मुखत्यार यांचे आधार कार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व सोबत वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे दाखल केले आहेत.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत श्री सुनिल चाचे यांचा तपास अहवाल, मोहंमदअली खान यांचा जबाब, श्री रामचंद्र शिंदे यांचा जबाब, इन्व्हेस्टीगेटर यांचे शपथपत्र तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) अपघाताची सूचना दिल्यानंतर वि.प.विमा कंपनीने श्री शेटे सर्व्हेअर यांचेमार्फत फायनल सर्व्हे रिपोर्ट करुन घेतला व त्या फायनल सर्व्हे रिर्पोटप्रमाणे सदरचे कारचा दुरुस्ती खर्च ओरिजनल एस्टिमेटप्रमाणे रु. 27,90,984/- व त्यानी असेस केलेली रक्कम रु.15,47,277/- अशी आहे. यावरुन सदरचे कारचे पूर्णतः नुकसान झालेले आहे हे दिसून येईल.
iv) अपघातस्थळावरील प्रत्यक्ष अपघात पहाणारे श्री रामचंद्र धोंडिबा शिंदे यांनी अपघात झालेनंतर कारमधून 4 ते 5 लोक खाली उतरले व अपघात हा साधारणतः रात्री 8.15 चे सुमारास झालेचे कथन केले आहे. अशा प्रकारे तक्रारदारांनी विमा पॉलिसीचे अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. सबब, तक्रारदार विमा क्लेम मिळण्यास पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे मालकीची स्कोडा कार क्र. एम.एच.09-ए.एल.-0338 असून सदर वाहनाचा विमा त्यांनी वि.प. कंपनीकडे पॉलिसी नं. 1628003117P107257781 ने उतरविला होता. पॉलिसीचा कालावधी दि. 21/08/2017 ते 20/08/2018 असा होता. सदरची पॉलिसी तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहे. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, अपघातस्थळावरील प्रत्यक्ष अपघात पहाणारे श्री रामचंद्र धोंडिबा शिंदे यांनी अपघात झालेनंतर कारमधून 4 ते 5 लोक खाली उतरले व अपघात हा साधारणतः रात्री 8.15 चे सुमारास झालेचे कथन केले आहे, सबब, तक्रारदारांनी पॉलिसीचे शर्ती व अटींचा भंग केला असल्याने तक्रारदाराचा विमादावा वि.प. यांनी नाकारला आहे असे कथन केले आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ वि.प. यांनी इनव्हेस्टीगेटर श्री सुनिल चाचे यांचा अहवाल दाखल केला असून त्यांचे शपथपत्रही याकामी दाखल केले आहे. परंतु प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्री रामचंद्र धोंडीबा शिंदे यांनी सदरची घटना पाहिली हे दर्शविणारा अन्य कोणताही ठोस पुरावा वि.प. यांनी याकामी दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी अपघातावेळी सदरचे वाहनातून प्रवासी वाहतुक केली हे शाबीत करण्यासाठी वि.प. यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, अपघातावेळी सदर वाहनातून प्रवासी भाडयाने प्रवास करीत होते ही बाब याकामी शाबीत झालेली नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सदरकामी विमा पॉलिसीचे अवलोकन करता वादातील वाहनाची आयडीव्ही ही रु. 6,00,000/- इतकी असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांचा विचार करता तक्रारदार हे नॉन स्टँडर्ड बेसीसवर वाहनाचे आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु.5,25,000/% मिळणेस पात्र आहेत.
याकामी तक्रारदाराने दाखल केलेल्या खालील मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयांचा आधार या आयोगाने घेतला आहे.
- II (2009) CPJ 278 J & K State Commission
- II (2010) CPJ 9 Supreme Court.
Insurance – Non-standard settlement – terms of policy violated – repudiation of claim in toto injustified – settlement of claim on non-standard basis directed.
सबब, तक्रारदार हे नॉन स्टँडर्ड बेसीसवर वाहनाचे आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु.5,25,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 5,25,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.