ग्राहक तक्रार क्र. : 144/2014
दाखल तारीख : 11/07/2014
निकाल तारीख : 20/10/2015
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुर्याजी प्रभाकर पडवळ,
वय – 35 वर्ष, धंदा – व्यापार,
रा. उपळा, (मा) ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. विभागीय व्यवस्थापकप ससयससव्यवस्थापक,
श्रीराम जनरल इन्शुरन्स कं. लि.
इ.8, इ.पी. आय . पी. आर. आय. सी.ओ.
इंडस्ट्रीअल ऐरिया, सितापुर, जयपूर. 302022 (राजस्थान)
2. शाखा व्यवस्थापक,
श्रीराम जनरल इन्शुरन्स कं.लि.
तावडे कॉम्पलॅक्स, भानु नगर, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधिज्ञ : श्री.आर.एस.मुंढे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री. पी.व्ही. सराफ.
विरुध्द पक्षकार क्र.2 विरुध्द एकतर्फो आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) विरुध्द पक्षकार (विप) कडे आपले ट्रकचा विमा उतरला असतांना ट्रकला अपघात झाल्या नंतर विमा रक्कम नाकारुन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) याने ही तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक ने कुटुंबाची उपजिवीका भागविण्यासाठी ट्रक क्र.एमएच 12 इएफ 9595 खरेदी केला. ट्रकचा विप कडे दि.02/01/2013 ते 01/01/2014 या कालावधीसाठी विमा उतरवला. दि.17/05/2013 रोजी ट्रक हायवे क्र.17 वरुन अंकोला मार्गे चालला होता त्यावेळेस ट्रकला ट्रक क्र.एमएच 12 एफ. सी.6667 ने पाठीमागून धडक दिली. तक चा ट्रक त्यावेळेस कच्या रत्यावर उभा होता. अपघातात ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला. घटनेची पोलीस स्टेशन अंकोला जिल्हा उत्तर कन्नडा येथे गु.रं.क्र.113/2013 ने कलम 279,338 भा.दं.वि. अन्वये नोंद झाली. दि.17/05/2013 रोजी पोलिसांनी पंचनामा केला. ट्रकचा बंपर व पुढील शोचे नुकसान झाले. फ्रन्ट एक्सल तुटले. पुढील डव्या बाजूचा टायर एक्सल व्हिल असेंबली तुटली. पाठीमागील बॅडीचा शो तुटला. चेसी बेंड झाली.
3) तक ने रेणूका बॅाडी बिल्डर उस्मानाबाद यांचेकडून दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक घेतले. विप क्र.1 कडे विप क्र.2 मार्फत क्लेम पाठवला. विप यांनी दि.08/08/2013 चे पत्र पाठविले व लोड चलन पाठवण्यास सांगितले. तसेच क्लेम करण्यास तेरा दिवस ऊशीर झाल्याबद्दल खुलासा करण्यास सांगितले.
4) तक ने त्याप्रमाणे उशीराबाबत कारण व लोड चलन विप कडे पाठविले. विप यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर कळविले नाही. ट्रक दुरुस्तीविना पडून राहिला. विप क्र.2 मार्फत विप क्र.1 यांचे सक्षम अधिका-याकडून माहिती घेतली असता तुम्ही ट्रक दुरुस्त करा नंतर भरपाई मिळेल असे समजले. जुलै 2013 मध्ये ट्रकची दुरुस्ती झाली. दि.17/01/2014 रोजी आरपीएडीने त्याबद्दलच्या पावत्या विप कडे पाठविल्या. तक ला दुरुस्तीसाठी रु.3,77,305/- खर्च आला. त्याची मागणी करुनही विप ने भरपाई दिलेली नाही. तक ला दरमहा रु.40,000/- निव्वळ उत्पन्न मिळत होते ते बुडाले. त्याबद्दल रु.1,00,000/- विप कडून मिळणे जरुर आहे. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- मिळणे जरुर आहे व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळणे जरुर आहे. म्हणून ही तक्रार दि.11/07/2014 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
5) तक्रारी सोबत तक ने दि.17/01/2014 चे पत्राची प्रत, व खर्चाच्या पावत्यांच्या प्रती, खर्चाचे इस्टिमेट, आर.सी. बुक, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय आर, पॉलिसी, विप चे दि.08/08/2013 चे पत्र, इ. कागदपत्राच्या प्रती हजर केल्या आहेत.
