प्रकरण पंजीबध्द करण्यांत आले दि.04/05/2010 विरुध्दपक्षास नोटीस लागून हजर राहण्याची तारीख :- 10/06/2010 मा. अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बुलडाणा यांचे समक्ष प्रकरण क्रमांक :- सी.सी. /101/2010 निकाल तारीख :- 23/11/2010 सोपान श्रीकृष्ण गावंडे : वय 26 वर्षे, धंदा शेती : तक्रारकर्ता रा.मामुलवाडी, ता.नांदूररा, जि.बुलडाणा. : --विरुध्द-- दि ओरीएन्टल इन्शुअरन्स कंपनी लि. : तर्फे विभागीय व्यवस्थापक : रयत हवेली, जुने कॉटन मार्केट, टिळक रोड, : अकोला, ता.जि.अकोला. : विरुध्दपक्ष जिल्हा मंचाचे पदाधिकारी :- 1) श्री.राजीव त्रिं. पाटील - अध्यक्ष 2) श्रीमती नंदा लारोकर - सदस्या तक्रारकर्त्यातर्फे वकील :- श्री.दिपक मापारी. विरुध्दपक्षातर्फे वकील :- श्री.डि.एस.चव्हाण (मा.सदस्या श्रीमती नंदा लारोकर यांनी निकाल कथन केला) आ दे श प त्र 1.. तक्रारकर्त्यानुसार त्याची आई चंद्रभागा ज.श्रीकृष्ण गावंडे ही शेतकरी होती. तिचा दि.25/02/2009 रोजी अपघातामधे मृत्यू झाल्यानंतर तक्रारकर्त्याने त्याबाबत विम्याचा दावा विरुध्दपक्षाकडे सादर केल्यानंतर विरुध्दपक्षाने कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय संबंधीत विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन त्याला संबंधीत विम्याची रक्कम व त्यावरील व्याज इत्यादीची मागणी केली आहे. 2.. विरुध्दपक्षानुसार संबंधीत व्यक्तीच्या नांवाने अपघाताच्या दिवशी कोणतीही जमीन नव्हती व ती शेतकरी नव्हती व त्यामुळे विरुध्दपक्षाने योग्य त्या कारणाकरीता तक्रारकर्त्याचा विम्याचा दावा फेटाळला असल्यामुळे ही तक्रार खारीज करण्यांत यावी. ..2.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /101/2010 ..2.. 3.. या प्रकरणातील तक्रार अर्ज, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब व उभय बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेता आमच्या समोर खालील मुद्दे निर्णयासाठी उपस्थित होतात. अ) विरुध्दपक्षाची या प्रकरणातील सेवेतील त्रुटी आहे काय ? -- होय. ब) या तक्रारीचा अंतिम आदेश काय ?-- कारणमिमांसेप्रमाणे.. 4.. दोन्ही पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व युक्तीवाद केला. या प्रकरणातील वादाचा एकमेव मुद्दा मृत शेतकरी चंद्रभागा श्रीकृष्ण गावंडे हि अपघाताच्या दिवशी शेतकरी होती अथवा नाही इतकाच आहे. या संबंधीत तक्रारकर्तीने जी कागदपत्रे या प्रकरणात सादर केलेली आहे त्यानुसार मौजे पलसोडा ता.नांदूरा, जि.बुलडाणा येथील फेरफारपत्रकातील नोंद क्र.578 नुसार दि.1/6/2008 रोजी झालेल्या वाटणीपत्रकानुसार मौजे पलसोडा येथील गट नंबर 188 मधील 1 हेक्टर 77 आर जमीनीपैकी 40 आर जमीन ही चंद्रभागा ज. श्रीकृष्ण गावंडे यांच्या हिस्यावर करुन देण्यांत आली होती. त्याबाबत संबंधीत 7/12 उता-याची प्रत देखील या प्रकरणात दाखल करण्यांत आलेली आहे. ही जमीन नंतर इतर व्यक्तीच्या नावाने केल्याबाबतची नक्कल देखील दाखल करण्यांत आली आहे. विरुध्दपक्षाच्या लेखी जवाबानुसार व युक्तीवादानुसार तक्रारकर्त्याने संबंधीत अपघाताबाबत तातडीने कळविले नव्हते तसेच विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडे अपघाताच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर तक्रारकर्त्याने योग्य ती कागदपत्रे विरुध्दपक्षाला पुरविली नव्हती परंतू विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडे कोणत्या कागदपत्रांची मागणी केली होती हे समजू शकत नाही. तक्रारकर्त्याने या प्रकरणात आवश्यक ती कागदपत्रे सादर केलेली आहेत व त्यामुळे विरुध्दपक्षाने कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय तक्रारकर्त्याचा विम्याचा दावा नामंजूर केल्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला संपूर्ण विम्याची रक्कम व त्यावर योग्य ते व्याज ..3.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /101/2010 ..3.. देण्याचा आदेश पारीत करणे न्यायोचीत होईल असे मंचाचे मत आहे. सबब खालील अंतीम आदेश पारीत करण्यांत येतो. अं ती म आ दे श 1) विरुध्दपक्षाने मृत शेतकरी चंद्रभागा ज.श्रीकृष्ण गावंडे हिच्या दि.25/2/2009 रोजी झालेल्या अपघाती मृत्यूबाबत शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेअंतर्गत सादर केलेला विम्याचा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय फेटाळून सेवेतील त्रुटी दर्शविली आहे. सबब विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लक्ष फक्त) द्यावी व या रकमेवर विम्याचा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.29/01/2010 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यत 9% दराने व्याज द्यावे. 2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा विम्याचा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय फेटाळून लावल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थीक,शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.2000/- (अक्षरी दोन हजार) ची रक्कम द्यावी. 3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला न्यायीक खर्चाबाबत. रु.1000/- (अक्षरी एक हजार) ची रक्कम द्यावी. 4) वरील आदेशाचे पालन विरुध्दनपक्षाने हा आदेश मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावे. (श्रीमती नंदा लारोकर) (राजीव त्रिं. पाटील) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बुलडाणा. स्थळ :- बुलडाणा दिनांक :- 23/11/2010
| [HONORABLE Mrs Nanda Larokar] Member[HONORABLE R T Patil] PRESIDENT | |