तक्रार क्र.135/2015.
तक्रार दाखल दिनांक - 16/12/2015. तक्रार नोंदणी दिनांक - 19/12/2015
तक्रार निकाल दिनांक - 07/07/2016
कालावधी 06 महिने 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती जनाबाई भ्र.रोकडोबा पाथरकर, अर्जदार
वय ४1 वर्ष धंदा – घरकाम, अॅड.ए.एम.राऊत.
रा.चिंचटाकळी ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
1. विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार
टाटा ए.आय.जी.जनरल इन्श्योरन्स कंपनी लि, अॅड.अजय व्यास.
ए- 501, 5 वा मजला, इमारत क्र.4,इन्फीनीटी,
आय.टी.पार्क,दिंडोशी, मालाड (पुर्व) मुंबई.
मुंबई – 400097.
2. विभागीय व्यवस्थापक,
युनिव्हर्सल इन्श्योरन्स ब्रोकर्स सर्व्हिस प्रा.लि.,
1 ला मजला,ए विंग,भारत बाजार, प्रोझोन मॉल जवळ,
ए.पी.आय.कॉर्नर,एम.आय.डी.सी.
चिकलठाणा, औरंगाबाद-431003.
3. तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय, गंगाखेड,
ता.गंगाखेड जि.परभणी.
कोरम - श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. - मा.सदस्या.
नि का ल प त्र
(निकालपत्र पारीत द्वारा – मा. श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा)
अर्जदार ही मयत अपघातग्रस्त शेतकरी यांची पत्नी असून मौजे चिंचटाकळी ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहीवाशी आहे. अर्जदाराचे पती रोकडोबा निवृत्ती पाथरकर हे 20/06/2014 रोजी रेल्वे अपघाताने मृत्यू पावले आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांचे विमा पॉलसी करारानुसार होता. अर्जदाराने क्लेम फॉर्म विहीत नमुन्यात भरुन गैरअर्जदाराकडे पाठविला. तसेच क्लेम फॉर्मसोबत शेतीच्या पुराव्यासंबंधी कागदपत्रासह अर्ज पुर्ण करुन गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे दाखल केला त्यानंतर दि.14/11/2014 रोजी जिल्हा कृषी अधीकारी परभणी यांचेकडे पाठविला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव अर्जदारास विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज, क्लेम फॉर्म भाग 1 दाखल केला. अर्जदाराने गैरअर्जदारांना कागदपत्रांची पुर्तता करुन क्लेम अर्जाची चौकशी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे केली असता अर्जदारास विमा योजनेचा लाभ मिळू शकत नाही म्हणुन अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला. गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम अर्ज सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह परीपुर्ण असून शेतीच्या व अपघाताच्या पुराव्यासंबंधी सर्व पोलिस कागदपत्र, अपघाताच्या स्वरुपानुसार प्रपत्र ड मधील इतर सर्व कागदपत्र तसेच डॉ.एच.बी. देशपांडे, फोरेन्सीक मेडीसीन विभाग, स्वामी रामानंद तीर्थ, वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई यांनी प्रेताचे शवविच्छेदन व पहाणी करुन अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा रेल्वे अपघाताने अनैसर्गीकरीत्या झाला आहे असा अहवाल दिला आहे. अर्जदाराचे पती रोकडोबा निवृत्ती पाथरकर यांच्या नावे गट क्र.130 क्षेत्र 1 हेक्टर 86 आर मौजे चिंचटाकळी तलाठी सज्जा खळी ता.गंगाखेड जि.परभणी येथे शेत जमीन होती यांची नोंद गांव नमुना 7/12, 8 – अ, 6-क, ड इत्यादी कागदपत्रावर आहे. त्यानुसार अर्जदार ही अपघातग्रस्त शेतकरी यांची पत्नी असून कायदेशिर वारस आहे. अर्जदाराचे मयत पती रोकडोबा निवृत्ती पाथरकर हे दि.20/06/2014 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन गंगाखेड येथे रेल्वेने परळी येथील नातेवाईकांच्या भेटीला जाण्यासाठी गेले होते व परळीकडे जाणा-या रेल्वेची वाट पहात असताना अचानक रेल्वे मालगाडी आल्याने व ती येत असल्याचा अंदाज न लागल्याने तसेच रेल्वेच्या आवाजाने घाबरुन तोल जाऊन त्यांचा अचानक येणा-या रेल्वे मालगाडीची जोराची धडक बसल्याने त्यांचे डोके व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत होऊन बेशुध्द पडले व त्यांचा मृत्यु झाला. रेल्वे पोलिसांनी