6) विप क्र.1 ने दि.02/12/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले. सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही असे म्हंटले आहे. या विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही असे म्हंटले आहे. तक च्या ट्रकला अपघात झाला याची माहिती नाही असे म्हंटले आहे. तक चे माहितीनुसार दि.08/08/2013 रोजी पत्राव्दारे कळविण्यात आले की ए.के. कदम यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक करण्यात आली मात्र वाहनजागेवर पंचनामा करण्यास उपलब्ध नव्हते. क्लेमची माहिती 13 दिवस उशीराने देण्यात आली याचा खुलासा मागितला होता तसेच लोड चलन मागीतले होते. सात दिवसाच्या आत ही माहिती मागवली होती. तक ने केवळ उशीरा बद्दल कारण कळविले. तक ला ट्रक दुरुस्त करुन देण्याबाबत कधीही कळविले नव्हते.
7) विप क्र. 1 चे कार्यालय उस्मानाबाद येथे कधीही नव्हते. विमाधारकाने विमा कंपनीला तात्काळ माहिती देणे आवश्यक असते. तक ने असे न करुन अटीचा भंग केला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणेस विप जबाबदार नाही. त्यामुळे तक्रार रद्द होणेस पात्र आहे.
8) विप क्र.2 यांना मंचा तर्फे नोटीस पाठविण्यात आली. ते पाकीट पोष्टमनचा शेरा की, सदर कार्यालय दिलेल्या पत्यावर नाही यासह परत आले. तक ने अर्ज दिला की सदरहू कार्यालय त्याच ठिकाणी असून सिध्दार्थ ओहाळ तेथे काम करतो. त्याने पोष्टमनशी संगनमत करुन खोटा शेरा मरुन पाकीट परत पाठविले आहे. त्यासोबत तक ने शपथपत्रपण दाखल केले. त्यावर सुप्रिटेंन्डन्ट पोष्ट ऑफिस यांचा रिपोर्ट मागवण्या संबंधी आदेश झाला. तशी नोटीस जाऊनही पोष्टाकडून कोणताही रिपोर्ट प्राप्त झाला नाही. त्यामुळे विप क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
9) तक ची तक्रार त्याने दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) ही तकार चालविण्याचा या मंचास अधिकार आहे काय ? होय.
2) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
4) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
10) तक हा ऊपळा (मा) येथील राहणार आहे. विप क्र.1 सितापूर, जयपूर, राजस्थान येथील कार्यालय आहे. ट्रकचा क्रमांक एमएच 12 म्हणजे पुणे येथे नोंदवलेला आहे. विप कडे विमा पॉलिसी तक नेच काढलेली आहे. तक ने जयपूर येथे जाऊन विप क्र. 1 कडे विमा पॉलिसी काढली असेल अशी शक्यता फारच कमी आहे. तक चे म्हणणेप्रमाणे विप क्र. 2 हा विप क्र.1 चा उस्मानाबाद येथील प्रतिनिधी आहे. वर खुलासा केल्याप्रमाणे विप क्र. 2 विरुध्द तक्रार एकतर्फा चालण्याविषयी आदेश पारीत करण्यात आलेला आहे. तक ने विप क्र. 2 मार्फत ट्रकचा विमा उतरला व तो उस्मानाबाद येथेच उतरला हे उघड आहे. विप क्र. 1 चे पत्राप्रमाणे इंटीमेशन दि.29/05/2013 रोजी मिळाले होते व त्या नंतर ए.के. कदम यांना सर्व्हेअर नियुक्त केले होते. तक चे म्हणणे प्रमाणे विप क्र. 2 मार्फत त्याने विप क्र. 1 शी संपर्क साधला व क्लेम ची मागणी केली. अशा प्रकारे तक्रारीस कारण अंशत: या मंचाचे सथळसिमेत घडले आहे. विप चे पत्रपण या मंचाचे स्थळसिमेत तक ला मिळाले म्हणून ही तक्रार चालविण्याची या मंचाला अधिकार आहे. असे आमचे मत आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र. 2 व 3 :
11) एफ.आय.आर. अंकोला न्यायालयात दाखल झाल्याचे दिसते. कर्नाटकमध्ये उत्तर कन्नडा या जिल्यात ते ठिकाण आहे. अपघात तारीख 16/05/2013 दाखवली आहे. एफ.आय. आर. कानडीमध्ये आहे, तसेच इंग्रजी मध्ये भरलेला आहे. वेळ रात्री नऊची दाखवली आहे. आरोपीचे नाव अरुण बालकृष्णन रा.कालिकत असल्याचे दिसते. पंचनाम्याचा मराठी अनुवाद दिला असून तारीख दि.17/05/2013 रोजी केल्याचे दिसते. फिर्यादी विजयन असल्याचे नमूद आहे. तक चा ट्रक रत्याच्या डाव्या बाजूला कच्या रत्यावर उभा होता तो ढकलत जाऊन खडयात पडला. बंपर व पुढील शो डॅमेज झाला. फ्रंट एक्सल तुटला पुढील डाव्या बाजूचा टायर एक्सल व्हील असेंबल तुटला. पाठीमागील भागाचा शो डॅमेज झाला. चेसीला मार लागला असे पंचनाम्यात लिहिले आहे.
12) विप क्र. 1 ने हे मान्य केले आहे की सदरहू ट्रकचा त्याचेकडे विमा उतरला होता. विप चे पत्राप्रमाणे अपघाताची माहिती दि.29/05/2013 रोजी विप ला कळविण्यात आली. त्यानंतर दि.08/08/2013 रोजी विप तर्फे कदम सर्व्हेअर यांची नेमणूक केल्याबद्दल तक ला कळविण्यात आले. हे खरे आहे की अपघातानंतर ताबडतोब विप ला माहिती दिली हे दाखविण्यास तक कडे कागदोपत्री पुरावा नाही. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की अपघात हा कर्नाटक मध्ये झाला. तक त्या वेळेस ट्रकमध्ये नव्हता, त्याला ड्रायव्हरकडून माहिती मिळाली असणार. अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असे तक चे म्हणणे आहे. भा.दं.वि. कलम 338 प्रमाणे गुन्हा नोंदवलेला आहे. त्यानंतर तक ने रेणूका बॉडी बिल्डर उस्मानाबाद कडून इस्टीमेट घेतले. त्याची प्रत हजर केली आहे. त्याचा दि.31/05/2013 त्यामध्ये क्रेनचे भाडे रु.45,000/- समाविष्ठ आहे. विप चे म्हणणे प्रमाणे सर्व्हेअरची नेमणूक दि.08/08/2013 रोजी करण्यात आली. इतके दिवस वाहन अपघातस्थळी ठेवणे इष्ट नव्हते त्यामुळे वाहन हलवल्याबद्दल तक ला दोष देता येणार नाही.
13) विप क्र.1 ने हे मान्य केले आहे की तक तर्फे अपघाताची माहिती देण्यात आली. मात्र त्यासाठी तेरा दिवस लागले असे विप चे म्हणणे आहे. कारण माहिती दि.29/05/2013 रोजी मिळाली त्या आधी इंटीमेशन दिल्याबद्दल तक कडे कागदोपत्री पुरावा नाही. तक चे म्हणणे आहे की त्याने विप क्र. 2 मार्फत विप क्र.1 शी संपर्क साधला. विप क्र.2 हा विप क्र.1 चा उस्मानाबाद येथील प्रतिनिधी असल्याचे आम्ही वर म्हंटलेले आहे. त्यामुळे विप क्र. 1 कडे इंटीमेशन पोहचण्यास वेळ लागला याबद्दल तक ला दोष देता येणार नाही. इंटीमेशन देण्यास झालेल्या उशीराचे स्पष्टीकरण मिळाले हे विप क्र.1 ला कबूल आहे. त्यामुळे त्या मुद्यावर विप क्र.1 क्लेम फेटाळू शकणार नाही. असे आमचे मत आहे.
14) तक ने जे इस्टीमेट पाठवले ते रु.3,96,600/- चे आहे. नुकसानीची रक्कम रु.3,77,305/- दाखवली आहे. त्यापैकी ग्लास पार्टस किंवा रबर पार्टस हयाबद्दल भरपाई देता येणार नाही.
15) गाडीचे रजिष्ट्रेशन दि.28/01/2008 रोजी झालेले होते. अपघाता दिवशी गाडीला पाच वर्षाचे वर झालेले होते. त्यामुळे इतर पार्टस ला चाळीस टक्के डिप्रिसिऐशन लागू होते. ती रक्कम सुमारे रु.1,50,000/- होते. तसेच विप ने तक कडे लोड चलन मागितले. ते तक ने हजर केलेले नाही. कदाचित गाडी ओव्हर लोड असावी त्यामुळे तक लोड चलन हजर करीत नसावा. त्यामुळे नॉनस्टॅन्डर्ड बेसिसवर तक रु.2,00,000/- विमा भरपाई मिळण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) विप क्र. 1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयुक्तपणे तक ला विमा भरपाई रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) 30 दिवसाच्या आत द्यावी. न दिल्यास त्या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम देई पर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज द्यावे.
3) विप क्र.1 व 2 यांनी तक ला तक्रारीचा खर्च म्हणून एकत्रितपणे रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.