::: नि का ल प ञ :::
(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,)
(पारीत दिनांक ३०/०६/२०२२)
१. प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केलेली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिल प्रमाणेः-
२. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमाक १ उत्पादित पॅनासोनिक ए.सी. मॉडेल क्रमांक सीयू-एलयू १८ युकेवायआरएन मॉडेल वर्ष सीएस-यु १८ हा दिनांक २८/०५/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून रुपये ३८,०००/- ला खरेदी केला व त्याकरीता विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना रुपये १३३०/- डाऊन पेमेंट केले व बजाज फायनान्स कडून अर्थसहाय्य घेतले होते. पॅनासोनिक ए.सी. चा तपशील सीयू-एलयू १८ युकेवायआरएन २०१८, कुलींग क्षमता (१००%) ५००० वॅट, कुलींग क्षमता (५०%) २५० वॅट विद्यूतवापर १०१९.०७ युनिट प्रतिवर्ष, हिट पंप नसल्याचे पॉवर सेव्हींग गाईडमध्ये नमूद केलेले आहे. उत्पादन क्षमतेनुसार पॅनासोनिक ए.सी.चा दरदिवशी विद्युत वापर २.८३०७५ युनिट, एका महिण्याचा विद्युत वापर ८४.९२२५ युनिट तसेच एका वर्षात १०१९.०७ युनिट विद्युत वापर होणे आवश्यक आहे (८४.९२२५ x १२ = १०१९.०७). परंतू तक्रारकर्त्याने घेतलेल्या ए.सी.मध्ये दरदिवशी २० ते २५ युनिट वापर होत होता. तक्रारकर्त्याच्या घरातील अन्य विद्युत उपकरणे बंद करुन उपरोक्त पॅनासोनिक ए.सी. सुरु केल्यानंतर दरदिवशी २० ते २५ युनिट विद्युत वापर होत होता. त्यामूळे तक्रारकर्त्याने दिनांक ०१/०६/२०१८ रोजी कंपनीचे स्थानिक अधि़कृत सर्व्हीस सेंटर येथे ऑनलाईन तक्रार केली. कंपनीच्या अधिकुत सर्व्हीस अभियंत्याने तक्रारकर्त्याच्या घरी दिनांक २,३,४ व ५ जून २०१८ ला जाऊन घरात लावलेल्या ए.सी. ची पाहणी केली व तपासणी करतांना तक्रारकर्त्याच्या घरातील सर्व विद्युत दिवे व उपकरणे बंद केली त्यावेळी दर दिवशी २० ते २५ युनिट विद्युत वापर होत असल्याचे त्यांचे निदर्शनास आहे. परंतू विरुध्द पक्ष क्रमांक १ व२ ची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी जॉबसिटवर ए.सी. उत्तम स्थितीत असल्याचे लिहून तक्रारकर्त्याची स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. परंतू तक्रारकर्त्याने त्याकरीता स्पष्ट नकार दिला.
३. तक्रारकर्त्याकडे असलेल्या उपरोक्त ए.सी.मध्ये उत्पादित दोष आहे त्यामूळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी दोष निघाल्यास बदलवून देऊ अशी हमी दिल्याने त्यांना ए.सी. बदलवून मागितला, परंतू त्यांनी बदलवून दिला नाही. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ ला सुध्दा दोष असलेला ए.सी. पाठविलेला नाही. विरुध्द पक्ष्ा क्रमांक १ यांनी उत्पादित केलेल्या ए.सी. मध्ये दोष आहे. विरुध्द पक्षांच्य निष्काळजीपणामूळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व दोषयुक्त ए.सी. बदलवून न दिल्यामूळे तकारकर्त्याने दिनांक १८/०६/२०१८ रोजी विरुध्द पक्ष २ यांना अधिवक्ता श्री सी.यु. खोब्रागडे यांचे मार्फत नोटिस पाठविला, परंतू त्याचेसुध्दा उत्तर दिलेले नाही. विरुध्द पक्षांनी दोषयुक्त ए.सी. देवून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दर्शविलेली आहे म्हणून तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास दोष असलेला पॅनासोनिक कंपनीचा ए.सी. बदलवून सुस्थितीत असलेला दूसरा ए.सी. दयावा तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रुपये १५,०००/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये ५०००/- देण्याचे आदेशीत व्हावे.
४. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना नोटीस प्राप्त होऊन ते आयोगासमक्ष उपस्थित राहून त्यांनी प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी आपले लेखी जबाबामध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे कडून दिनांक २८/०५/२०१५ रोजी पॅनासोनिक ए.सी. विकत घेतला व त्यांनी प्रथमतः दिनांक ०१/०६/२०१८ रोजी घेतलेल्या ए.सी. ला अधिकचे युनिट लागत आहे याबद्दल तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्याबरोबर विरुध्द पक्ष यांचे तंत्रज्ञ यानी तक्रारकर्त्याकडे जावून ए.सी.ची तपासणी केली असता त्यामध्ये कोणताही दोष निदर्शनास आला नाही. तक्रारकर्त्याचा ए.सी. हा वारंटी कालावधीमध्ये असल्यामूळे तक्राकरर्त्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. तक्रारकर्त्याचा ए.सी हा चांगला आहे तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे नोदणीक्रुत कार्यालय हे गुडगाव, राज्य हरीयाणा येथे आहे. विरुध्दपक्ष क्रमाक १ विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण चंद्रपूर आयोगाचे अधिकारक्षेत्रात घडलेले नाही. सबब या कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी त्यांचे अधिकाराला बाधा न पोहचता लेखी उत्तरात तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक २ कडून पॅनासोनिक ए.सी. मॉडेल क्रमांक सीएस-एलयू’१८युकेवायआरएन खरेदी केल्याचे तसेच तक्रारकर्ता यांनी दिनांक ०१/०६/२०१८ रोजी ए.सी. हा पावर सेव्हींग मोडमध्ये दिेलेल्या युनिटपेक्षा अतिरीक्त युनिट जळत असल्याचे विरुध्दपक्ष क्रमांक १ यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर असलेले गल्फ सर्व्हीसेस मध्ये ऑनलाईन तक्रार केली. तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त होताच विरुध्दपक्ष यांचे तंत्रज्ञ तक्रारकर्त्याचे घरी गेले व ए.सी. ची तपासणी केली. ए.सी. ची तपासणी केली असता ए.सी.चे युनिटमध्ये कोणताही दोष नसल्याचे निदर्शनास आले. सदर ए.सी. हा पॅनासोनिक कंपनीने दिलेल्या मानके व वैशिष्टे प्रमाणे योग्य काम करीत आहे. सर्व्हीस सेंटरचे अभियंता यांनी तक्रारकर्त्याचे नांवे जॉबशिट तयार करुन त्यामध्ये ए.सी. मध्ये दोष नसल्याचे नमूद केले. याबाबी विरुध्दपक्ष क्रमांक १ यांनी मान्य केल्या असून तक्रारकर्त्याचे तक्रारीमधील उर्वरीत कथन नाकबूल करुन पुढे नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी दिनांक ०१/०६/२०१८ रोजी केलेल्या तक्रारीचे निवारण करुन ग्राहक सर्व्हीस सेंटरचे अभियंता यांनी जॉबशिट तयार करुन त्यामध्ये ए.सी. ओके असल्याचे नमूद केले व त्यावर तक्रारकर्त्यास सही करावयाचे सांगीतले असता तक्रारकर्ता यांनी सही करण्यास नकार दिल्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक ०७/०६/२०१८ रोजी ए.सी.मध्ये दोष नसल्याबाबत तक्रारकर्त्यास पत्र व मेल पाठविला. अधिकृत सर्व्हीस सेंटरच्या अभियंता यांनी उपरोक्त ए.सी.ची संपूर्ण तपासणी केली आणि युनिटचे वाचन घेतले असता त्यामध्ये २३८ व्होल्टचा पुरवठा आणि ७.६ ऍम्पीयर करंट आणि रिडींग घेतांना रात्री १०.३० वाजता (५२६७ किलोवॅट) व दूस-या दिवशी सकाळी ६.०० वाजता (५२७७ किलोवॅट) मिटरचे रिडींग घेतलेले आहे. तक्रारकर्त्याचा ए.सी. हा व्यवस्थित चालत असल्याने तक्रारकर्त्याने केलेले आरोप हे खोटे आहे. उपरोक्त ए.सी. मध्ये कोणताही दोष नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
५. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना नोटीस प्राप्त होऊनही ते आयोगासमक्ष प्रकरणामध्ये उपस्थित राहीले नसल्यामूळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक २३/०८/२०१८ रोजी निशानी क्रमाक १ वर करण्यात आला.
६. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याची तक्रार दस्तऐवज यातील मजकुरालाच तकारकर्त्याचे शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरसिस तक्रारकर्ता यांनी दाखल केली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्तर, दस्तऐवज, शपथपञ आणि लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी लेखीयुक्तीवाद दाखल केला असल्यामूळे त्यांना तोंडीयुक्तीवाद करावयाचा नाही अशी पुरसिस दाखल केल्यामूळे तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्ताऐवज व तोंडी युक्तिवाद तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दाखल केलेला लेखी जबाब, दस्तावेज, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचे होय
ग्राहक आहेत काय ॽ
२ प्रस्तूत तक्रार दाखल करण्याचे कारण होय
हे आयोगाच्या स्थानिक
अधिकारक्षेत्रात घडले आहे काय ॽ
. ३. विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांनी तक्रारकर्त्याप्रति नाही
न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ॽ
४. आदेश काय ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक १ बाबतः-
७. तक्रारकर्त्याने दिनांक २८/०५/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ उत्पादीत पॅनासोनिक कंपनीचा ए.सी. मॉडेल क्रमांक सीएस-एलयू-१८युकेवायआरएन हा विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून रुपये ३८,०००/- ला खरेदी केला व त्याकरिता बजाज फायनान्स कडून अर्थसहाय्य घेतले. तक्रारकर्ता यांनी निशानी क्रमांक ४ सोबत खरेदीची पावती दाखल केली आहे यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः-
८. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक २ – रघुकूल होम अप्लायन्सेस , चंदपूर यांचेकडून विरुध्द पक्ष क्रमांक १ निर्मीत पॅनासोनिक ए.सी. दिनांक २८/०५/२०१८ रोजी खरेदी केला आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी आपले लेखी उत्तरामध्ये त्यांचे अधिकृत तंत्रज्ञ/अभियंता हे तक्रारकर्त्याचे ए.सी. च्या अधिक युनिट जळत असल्याबाबत तक्रारीचे निवारण करण्याकरीता दिनांक ०१/०६/२०१८ रोजी तक्रारकर्त्याचे घरी गेले व ए.सी.ची संपूर्ण तपासणी केली, ही बाब मान्य केली आहे. याशिवाय विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी अनेक्शचर १/२ वर गल्फ सर्व्हीस सेंटर चे दिनांक ०७/०६/२०१८ चे पत्र दाखल केले आहे त्यावर Authorised Service Center पॅनासोनिक असे नमूद आहे. यावरुन तक्रार दाखल करण्याचे अंशतः कारण हे चंद्रपूर आयोगाच्या स्थानिक अधिकारक्षेत्रात उदभवलेले आहे. तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार ही जुना ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे आणि अंशतः कारण हे चंद्रपूर येथे उद्भभवल्याने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम ११(३) अंतर्गत प्रस्तूत प्रकरण चालविण्याचा चंदपूर आयोगाला अधिकार आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः
९. तक्रारीत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी दिनांक ०१/०६/२०१८ रोजी विरुध्द पक्षांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर गल्फ यांचेकडे तकारकर्त्याने घेतलेल्या उपरोक्त पॅनासोनिक ए.सी. हा त्याचे उत्पादन क्षमतेनुसार पॉवर सेव्हींग मोड मध्ये दिलेल्या दरदिवशीच्या विद्युत वापर २.८३०७५ युनिट पेक्षा २० ते २५ युनिट जास्त जळत आहे याबाबत ऑनलाईन तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच सर्व्हीस सेंटर चे अभियंता/तत्रज्ञ यांनी तक्रारकर्त्याचे दिनांक ०१/०६/२०१८ रोजीचे तक्रार क्रमांक आरओ १०६१८२१७७२२ चे जॉबकार्ड तयार करुन ए.सी. हा वॉरंटी कालावधीमध्ये असल्यामूळे विनाशुल्क ए.