(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्या)
(पारीत दिनांक– 23 ऑगस्ट, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 दिन्यु इंडिया अॅश्योरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून, तिचा पती श्री मधु सोमाजी मेंढे हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा ढोलसर, तालुका-लाखंदुर, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-99 अशी शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 3 विमा सल्लागार कंपनी आहे. विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा सरकाद्वारे काढण्यात आला असल्याने त्याचे मृत्यू नंतर पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून ती “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा दिनांक-15.10.2011 रोजी तलावात पाय घसरुन पडल्याने बुडून अपघाती मृत्यू झाला. (याठिकाणी नमुद करावेसे वाटते की, पोलीस दस्तऐवजा प्रमाणे त.क.चे पतीचा दुस-याचे शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे नमुद आहे) तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-4 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-08.05.2012 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तिला विमा दाव्या बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे कोणताही निर्णय न कळविल्याने तिचे वकीलांनी दिनांक 20/03/2017 रोजी विरुध्दपक्षांना नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्दपक्षांना मिळूनही नोटीसला उत्तर दिले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे विमा दावा प्रस्तावा संबधात तिला आजपर्यंत काहीही कळविलेले नसल्याने सेवेत त्रृटी ठेवली. म्हणून तक्रारकर्तीने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/-विमा प्रस्ताव दाखल दिनांक-08.05.2012 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- विरुध्दपक्षां कडून मागितले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनी तर्फे मंचासमक्ष पान क्रं 60 ते 62 वर एकत्रितरित्या लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्ती कडून विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीला कोणताही विमा दावा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही वा विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांचे कडून विमा दावा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही असे नमुद केले. विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह दाखल केल्याची बाब पुराव्यानिशी तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांनी सिध्द करावी. अपघाती घटना ही सन-2011 मध्ये घडलेली असून तक्रारकर्तीने 2017 मध्ये दावा दाखल केलेला आहे, जो कालबाहय ठरतो, सबब तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारकर्ती कडून विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-20/03/2017 ला नोटीस पाठविल्याची बाब नाकबुल केली. अन्य सर्व विपरीत विधाने नामंजूर करुन तक्रारकर्तीची तक्रार दंडासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) मे.कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड यांना ग्राहक मंचाचे मार्फतीने पाठविलेली नोटीस मिळाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच पान कं 74 वर तसेच विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर, जिल्हा भंडारा यांना नोटीस मिळाल्याची पोच पान क्रं 73 वर दाखल आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं 3 व 4 यांना ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित न झाल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 व 4 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाव्दारे पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ठ क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शासन निर्णय 2011-2012, विमा दावा प्रस्ताव, 7/12 उतारा, पोलीस दस्तऐवज, पी.एम. रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे मृतक पतीचा वयाचा दाखला, वकीलामार्फत रजि.पोस्टाने विरुध्दपक्ष विमा कंपनी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस अश्या दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 63 ते 65 वर शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-68 व 69 वर तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर पान क्रं 60 ते 62 वर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनीतर्फे त्यांनी पुराव्याचे शपथपत्र पृष्ठ क्रं- 66 व 67 वर दाखल केले असुन, लेखी युक्तिवाद पृष्ठ क्रं. 70 व 71 वर दाखल केला आहे.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीतर्फे लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद त्याच बरोबर तक्रारकर्तीने प्रकरणांत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. मौखीक युक्तीवादाचे वेळी विरुध्द पक्ष क्रं. 3 व 4 गैरहजर होते. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर यांचा तर विरुदपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे.
:: निष्कर्ष ::
08. सदर प्रकरणांत विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 विमा कंपनी तर्फे दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीचे पतीचा झालेला अपघाती मृत्यू तसेच त्याचे मालकीची शेती या बाबी संबधाने कोणताही विवाद उपस्थित केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनी तर्फे एवढाच मर्यादित बचाव घेण्यात आला की, त्यांना तक्रारकर्ती कडून तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात कोणताही विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह प्राप्त झालेला नाही वा विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांचे कडून विमा दावा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह दाखल केल्याची बाब पुराव्यानिशी तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांनी सिध्द करावी. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे असाही आक्षेप घेण्यात आला की, अपघाती घटना ही सन-2011 मध्ये घडलेली असून तक्रारकर्तीने 2017 मध्ये दावा दाखल केला
09. तक्रारकर्तीने उपरोक्त आक्षेपास अनुसरुन तालुका कृषि अधिकारी, लाखांदुर जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात सर्वप्रथम विमा दावा आवश्यक त्या दस्तऐवजांसह दिनांक-07.05.2012 रोजी दाखल केल्याचे तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर जिल्हा भंडारा यांचे पान क्रं 15 वर दाखल असलेल्या पत्रावरील नोंदीवरुन दिसून येते. तालुका कृषी अधिकारी लाखांदूर यांनी सदर विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह दिनांक-08.05.2012 रोजीचे पत्रान्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात पाठविल्याचे व सदर विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांना दिनांक-14 मे, 2012 रोजी मिळाल्याचे सदर पत्रावरील नोंदींवरुन दिसून येते.
