(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार मा.सदस्या)
(पारीत दिनांक – 20 मे, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तिचे आईच्या मृत्यू संबधात विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिची मृतक आई वंदना उर्फ प्रेमाबाई केवळराम बाकमवार ही व्यवसायाने शेतकरी होती व तिच्या मालकीची मौजा ईटगांव, तालुका-पवनी, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-608 ही शेत जमीन असून त्यावर तिचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात आणि विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा सरकारद्वारे काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे आईचा दिनांक-13/11/2016 रोजी म्हशीने शिंगाने उचलुन फेकल्याने मृत्यू झाला. तिच्या आईचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा असल्याने तिने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-26/12/2016 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्द पक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केल्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीतर्फे तक्रारकर्तीच्या आईच्या विमा दाव्याबाबत दिनांक 14/09/2017 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्तीचा विमा दावा “अधिवक्त्याच्या मतानुसार दावा नामंजूर” हया शे-याने विमा दावा फेटाळल्याचे कळले. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्द पक्षांकडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-26/12/2016 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून त्याला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीतर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीच्या तक्रारीला सक्त विरोध केला असून, लेखी कथनात नमुद केले की, तक्रारकर्तीची आईचे नाव श्रीमती वंदना उर्फ प्रेमाबाई केवळराम बाकमवार नाही. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा “अधिवक्त्याच्या मतानुसार दावा नामंजूर” हया शे-याने फेटाळला आहे. विरुध्द पक्षाने आपले विशेष कथनात नमुद केले की, सदरहु प्रकरणांत गुरुदेव केवळराम बाकमवार मु.पो. निलज यांनी मृतक वंदना केवळराम बाकमवार यांचा क्लेम फॉर्म भरलेला आहे. घटनेची रिपोर्ट गुरुदेव केवळराम बाकमवार यांनीच दिलेली आहे आणि त्यात देखील मृतकाचे नाव सौ. वंदना केवळराम बाकमवार असेच दिलेले आहे. सदरहु घटनेच्या संबंधात विमा कंपनीने चंद्रपूर येथील वकील श्री. मुरलीधर बावनकर यांची Investigator म्हणून नियुक्ती केली होती व त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन तसेच पोलीस स्टेशनची कागदपत्रे पडताळून आपला अहवाल 24/08/2017 रोजी विमा कंपनीला सादर केला आणि सदर अहवालानुसार विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा अधिवक्त्याच्या मतानुसार नामंजूर केला. तक्रारकर्तीने प्रकरणांत दाखल केलेले तलाठयाचे प्रमाणपत्र,7/12 उतारा व गाव नमुना 6-क यामध्ये मृतकाचे नाव प्रेमाबाई ज. केवळराम बाकमवार हेच नाव लिहीलेले आहे या बाबींवरुन मृतक वंदना केवळराम बाकमवार ही शेतकरी नसल्यामुळे तिचे वारस ह्या विमा योजनेच्या अंतर्गत येत नाही. तसेच विमा कंपनीचे Investigator वकील श्री. मुरलीधर बावनकर यांनी सादर केलेला अहवाल मान्य करुन योग्य निर्णय विमा कंपनीने घेतलेला आहे. सदरहु प्रकरणांत विमा कंपनीची कोणतीही हयगय व निष्काळजीपणा नाही. विरुध्द पक्ष विमा कंपनीने विमा अटी व शर्तीचे आधीन राहून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला, यात त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे नमुद करुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, पवनी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे लेखी उत्तरात असे नमुद केले की, मृतक वंदना केवळराम बाकमवार वारसदार श्री. गुरुदेव केवळराम बाकमवार यांनी सदर अपघाती मृत्युबाबत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-26/12/2016 रोजी दाखल केल्यानंतर त्यांनी त्रृटी पुर्तता करुन सदर विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-26/12/2016 रोजी सादर केला. विमा कंपनीने विमा प्रस्ताव REJECTED Due to No Name 7/12 अश्या शे-यासह कळविले आहे. त्यांनी तक्ररीकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 10 नुसार एकूण-10 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, विमा कंपनीने विदा दावा फेटाळल्याचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, तक्रारकर्तीच्या आईच्या शेताचा 7/12 उतारा व इतर शेतीचे कागदपत्रे, तक्रारकर्तीच्या आईचे अपघाताबाबत अकस्मात मृत्यु खबर व पोलीस दस्तऐवज, शव विच्छेदन अहवाल, उपविभागीय दंडाधिकारी, ब्रम्हपूरी यांनी दिलेल्या आदेशाची प्रत, ग्राम अधिकारी कुर्झा यांचा चौकशी अहवाल, तक्रारकर्तीच्या आई वडीलांची लग्नाची पत्रिका, तक्रारकर्तीच्या भावाचे शपथपत्र अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 72 वर तक्रारकर्तीचे शपथपत्र दाखल केले असून, तक्रारकर्तीतर्फे लेखी युक्तीवाद पृष्ट क्रं- 77 वर दाखल केला आहे..
06. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे भंडारा येथील वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी पुराव्या दाखल पान क्रं- 75 वर शपथपत्र दाखल केले असुन, पृष्ठ क्रं. 81 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीतर्फे लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्तीतर्फे वकील श्री. उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनीतर्फे वकील श्री. व्ही. एम. दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, विरुध्द पक्ष क्रं. 1 व 3 युक्तिवादाचे वेळी गैरहजर. त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे.
:: निष्कर्ष ::
08. सदर प्रकरणांतील मृत्यु अपघाती स्वरुपाचा असल्याचे उभय पक्षात वादातीत नाही. विरुध्द पक्ष विमा कंपनीने 7/12 उता-यावर शेतक-याच्या नावाचे साधर्म्य नसल्याच्या कारणावरुन विमा दावा नामंजूर केला आहे.
तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिची आई वंदना उर्फ प्रेमाबाई केवळराम बाकमवार असुन तिची आई शेतकरी असल्याकारणाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची लाभधारक आहे. याउलट विरुध्द पक्ष विमा कंपनीचे म्हणण्यानुसार तक्रारकर्तीच्या आईचे नाव श्रीमती वंदना उर्फ प्रेमाबाई केवळराम बाकमवार नाही तसेच 7/12 व इतर कागदपत्रे यात मयताचे नावात साधर्म्य आढळून येत नाही. त्यामुळे मृतक वंदना केवळराम बाकमवार ही शेतकरी नसल्यामुळे तिचे वारस ह्या विमा योजनेच्याअंतर्गत येत नाही. विरुध्द पक्ष विमा कंपनी यांनी विमा अटी व शर्तीचे अधीन राहुनच विमा दावा नामंजूर केला असल्याचा बचाव घेतलेला आहे.
मंचाद्वारे अभिलेखावरील दाखल सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्तीचे आईचे अपघाती मृत्यु संबंधात विमा दावा प्रस्ताव मयताचे वारसदार श्री. गुरुदेव केवळराम बाकमवार यांचेकडून दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील मयताचे लग्नापूर्वीचे नाव प्रेमाबाई ज्योतीराम एंन्चीलवार असुन लग्नानंतरचे नाव वंदना केवळराम बाकमवार असल्याबाबतीत मयताचे वारसदार गुरुदेव केवळराम बाकमवार यांनी त्याबाबतचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केल्याचे अभिलेखावरील दाखल पृष्ठ क्रं. 25 नुसार दिसून येते. सदर प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केले असता सदरचे प्रतिज्ञापत्र श्री. गुरुदेव केवळराम बाकमवार यांनी केल्याचे दिसून येते. त्यात त्यांनी त्यांच्या आईचे प्रेमाबाई व वंदना ही दोन्ही नावे लग्ना आधीचे व लग्नानंतरचे असल्याचे नमुद केले आहे तसेच वरील दोन्ही नावे एकाच व्यक्तीची आहे असेही नमुद केले आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रं. 52 वर ग्राम अधिकारी, कुर्झा तालुका पवनी जिल्हा भंडारा यांनी दिलेला चौकशी अहवाल दाखल आहे त्यात वंदना केवळराम बाकमवार व प्रेमाबाई केवळराम बाकमवार ही दोन्ही एकाच व्यक्तीचे नावे आहेत असे अर्जदाराने सादर केलेले पुरावे व गावात केलेल्या चौकशीनुसार सिध्द होते असे नमुद केलेले आहे.
