::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये,श्रीमती कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्य)
(पारीत दिनांक :- 31/5/2017)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदार वाहतुकीचा व्यवसाय करतात. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून त्याचे वाहन क्र. एम.एच. -29 एम 553 चा पॉलिसी क्र. 181120/31/2008/7742 अन्वये विमा उतरविला होता. अर्जदाराने वरील वाहन गैरअर्जदार क्र.3 कडून कर्ज घेवून घेतले होते. सदर वाहन दिनांक 9.3.2008 रोजी वरोरा – भद्रावती रोडवर कोंडा फाटा टाकळी नाल्याजवळ नागपूर हायवे रोड येथून चोरीला गेले. अर्जदाराने पोलीस स्टेशन भद्रावती यांचेकडे तक्रार नोंदविल्यानंतर त्यांनी गुन्हा नोंदविला. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी तसेच गैरअर्जदार क्र.3 यांना वाहन चोरी झाल्याचे कळविले. अर्जदाराने वाहन चोरी गेल्यानंतर क्लेम नुकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.1 कडे क्लेम क्रं.181100/31/2009/000016 सर्व दस्तावेजासह दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 नी वेळोवेळी जी काही कागदपञे मागविली ती सर्व पुरविली, परंतु गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदाराचा क्लेम अजुनपर्यंत दिला नाही. गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 20.4.2010 ला अर्जदारास पञ पाठवून दस्तावेजांची पुर्तता करण्यास सांगीतले त्याप्रमाणे सर्व कागदपञे अर्जदाराने गैरअर्जदारक्र.1 कडे दाखल केले. त्यानंतर अर्जदारानी गैरअर्जदार क्र.1 यांना पुन्हा दिनांक 31.1.2011 रोजी एमडीएल कॉपी ऑफ ड्रायव्हर, डुप्लीकेट किल्ल्या, ओरिजनल डाक्युमेंटस याबद्दल पुर्तता केल्याचे कळविले. तसेच ओरिजनल डाक्युमेंट हरविले असल्यामुळे त्याबद्दलचे शपथपञ दाखल केले. तरी सुध्दा गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराच्या दाव्याची पुर्तता केली नाही व गैरअर्जदारांनी सेवा देण्यात न्युनता केली. म्हणून अर्जदाराने अधिवक्त्यामार्फत गैरअर्जदाराना दिनांक 23/6/2012 रोजी नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदारांनी त्याची पुर्तता केली नाही. सबब अर्जदाराने गैरअर्जदारांविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर वाहनाचे विम्याची रक्कम रुपये 10,68,400/- द्यावे. तसेच त्यावरील व्याज दिनांक 9/3/2008 पासून तो रक्कम वसूल होईपर्यंत द्यावे. तसेच अर्जदाराला झालेल्या मानसिक ञासापोटी खर्च रू.50,000/- व तक्रार खर्च रू.50,000/- गैरअर्जदार क्र.1 ने देण्याचा आदेश पारीत व्हावा तसेच वरील रक्कम सरळ फायनान्स कंपनी गै.अ.क्र.3 बॅंक यांना द्यावी अशी प्रार्थना केलेली आहे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने हजर होवून त्यांनी निशाणी क्र. 11 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द दि.14/1/2016 रोजी नि.क्र.1 वर आदेश पारीत करुन सदर प्रकरण नस्तीबध्द करण्यांत आले. तसेच गैरअर्जदार क्र.3 यांना नोटीस बजावणी होऊन सुध्दा हजर झाले नाही त्यामुळे गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर दिनांक 22.4.2013 रोजी पारीत केला.
3. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.11 नुसार दाखल केलल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने त्यांचेवर तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराच्या मालकीच्या टाटा 2515 ट्रक मॉडेल 2006, आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन क्र. एम.एच. -29 एम 553 हा गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 9.1.2008 ते दिनांक 8.1.2009 चे कालावधीकरीता पॉलिसी क्र. 181100/31/2008/7742 अन्वये विमाकृत केला. सदर विमा गैरअर्जदार क्र.3 व्दारे काढण्यात आलेला होता. अर्जदाराने दिनांक 18.3.2008 रोजी विभागीय कार्यालय चंद्रपूर येथे कळविले की, दिनांक 9.3.2008 रोजी विमाकृत सदर गाडी ही वरोरा-भद्रावती रोडने जात असतांना दोन अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबवून सदर गाडीच्या ड्रायव्हरला म्हटले की, ते फायनान्स कंपनीचे व्यक्ती असून गाडीचे मालकाने म्हणजेच अर्जदाराने फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरल्याने सदर गाडी जप्त करुन गाडी घेवून जात आहे. अशारितीने अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला सदर तथाकथीत घटनेच्या तब्बल 9 दिवसांनी सदर घटनेची माहिती कळविली व त्यानुसार गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला क्लेम फार्म दिला. सदर पॉलिसीमध्ये “Claim for theft of vehicle not payble if theft not reported to company within 48 hours of is occurrence.” नमूद अटीनुसार अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून नुकसान भरपाई मागण्यास पाञ नाही. अर्जदाराने गाडी चोरीची तथाकथीत घटना घडली त्यादिवशी सदर गाडीचा आर.टी.ओ.टॅक्स भरलेला नव्हता व अर्जदाराने सदर गाडी रोडवर चालविल्यामुळे मोटार व्हेईकल अॅक्टच्या कायदा व नियमांचे उल्लंघन केलेले होते. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास दिनांक 5.1.2009, दिनांक 19.2.2009, व दिनांक 6.3.2009 रोजी अर्जदाराला पञ दिले पण त्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मार्च 2009 मध्ये अर्जदाराचा क्लेम अर्ज खारीज करुन दप्तरी करण्यात आला. गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 28.1.2013 रोजी अर्जदाराचा क्लेम अर्ज खारीज केल्याबद्दल गैरअर्जदार क्र.3 ला कळविण्यात आले. सबब अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
4 अर्जदाराचा तक्रारअर्ज व गैरअर्जदाराचे लेखी उ्त्तर, उभय पक्षांचे दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवाद. अर्जदार यांना तोंडी युक्तीवादाकरीता संधी देवून सुध्दा प्रकरणात तोंडी युक्तीवाद केला नाही सबब नि.क्र.1 वर दिनांक 16.3.2016 रोजी अर्जदाराचे तोंडी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला. गैरअर्जदार क्र.1 ने तोंडी युक्तीवाद केला. परंतु प्रकरण पुनर्युक्तीवादास्तव ठेवण्यांत आले असता उभय पक्षांनी युक्तिवाद केला नसल्याने प्रकरण अंतीम आदेशाकरीता बंद करण्यांत आले. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरून खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील कारणमिमांसा व निष्कर्ष पुढीलप्रमाणे...
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीचा : नाही
अवलंब केला आहे काय ?
3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ?: नाही
4) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने टाटा कंपनीचा ट्रक क्र. एम.एच. -29 एम 553 गैरअर्जदार क्र.3 बॅंकेकडून कर्ज घेवून विकत घेतला होता व सदर वाहनाचा गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडून पॉलिसी क्र. 181100/31/2008/7742 अन्वये दिनांक 9/1/2008 ते दिनांक 8/1/2009 करीता विमा उतरविला होता. सदर बाब गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या लेखी उत्तरात मान्य केलेले असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराचे टाटा कंपनीचा ट्रक वाहन क्र. एम.एच. -29 एम 553 दिनांक 9.3.2008 रोजी वरोरा – भद्रावती रोडवर कोंडा फाटा टाकळी नाल्याजवळ नागपूर हायवे रोड येथून चोरीला गेले. अर्जदाराने पोलीस स्टेशन भद्रावती यांचेकडे दिनांक 9/3/2008 रोजी तक्रार नोंदविल्यानंतर त्यांनी गुन्हा नोंदविला. अर्जदाराने नि.क्र.6 वर दाखल केलेल्या दस्त क्र.3 अंतीम अहवाल (“A Summery”) या दस्तावेजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस आले की पोलिसांनी केलेल्या तपासात सदर वाहनाचा तपास लागला नाही. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांना दिनांक 18/3/2008 रोजी सदर वाहन चोरी झाल्याचे कळविले व तेंव्हाच गैरअर्जदाराने दिलेला क्लेम फॉर्म नुकसान भरपाई मिळण्याकरीता दाखल केला. अर्जदाराने चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला परंतु गैरअर्जदार क्र.1 कडे सदर चोरीबाबत तब्बल नऊ दिवसांनी कळविले हे अर्जदाराने नि.क्र.12 वर दाखल केलेल्या पहिली खबर व क्लेम फॉर्म या दस्तावेजांवरून सिध्द होते. अर्जदाराने क्लेम दाखल करण्यापूर्वी गैरअर्जदार क्र.1 ला वाहन चोरीबाबत सुचना दिली होती हे दस्तावेज दाखल करून सिध्द केलेले नाही.
7. गैरअर्जदाराने नि.क्र.12 वर दाखल केलेल्या दस्त क्र.1 पॉलिसीचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की,सदर पॉलिसीमध्ये “Claim for theft of vehicle not payble if theft not reported to company within 48 hours of its occurrence.” अशी अट नमूद आहे. सदर पॉलिसीचे अटींनुसार अर्जदाराने गैरअर्जदाराला वाहन चोरी झाल्याची सूचना चोरी झाल्यापासून 48 तासांत देणे आवश्यक होते मात्र अर्जदाराकडून सदर सुचना गैरअर्जदारांस देण्यांत विलंब झाला व तो विलंब का झाला याचे कारण किंवा स्पष्टीकरणही अर्जदाराने तक्रारीत नमूद केलेले नाही. ‘मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील नं.6739/2010,ओरिएंटल इंश्युरंस कंपनी विरूध्द परवेशचंद्र चढ्ढा मध्ये दिनांक 17/08/2010 रोजी दिलेल्या निवाडयातील न्यायतत्व प्रस्तूत प्रकरणात लागू पडते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचा विमादावा पॉलिसीचे शर्ती व अटींचा भंग केलेला आहे या कारणास्तव नामंजूर करून अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंब करून सेवेत त्रुटी दिलेली नाही असे मंचाचे मत आहे.
सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सहन करावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 31/05/2017