(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 30 जानेवारी 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हिचे पतीने जिवंतपणी गैरअर्जदारांकडून वेळोवेळी एकूण सात जिवन पॉलिस्या काढल्या होत्या. अर्जदार हिचे पती दि.25.10.2011 ला मरण पावले. पतीचे मृत्युपश्च्यात अर्जदार हिने गैरअर्जदाराच्या गडचिरोली शाखेत गैरअर्जदार क्र.3 कडे सात पॉलिसीचे आवश्यक कागदपञासह क्लेम सादर करुन त्यावरील मिळणा-या मोबदल्याची मागणी केली. गैरअर्जदार क्र.2 ने एकूण सात पॉलिस्यांपैकी फक्त तीन पॉलिस्यांचे भुगतान केले होते आणि उर्वरीत चार पॉलिस्यांचे भुगतान करण्यास नाकारले. गैरअर्जदार क्र.2 ने आपले पञ दि.15.4.2013 व्दारे पॉलिसी क्र.973869299 रुपये 7,00,000/- व पॉलिसी क्र.973876156 रुपये 3,00,000/- या दोन पॉलिस्या नाकारल्या असून दोन पॉलिस्याबद्दल पॉलिसी क्र.973658257 रुपये 2,00,000/- व पॉलिसी क्र.973734716 रुपये 2,50,000/- आजही त्यांचेकडे प्रलंबीत आहेत व वारंवार पञव्यवहार करुन सुध्दा काहीच कळवीलेले नाही. अर्जदार हिने वकीलामार्फत दि.2.7.2014 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली. गैरअर्जदार क्र.2 ने पञ दि.2.5.2014 व्दारे अर्जदाराने सि.आ.सि.आर.सी. मुंबई कडे अपील करण्याचे कळवीले. त्यामुळे गैरअर्जदारांकडून अर्जदारास अर्जात नमूद चार पॉलिस्यांची थकबाकी रक्कम रुपये 14,50,000/- व त्यावरील व्याज द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे अर्ज दाखल तारखेपासून अर्जदाराला रक्कम प्राप्त होईपावेतो देण्यात यावी. तसेच, अर्जदाराला झालेला ञास, असुविधा, आर्थिक नुकसानीबद्दल रुपये 2,50,000/- देण्याची प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 16 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे नि.क्र.12 नुसार लेखीउत्तर व नि.क्र.12-अ नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे नि.क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले आहे की, मृत पॉलिसीधारक दिलीप देवाजी भोयर यांनी एकूण सात पॉलिसी काढल्या होत्या. त्यापैकी तीन पॉलिसीची रक्कम अगोदरच अर्जदारास मिळाली आहे. चार पॉलिसी पैकी पॉलिसी क्र.973869299 व पॉलिसी क्र.973876156 मधील मृत्युदावा गैरअर्जदारांनी नाकारला आहे. गैरअर्जदार पुढे नमूद करतो की, वरील दोन्ही पॉलिसी घेतांना भरण्यात येणा-या प्रपोजल फार्म मध्ये पॉलिसीधारकाने जाणीवपूर्वक आपल्या आरोग्याविषयी माहिती लपवून ठेवली. मृत पॉलिसीधारक हा दि.21.2.2010 ते 25.10.2011 या काळात कामावर गैरहजर होता. पॉलिसी क्र.973869299 व पॉलिसी क्र.973876156 मध्ये विमाधारकाने प्रस्ताव पञामधील प्रश्न क्र.11(सी) ला योग्य उत्तर न देता चुकीची माहिती दिली हे Certificate by employer वरुन सिध्द होते आणि प्रस्ताव पञामधील डिक्लेरेशन नुसार दोन्ही पॉलिसीमधील मृत्युदावा नाकारण्यात आला. तसेच, गैरअर्जदार पुढे नमूद करतो की, पॉलिसी क्र.973658257 व पॉलिसी क्र.973734716 या early claim असल्यामुळे विचाराधीन व कार्यवाही अंतर्गत आहेत. करीता सदरहू तक्रार फेटाळण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.13 नुसार शपथपञ, व नि.क्र.15 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.14 नुसार गैरअर्जदार क्र.1 ते 3 चा लेखीउत्तर हेच गैरअर्जदार क्र.1 ते 3 चा पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली, तसेच गैरअर्जदाराने दोन पॉलिसीची रक्कम अर्जदारास दिल्याबाबत पुरसीस नि.क्र. 19 वर दाखल केली व नि.क्र. 16 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) गैरअर्जदाराने अजदाराप्रती अनुचीत व्यवहार पध्दतीचा : होय.
अवलंब केला आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदार हिचे पतीने जिवंतपणी गैरअर्जदारांकडून वेळोवेळी एकूण सात जिवन पॉलिस्या काढल्या होत्या. त्यापैकी सदर प्रकरणात वादग्रस्त चार पॉलिस्या आहेत. अर्जदार हिचे पती दि.25.10.2011 ला मरण पावले. अर्जदार ही मय्यताची पत्नी असून वारसदार आहे. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार गैरअर्जदाराची ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. गैरअर्जदाराने दाखल नि.क्र.19 वर दाखल पुरसीस व त्याचे सोबत जोडलेले अकांऊंट स्टेटमेंट व सोबत जोडलेले पञ मधून असे निष्पन्न होते की, वादातील दोन पॉलिसी क्र.973658257 व 973734716 चे भुगतान गैरअर्जदाराने अर्जदाराला सदर प्रकरण प्रलंबीत असतांना केलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे इतर दोन पॉलिसी क्र.973869299 व 97387615 चे भुगतानाबाबत नि.क्र.3 वर दाखल दस्त क्र.अ-5 व अ-6 मधील दाखील पञाव्दारे नाकारले आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने अर्जदाराचे वरील नमूद असलेली दोन पॉलिसीचे भुगतान मय्यतनी पॉलिसी काढतावेळी स्वास्था संबंधी चुकीची माहिती पुरविली या कारणास्तव नाकारले आहे. गैरअर्जदाराने सदर बाब सिध्द करणे आवश्यक होते, परंतु या संदर्भात गैरअर्जदाराने कोणत्याही साक्षपुरावा किंवा दस्ताऐवज मंचा समक्ष दाखल केलेला नाही. गैरअर्जदाराने नि.क्र.14 वर फक्त पुरसीस दाखल करुन त्यांचे लेखीउत्तर लेखीपुरावा गृहीत धरावे असे कळविलेले आहे. मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदाराने त्यांचे लेखी बयाणात घेतलेला बचाव पक्ष सिध्द करणे आवश्यक होते. परंतु, गैरअर्जदाराने त्यासंदर्भात कोणताही साक्षीपुरावा तपासलेला नाही. गैरअर्जदाराने नि.क्र.12-अ खाली दाखल दस्ताऐवज सुध्दा छायाप्रत असून त्यावर कोणतेही अधिका-याची सही नसून व त्यावर कोणत्याही सत्यप्रतीचा शेरा नाही. गैरअर्जदाराने त्या दस्ताऐवजाचे मुळ प्रत सदर प्रकरणात दाखल केलेले नाही. म्हणून गैरअर्जदाराने दाखल दस्ताऐवज ग्राह्य धरण्यासारखे नाही. तसेच, गैरअर्जदार त्याचे बचाव पक्षात कोणताही ठोस पुरावा दाखल केला नसल्याने व गैरअर्जदाराने उपरोक्त दोन पॉलिस्या विषयी अर्जदाराचा क्लेम नाकारला असल्यामुळे मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला असून न्युनतम सेवा दिली आहे असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. गैरअर्जदाराने दाखल नि.क्र.19 वर दाखल पुरसीस व त्याचे सोबत जोडलेले अकांऊंट स्टेटमेंट व सोबत जोडलेले पञ मधून असे निष्पन्न होते की, वादातील दोन पॉलिसी क्र.973658257 व 973734716 चे भुगतान गैरअर्जदाराने अर्जदाराला सदर प्रकरण प्रलंबीत असतांना केलेले आहे. म्हणून भुगतान केलेल्या पॉलिसीचे संदर्भात कोणतेही आदेश नाही. तसेच, मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने पॉलिसी क्र.973869299 व 973876156 चे विमा क्लेम अर्जदारास आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत देण्यात यावे.
(4) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/1/2015