09. तक्रारकर्तीने अभिलेखावर तिचे आई-वडीलांची लग्नाची पत्रिका दाखल केली आहे. त्यात चि. केवळराम भिकाजी बाकमवार यांचे लग्न श्री. ज्योतीराम ऐंन्चीलवार यांचे कन्येशी प्रमिलाबाई हिचेशी दिनांक 11/05/1990 रोजी झाल्याची बाब स्पष्ट होते. मंचाचे मते लग्न पत्रिकेतील प्रमिलाबाई हे नाव इतर कोणत्याही कागदपत्रावर नमुद नाही, त्यामुळे सदरचे नाव केवळ लग्नाचे पत्रिके पुरते छापण्यात आले असु शकते. लग्न पत्रिकेनुसार वधुचे वडीलांचे नाव श्री. ज्योतीराम ऐंन्चीलवार असे आहे. अभिलेखावरील पृष्ठ क्रं. 35 वर दाखल 7/12 वर मुळ मालकाचे नाव ऐंन्चीलवार दयाराम ज्योतीराम असल्याचे नमुद आहे. तसेच वारसदार म्हणून प्रेमाबाई ज. केवळराम बाकमवार राहणार निलज ह्या नावाची नोंद आहे. ज्योतीराम ऐंन्चीलवार यांच्याच कन्येचा विवाह केवळराम बाकमवार यांचेशी झाल्याची बाब लग्नाचे पत्रिकेद्वारे स्पष्ट आहे. सदरच्या फेरफाराची नोंद मयतेच्या विवाहानंतर म्हणजेच 2015-2016 मध्ये झाल्याचे दिसून येते. अभिलेखावरील पृष्ठ क्रं. 34 वर गाव नमुना 6-क वारसा प्रकरणांची नोंदवहीचे अवलोकन केले असता मृत ज्योतीराम नारायण ऐंन्चीलवार यांचे कायदेशीर वारसदार म्हणून प्रेमाबाई ज. केवळराम बाकमवार रा. निलज हिचे नावाची नोंद मुलगी म्हणून झाली असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ ज्योतीराम नारायण ऐंन्चीलवार यांची मुलगी प्रेमाबाई केवळराम बाकमवार हिच आहे जिचे लग्न केवळराम बाकमवार यांचेशी झाले असुन तिचे लग्नानंतरचे नाव वंदना केवळराम बाकमवार असे होते. भारतीय रुढी, प्रथा व परंपरेप्रमाणे लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याची प्रथा आहे. अश्या रुढी परंपरेमुळेच तक्रारकर्तीच्या आईचे नावात बदल झाल्याचे दिसून येते. मृत प्रेमाबाई केवळराम बाकमवार यांना सदरची शेतजमीन वडीलांकडून म्हणजेच ज्योतीराम नारायण ऐंन्चीलवार यांचेकडून मिळाली असल्याचे अभिलेखावर दाखल गाव नमुना सात ची प्रत, तसेच गाव नमुना 8-अ या प्रतिवरुन स्पष्ट होते.
प्रेमाबाई केवळराम बाकमवार यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसानांची नोंद गाव नमुना 6-क फेरफार नोंदवही यावरुन झाल्याचे दिसून येते. त्यात गुरुदेव केवळराम बाकमवार (मुलगा) ब्रम्हदेव केवळराम बाकमवार (मुलगा), सपना केवळराम बाकमवार (मुलगी) यांची कायदेशीर वारसदार म्हणून नोंद झाल्याचे स्पष्ट होते. मंचाचे मते प्रेमाबाई व वंदना या दोन वेगळया व्यक्ती असल्यास त्यांच्या वारसानांची नावे सारखी असणे ही बाब अशक्यप्राय आहे, त्यामुळे विरुध्द पक्षाच्या प्रेमाबाई व वंदना या भिन्न व्यक्ती आहेत या कथनात तथ्य दिसून येत नाही.
10. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर व शपथपत्रातील कथनानुसार विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा अटी व शर्तीचे आधीन राहून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याचे नमुद केले. विरुध्द पक्ष विमा कंपनीचे Investigator वकील श्री. मुरलीधर बावनकर यांनी सादर केलेला आहे, परंतु सदरचा सर्व्हे अहवाल सर्व्हेअर यांच्या शपथपत्राशिवाय दाखल करण्यात आल्याचे दिसून येते.
या अनुषंगाने मंचाने आपली भिस्त मा. राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या National Insurance Co. Ltd V/s Mohd. Ishaq 2012 (1) CPR 386 (NC) या न्याय निवाडयावर ठेवली आहे.
सदरच्या न्याय निवाडयामध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे. “ 6 Therefore, in our view, the district forum as well as the State Commission have very rightly rejected the report of the surveyor on the ground it is not supported by the affidavit of its author”
हातातील प्रकरणामध्ये सुध्दा विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे Approved Surveyor यांचा सर्व्हे अहवाल शपथपत्राशिवाय दाखल केलला आहे, त्यामुळे सदरचा सर्व्हे अहवाल ग्राहय धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन अपघात झाल्याचे तसेच मृतक मृत्युसमयी शेतकरी असल्याची बाब स्पष्ट होते. सदर प्रकरण मृतकाचे अविवाहीत मुलीने दाखल केले आहे. त्याबाबतीत इतर वारसानांचे ना-हरकत संमतीपत्र तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केले आहे. मंचाचे मत विरुध्द पक्ष विमा कंपनीने विनाकारण तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याने त्यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते, म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
11. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिच्या आईच्या अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- तक्रार दाखल दिनांक-15/05/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, पवनी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला पतीच्या अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-15/05/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत अदा करावे. मुदतीच्यानंतर प्रकरणांत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह अदा करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.