सी.ची संपूर्ण तपासणी करुन ए.सी. युनिटचे रिडींग वाचन सुध्दा घेतले असता, त्यामध्ये २३८ व्होल्टेज पुरवठा व विद्युत प्रवाह ७.६ अॅम्पीअर मिटरचे रिडींग घेतले असता त्यामध्ये रात्री १०.३० (५२६७ किलावॅट) ते सकाळी ६ पर्यंत (५२७७ किलोवॅट) रिडींग आणि ए.सी. युनिट मध्ये कोणताही दोष नसून व्यवस्थित काम करत असल्याचे निदर्शनास आल्याने तत्रज्ञ यांनी जॉबशिटवर “No defect found as technician visited set working OK” असे नमूद केले परंतू तक्रारकर्ता यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने विरुध्द पक्ष यांनी दिनांक ०७/०६/२०१८ चे ए.सी. मध्ये दोष नसल्याबाबतचे पत्र, मेल, फोटाग्राफ्स तक्रारकर्त्यास पाठविले. सदर जॉबशिट, पत्र, फोटोग्राफ्स विरुध्दपक्ष क्रमांक १ यांनी प्रकरणात दाखल केलेले आहे यावरुन ए.सी. मध्ये कोणताही दोष् नसल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्ता यांनी त्यांचेकडे असलेला उपरोक्त पॅनासोनिक ए.सी. हा पॉवर सेव्हींग मोड मध्ये दिलेल्या युनिटपेक्षा दरदिवशी २० ते २४ युनिट विद्युत पुरवठा जास्त घेतो व त्यामध्ये उत्पादीत दोष आहे याबाबत कोणत्याही तज्ञाचा स्वतंत्र अहवाल/ पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे अधिकृत तंत्रज्ञाने जॉबशिटवर ए.सी. ओके ची घेतलेली नोंद चुकीची व खोटी आहे हे सुध्दा खोडून काढलेले नाही. शिवाय स्वतंत्र तंत्रज्ञाकडून ए.सी. ची तपासणी करुन मिळाणेकरीता आयोगासमक्ष अर्जसुध्दा केला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे तक्रार केल्यावर अधिकृत तंत्रज्ञाकडून तपासणी करुन दिली आणि ए.सी. युनिट मध्ये दोष नसल्याबाबतची जॉबशिट दाखल केली.त्यामूळे विरुध्दपक्ष क्रमांक १ चे कथन पॅनासोनिकने दिलेल्या मानके आणि वैशिष्टयाप्रमाणे उपरोक्त ए.सी. व्यवस्थित काम करत असल्याचे कथन ग्राहय धरण्यायोग्य आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने C. N. Anantharam Vs. Fiat India Limited and others या प्रकरणात “Complaint of manufacturing defects in the vehicle – Manufacturer replaced the engine of the vehicle with a new one- No question of replacing the vehicle itself arises- If the independent technical expert directed to appointed by the District Forum is of the opinion that there are inherent manufacturing defects in the vehicle , the petitioner will be entitled to refund of the price of the vehicle and the lifetime tax and EMI along with interest @12% per annum and costs”. असा निर्वाळा दिला आहे. उपरोक्त न्यायनिवाडयाचे तत्व प्रस्तूत प्रकरणास लागू होते. या न्यायनिर्णयाचा आधार व वस्तूस्थिती विचारात घेता तक्रारकर्ता यांनी सुध्दा ए.सी. मध्ये उत्पादीत दोष आहे हे स्वतत्र् तज्ञाचा अहवाल दाखल करुन सिध्द केले नाही त्यामूळे त्यांची ए.सी बदलवून देण्याची मागणी ही कायदेशीर नाही. उलटपक्षी दाखल दस्ताऐवजांवरुन विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याने उपरोक्त ए.सी. बाबत तक्रार केल्यावर अधिकृत तंत्रज्ञाकडून ए.सी. ची विनाशुल्क तपासणी करुन ए.सी. मध्ये कोणताही दोष नसल्याबाबतची नोंद जॉबशिटवर घेतली व असे करुन विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत कोणतीही न्युनता दिली नसल्याचे सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे. सबब मुद्दा क्रमांक ३ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक ४ बाबतः-
१०. मुद्दा क्रमांक १ ते ३ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १०४/२०१८ खारीज करण्यात येते.
२. उभय पक्षांनी आपआपला तक्रारखर्च सहन करावा.
३. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.