अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये खास मुखत्यार मार्फत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार हा कॉलरी मध्ये काम करीत असतांना दि.21.10.07 रोजी कोळसाची दरड कोसळून 15 फुटावरुन खाली पडला व त्यामध्ये गंभीर जखमी झाला. अर्जदार व त्याचे सोबत इतर सभासदानी एकञितपणे 1000 सभासदांचा जनता अपघात विमा काढला असून त्याचा एकञित विमा प्रिमिअम रुपये 2,50,000/- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेक क्र.953631 दि.25.3.99 अन्वये गै.अ.क्र.1 ला पाठविला होता व त्यानुसार गै.अ.क्र. 1 यांनी पॉलिसी नं.9601830/99 दिलेला होता. 2. सदर जनता अपघात पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार विमा कालावधी दि.31.3.99 पासून 30.3.2011 पर्यंत एकूण 12 वर्षाचा आहे व प्रत्येकाची सुरक्षीत रक्कम ही रुपये 5,00,000/- आहे. अर्जदाराचे वेळोवेळी ऑपरेशन करुन सुध्दा अर्जदारास झालेल्या गंभीर दुखापती पासून मुक्तता मिळालेली नाही व अर्जदाराला कायमचे अपंगत्व आले व त्यामुळे तो काम करण्यास असमर्थ झाला. अर्जदार आजमितीस एका जागेवरुन दुस-या जागेवर स्वतःहून हलू शकत नाही व त्याला 100 % कायम अपंगत्व आले आहे. 3. अर्जदाराने अपघाताची सुचना ताबडतोब गै.अ.ला लेखी सुचना देवून कळविले व आपला अपघाताबद्दल दावा सविस्तर विवरण व कागदपञासहीत रजिस्टर पञाव्दारे दि.27.1.09 रोजी सादर केले. सदर क्लेम गै.अ.क्र.1 यांना दि.29.1.09 रोजी मिळाला. अर्जदाराने वकीला मार्फत दि.29.11.10 रोजी गै.अ.स नोटीस पाठविला. गै.अ.ला नोटीस मिळुनही कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट, दि.3.12.10 रोजी गै.अ.क्र.1 यांनी यापूर्वीच ‘नो क्लेम’ चे रजिस्टर पञ अर्जदारास पाठविले. गै.अ.क्र.1 कंपनी अर्जदारास नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळण्यासाठी खोटी सबब पुढे करीत आहे. गै.अ.क्र.2 संस्था ही विद्यमान मंचाचे कार्यक्षेञात येत असून त्याचे माध्यमातून जनता अपघाता विमा काढला असून गै.अ.क्र.1 व 2 हे अर्जदारास विम्याची रक्कम देण्यास कायदेशीररित्या जबाबदार आहे. गै.अ.नी विमा पॉलिसीची रक्कम, क्लेम पाठवून दिलेली नाही व गै.अ. नी सेवेत न्युनता निर्माण केली आहे. त्यामुळे, अर्जदाराने जनता अपघात विमा क्लेम रुपये 5,00,000/- व त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे दि.1.4.09 पासून व्याजासह गै.अ. कडून मिळण्याचा आदेश व्हावा. अर्जदाराला तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- व शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- मिळण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदाराने नि.5 नुसार 20 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ. यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 ने नि.17 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.10 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 5. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराचे अपघाती अपंगत्वा बद्दल मजकूर हा माहिती अभावी नाकबूल. अर्जदाराचे अपघाती अपंगत्व बद्दल मजकूर हा माहिती अभावी नाकबूल. तसेच, अर्जदाराचे हे म्हणणे असंयुक्तीक व व्यवहारीक आहे की, प्रस्तूत प्रकरणातील वादाचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कोणताही संबंध नाही. कारण, विमा पॉलिसी ही बॅकेच्या नावांनी काढण्यात आलेली आहे म्हणून सदर बँक याप्रकरणी महत्वाची व आवश्यक पार्टी आहे. त्याच्या गैरहजेरीत ही तक्रार कायम स्वरुपात निकाली निघु शकत नाही. या कारणाने सदर तक्रार ही बेकायदेशीर असून अदखलपाञ आहे. अर्जदाराचे हे म्हणणे माहिती अभावी नाकबूल आहे की, अर्जदार एका जागेवरुन दुस-या जागेवर स्वतःहून हलू शकत नाही. गै.अ.ने पाठविलेल्या पञातील मजकूर हा खरा असून त्याकारणाने तक्रार बेकायदेशीर, मुदतबाह्य असून खारीज होण्यास पाञ आहे. 6. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराचा अपघाता हा दि.21 ऑक्टोंबर 2007 मध्ये झालेला असून त्याची सुचना अर्जदाराचे म्हणण्यानुसार प्रथमतः 27.1.09 रोजी म्हणजे घटनेच्या 1 वर्षानंतर देण्यात आलेली आहे. अर्जदाराने मागणी केलेले दस्ताऐवज पुरविलेले नाही म्हणून शेवटी गै.अ. कंपनीने सदर कारणाने, तसेच क्लेम हा अंतिविलंबाने दाखल केल्यामुळे नामंजूर केलेला आहे. केवळ नोटीसामुळे अर्जदाराचा क्लेम हा कायदेशीररित्या पाञ आहे असे गृहीत धरता येत नाही. अर्जदाराचा अपघात डयुटीवर असतांना घडून आलेला आहे, म्हणून यासंबंधी त्यास पोहचलेल्या नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी मालक डब्ल्यु.सी.एल. ची आहे व अर्जदाराला मालक डब्ल्यु.सी.एल कडून नुकसान भरपाई प्राप्त झाले आहे व त्यास 100 % अपंगत्व आले आहे व डब्ल्यु.सी.एल. ने त्याला ह्या कारणाने कामावरुन कमी केल्याचा पुरावा रेकॉर्डवर उपलबध नाही. म्हणून एकाच कारणाने दोनदा नुकसान भरपाईची मागणी बेकायदेशीर आहे. अर्जदाराची तक्रार ही बेकायदेशीर असून खारीज करण्यात यावी. 7. गै.अ.क्र.2 ने नि.10 वरील लेखी बयानात नमूद केले की, अर्जदार हा गै.अ.क्र.2 संस्थेचा सभासद आहे. अर्जदार हा नौकरीत कॉलरीत काम करीत असतांना त्याचा दि.21.7.07 ला अपघात झाला हे खरे आहे. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने गै.अ.क्र.2 मार्फत गै.अ.क्र.1 यांचेकडून विमा पॉलिसी काढली होती. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 यांचेकडे रुपये 250/- विम्याचा एकमुस्त हप्ता भरला होता हे म्हणणे खरे आहे. अर्जदार विमा पॉलिसीचे एक धारक होते. दुदैवाने अर्जदाराचा विमा पॉलिसी काळात अपघात झाला. त्यानंतर, गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराचा विमा क्लेम संपूर्ण कागदपञासहीत गै.अ.क्र.1 यांचेकडे पाठविला. परंतु, गै.अ.क्र.1 यांनी अर्जदाराचा विमा क्लेमची मागणी मान्य केली नाही. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे, अर्जदाराची, गै.अ.क्र.2 विरुध्दची मागणी अमान्य आहे. 8. अर्जदाराने नि.18 नुसार शपथपञ दाखल केला. गै.अ.क्र.1 यांनी दाखल केलेला लेखी उत्तरातील मजकूर व माहिती शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस नि.19 नुसार दाखल केली. गै.अ.क्र.2 यांनी नि.20 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाचे वकीलांनी केलेल्या लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर 1) अर्जदाराची तक्रार योग्य पक्ष न केल्याच्या कारणावरुन : नाही. खारीज होण्यास पाञ आहे काय ? 2) गै.अ. यांनी सेवा देण्यात न्युनता केली आहे काय ? : नाही. 3) अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पाञ आहे काय ? : नाही. 4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे @@ कारण मिमांसा @@ मुद्दा क्र. 1 : 9. अर्जदाराने सदर तक्रार ही गै.अ.चे विरुध्द दाखल करुन जनता अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम रुपये 5,00,000/- मागणी केली आहे. अर्जदाराने गै.अ.क्र.1 म्हणून विमा कंपनीला पक्ष केले आहे आणि गै.अ.क्र.2 म्हणून दुर्गापूर रय्यतवारी कॉलरी कामगार सहकारी पत संस्था, रजि.नं.343 चंद्रपूर यांना केले आहे. गै.अ.क्र.1 यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की, 1000 कर्मचा-यांचा विमा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे वतीने काढण्यात आला. त्यामुळे, त्याला पक्ष केल्याशिवाय त्याचे गैरहजेरीत ही तक्रार कायम स्वरुपात निकाली निघू शकत नाही, या कारणावरुन तक्रार ही बेकायदेशीर आहे. गै.अ.क्र.1 यांनी उपस्थित केलेला मुद्दा संयुक्तीक नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत विमा पॉलिसीची प्रत अ-5 वर दाखल केली आहे. सदर विमा पॉलिसीच्या झेरॉक्स प्रतीचे अवलोकन केले असता, विमा काढणारी व्यक्ती म्हणून दुर्गापूर रैय्यतवारी कॉलरी कर्मचारी सहकारी पत संस्था, रजि. नं.343 असा असून गै.अ.क्र.2 यांनी चंद्रपूर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक, चंद्रपूर चा चेक क्र.858631 दि.25.3.99 देवून 1000 सदस्यांचे विमा उतरविला आहे. यामुळे, चंद्रपूर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक, चंद्रपूर यांना गै.अ. न जोडल्याच्या कारणावरुन तक्रार खारीज होण्यास पाञ नाही. 10. गै.अ.क्र.1 यांनी नि.22 च्या यादीनुसार ब-2 वर गै.अ.क्र.1 ने गै.अ.क्र.2 ला दिलेल्या पञाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. सदर पञा सोबत गै.अ.क्र.1 ने दि.29.3.10 ला नो क्लेम केल्याच्या पञाची प्रत जोडली आहे. सदर पञाचे अवलोकन केले असता, गै.अ.क्र.1 ने दि.29.3.10 ला पाठविलेला पञ हा गै.अ.क्र.2 च्या पत्यावर पाठविलेला आहे. त्यामुळे, चंद्रपूर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक, चंद्रपूर यांना पक्ष न केल्याचा, गै.अ.क्र.1 ने उपस्थित केलेला मुद्दा ग्राह्य धरण्यास पाञ नाही, असे या न्यायमंचाचे ठाम मत असल्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 2 व 3 : 11. गै.अ.क्र.1 कडून, गै.अ.क्र.2 ने घेतलेला जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढला होता, त्याचा पी. क्र.9601830/99 असा असून विमा कालावधी 31.3.99 ते 30.3.2011 असा असून प्रत्येक विमा धारकासाठी रुपये 250/- प्रमाणे प्रिमिअमचा भरणा करुन रुपये 5,00,000/- चा विमा काढण्यात आला, याबाबत वाद नाही. गै.अ.क्र.1 ला विमा क्लेम मिळण्याकरीता प्रस्ताव पाठवूनही रुपये 5,00,000/- चा क्लेम कायम अपंगत्व आल्यामुळे मागणी करुनही दिला नाही, ही गै.अ.क्र.1 व 2 चे सेवेतील न्युनता आहे, असे अर्जदाराने तक्रारीत कथन केले आहे. परंतु, उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.क्र.1 यांनी सेवा देण्यात न्युनता केली ही बाब सिध्द होत नाही. तसेच, गै.अ.क्र.2 ला केंव्हा क्लेम मिळण्याकरीता कागदपञ सादर केले, याचा काहीच उल्लेख नाही. 12. अर्जदाराचा अपघात दि.21.10.07 ला गै.अ.क्र.2 कडे काम करीत असतांना दरड कोसळून झाला. अपघातानंतर अर्जदाराला उपचाराकरीता रुग्णालयात भरती करण्यांत आले. अर्जदाराने शूअरटेक हॉस्पीटल रिचर्स सेंटर, धंतोली नागपूर येथे उपचार करण्यात आला, ऑपरेशन करण्यात आले. अर्जदाराला कायम अपंगत्व आल्यामुळे तो काम करण्यास असमर्थ झाला असल्याने ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लुर येथे पाठविण्यात आले, तरी काही उपयोग झाला नाही. अर्जदार जागेवरुन उठू शकत नाही. त्याला 100 % कायम अपंगत्व आले. गै.अ.क्र.1 यांनी जनता अपघात पॉलिसीच्या कालावधीत अपघात झाला असल्याने रुपये 5,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु, अर्जदाराने आपले तक्रारीत असे कथन केले आहे की, अपघाता बद्दल दावा सविस्तर विवरण व कागदपञासहीत दि.27.1.09 रोजी सादर केला व तो दावा दि.29.1.09 रोजी गै.अ.क्र.1 ला मिळाला. या अर्जदाराच्या कथनावरुन जनता विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचे पालन अर्जदाराने केलेले नाही. वास्तविक, अर्जदारानी अपघातानंतर ताबडतोब सुचना विमा कंपनीला द्यावयास पाहिजे, किंवा पॉलिसीच्या शर्ती व अटी नुसार 1 वर्षात विमा क्लेम सादर केला पाहिजे. याबाबत, गै.अ.क्र.1 ने नि.22 वर पॉलिसी शर्ती अटीची प्रत दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराने अपघात दि.21.10.07 पासून 27.1.09 पर्यंत गै.अ.क्र.1 ला कोणतीही सुचना दिलेली नाही. म्हणजेच, अर्जदाराने 1 वर्ष 3 महिने 2 दिवसानंतर विमा क्लेमचा दावा गै.अ.क्र.1 यास सादर केला. अर्जदाराने, विमा दाव्यासोबत कोणते कागदपञ सादर केले याबद्दलचा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीच उल्लंघन केले असल्यामुळे आणि विमा क्लेम पाठविण्यास झालेल्या विलंबाचे स्पष्टीकरण केले नाही, यामुळे गै.अ.क्र.1 यांनी विमा क्लेम दिला नाही म्हणून सेवा देण्यात न्युनता केली, ही बाब सिध्द होत नाही. 13. गै.अ.क्र.2 यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. गै.अ.क्र.2 ने अर्जदाराची पूर्ण तक्रार मान्य केली आहे. अर्जदारास सेवा देण्यात न्युनता केली नाही व गै.अ.क्र.1 ने कोणताही पञ व्यवहार त्यांचेशी केले, हे अमान्य केले. तर, अर्जदाराचा विमा क्लेम गै.अ.क्र.2 यांनी संपूर्ण कागदपञासहीत गै.अ.क्र.1 कडे पाठविला व वेळोवेळी अर्जदाराला मदत केली आहे. गै.अ.क्र.2 यांनी, गै.अ.क्र.1 कडे केंव्हा विमा क्लेम पाठविला याबाबतची कुठलेही पुरावा सादर केलेले नाही. उलट पक्षी, गै.अ.क्र.1 ने नि.22 ब-2 नुसार पाठविलेल्या पञानुसार दि. 29.3.10 ला पञ पाठविल्याचे पञ दाखल केले आहे. गै.अ.क्र.2 ने मोघमपणे आपले कथन करुन संपूर्ण जबाबदारी गै.अ.क्र.1 वर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक, अर्जदारानेच विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचे उल्लंघन करुन विमा क्लेम अपघाताचे 1 वर्षानंतर सादर केला असल्याने गै.अ. यांनी सेवा देण्यात न्युनता केली, ही बाब सिध्द होत नाही. गै.अ.क्र.1 चे वकीलांनी लेखी युक्तीवादा सोबत मा.सर्वोच्च न्यायालय यांनी नशॅनल इंशु.कं.लि.-वि.- सुजीर गणेश नायक अन्ड कंपनी व इतर, 1997 NCJ 603 (S.C.) या प्रकरणाचा हवाल दिला. सदर प्रकरणात दिलेले मत या प्रकरणातील बाबीला लागू पडतो. 14. गै.अ.क्र.1 चे वकीलांनी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदारास कायम अपंगत्व आल्यामुळे गै.अ.क्र.2 ने सेवेतून कमी केल्याचा पुरावा सादर केला नाही. तसेच, वेस्टर्न कोल्ड फिल्ड लि. कडून नुकसान भरपाई संबंधीचा पुरावा सादर केलेला नाही, या कारणामुळे तक्रार खारीज करण्याची मागणी केली. अर्जदाराचे वकीलांनी याबाबत असे सांगितले की, कामगार नुकसान भरपाईचा दावा (workman compensation) हा वैधानिक दावा (Statutory) असून गै.अ.क्र.1 काढून काढलेल्या विमा पॉलिसीतील दावा हा करारात्मक दावा (contractual) आहे. त्यामुळे, गै.अ. करारानुसार अर्जदाराचा अपघात झाल्यामुळे कायम 100 % अपंगत्व आल्याने जनता अपघात विमा क्लेम देण्यास पाञ आहे. अर्जदाराच्या वकीलाचे हे म्हणणे संयुक्तीक नाही. गै.अ.क्र.1 शी contractual करार झालेला असल्याने त्याचे पालन करणे दोन्ही पक्षावर बंधनकारक आहे. याबाबत, मा.सर्वोच्च न्यायालयाने वर उल्लेखीत न्यायनिवाडयात आपले मत स्पष्टपणे दिलेले आहे. प्रस्तूत प्रकरणात कराराच्या शर्ती व अटीप्रमाणे अर्जदाराने अपघातानंतर 1 वर्षाचे आंत सुचना देवून क्लेम सादर करावयास पाहिजे, अशी अट असतांनाही त्याचे पालन केले नाही हा अर्जदाराचा निष्काळजीपणा असून त्याला गै.अ. जबाबदार नाही. या एकमेव कारणावरुन तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही. 15. अर्जदाराने, अपघातामुळे 100 % अपंगत्व आल्याचे कथन केले आहे. याबाबत, पुरावा सादर केला नाही आणि अ-6 नुसार झेरॉक्स अपंगत्व सर्टीफिकेट दाखल केली आहे. त्यात 60 % अपंगत्व आल्याचे दाखविलेले आहे. गै.अ.क्र.1 चे वकीलाने लेखी युक्तीवादात असे म्हटले आहे की, 60 % दर्शविलेले अपंगत्व कायम स्वरुपी 100 % अपंगत्व असल्याचे सिध्द होत नाही. याबाबत, जास्त विस्तृत भाष्य करणे वरील विवंचनेवरुन संयुक्तीक होणार नाही. गै.अ. यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही, त्यामुळे अपंगत्वाच्या कारणावरुन अर्जदार विमा क्लेम मिळण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र.4 : 16. वरील मुद्दा क्र. 1 ते 3 च्या विवेचने वरुन, गै.अ. यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार नामंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |