निकाल
दिनांक- 26.11.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार पांडूरंग बाबासाहेब मुंढे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,तक्रारदार हे स्कार्पीओ वाहन क्र.एम.एच.-23-वाय-7474 चे मालक आहेत. तक्रारदार यांनी सदरील वाहनाचा सामनेवाले यांचेकडे विमा उतरविलेला आहे. सदर विम्याची पॉलिसी नंबर163300/11/5035 असा आहे. पॉलिसीची मुदत दि.29.01.2011 ते 28.01.2012 पर्यत आहे. तक्रारदार हे सदरील वाहनाचा वापर स्वतःसाठी करतात. तक्रारदार यांचे वाहनावर सोमनाथ बाबूराव उढाण हे चालक म्हणून काम करतात. दि.19.08.2011 रोजी तक्रारदार यांचे घरातील माणसे व नातेवाईक सदरील वाहनाने ज्योतीबाचे दर्शनासाठी गेले होते. सदरील वाहनास मौजे दाणेवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर याठिकाणी अपघात झाला व वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील वाहन श्रीराम अँटोमोबाईल्स बीड यांचेकडून दूरुस्त करुन घेतले. तक्रारदार यांना दूरुस्ती कामी रु.30,000/- खर्च आला.
तक्रारदार यांनी सदरील वाहनाचा अपघात झाल्या बरोबर त्यांची माहीती सामनेवाले यांना दिली. सामनेवाले यांचे प्रतिनिधी आले व अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली. सामनेवाले यांचे प्रतिनिधी तक्रारदार यांचे नातेवाईकांची दिशाभूल करुन को-या कागदावर सहया घेतल्या. सदरील सहया हया ताबडतोब नुकसान भरपाई देतो असे सागून घेण्यात आल्या. सामनेवाले यांचे प्रतिनिधीनी सहया घेतलेल्या कागदावर खोटा मजकूर लिहून त्यांचा खोटा अहवाल सामनेवाले यांना दिला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम सदरील वाहन प्रवासी वाहतूक करण्यासाठी वापरले विमा पॉलिसीच्या अटीचा भंग झाला म्हणून क्लेम नांमजूर केला. तक्रारदार यांनी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही शर्ती व अटीचा भंग केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास दिलेला आहे. सबब तक्रारदार यांनी सदरील वाहनाचे झालेल्या नुकसानी बददल रक्कम रु.30,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- तसेच तक्रारीचा खर्च असे एकूण रु.65,000/- सामनेवाले यांचेकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.10 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन स्पष्टपणे नाकारले आहे. तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेल्या वाहनाचे मालक आहेत व सदरील वाहनाचा सामनेवाले यांचेकडे विमा उतरविलेला आहे ही बाब मान्य आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या शर्ती व अटीचा भंग केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम रास्त कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदार हे सदरील वाहन भाडे घेऊन प्रवासी वाहतूक करीत असताना त्यांचा अपघात झालेला आहे. सदरील वाहन हे तक्रारदार यांनी स्वतःचे वापरासाठी घेतलेले आहे व त्यांच कारणासाठी विमा पॉलिसी काढलेली आहे. तक्रारदार यांनी प्रवासी वाहतूक करणेकामी कोणतीही विमा कंपनी कडे रक्कम भरली नाही. त्यामुळे पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून कोणतीही रक्कम मागणी करता येणार नाही. सामनेवाले यांचे कथन की, तपासी अंमलदाराने तक्रारदार यांचे वाहनामध्ये जाणा-या प्रवाशाची चौकशी केली व त्यांचे जवाब घेतले व ते सदरील वाहन भाडयाने घेऊन गेले होते असे निष्पन्न होते. तसेच सदरील अपघाता बाबत पोलिसाकडे जी खबर दिल्या गेली व पोलिसाकडील कागदपत्रानुसार सदरील वाहनामध्ये परमिट नसताना प्रवासी वाहतूक केल्या गेली. सदरील बाब ही पॉलिसीमधील शर्ती व अटीचा स्पष्ट भंग करणारी आहे. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.14 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये सामनेवाले यांनी पाठविलेली नोटीस, श्रीराम अँटोमोबाईल्स बीड यांनी दिलेले वाहन दूरुस्तीचे बिल, ग्लास फिटींगची पावती, बॅटरी दूरुस्तीची पावती, पेंटींगसाठी लागलेल्या खर्चाची पावती, हजर केली आहे. तक्रारदार यांनी मोटार वाहन कव्हर नोट हजर केली आहे. सामनेवाले यांनी नि.13 अन्वये ज्या ज्या व्यक्ती तक्रारदार यांचे वाहनात प्रवास करीत होत्या त्या त्या व्यक्तीचे जवाब, विमा पॉलिसी, पुराव्याचे शपथपत्र नि.12 अन्वये दाखल केले आहे. तसेच दोषरोपपत्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पन्हाळा यांची झेरॉक्स प्रत, फिर्याद, पंचनामा, तपासाचे टिपन हजर केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.नागरे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.1 व 2 यांचे वकील श्री. वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत
त्रुटी ठेवली ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय नाही.