त्यांना सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे दाखल केले. सदरचे शेतकरी जनता अपघात विमा मिळण्यासाठी अर्जदाराने सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे क्लेम पाठविला असता गैरअर्जदाराने दि.22/05/2015 रोजी शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा दावा बेकायदेशीर नामंजुर केला. दि.17/04/2015 रोजी गैरअर्जदारांनी केलेल्या स्पष्टीकरणानुसार अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा रेल्वे अपघातामध्ये झाला. गैरअर्जदाराने आत्महत्या दाखवून अर्जदाराचा अर्ज नामंजुर केला. म्हणुन गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदाराला गैरअर्जदाराकडून रक्कम रु.1,00,000/- वर दि.20/06/2014 पासुन 18 टक्के प्रमाणे व्याज देण्यात यावे व मानसिक व शारिरीक त्रासापोटी 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.10,000/- देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे.
2008 (3) ALL MR (JOURNAL) 15, STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION,MUMBAI (AURANGABAD BENCH) S.G.DESHMUKH, President Judicial Member & Mrs.Uma S. Bora, Member. The New India Assurance Co. Ltd. Vs Smt. Hausabai Panalal Dhoka. First Appeal No.2405 of 1999 IN Consumer Complaint No.201 of 1999. 17 April 2007.
Question raised before Consumer Forum as to who was driving the vehicle at time of accident in question – Statements recorded by police officers during investigation under S.161 of Criminal P.C. – Cannot be read in evidence - Held, police statements have no evidential value unless the persons whose statements are recorded are examined before the Forum.
गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी कथन दि.05/05/2016 रोजी दाखल केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार वेडयाच्या परिस्थीतीत आत्महत्या केली असेल किंवा एच.आय.व्ही.असेल, आजारी असेल, मानसिक रोगी,एडस, या व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर असे व्यक्ति शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाहीत व अर्जदाराच्या मयत पतीच्या पंचनामामध्ये असा उल्लेख आहे की, अर्जदाराच्या पतीने आत्महत्या केलेली आहे. म्हणुन अर्जदाराच्या पतीचा मृत्यू आत्महत्या असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने सदरचा क्लेम फेटाळलेला आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांनी आपला लेखी खुलासा दि.21/01/2016 रोजी दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या पतीचा मृत्यू अपघाती नसुन आत्महत्या आहे आणि पोलिस पंचनामा चुकीचा आहे असे पत्र टाटा आय.जी. ने दि.08/06/2015 रोजी दिले आहे. परिछेद क्र.2 प्रमाणे अर्जदाराचे पतीचा मृत्यू रेल्वे खाली आत्महत्या केल्याने झाला आहे. विमा कंपनी या नात्याने दावा नामंजूर केला आहे तसे पत्र दि.08/06/2015 रोजी दिलेले आहे.
सदर प्रकरणांत गैरअर्जदारांना क्र.3 यांना नोटीस पाविण्यात आली त्यानुसार गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे मंचासमोर दाखल केले. तालुका कृषी अधीकारी यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा प्रस्ताव या कार्यालयास मिळाले प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता करुन दि.28/01/2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 ला पाठवीले त्यानंतर 25/03/2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 चे पत्रानुसार प्रस्ताव हा मृत्यू रेल्वे खाली आत्महत्या केल्याचे कारण दाखवून अर्ज नामंजुर करण्यात आले.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, साक्षीचे शपथपत्र, युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी कथन, साक्षीचे शपथपत्र्, युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर.