10. तक्रारकर्तीने सदर विमा दावा प्रस्तावा सोबत 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6 क, प्रतिज्ञापत्र, वयाचा पुरावा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, पोलीसांनी केलेला घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा,राशन कॉर्ड, बँक पासबुक अशा सर्व दस्तऐवजाच्या प्रती जोडल्याची बाब दाखल दस्तऐवजी पुराव्या वरुन सिध्द होते. तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी केलेल्या शवविच्छेदन अहवाला मध्ये तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यूचे कारण “Asphyxia due to Drowning” असे स्पष्टपणे नमुद आहे. दाखल पोलीस दस्तऐवजा वरुन तक्रारकर्ती हिचे पती श्री मधु सोमा मेंढे याचा मासळ, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथील शरदकुमार वर्मा यांचे शेतातील विहिरी मध्ये बुडून मृत्यू झाल्याचे नमुद आहे. मृत्यू प्रमाणपत्रा नुसार मृतकाचा मृत्यू दिनांक-15.10.2011 रोजी झाल्याचे नमुद आहे.
11. शेतकरी जनता अपघात विमा योजना-2011-12 चे दिनांक-08 ऑगस्ट, 2011 रोजीचे दाखल महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका वरुन ही योजना दिनांक-15 ऑगस्ट, 2011 ते दिनांक-14 ऑगस्ट, 2012 या कालावधीसाठी होती आणि योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांच्या आत विमा दावा करणे आवश्यक आहे. त्यानुसार विमा योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांचा कालावधी हा दिनांक-14 नोंव्हेंबर, 2012 येतो. तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्यू नंतर सर्वप्रथम विमा दावा प्रसताव आवश्यक दस्तऐवजांसह तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्हा भंडारा यांचेकडे दिनांक-07 मे, 2012 रोजी दाखल केल्याचे पान क्रं 15 वरील दाखल पत्रावरील नोंदीवरुन सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्तीने विहित मुदतीत सर्वप्रथम विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर केल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होत असल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे विमा दावा विहित मुदतीत दाखल केलेला नाही या घेतलेल्या आक्षेपामध्ये ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की, ही तक्रार तक्रारीचे कारण घडल्या पासून 02 वर्षा नंतर ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय आहे. या आक्षेपावर तक्रारकर्तीचे वकीलानीं प्रत्युत्तर देताना असे सांगितले की, तिच्या विमा दावा प्रस्तावावर काय निर्णय झाला? या संबधी तिला आज पर्यंत विमा कंपनी तर्फे काहीही कळविलेले नाही आणि जो पर्यंत तिचा विमा दावा प्रस्ताव खारीज झाला असल्याचे तिला लेखी कळविल्या जात नाही, तो पर्यंत तक्रार दाखल करण्यास सतत कारण घडत असते. तक्रारकर्तीने तिचे पान क्रं 63 ते 65 वर दाखल शपथपत्रामध्ये अशा आशयाचा मजकूर नमुद केलेला आहे की, तिने विरुध्दपक्ष क्रं 1 व 3 ला दिनांक-20.03.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली होती परंतु अशी नोटीस मिळाल्या नंतरही विरुध्दपक्षांनी नोटीसला उत्तर दिले नाही तसेच आज पर्यंत विमा दाव्या संबधात तिला काहीही लेखी कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला तिच्या विमा दाव्या संबधी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून कुठलीही माहिती न मिळाल्याने तक्रारीस कारण सतत घडत असल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार उशिराने मंचा समक्ष दाखल केली असा विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेला आक्षेप निरस्त ठरतो.
13. ग्राहक मंचा समक्ष विहित मुदतीत तक्रार दाखल केलेली नाही या विरुध्दपक्ष विमा कंपनीचे आक्षेपा संदर्भात खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयाचा आधार मंचा तर्फे घेण्यात येतो-
“PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”—I (2006) CPJ-53 (NC)
या प्रकरणा मध्ये विमा दावा खारीज केल्याचे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नव्हते तसेच त्या पत्राची प्रत तक्रारकर्तीला मिळाल्याचे पण सिध्द झाले नव्हते परंतु तरीही जिल्हा ग्राहक मंचाने ती तक्रार खारीज केली होती, जिल्हा मंचाचा तो निर्णय मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रद्दबातल ठरविला आणि तक्रार ही मुदतीत असल्याचे नमुद केले. हातातील प्रकरणात सुध्दा तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज केल्या संबधीचे पत्र त्याला मिळाल्याचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने अभिलेखावर दाखल केलेला नाही आणि म्हणून तक्रार दाखल करण्यास कारण हे सतत घडत असल्याने ही तक्रार मुदतबाहय होत नाही.
14. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- तिने सर्व प्रथम विमा दावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी लाखांदूर, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्याचा दिनांक-07/05/2012 नंतर महाराष्ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजना सन-2011-2012 चे परिपत्रका प्रमाणे विमा कंपनीला विमा दावा निश्चीतीसाठी 60 दिवसाची मुदत देऊन म्हणजे दिनांक-07/07/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्ती विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस ही एक विमा सल्लागार कंपनी असून त्यांनी दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिल्याचे तिचे म्हणणे नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-(4) तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-(3) व क्रं-(4) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमायोजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) दिनांक-07/07/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) मे.कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड विमा सल्लागार कंपनी यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) विरुध्दपक्ष -(4) तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, तालुका लाखांदुर जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(06) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्तीला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.
(07) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(08) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.