निकाल
(घोषित दि. 17.06.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार ही पेरजापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवाशी आहे, तिचा व्यवसाय शेती आहे. तिचे पती सुखदेव भिका जाधव हे दि.14.12.2014 रोजी विहीरीत पडून मरण पावले. सदर घटनेची माहिती भोकरदन पोलीस स्टेशन यांना देण्यात आली तेथे अपघाती मृत्यू नोंद नं.73/2014 करण्यात आली, पोलीसांनी मृत व्यक्तीचा मरणोत्तर पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठविला व संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुखदेव भिका जाधव हे सुध्दा व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची सुरुवात केली, त्या सामुहिक योजनेअंतर्गत तक्रारदार हिच्या मयत पतीचा विमा काढलेला आहे. पतीच्या मृत्यूनंतर तक्रारदार हिने दि.07.02.2015 रोजी तालुका कृषी अधिकारी भोकरदन यांच्याकडे जाऊन विमा प्रस्ताव दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली परंतू त्यांनी तक्रारदार हिचा विमा प्रस्ताव दाखल करुन घेतला नाही. त्यानंतर दि.23.10.2015 रोजी तक्रारदार हिने वकीलामार्फत विहीत नमुन्यात विमा दावा पोस्टाने पाठविला परंतू विमा कंपनीने सदर प्रस्तावाबाबत कोणतीही सुचना तक्रारदार हिला दिलेलीनाही. विमा प्रस्तावासोबत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राच्या नकला जोडलेल्या होत्या. विम्याच्या नियमावलीनुसार विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत विमा कंपनीस सदर प्रस्तावावर उचित निर्णय घेणे आवश्यक आहे परंतू या प्रकरणात विमा कंपनीने विहीत मुदतीत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे हा तक्रार अर्ज दाखल केला. तक्रारदार हिने विनंती केली आहे की,तिला विमा प्रस्ताव दाखल केल्यापासून 18 टक्के व्याजदराने विमा रक्कम देण्याचा आदेश व्हावा तसेच तिला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरता नुकसान भरपाई म्हणूनरु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारदार हिने तक्रार अर्जासोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर केलेली आहेत, त्यामध्ये क्लेम फॉर्म 8/3, तलाठयाचे प्रमाणपत्र, क्लेम फॉर्म भाग-1, क्लेम फॉर्म भाग-1 चे सहपत्र, 7/12 चा उतारा, वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यूचे प्रमाणपत्र, वारसाच्या नोंदीचा उतारा, नमुना नं.6 क चा उतारा, फेरफार क्रमांक 419 चा उतारा, रहिवाशी प्रमाणपत्राच्या नकला, अर्जदार हिच्या बचत खात्याच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, घटनास्थळ पंचनाम्याची नक्कल, शवविच्छेदन अहवालाची नक्कल, मरणोत्तर पंचनाम्याची नक्कल, शवविच्छेदनाचा अभिप्राय मागवणे करता दिलेले सहपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल आहेत.
गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांनी तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव मिळाल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे तसेच तक्रारदार हिच्या पतीचा मृत्यू दि.14.12.2014 रोजी झाल्याचे ही कबूल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला नाही, सामुहिक विमा पॉलीसी ही काही अटी व शर्तींना अधीन राहून जारी करण्यात आली. सदर अटी व शर्ती सर्व लाभधारकांना लागू आहेत. पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली व पंचनामा बनविला आणि तपास केला ही गोष्ट गैरअर्जदार क्र.1 यांना मान्य आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार हिचा विमा दावा फेटाळण्यात कोणतीही चूक केलेली नाही, सदर प्रकरण हे विमा पॉलीसीच्या एक्सक्लूजन क्रमांक 2 अनुसार आहे त्यामुळे तक्रारदार हिचा विमा प्रस्ताव फेटाळल्याबाबत तिला दि.03.12.2015 च्या पत्रानुसार तसेचदि.18.01.2016 च्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. तक्रारदार हिच्या विमा दाव्याचे कागदपत्र दि.27.10.2015 रोजी मिळाले त्यानंतर सदर प्रस्तावातील त्रुटी बाबत खुलासा मिळविण्याकरीता गैरअर्जदार क्र.1 यांनी कार्यवाही सुरु केली, तक्रारदार हिच्या पतीच्या मृत्यूच्या तारखेबाबत कागदपत्रात विसंगती आहे. गैरअर्जदारक्र.1 यांनी त्यांचे स्वतंत्र तपास अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याकरता नेमलेले होते सदर तपासिक अधिका-यांनी स्वतंत्रपणे तपास करुन त्यांचा अहवाल सादर केला. तपासिक अधिका-यांचे असे मत आहे की, तक्रारदार हिच्या पतीचा अपघाती मृत्यू नसून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या तपासिक अधिका-यांनी गावातील शासकीय कर्मचा-यांकडे, पोलीस पाटलाकडे तसेच अंगणवाडी शिक्षक व शेजारीपाजारी आणि मृतकांचे कुटूंबिय यांच्याकडे ख-या परिस्थितीबाबत चौकशी केली तसेच वृत्तपत्रात छापून आलेली बातमी सुध्दा मिळवली. तक्रारदार हिच्या पतीने आत्महत्या केली असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर सामुहिक विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार हिचा विमा प्रस्ताव फेटाळण्यात गैरअर्जदार यांनी कोणतीही चूक केलेली नाही त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांच्यावर नोटीसची बजावणी होऊनही ते हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्दचे प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबाचे काळजीपूर्वक वाचन केले, ग्राहक मंचासमोर दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे परीक्षण केले. दोन्ही बाजूचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. त्यावरुन मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळण्यास गैरअर्जदार विमा कंपनीस कोणतेही ठोस कायदेशीर कारण उपलब्ध नव्हते. गैरअर्जदार विमा कंपनी यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हिच्या पतीचा आत्महत्या करुन मृत्यू झाला असल्यास विमा पॉलीसीच्या एक्सक्लूजन 2 अनुसार मृतकांच्या वारसांना विम्याचा लाभ मिळू शकत नाही. आमच्या मताने जरी विमा पॉलीसीच्या एक्सक्लूजन क्लॉज 2 अनुसार आत्महत्या या कारणास्तव मृतकांच्या वारसास विम्याचा लाभ मिळत नसेल तरी, गैरअर्जदार यांनी मृतकांचे वारसाचे प्रकरण एक्सक्लूजन क्लॉज 2 मध्ये येते हे स्पष्टपणे दाखविणे आवश्यक होते.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी असे प्रतिपादन केले की, त्यांनी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीचे कात्रण ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ जोडले आहे, सदर बातमीमध्ये तक्रारदाराच्या पतीने आत्महत्या केल्याचे लिहीलेले आहे. आमच्या मताने अशा वृत्तपत्राच्या बातम्यावरुन एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली अथवा नाही याबाबत योग्य तो निर्णय घेणे योग्य राहणार नाही.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी असेही प्रतिपादन केले की, त्यांनी जो स्वतंत्र तपासिक अधिकारी नेमला त्याने गावातील शासकीय कर्मचा-यांकडे, पोलीस पाटलाकडे तसेच अंगणवाडी शिक्षक व शेजारीपाजारी आणि मृतकांचे कुटूंबिय यांच्याकडे ख-या परिस्थितीबाबत चौकशी केली. त्यावरुन तपासिक अधिका-याने निष्कर्ष काढला की, तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाला. आमच्या मताने अशा प्रकारचा पुरावा सुध्दा तक्रारदाराच्या पतीने आत्महत्या केली असे गृहीत धरणे पुरेसा होणार नाही, कारण या सर्व लोकांचे जबाब हे त्यांच्या स्वतःच्या मतावर अवलंबून आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसरी व्यक्ती त्याच मृत्यूबददल काही मत व्यक्त करीत असेल तर सदर मत हे त्याच्या स्वतःच्या समजूतीनुसार बनविलेले असते. जर खरोखरच तक्रारदाराच्या पतीने दुष्काळी परिस्थितीला त्रासून आत्महत्या केली असेल तर, खरोखरच तक्रारदार हिचे प्रकरण एक्सक्लूजन क्लॉज 2 मध्ये येईल परंतू त्या परिस्थितीत तक्रारदाराच्या पतीची आर्थिक परिस्थिती कशी होती, ते कर्जबाजारी झाले होते का, त्याला दुष्काळी परिस्थितीमुळे जगणे अशक्य झाले होते का, त्याला किती रकमेचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी होती, किंवा खाजगी देणेदारांचे देणे त्याच्या डोक्यावर होते याबाबतीत कोणताही स्पष्ट पुरावा ग्राहक मंचासमोर आणण्यात आलेला नाही.
पोस्टमार्टम नोटसच्या नकला ग्राहक मंचासमोर दाखल आहेत. परंतू सदर पोस्टमार्टमच्या नोटस वाचून तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू आत्महत्या करुन झाला असा निष्कर्ष काढता येणार नाही. पोस्टमार्टम नोटसमध्ये तक्रारदार हिच्या पतीचा मृत्यू कार्डीओ रेस्पेरेटरी आरेस्टमुळे झालेला आहे असे लिहीलेले आहे.
विमा कंपनीचे तपासिक अधिका-यांच्या अहवालामध्ये तक्रारदाराचा पती हा दि.10.12.2014 रोजी संध्याकाळी 6 वाजता घराच्या बाहेर गेला त्यानंतर तो घरी परत आलाच नाही व शेवटी दि.14.12.2014 रोजी त्याचा मृतदेह शेतातील विहीरीमध्ये तरंगताना आढळला असा उल्लेख आहे. पोस्टमार्टमच्या तपासणी अहवालामध्ये तक्रारदार हिच्या पतीच्या मृत्यूची तारीख 14.12.2014 असल्याचा उल्लेख आहे. पण त्यामुळे तक्रारदार हिचा पती दि.10.12.2014 रोजी घर सोडून गेला अथवा दुस-या कोणत्या तारखेस गेला याचा बोध होत नाही, परंतू त्या परिस्थितीमध्ये तक्रारदाराचे प्रकरण संशयास्पद होत नाही.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन आमचे असे मत बनले आहे की, तक्रारदार हिचा पती विहीरीजवळून जात असताना अपघाताने त्याचा पाय निसटला व तो विहीरीत पडला, त्याला विहीरीच्या पाण्यातून स्वतःचा बचाव करण्याकरता बाहेर येता आले नाही. त्यामुळे तो गुदमरुन मेला, या वरुन तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू अपघाती असल्याचे निष्पन्न होते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव फेटाळणे बेकायदेशीर व चुक आहे. तक्रारदाराचा विमा दावा फेटाळणे ही विमा कंपनीची सेवेतील त्रुटी आहे असे आमचे मत आहे.
वरील कारणास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदार हिला या आदेशापासून 60 दिवसाच्या आत
विमा रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख) राष्ट्रीयकृत बॅंकेच्या
डिमांड ड्रॉफ्टमध्ये द्यावी.
3) सदर रक्कम विमा कंपनीकडून मिळेपर्यंत तक्रारदार हिला त्या रकमेवर
द.सा.द.शे.11 टक्के प्रमाणे व्याज दि.23.10.2015 पासून आकारण्याची
मुभा आहे.
4) या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार हिला
रक्कम रु.3,000/- द्यावी.
श्री सुहास एम.आळशी श्री के.एन.तुंगार
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना