(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्या)
(पारीत दिनांक– 26 नोव्हेंबर, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून, तिचा मुलगा मृतक नामे श्री शुभम केशव खांडेकर हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा सातलवाडा, तालुका- साकेाली, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं- 534 ही शेत जमीन होती आणि त्यावर त्याचा आणि त्याचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन तसेच आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे मुलाचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा सरकाद्वारे काढण्यात आला असल्याने अविवाहित मुलाचे मृत्यू नंतर आई या नात्याने ती कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे मुलाला दिनांक-05/08/2016 रोजी तो शेतात काम करीत असताना विषारी साप चावल्यामुळे वैद्दकीय उपचारासाठी नेत असताना त्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-17.12.2016 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा प्रस्ताव दाखल केला. तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिचे विमा दाव्या बाबत तिला काहीही कळविले नाही म्हणून तीने माहिती अधिकार कायद्याखाली मा.कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे माहिती मागीतली असता त्यांनी दिनांक-07.11.2017 रोजी माहिती देऊन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिचा दावा “Rejected due no Viscera Report ” असे कारण दर्शवून नामंजूर केला असल्याचे कळविले. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा विनाकारण नामंजूर करुन तिला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारकर्तीने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षांकडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-17.12.2016 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-20,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष पान क्रं 68 ते 70 वर लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कपंनी तर्फे दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीच्या मुलाची शेत जमीन होती. तसेच तक्रारकर्तीचा मुलगा शुभम हा शेतात काम करीत असताना त्याला विषारी सर्पाने दंश केला आणि त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना दिनांक 05/08/2016 रोजी मृत्यू झाला या बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्तीचे मुलाचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा होता, त्याचे मृत्यू नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा सादर करण्यात आला होता या बाबी सुध्दा मान्य केल्यात. परंतु तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधिचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीने मृतकाचा व्हीसेरा रिपोर्ट दाखल न केल्याचे कारणा वरुन नामंजूर केला कारण व्हीसेरा रिपोर्ट दाखल करणे विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे बंधनकारक आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्याची कृती योग्य असल्याने त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तसेच विमा पॉलिसी प्रमाणे सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा अपघातात मोडत नाही. परंतु जर विमा रक्कम पाहिजे असेल तर व्हीसेरा रिपोर्ट दाखल करणे बंधनकारक आहे. सबब तक्रारकर्तीची तक्रार चुकीची असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, जिल्हा भंडारा यांनी पान क्रं 65 व 66 वर लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले. तक्रारकर्तीचे मुलाची शेतजमीन होती व तो शेतीचा व्यवसाय करीता होता ही बाब मान्य केली. मुलाचे मृत्यू नंतर तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह दिनांक-17.12.2016 रोजी दाखल केल्याची बाब मान्य केली. त्यांनी विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह लगेच त्याच दिवशी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात जावक क्रं-1385, दिनांक-17.12.2016 रोजी पाठविला होता. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे सर्वस्वी विमा कंपनीचे काम आहे, सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ठ क्रं- 17 नुसार एकूण-08 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2015-2016 शासन निर्णय, तक्रारकर्ती तर्फे मा.कृषी आयुक्त यांचेकडे माहिती अधिकारा अंतर्गत मागविलेली माहिती, विमा दावा प्रस्ताव, तक्रारकर्तीचे मुलाचे नावाचा 7/12 उतारा व ईतर शेतीचे दस्तऐवज, तक्रारकर्तीचे मुलाच्या अपघाता बाबत अकस्मात मृत्यू सुचना व ईतर पोलीस दस्ताऐवज, पी.एम. रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, तिचे मुलाचे वयाचा पुरावा अश्या दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 71 व 72 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला तसेच पृष्ट क्रं-76 व 77 वर तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला.
06.(अ) विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर पान क्रं 68 ते 70 वर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनी तर्फे पुराव्याचे शपथपत्र पृष्ठ क्रं- 73 ते 75 वर दाखल केले असुन तसेच पान क्रं 78 वर लेखी युक्तिवादा संदर्भात पुरसिस दाखल केली.
06.(ब) विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी पान क्रं 65 व 66 वर लेखी उत्तर दाखल केले.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथेवरील पुरावा आणि लेखी युक्तिवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीतर्फे लेखी उत्तर, शपथेवरील पुरावा त्याच बरोबर तक्रारकर्तीने प्रकरणांत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे ग्राहक मंचातर्फे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे.
:: निष्कर्ष ::
08. सदर प्रकरणांत विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 विमा कंपनी तर्फे दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीचा मुलगा नामे श्री शुभम केशव खांडेकर याचे नावे शेती असून तो शेतकरी होता व त्याचा शेतात काम करीत असताना सर्पदंशामुळे दिनांक 05/08/2016 रोजी मृत्यू झाला होता या बाबी संबधाने कोणताही विवाद उपस्थित केलेला नाही.
09. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधिचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीने मृतकाचा व्हीसेरा रिपोर्ट दाखल न केल्याचे कारणा वरुन नामंजूर केला कारण व्हीसेरा रिपोर्ट दाखल करणे विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे बंधनकारक आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
10. तक्रारकर्तीने तालुका कृषि अधिकारी, साकोली, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह दिनांक 17/12/2016 रोजी दाखल केला. तसेच विमा दावा प्रस्तावा सोबत 7/12 उतारा प्रत, ईतर शेतीची कागदपत्रे, पोलीस दस्तऐवज अकस्मात मृत्यू सुचना, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषन प्रतीवृत्त, वैद्दकीय रुग्णालय साकोली, जिल्हा भंडारा येथील शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र अशा सर्व दस्तऐवजाच्या सादर केल्याची बाब सिध्द होते.
11. वैद्दकीय रुग्णालय साकोली, जिल्हा भंडारा येथील मृतकाचे शवविच्छेदन अहवाला मध्ये “Opinion reserved for chemical analysis Report” असे नमुद केलेले आहे.
12. पोलीस स्टेशन साकोली, जिल्हा भंडारा यांचे अकस्मात मृत्यू सुचना, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषन प्रतीवृत्त इत्यादी दस्तऐवजां मध्ये मृतक शुभम केशव खांडेकर हा दिनांक-05.08.2016 रोजी शेतातील विहिरीवर असलेली मोटरपंप सुरु करण्या करीता गेला असता विषारी सापाने उजवे हाताचे करंगळीला व उजव्या पायाचे बोटावर चावा घेतला असता तो रोडवर बेशुध्द पडल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करुन तो मृत्यू पावल्याचे घोषीत केले असे नमुद केलेले आहे.
13. महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध्व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शेतकरी जनता अपघात विमा योजना मार्गदर्शक सुचना परिपत्रक दिनांक-04 डिसेंबर,2009 अनुसार प्रपत्र ड- शेतकरी अपघात विमा योजना-अपघाताचे पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे यामध्ये अनुक्रमांक-8 सर्पदंश/विंचूदंश या प्रकरणात प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टेम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल, मृत्यू दाखला (वैद्यकीय उपचारा पूर्वीच निधन झाल्याने पोस्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सुट मात्र वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्यकेंद्र अधिका-या कडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक) असे नमुद आहे. आमचे समोरील प्रकरणात मृतकाचे बाबतीत त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्या बाबत पोलीस स्टेशन साकोली, जिल्हा भंडारा यांचे अकस्मात मृत्यू सुचना, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषन प्रतीवृत्त इत्यादी दस्तऐवजां मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे. तसेच वैद्दकीय रुग्णालय साकोली, जिल्हा भंडारा येथे मृतकाचे शवविच्छेदन करुन तसा शवविच्छेदन अहवाल दिलेला आहे. फक्त मृतकाचा व्हीसेरा रिपोर्ट उपलब्ध नाही. मृतकाचा व्हीसेरा रासायनिक प्रयोगशाळेला पाठविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासकीय रुग्णालयाची आहे, त्या संबधाने तक्रारकर्तीला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्तीचा मुलगा नामे शुभम केशव खांडेकर याचा मृत्यू सर्पदंशाने झाल्या बाबत संपूर्ण पोलीस दस्तऐवज दाखल आहेत तसेच वैद्यकीय रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल सुध्दा आहे. व्हीसेरा रिपोर्ट हा मृत्यू संशयास्पदरित्या झालेला असेल तर महत्वाचा आहे परंतु हातातील प्रकरणात मृतकाचा मृत्यू हा सर्पदंशामुळेच झालेला आहे या बाबत सबळ पुरावा उपलब्ध आहे, केवळ व्हीसेरा रिपोर्टच्या अभावी हे दस्तऐवज निरर्थक आहेत असे म्हणता येणार नाही. व्हीसेरा रिपोर्ट हा एका सहाय्यकारी दस्तऐवज (Supporting document) आहे.
14. या संदर्भात हे मंच मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी पारीत केलेल्या पुढील निवाडयावर आपली भिस्त ठेवत आहे- III (2005) CPJ 224 Appeal No. 764 of 2002, Decided on-16/02/2005 “Laxman Manikrao Gawahane & Others-Versus-United India Insurance Company Ltd. & Others”
मंचा तर्फे मा. राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी पारीत केलेल्या सदर निवाडयाचे वाचन करण्यात आले, त्यामध्ये मा. राज्य ग्राहक आयोग यांनी असे मत नोंदविले की, जिल्हा ग्राहक मंचाने केवळ मृतकाचे व्हीसेरा अहवालाचा विचार करुन व्हीसेरा अहवाला प्रमाणे मृतकाचे शरिरात सर्पदंशाचे विष आढळून न आल्याने तक्रार खारीज केली परंतु सदर ग्राहक मंचाचा निर्णय चुकीचा असल्याचे नमुद करुन निवाडयात पुढे असे नमुद केले की, मृतकाचे शरिराचे रासायनिक विश्लेषण करताना अनेक कारणांमुळे मृत शरीरात विष आढळून येत नाही. परंतु अशा सर्पदंशाचे प्रकरणात संबधित न्यायाधिश यांनी निर्णय देताना अन्य शरिर लक्षणांचा सुध्दा विचार करायला पाहिजे, ज्यामध्ये मुख्यत्वे करुन शवविच्छेदन अहवाल आहे. आदरणीय राज्य ग्राहक आयोग यांचे समोरील प्रकरणात प्राथमिक आरोग्य केंद्र नेवासा यांचा मृतक मंगला हिचे उजव्या हाताला सर्पदंश केल्याचे आढळून आल्या बाबत अहवाल दाखल आहे. पोलीसांनी केलेल्या इन्क्वेस्ट पंचनाम्या मध्ये सुध्दा मृतक मंगला हिचे उजव्या हातावर सर्पदंश झाल्याची खूण असल्याचे नमुद केलेले आहे. शवविच्छेदन अहवाला मध्ये सुध्दा मृतक मंगला हिचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचे नमुद आहे. अशाप्रकारे दाखल असलेल्या अन्य आधारभूत (Supporting documents) दस्तऐवजांवरुन सिध्द होते की, मृतक मंगला हिचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढून मा. राज्य ग्राहक आयोग मुंबई यांनी तक्रारकर्त्याने दाखल केलेले अपिल मंजूर करुन जिल्हा ग्राहक मंच, अहमदनगर यांनी दिलेला निकाल रद्दबातल ठरवून विरुध्दपक्ष विमा कंपनीला विमा दावा रक्कम आणि नुकसान भरपाई तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित केले आहे.
15. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने लेखी उत्तरात तक्रारकर्तीचा विमा दावा तिने मृतकाचा व्हीसेरा रिपोर्ट सादर न केल्याचे कारणावरुन नामंजूर केला होता व तसे तक्रारकर्तीला लेखी पत्र दिले होते असे नमुद केले आहे परंतु या संबधात तक्रारकर्तीला विमा दावा नामंजूरीचे पत्र मिळाल्या बाबत रजि.पोस्टाची पोच तसेच नामंजूरीचे पत्र प्रकरणात पुराव्या दाखल सादर केलेले नाही. या उलट तक्रारकर्तीने तिचे विमा दाव्या संबधात माहिती अधिकारात तिचे वकील श्री उदय क्षिरसागर यांचे तर्फे माहिती मागविली असता पान क्रं 24 वर सांख्यिकी विभाग, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक-07 नोव्हेंबर,2017 रोजी माहिती देऊन तिचा विमा दावा हा “Rejected due to no Viscera” या कारणाने फेटाळला असल्याचे नमुद केले.
16. उपरोक्त नमुद केल्या नुसार दाखल दस्तऐवजी पुराव्यां वरुन मृतकाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याची बाब सिध्द होते परंतु केवळ व्हीसेरा रिपोर्ट नसल्याचे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला आहे, जेंव्हा की, इतर आधारभूत दस्तऐवजा (Supporting documents) वरुन पोलीस अकस्मात मृत्यू सुचना, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषन प्रतीवृत्त आणि शवविच्छेदन अहवाल यावरुन सिध्द होते की, मृतक याचा मृत्यू हा सर्पदंशामुळेच झालेला आहे. त्यामुळे आदरणीय राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी उपरोक्त नमुद दिलेला न्यायनिवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन तिला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते असे ग्राहक मंचाचे मत आहे.
17. या संदर्भात तक्रारकर्तीचे वकील श्री क्षिरसागर यांनी खालील मा.वरिष्ठ नयायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
(1) Order of Hon’ble State Commission, Circuit Bench Nagpur in First Appeal No.-FA/07/77-“Smt.Nirupa Vivek Bongirwar-Versus-State of Maharashtra” Order dated-06/09/2013
(02) III (2005) CPJ 224 “Laxman Manikrao Gawhane-Versus-United
India Insurance Co.”
(03) I (2016) CPJ 11 (NC) “Dharmsetty Sriniwas Rao-Versus-New
India Assurance Company”
(04) Order of Hon’ble National Commission in Revision Petition No.
471 of 2006, Order dated-25/05/2011-“National Insurance
Co.Ltd.-Versus-Shri Madhusudan Das.
उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायनिवाडयांचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले असता सदर निवाडयातील वस्तुस्थिती हातातील प्रकरणाशी थोडीफार वेगळी असली तरी त्यातील तत्व (Ratio) हातातील प्रकरणाशी जुळतात.
18. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- तिने सर्वप्रथम विमा दावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी साकोली, तालुका साकोली जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्याचा दिनांक-17/12/2016 नंतर महाराष्ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपत्रका प्रमाणे विमा कंपनीला विमा दावा निश्चीतीसाठी 60 दिवसाची मुदत देऊन म्हणजे दिनांक-17/02/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, तालुका साकोली, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
19. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंचा व्दारे खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अनुक्रमे विभागीय कार्यालय, पुणे आणि क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) दिनांक-17/02/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्ये नमुद केलेली देय विमा राशी मुदतीनंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्तीला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.