1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. आदेश काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र. 1 - चे उत्तर होय असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. मयत अर्जदाराचे पती रोकडोबा निवृत्ती पाथरकर यांचे नावे गट क्र. 130 क्षेत्र 1 हेक्टर 86 आर मौजे चिंचटाकळी ता.गंगांखेड जि.परभणी येथे शेत जमीन होती मृत्युच्या समयी मयत शेतकरी होते याबाबत कागदपत्र अर्जदाराने दाखल केलेली आहेत.
मुददा क्र.२ - चे उत्तर होय असून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दि.20/06/2014 रोजी झालेले आहे ही बाब पोलिस कागदपत्रावरुन दिसते. दाव्यातील कागदपत्रातील यादीतील नि.5/17 वर असे नमुद आहे की, रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्म नं.2 वरुन रेल्वे पटरी क्रॉस करीत असतांना अचानक तोल गेल्याने जवळून जाणारे माल गाडीच्या धडकेने त्यांचे डोक्यास गंभीर मार लागुन गंभीर दुखापत झाल्याने त्यास रेल्वे पोलिसांनी तेथील लोकांचे मदतीने उपचाराकामी सरकारी दवाखाना गंगाखेड येथे नेऊन तेथे त्यांचेवर उपचार करुन पुढील उपचाराकामी एस.आर.टी.आर. दवाखाना अंबाजोगाई येथे दवाखान्याचे अंबुलन्सने आणुन अपघात विभागात शेरीक केले असता उपचारा दरम्यान दि.20/06/2014 रोजी 14.30 वाजता मयत झाला आहे. तक्रारअर्जातील परिच्छेद क्र.6 मध्ये गंगाखेडे रेल्वे स्टेशन वरुन परळीकडे जाणारी माल गाडीचा आवाजाने घाबरुन तोल जाऊन त्यांना अचानक येणा-या रेल्वे माल गाडीची जोराची धडक बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर नि.5/20 वरील डॉ.देशपांडे यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालावर अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा Heamorrhage & shock due to polytrauna in Railway accident ( unnatural) डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे झालेला आहे असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. सदरील जनता अपघात विमा योजनेत शेतीचे व्यवसाय करतांना किंवा नैसर्गिक आपतीमुळे होणारे अपघात रस्त्यावरील अपघात,रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यु, विषबाधा,विज पडुन होणारे मृत्यू, विजेचा धक्का, पुर, खुन,सर्प दंश,विंचू दंश,जनावरांचे चावणे/हल्यामुळे या कारणांमुळे शेतक-याचा मृत्यू झाल्यास सदर शेतकरी वैयक्तिक जनता अपघात विमा योजनेत येणारी रक्कम मिळण्यास शेतकरी पात्र आहे. म्हणुन गैरअर्जदाराने घेतलेला उजर अर्जदार शेतकरी होता व त्याने आत्महत्या केली पोलिसांचे कागदपत्रावरुन असे कुठेच सिध्द होत नाही की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा आत्महत्या आहे. गैरअर्जदाराने आत्महत्या या सदराखाली कोणताही पुरावा कागदोपत्री अथवा साक्ष नमुद केलेली नाही. म्हणुन गैरअर्जदाराचा या उजराचा हे न्यायमंच विचार करु शकत नाही. तसेच रेल्वे अपघात हा अर्जदाराच्या पतीचा झालेला आहे. गैरअर्जदार क्र.1 ने त्यास आत्महत्या सांगून त्यास शेतकरी वैयक्तिक अपघात विमा या योजनेचा लाभ दिला नाही ही गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केल्याचे निष्पन्न होते. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे निष्पन्न होते. म्हणुन गैरअर्जदार क्र.1 विभागीय व्यवस्थापक,टाटा ए.आय.जी.जनरल इन्श्योरन्स कंपनी लि, यांनी अर्जदारांना रु.1,00,000/- देण्यात यावे व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/- व दावा खर्चापोटी रु.1,000/- देण्यात यावे असे मंचाचे मत आहे. ाभभ्भ् भभाा
यास्तव मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश.
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र.1 विभागीय व्यवस्थापक,टाटा ए.आय.जी.जनरल इन्श्योरन्स कंपनी लि, यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/- व दावा खर्चापोटी रु.1,000/- निकाल मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आंत अदा करावे.
3. उभयपक्षकार यांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा