(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार मा.सदस्या)
(पारीत दिनांक – 20 मे, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तिचे पतीचे मृत्यू संबधात विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री ईस्तारी साधु शेंडे हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा बेटाळा, तालुका-मोहाडी, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-914/5 ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा सरकारद्वारे काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा दिनांक-12/09/2016 रोजी आपले बैलासोबत वैनगंगा नदी ओलांडत असता नदीत वाहुन गेल्याने मृत्यू झाला. तिचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा असल्याने तिने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-15/02/2017 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्द पक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. परंतु तिला विमा दावा प्रस्तावा संबधाने विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीतर्फे विमा दावा मंजूर वा नामंजूर न केल्याने तक्रारकर्तीने वकीलामार्फत माहिती अधिकार कायद्दाखाली कृषी आयुक्तालयात माहिती मागितली असता तक्रारकर्तीचा दावा “rejected due to no P.M. report” हया शे-याने विमा दावा फेटाळल्याचे रिजेक्ट यादीवरुन कळले. सदर विमा दावा फेटाळल्याबाबत विरुध्द पक्षांनी आज पर्यंत तिला कळविलेले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळल्याबाबत तिला पत्र पाठविले नसल्याने सेवेत त्रृटी ठेवली. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्द पक्षांकडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-15/02/2017 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीतर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीच्या तक्रारीला सक्त विरोध केला असून, विषेश कथनात नमुद केले की, तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्तावासोबत शव विच्छेदन अहवाल जोडलेला नव्हता, त्यामुळे विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव नामंजूर केलेला आहे. सदरहु घटनेचा पोलीस विभागाद्वारे तपास करण्यात आला आणि त्यांनी मर्ग क्रं. 8/16 कलम 174 जा. फौ. अन्वये गुन्हा दाखल केला. विरुध्द पक्ष विमा कंपनीने विमा अटी व शर्तीचे आधीन राहून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला, यात त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे नमुद करुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ती श्रीमती पुस्तकला ईस्तारी शेंडे हिचा पती श्री. ईस्तारी साधु शेंडे यांचा पाण्यात बुडून दिनांक-12/09/2016 रोजी मृत्यू झाला. तक्रारकर्तीने तिचे पतीचे अपघाती मृत्युबाबत शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-15/02/2017 रोजी दाखल केल्यानंतर त्यांनी त्रृटी पुर्तता करुन सदर विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-15/02/2017 रोजी सादर केला. पुन्हा मा.जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालय भंडारा यांचे दिनांक-03/03/2017 रोजीचे पत्रा नुसार त्रृटींची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाने दिनांक-13/07/2017 रोजी पत्रानुसार त्रृटींची पुर्तता करुन सादर केलेले आहे. मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे दिनांक-08/09/2017 रोजीचे पत्राअनुसार तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याचे पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. विमा दावा प्रस्तावातील त्रृटी संबधाने त्यांनी वेळोवेळी तक्रारकर्तीशी पत्रव्यवहार करुन त्रृटीची पुर्तता केली. त्यांनी तक्ररीकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 10 नुसार एकूण-08 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, कृषी आयुक्तालय यांचे कडून मागविलेली माहिती, विमा दावा प्रस्ताव, शेतीचे कागदपत्रे, तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यूबाबत पोलीस दस्तऐवज, शव विच्छेदन अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र, मृतकाचा वयाचा दाखला अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 67 वर तक्रारकर्तीचे शपथपत्र दाखल केले असून, तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला नाही.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे भंडारा येथील वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी पुराव्या दाखल पान क्रं- 73 वर शपथपत्र दाखल केले असुन, पृष्ठ क्रं. 71 लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीतर्फे लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्तीतर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनीतर्फे वकील श्री व्ही.एम.दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता, त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता व तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक 12/09/2016 रोजी पाण्यात बुडून मृत्यु झाला या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. या मधील विवाद अत्यंत संक्षीप्त स्वरुपाचा आहे की, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात व शपथपत्रात तक्रारकर्तीने पतीच्या मृत्यु बाबतचा शव विच्छेदन अहवाल विमा प्रस्तावासोबत दाखल न केल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्यात आला असा बचाव घेतलेला आहे.
09. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर व शपथपत्रातील कथनानुसार विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा अटी व शर्तीचे आधीन राहून तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केल्याचे नमुद केले. विरुध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केलेल्या पृष्ठ क्रं. 76 चे मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमा दावा कोणत्या कारणाने नामंजूर केल्याचे पत्र पाठविले होते, परंतु सदर पत्रावर सदर व्यक्ती कन्हाळगाव येथे नाही मुंढरी कन्हाळगाव पोस्टाने पेड होण्यास परत असा शेरा लिहीलेला दिसून येते. विरुध्द पक्ष विमा कंपनीने जरी तक्रारकर्तीला पत्र पाठविलेले होते, परंतु योग्य पुराव्याअभावी सदरचे पत्र तक्रारकर्तीला मिळाले ही बाब सिध्द होत नाही. अभिलेखावरील विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले पृष्ठ क्रं. 77 वरील पत्राचे मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्द पक्षाने दिनांक 28/07/2017 रोजी तक्रारकर्तीला पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट व 6-क न पाठविल्यामुळे दावा नामंजूर केल्याचे नमुद केले आहे. अभिलेखावर दाखल पृष्ठ क्रं. 28 नुसार मृतक र्इस्तारी साधु शेंडे यांचे मालकीची मौजा बेटाळा, तालुका-मोहाडी, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-914/5 ही शेत जमीन होती ही बाब दाखल गाव नमुना-7,7 अ व 12 चे प्रतीवरुन दिसून येते. अभिलेखावरील पृष्ठ क्रं. 29 वर फेरफार नोंदवही दाखल केली आहे त्यामध्ये दिनांक 20/06/1990 मध्ये तक्रारकर्तीचे नावे फेरफार झाल्याची नोंद झाल्याचे दिसून येते तसेच तक्रारकर्तीने अभिलेखवरील पृष्ठ क्रं. 37 वर शव विच्छेदन अहवाल दाखल केलेला आहे. ज्यात पोलीस स्टेशन करडी, जिल्हा भंडारा याचे घटनास्थळ पंचनाम्यात मृतक ईस्तारी साधु शेंडे यांचा मृत्यू वैनगंगा नदीच्या पुरात वाहुन गेल्याने झाल्याचे नमुद आहे. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वेलतुर, यांचे शवविच्छेदन अहवालामध्ये मृतकाचे मृत्यूचे कारण “P.M. appearance is Suggestive of Death is most probably due to drowning” असे नमुद आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने शव विच्छेदन अहवाल न मिळाल्याविषयी घेतलेला आक्षेप अमान्य करण्यात येतो.
विरुध्द पक्ष क्रं. 2 विमा कंपनीने युक्तिवादाचे दरम्यान त्यांचे दिनांक 28/07/2017 रोजीचे विमा दावा नामंजूर केल्याचे पत्र दाखल करीत विरुध्द पक्ष क्रं. 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा 6-क तसेच शव विच्छेदन अहवालाची प्रत नसल्यामुळे नामंजूर करण्यात आला असा युक्तिवाद केला आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 विमा कंपनीने दाखल केलेल्या लेखी युक्तिवादात सुध्दा शव विच्छेदन अहवाल तसेच 6-क न मिळाल्यामुळे दावा नामंजूर केल्याचे कथन केले आहे, परंतु 6-क न मिळाल्याबाबतचा कोणताही उल्लेख त्यांनी त्यांचे लेखी उत्तरात व शपथपत्रात केलेला नाही. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी स्वतःच त्यांचे लेखी उत्तरात व मौखिक युक्तिवादात नवीन कारण दाखवित विमा दावा नाकारण्याचे नवीन विसंगत कारणे उपस्थित केलेले आहे. युक्तिवादादरम्यान दाखल दिनांक 28/07/2017 चे विमा दावा नामंजूरीचे पत्र आता ग्राह्य धरणे उचित होणार नाही. कारण त्यात नमुद कारण विरुध्द पक्षाने कधीही तक्रारकर्तीला कळविलेले नाही, तसेच 6-क ची प्रत विरुध्द पक्ष विमा कंपनी यांनी तक्रारकर्तीकडून मागीतली होती याबाबतही विरुध्द पक्ष विमा कंपनीने लेखी पुरावा दाखल केला नाही.
10. या संदर्भात तक्रारकर्तीचे वकीलांनी पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली. मंचातर्फे त्या निकालपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आलेत.
2018 (1) CPR 305 (NC) - “Bajaj allianze -Versus- Harpal Singh & Anr. ”
(2) 2008 CPJ 371 (NC) - “New India Assurance Co.Ltd.-Versus- State Of Haryana & Ors.”
(2) 2013 CPJ 486 (NC) - “New India Assurance Co.Ltd.-Versus- Jitenderkumar Sharma.”
11. मंचा समोरील हातातील प्रकरणात उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयानीं दिलेले न्यायनिवाडयातील तत्व (Ratio) लागू पडतात. हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती ही एकमेकांशी जुळत असून सदरचे निवाडे हे हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे मंचाचे मत आहे. विनाकारण तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याने त्यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते, म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- तक्रार दाखल दिनांक-05/04/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला पतीच्या अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-05/04/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत अदा करावे. मुदतीच्यानंतर प्रकरणांत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला आदेशीत रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह अदा करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.