निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 17/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 26/11/2012 कालावधी 09 महिने, 23 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- - सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
कुंता भ्र.कारभारी बचाटे. अर्जदार
वय -25 वर्षे,धंदा – घरकाम अड.अरुण.डी.खापरे.
रा.वडगाव स्टेशन,ता.सोनपेठ.जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अशुरन्स कंपनी लि.पुणे
विभागीय कार्यालय क्र.153400,
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाउस रोड,पुणे.
2 शाखा व्यवस्थापक,
न्यु इंडीया अशोरन्स कं.लि.
यशोदीप नानलपेठ, परभणी.
3 विभागीय व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठीमागे
आकाशवाणी चौक,औरंगाबाद.
4 तालुका कृषी अधिकारी,
सोनपेठ ता.सोनपेठ जि,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. प्र.अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदारांचे पती श्री.कारभारी बालासाहेब बचाटे यांच्या मालकीची शेतजमीन मौजे वडगांव गट नं.4/1,173/2 येथे असून 7 x 12, 6 क, व 6 ड च्या उता-यावर नोंद आहे.तक्रारदारांचे पती ता. 13/09/2010 रोजी झालेल्या मोटारसायकल व कार अपघाता मध्ये गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालय परभणी येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान ता. 14/09/2010 रोजी मृत्यू पावले. सदर घटनेची माहीती संबंधित पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला, मयताच्या प्रेत पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालय परभणी येथे पाठवले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 4 यांचेकडे ता. 31/01/2011 रोजी पाठवला.त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ता.28/11/2011 रोजीच्या पत्रान्वये विमा प्रस्ताव नामंजूर केला.अपघाताचे वेळी मोटार सायकल चालकाकडे ड्रायव्हिंग लायसेन्स नव्हते, तसेच वाहन चालकाने दारुच्या नशेत मोटार सायकलवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले असल्याचे कारणास्तव प्रस्ताव नामंजूर केल्याबाबत नमुद केले आहे. गैरअर्जदार यांनी तांत्रिक कारणास्तव तकारदारांचा प्रस्ताव नामंजूर केला, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार पोलीसांनी अपघाता नंतर केलेल्या घटनास्थळ पंचनामा, F.I.R. नुसार तक्रारदारांचे पती मोटारसायकलवर मागे बसून इतर तीन व्यक्ती सोबत प्रवास करत होते. मोटारसायकल वाहन चालक दारुच्या नशेत तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स शिवाय वाहन चालवित होते. पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे इन्शुरन्स कंपनीने योग्य कारणास्तव तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर केला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव इन्शुरन्स कंपनीकडे पडताळणी करुन पाठविण्याची जबाबदारी पूर्ण केली.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांचा लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव ता.22/02/2011 रोजी मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांना पाठवला असून विमा कंपनीने क्लेम नाकारल्या बाबतचे पत्राची प्रत तक्रारदारांना पाठवली आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.ए.डी.खापरे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे विव्दान वकील श्री. जी.एच.दोडीया यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पतीच्या अपघाती मृत्यूनंतर तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत दाखल केलेला प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीने ता. 28/11/2011 रोजीच्या पत्रान्वये नामंजूर केला. सदर पत्राचे अवलोकन केले असता अपघाताचे वेळी मोटारसायकल वाहन चालक दारुच्या नशेत होता तसेच त्याचेकडे ड्रायव्हिंग लायसेंन्स नव्हते.तसेच मोटारसायकल वाहनाची क्षमता दोन व्यक्तींसाठी असूनही चार व्यक्ती प्रवास करत होते, असे नमुद केल्याचे दिसून येते.
तक्रारीतील कागदपत्रे म्हणजेच एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनामा यांचे अवलोकन केले असता सदरचा अपघात मोटारसायकल वाहन चालकाच्या निष्काळजीपणाने झालेला नसून कार वाहन चालका विरुध्द भा.द.वि. कायद्याच्या कलम 279, 337, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल झाल्याचे दिसून येते.
मोटारसायकलवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे तसेच मोटारसायकल वाहन चालकाने दारुच्या नशेत वाहन चालविल्यामुळे सदरचा अपघात झालेला नसून कारवाहन चालकाच्या निष्काळजीपणाने झाल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. मा.सवोच्च न्यायालयाच्या नागार्जून विरुध्द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ( AIR 1996 SC 2054 ) न्यायानिवाड्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी हे अपघात घडण्याचे कारण नसल्यामुळे विमा पॉलीसीचे मुख्यतः ( Fundamental breach ) उल्लंघन झाले नाही. अशा परिस्थितीत इन्शुरन्स कंपनीला जबाबदारी पूर्णतः टाळता येणार नाही.मोटार वाहन चालक अपघाताचे वेळी दारुच्या नशेत असल्याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने पुराव्यानिशी सिध्द केले नाही.तसेच अपघाताच्या वेळी मोटार वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसेन्स होते किंवा काय ? याबाबत कोणताही पुरावा न्यायमंचा समोर नाही.महाराष्ट्र राज्य आयोगाच्या आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार ( C.P.R. 2 (2008) 203 ) तसेच महाराष्ट्र राज्य आयोग, सर्किटबेंच औरंगाबाद यांचे पहीले अपील 661/2011 मध्ये ता. 17/02/2012 रोजी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव सोबत ड्रायव्हिंग लायसेन्स दाखल करण्याची आवश्यकता नाही.
वर नमुद केलेले न्यायनिवाडे सदर प्रकरणात लागू होतात, असे न्यायमंच नम्रपणे नमुद करत आहे.अपघाताचे वेळी तक्रादारांचे पती मोटारसायकल चालवित नव्हते.तसेच मोटार वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसेंन्स होते किंवा काय ? ही बाब स्पष्ट होत नाही. वरील न्यायनिवाड्यानुसार सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव सोबत ड्रायव्हिंग लायसेन्स दाखल करण्याची आवश्यकता नाही, हे स्पष्ट होत नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 विमा कंपनीने अयोग्य कारणास्तव तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर करुन त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते.असे न्यायमंचाचे मत आहे, त्यामुळे तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 विमा कंपनीने देणे न्यायोचित होईल. असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
शेतकरी व्यक्तीगत अपघात योजना अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम
रु.1,00,000/-फक्त ( अक्षरी रु.एकलाख फक्त ) आदेश मिळाल्या पासून 30
दिवसात द्यावी.
2 वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदरासहीत
द्यावी.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.