2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. खालील नमूद केलेल्या बाबीविषयी वाद नाही. तक्रारदार हे स्कार्पीओ वाहन क्र.एम.एच.-23-वाय-7474 चे मालक आहेत. सदरील वाहनाचा सामनेवाले यांचेकडे प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी अंतर्गत दि.29.01.2011 ते 28.01.2012 या कालावणीत विमा उतरविलेला होता. सदरील वाहनाचा अपघात न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पन्हाळा यांचे अधिकार क्षेत्रात पोलिस स्टेशन कोडोली हददीत अपघात झाला. त्या अपघातामध्ये सदरील वाहनाचे नुकसान झाले. सामनेवाले यांनी नुकसान झालेल्या वाहनाची सर्व्हेअर कडून तपासणी केली. तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्तीचा खर्च केला.
या मंचासमोर जो महत्वाचा मुददा आहे तो म्हणजे ज्या वेळी वाहनाचा अपघात झाला त्यावेळी सदरील वाहन प्रवासी वाहतूक करीत होते किंवा काय ? तसेच तक्रारदार यांनी जी विमा पॉलिसी घेतली होती त्या पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला आहे किंवा नाही ? तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत सदरील वाहनामध्ये तक्रारदार यांचे घरचे लोक व नातेवाईक हे ज्योतीबा येथे दर्शनासाठी गेले होते असे कथन केले आहे. थोडक्यात तक्रारदार यांचे म्हणणे की, सदरील वाहनाचा वापर हे स्वतःसाठी करीत होते. त्यामुळे विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही शर्ती व अटीचा भंग होत नाही व तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली मागणी मिळण्यास पात्र आहेत.
याउलट सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांचे वाहनामध्ये प्रवासी वाहतूक करीत असताना वाहनास अपघात झाला.त्यासंबंधी कोडोली पोलिस स्टेशन जिल्हा कोल्हापूर याठिकाणी सीआरपीसी कलम 173 प्रमाणे खबर दाखल करण्यात आली. पोलिसांनी वाहनामध्ये प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचे जवाब घेतले. तसेच सामनेवाले यांचे तपासणी अधिका-याने संबंधीत व्यक्तीचे जवाब घेतले तेव्हा त्यांनी सदरील वाहन भाडे तत्वावर घेतले आहे असे निवेदन दिले आहे. सदरील वाहनाचा भाडे घेऊन प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना नाही अगर तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे प्रवासी वाहतूक करण्या बाबत विमा उतरविलेला नाही. सदरील वाहनाच्या विम्याचे पॉलिसीचे स्वरुप प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी झोन-बी असा आहे. सदरील पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार वाहनाचा वापर प्रवासी वाहतूक करण्याचा नाही. जर प्रवासी वाहतूक केली असेल तर विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग समजावा. सामनेवाले यांचे मते तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र यांचे काळजीपुर्वक अवलोकन केले असता या मंचाचे मत की, तक्रारदार यांचे वाहन क्र. एम.एच.-23-वाय-7474 हे दि.19.08.2011 रोजी सकाळी 9.45 वाजेचे सुमारास वाघबीड ते ज्योतीबा जाणा-या रोडवर दाणेवाडी गावांचे हददीत अपघातग्रस्त झाले. तक्रारदार यांचे वाहनाने मोटार सायकल यांस धडक दिली. तक्रारदार यांचे ड्रायव्हर यांचा पोलिसांनी जवाब घेतला त्या जवाबात त्यांने त्यांचे गावांतील तीन व गेवराई येथील तिन लोक सदरील वाहनामध्ये देवदर्शना करिता घेऊन आले आहे असे नमूद केले आहे. सदरील अपघाताची पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाल्यानंतर पोलिसांनी वाहनामध्ये प्रवास करणा-या व्यक्तीचे जवाब घेतले. सदरील व्यक्तीचे जवाबाचे अवलोकन केले असता व तसेच सामनेवाले यांचे तपासणी अधिका-याने संबंधीत व्यक्तीचे जे जवाब घेतले त्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे वाहनामध्ये प्रवास करणा-या व्यक्ती यांनी सदरील वाहन भाडयाने घेतले होते व ते प्रवासी वाहतूक करीत होते हे सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरील वाहनाची पॉलिसी वैयक्तीक कार पॅकेज पॉलिसी अशा स्वरुपाची पॉलिसी घेतली होती. सदरील वाहन जर प्रवासी वाहतूक करीता वापरले तर विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग होईल असे स्पष्ट नमूद केलेले आहे. सबब, या मंचाचे मते तक्रारदार यांनी पॉलिसीच्या शर्ती व अटीचे अधीन राहून वाहनाचा वापर केलेला नाही. सदरील वाहनाचा वापर पॉलिसीत नमूद केलेल्या शर्ती व अटीचे विरुध्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा योग्य व वाजवी कारणासाठी नाकारलेला आहे असे या मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक